पावसाळी भटकंती

नंदकिशोर मते
सोमवार, 19 जुलै 2021

झडझिम्मड

एकवीस जून... आंतरराष्ट्रीय योगा दिवस. दोन महिन्यांनंतर दुसरा लॉकडाउन काहीसा उघडल्यानंतर भटक्यांची चुळबुळ सुरू झाली. पावसालाही सुरुवात झाली होती. नजरेला सुखावणाऱ्या हिरवळीमुळे पायांना जोर आला होता...

‘कुठून सुरुवात करायची?’ या प्रश्नाच्या उत्तराचे असंख्य पर्याय समोर होते. त्यापैकी एक निवडला, ‘गोप्या घाट’.  वेल्ह्यातील बोपे गावाजवळील गोप्या घाटाने खाली उतरून वरंधा घाटाच्या पायथ्याच्या शिवथरघळीत जाऊन दर्शन घ्यायचे आणि आंबेनाळीने परत केळदला यायचे, असा मार्ग ठरला. भटक्यांशी फोनाफोनी झाली अन् बघता बघता वीस लोकांनी होकारही दिला. मग काय, पहाटे साडेचार वाजता आम्ही चार गाड्यातून वेल्ह्यातील घाटमाथ्यावरच्या शेवटच्या कुंबळे जवळील बोपे गावाकडे निघालो..

मोहीम तर ठरली होती, पण आदल्या दिवशीच्या दोन घटनांनी मनात थोडी धाकधूक होती. एक म्हणजे आम्ही जिकडे जाणार होतो, त्या वरंधा घाटात बिबट्याचे दर्शन झाले होते. दुसरे म्हणजे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता सांगितली होती. पण निर्णय झाला होता. 

धुक्यात हरवलेला दुर्ग तोरणा पाहत बोपे गावच्या दिशेने निघालो. पावसाने न्हाऊन निघालेले रस्ते, कडेला हिरवेगार गालिचे, पक्ष्यांचा चिवचिवाट, भातखाचरातून खळखळ वाहणारे पाणी, डोक्याएवढ्या उंचीपर्यंत खाली उतरलेले धुके आणि त्या धुक्यात हरपलेले मन... बोपे गावात शाळेच्या आवारात न्याहरी सोडून गोपाळकाला घेतला आणि गाड्या तेथेच सोडून गावा शेजारून जाणारी गोप्या घाटाची वाट धरली.

बोपे गावात फार मोठी वस्ती नाही. साधी कौलारू घरे, पण नाचणी आणि भाताच्या पिकांबरोबरच माणसांच्या मनाचीही श्रीमंती प्रचंड.. गावापासून पुढे आल्यावर एक धनगरवाडा लागला. तेथील एका माउलीला पुढचा मार्ग विचारल्यावर तिने आपल्या लेकरांनाच आमच्या सोबत धाडले. त्यांच्याशी गप्पा मारत, वाटेतले पाण्याचे झरे ओलांडत, करवंदांचा रानमेवा ओरबाडत गोप्या घाटाच्या मुखाशी पोहोचलो. येथे डाव्या हाताला थोडं उंचावर एक दगडात खोदलेले पाण्याचे टाके आहे. शेजारीच खडकात कोरलेले शिवलिंग आहे. घाटाच्या मुखाजवळच एक चिन्ह कोरलेला दगड पाहायला मिळाला. या  घाटवाटेच्या प्राचीनतेच्या खुणाच जणू.

आम्ही आता सह्याद्रीच्या धारेवर उभे होतो. ‘ढगात असणे’ काय असते याचा अनुभव तेथे घेतला. टाक्यातील पाणी पिऊन घाट उतरण्यास गर्द झाडीत शिरलो. पावसाला जोर नव्हता पण मधे मधे एखादी सर थंडावा देत होती. वाट अरुंद, सुट्या दगडांची आणि घसरडी होती. घाटाच्या थोडं मध्यावर आल्यावर सोबतच्या सुनील-अनिल बंधूंनी आम्हाला पुढची वाट समजावून आमचा निरोप घेतला. 

वाटेतल्या वनस्पतींविषयी आझाद अभ्यासपूर्ण माहिती सांगत होता, मंदारने लिड केले होते, अमित सह्याद्री घाटवाटांची माहिती सांगत होता. हरीश, ज्ञानेश्वर, निखिल, भानुदास यांनी अतिउत्साही समृद्धी, तनीष्का, ओजस, अस्मिता, देवांक, स्वरूप, ऋग्वेद या बच्चेकंपनीचा लगाम पकडला होता. राहुल, नचिकेत यांचा हशा चालू होता, सुशांत, शिवराज, सागर ट्रेकच्या आठवणी कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आपले कसब पणाला लावत होते.

गर्द झाडीतून आता मोकळ्या मैदानात आलो होतो. समोर वरंधा घाटाचे दर्शन झाले. गाडी रस्त्याने कोकणात जाताना अनेक वेळा वरंधा घाटाने प्रवास केला, परंतु त्याच्या बेलाग कड्याची दुसरी बाजू मात्र आता पाहायला मिळत होती. शेता-बांधातून खळखळणारे कुमारवयीन झरे आता प्रौढ होऊन धबधब्यात परावर्तित झाले होते. वरंधा घाटातून खाली झेपावणाऱ्या त्या धबधब्यांचा नजारा पाहून सगळेच हरखून गेले. नजरेत, हृदयात आणि कॅमेऱ्यात जमेल तेवढं ते दृश्य साठवून पुढे निघालो.

साडेअकरा वाजता आम्ही पूर्ण घाट उतरून पायथ्याच्या आंबे शिवथरच्या वाडीत पोहोचलो. आठ-दहा घरांची वस्ती, घराभोवतीच शेती. गावकऱ्यांसमोर अचानक प्रकट झालेली आमची जत्रा पाहून कुजबूज सुरू झाली. ‘बया, लेकरं बाळं घीवून घाटानी खाली आल्याती’, एका उंबऱ्यावरील कुजबूज. गावातील लहान लेकरं अंतर 

ठेवून आमच्यापाशी गोळा झाली. सागरने बॅगेतील चॉकलेट त्यांच्यासमोर धरली. थोडे आढेवेढे घेऊन त्यांनी ती घेतली आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले एक छान हसू कॅमेऱ्यात टिपून आम्ही शिवथर घळीकडे निघालो.

आंबे शिवथर, कुंभे शिवथर आणि कसबे शिवथर ही तिन्ही गावे शिवथर घळीजवळ वाघजाई याठिकाणी उगम पावणाऱ्या काळ नदीच्या किनाऱ्यावर आहेत. त्यामुळे नदी ओलांडून शिवथर घळीकडे या परिसरातून जाताना हिची साथ कायम राहते. या भटकंतीमधील सर्वात अविस्मरणीय प्रवास कुठला असेल तर तो या नदीकडेने गावातून केलेला प्रवास. मोजकीच पण अस्सल ग्रामीण कोकणी ढंगाची घरे,  त्याभोवती पसरलेली भाताच्या रोपांची हिरवी पैठणी नेसून त्यावर इंद्रायणीचे अत्तर शिंपडलेली भातखाचरे, त्या अत्तराचा सुटलेला घमघमाट, पावसाबरोबर शेतीच्या मशागतीची, भात लागवडीची चाललेली लगबग, डोक्यावर इरलं घेऊन बांधावरून जाणाऱ्या आयाबाया, पोटरीभर खोलीच्या पाण्यातून जाणाऱ्या पायवाटा आणि मधेच येणारी पावसाची सर..  अहाहा. .  मोह आवरला नाही. काळनदीच्या पाण्यात पाय सोडून बसलो. बच्चे कंपनी तर ओढ्याच्या पाण्यात उड्या मारतच भिजण्याचा आनंद घेत होती. थोड्याच वेळात शिवथर घळीजवळ पोहोचलो. 

शिवथर घळ- रामदास स्वामींनी ज्याला ‘सुंदरमठ’ असे म्हटले आहे ते ठिकाण. समर्थांनी येथे दासबोधाची निर्मिती केली. घळीच्या शेजारीच रोरावणारा धबधबा आहे.

दीड वाजला होता. दर्शन घेऊन घळीजवळच पंगत पडली, शिदोऱ्या सोडून स्नेहभोजनाचा आनंद घेतला. थोडी विश्रांती घेऊन पुढे निघालो.

परत फिरताना आंबेनळी वाटेने घाटावर जायचे असे ठरले होते. स्थानिकांना आंबेनळीची वाट विचारली तर त्यांनी, ‘वाट लय वापरात न्हाय, आन् पाऊस बी मोकार झालाय, तुमी उपांड्यानीच वर जा’ असं सांगितले. आम्ही उपांड्या घाटाकडे जाण्यासाठी रानवडीची वाट धरली.

शिवथर घळ ते रानवडी हा सात किलोमीटरचा प्रवास डांबरी सडकेने होता. उकाडाही जास्त होता. लहानांचा विचार करून एका टेम्पोवाल्याला रानवडी जवळ सोडायला सांगितले. त्याने आम्हाला त्याच्या छोटा हत्तीमध्ये अक्षरशः कोंबले. हेलकावे खात आम्ही कसेबसे रानवडी गावच्या नदी पुलाजवळ पोहोचलो. समोर उंचावर मढे-उपांड्या कडा दिसत होता. नदी पार करून आम्ही निसर्गरम्य रानवडीत पोहोचलो. हे रायगड जिल्ह्यातील गाव. तर पुढे तीन किमी अंतरावर घाट पायथ्याचे कर्णवडी हे पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील शेवटचे गाव. रानवडी ते कर्णवडी घाटरस्ता डांबरी सडकेचा. कर्णवडीपर्यंत पोहोचायला साडेपाच वाजले होते. अंधार पडायच्या आत माथ्यावर पोहोचायचे होते. हळूहळू घाटाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो. मागे वळून पाहताना ढगात हरवलेला पायथ्याचा सारा नजारा दिसत होता. पाच मिनिटे तेथेच बुड टेकले तोच अचानक धोधो पाऊस सुरू झाला. अवघ्या पाच मिनिटातच घाट रस्त्याला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले. तडकन उठलो आणि बच्चे कंपनीला घेऊन मुसळधार पाऊस आणि वाऱ्याचा सामना करत पठाराकडे निघालो. दीड तासाने पठारावर पोहोचून केळदच्या दिशेने निघालो. अंधार पडायला लागला होता. ढग अक्षरशः पायाला गुदगुल्या करत होते. ‘उंचावर गेलं की ढगसुद्धा जमिनीवर येतात’. माणसाने हे शिकले पाहिजे. मढे घाट पठार विस्तीर्ण आहे. अनेक ठिकाणी वाटेला फाटे फुटले आहेत. काही अंतर गर्द झाडीतून जावे लागते, त्यामुळे चकवा लागू शकतो.

बिबट्याचे दर्शन झाले नाही हे समाधान मनात घेऊन चालत होतो. तिघेजण बोपेगावात असलेल्या गाड्या आणण्यासाठी पुढे गेले. इतक्यात सागरने फोन केला,  “काका ,मढे पठारावर थोडे पुढे आल्यावर एक झरा लागेल, तेथे एका झुडपाजवळ मोठा अजगर मुक्काम ठोकून आहे, पायाकडे पाहत काळजीपूर्वक पुढे या”.  झालं... बच्चे कंपनी आणि बाकी मंडळींना एकत्र केले, प्रसंग सांगितला आणि जपून पुढे चालायला लागलो. आमचं सुदैव की दुर्दैव, पण अजगर बाबाचे दर्शन आम्हाला झाले नाही. (नंतर सर्पमित्रांकडून कळलं, ती घोणस होती.) केळद जवळ आले होते. मंदारने एक दुचाकी विनंती करून मिळवली आणि ट्रीपल सीट बोपे गाठले. दोघांना सोडून तो परत केळदमध्ये आला. रात्रीचे आठ वाजले होते. बोप्यावरून दोन गाड्या येऊन पुन्हा दोन गाड्या आणायच्या होत्या. या प्रक्रियेत दीड तास जाणार होता. केळदमध्येच एका दुकानदाराला विनंती करून पिठलं भाकरीचा बेत ठरवला. बच्चे कंपनी भुकेने आणि थंडीने कुडकुडत होती. दोन गाड्या आल्या, ओले कपडे बदलले, शेकोटी पेटवली आणि जेवण तयार होईपर्यंत गप्पांचा फड रंगला. दूरवर अंधारात काजवे चमकत होते. दुसऱ्याही गाड्या आल्या. अमितने अंडाभुर्जी अफलातून केली होती. ट्रेक आणि भोजनाच्या तृप्ततेचा ढेकर देऊन भिजलेल्या शरीराने आणि आठवणींने चिंब झालेल्या मनाने रात्री एक वाजता घर गाठले.

संबंधित बातम्या