सत्योत्तर राजकारणाचे युग

प्रकाश पवार
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

राज-रंग
 

‘पोस्ट ट्रुथ’ म्हणजे सत्योत्तर. ऑक्‍सफर्ड शब्दकोशाने ‘सत्योत्तर’ हा शब्द २०१६ मध्ये जगातील सर्वांत जास्त वापरला गेला, अशी नोंद केली. या आधी ‘सत्योत्तर’ हा शब्द प्रथम नव्वदीच्या दशकात (१९९२) वापरला गेला. भावना-विवेक यांच्यातील फारकत, राजकारणाचे एकपदरीकरण, तुटक-तुटक धोरणे अशी तीन सूत्रे ‘सत्योत्तर’ राजकारणाची आहेत. ही तीन सूत्रे राष्ट्रीय-राज्यांच्या राजकारणात दिसतात. या तीन सूत्रांचा प्रभाव भाजप व भाजपच्या विरोधात स्थापन होणाऱ्या महाआघाडीवर पडलेला दिसतो. लोकशाहीची पुनःस्थापना असा एक विचार महाआघाडी मांडते. त्यांचा आशयदेखील सत्योत्तर राजकारणवाचक दिसतो. कारण राजकारण हरवले गेले, राजकारण लपले आहे, राजकारणाचा शोध घेतोय, चळवळ राजकीय आहे, परंतु सत्तावादी नव्हे, राजकीय म्हणजे परिवर्तनवादी अशी राजकारणाबद्दलची मते ‘महाआघाडी’कडून व्यक्त होत आहेत. तर भाजपने या प्रयत्नाला ‘महाभेसळ’ अशी संकल्पना वापरली. असा प्रचार जोरकसपणे सुरू आहे. आक्रमक भाषणशैली दिसते. तसेच समग्र प्रश्‍नांऐवजी सुट्या-सुट्या प्रश्‍नांना जास्त महत्त्व दिले जाते. धोरणापेक्षा योजनांवर लक्ष केंद्रित केले जाते. स्त्री-पुरुष भेदभाव दिसतो. अशा अनेक घडामोडींमध्ये भावना आणि विवेक या दोन घटकातील संबंध ताणले गेले. भावनांच्या आधारे टोकाचे राजकारण केले जाते. भावनांचा प्रवास सुटा होतो. तसेच भावनाशून्य विवेकही एकटा राजकीय प्रवास करतो. भावना-विवेक यांची एकत्र जुळवाजुळव होत नाही. राजकारणात भावना-विवेक या दोन घटकांचे संबंध शत्रुभावी मांडले जातात. अशा सर्व तपशिलांचा समावेश सत्योत्तर राजकारण म्हणून केला जातो. 

भावना-विवेकाची ताटातूट 
राजकारणात भावना आणि विवेक या दोन घटकांचा समतोल राखावा लागतो. या दोन घटकांमधील खुला संवाद म्हणजे राजकारण होय. परंतु या घटकातील संवादाचा ऱ्हास सुरू झाला. नव्वदीच्या नंतरचे युग म्हणजे ‘सत्योत्तर युग’ होय. या युगामध्ये भावना आणि विवेक या दोन्ही गोष्टींचे सवतेसुभे कल्पिले गेले. त्यांच्यामध्ये अंतरायाची कल्पना केली गेली. दोन्ही घटक सुटेसुटे काम करू लागले. जर भावनांना विवेकाची जोड नसेल, तर ते राजकारण भावनाप्रधान होते. असे राजकारण अविवेकी म्हणून ओळखले जाते. याउलट विवेकाला भावनेची साथ नसेल तर राजकारण भावनाशून्य होते. म्हणजे राजकारण भावनाप्रधान (भावनावेग) आणि विवेकप्रधान (भावनाशून्य) अशा काळ्यापांढऱ्या पद्धतीने घडू लागले. भारतीय व जागतिक अशा दोन्ही पातळ्यांवरील राजकारणात विवेक-भावना घटकांमधील समतोल कमी झाला. त्यास ‘सत्योत्तर राजकारण’ असे म्हटले जाते. ‘सत्योत्तर’ ही संकल्पना सत्यानंतर म्हणजे सत्याच्या अभावाशी संबंधित आहे. या प्रकारच्या राजकारणामध्ये टोकदार भावनांना उदा. माँ, मिट्टी, मनुष्य, सर्वांत जास्त महत्त्व दिलेले असते. लोक, भूमी, नदी, पर्वत, यांचे गौरवीकरण केले जाते. उदा. इंद्रायणी नदी नव्हे, तर महाराष्ट्राची सरस्वती अशी भावनाप्रधान भाषाशैली असते. 
दुसरी बाजू विवेकाची, ती जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली जाते. अर्थातच भावना आणि विवेक या दोन गोष्टींमधील समतोल कमी कमी होत जातो. विवेकाच्या अवकाशाची जागा भावना घेतात. म्हणजे गौरवीकरण, उणीदुणी काढणे, फेक न्यूजचे राजकारण होते. अशा भावनाप्रधान ज्ञानभंडाराचा वापर केला जातो. या पद्धतीने सत्योत्तर राजकारण घडते. विशेष म्हणजे समकालीन दशकामध्ये सत्योत्तर राजकारण जास्त वेगाने घडू लागले. अमेरिका (ट्रम्प), इंग्लंड (ब्रेग्झिट) प्रमाणे ‘सत्योत्तर राजकारण’ भारतातदेखील घडते. या प्रकारचे राजकारण चोवीस तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या, सोशल मीडिया या माध्यमांनी पुढे आणले. थोडक्‍यात, भावना आणि विवेक यांचा तोल गेला. त्यामुळे राजकारण केवळ एकपदरी झाले. म्हणजे राजकारण केवळ एका प्रश्‍नाभोवती उभे केले जाते. परंतु राजकारणाचा संबंध एकापेक्षा जास्त प्रश्‍नांशी असतो. राजकारणात रोजगार, शेती, पाणी, शिक्षण, तंत्रज्ञान, आत्मसंरक्षणाचा अधिकार इत्यादी अनेक पदर एकमेकांशी संबंधित असतात, तसेच एकमेकांमध्ये मिसळलेले असतात. या अर्थाने राजकारण बहुपदरी असते. मात्र पक्षांचे कार्यकर्ते व अनुसारक (फॉलोअर) राजकारणाला केवळ एका प्रश्‍नावर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडतात. यामुळे राजकारणाचे बहुपदरी रूप नष्ट होते. राजकारण एकपदरी पद्धतीने घडवले जाते. ही राजकारणाची नवीन संकल्पना आहे. या नवीन धारणेमुळे राजकीय क्षेत्रात मोठा फेरबदल झाला. तो म्हणजे बहुपदरी राजकारण ही संकल्पना राजकारणाच्या क्षेत्रातून हद्दपार झाली. म्हणून चळवळीतील कार्यकर्ते ‘राजकारण हरवले आहे’, अशी चर्चा करतात. हा बदल भावना-विवेक यांच्यातील द्वंद्वामुळे झाला आहे. भावना-विवेक यांच्यातील महासंवादाची जागा द्वंद्वाने घेतली. हेच सत्योत्तर राजकारणाचे एक खास वैशिष्ट्य दिसते. तेच वैशिष्ट्य राजकीय पक्ष, नेते आणि मतदार यांचे दिसते. 

राजकारणाचे एकपदरीकरण 
सत्योत्तर राजकारणाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे राजकारणाचे एकपदरीकरण झाले. याची सुरुवात राजकारणातील विविध बाजू लपवण्यापासून होते. सत्ताधारी आणि विरोधक असे दोघेही हा खेळ खेळतात. यामुळे राजकारण हे लपाछपीच्या खेळासारखे सोपे दिसते. असे राजकारणाचे अतिसुलभ रूप पुढे येते. एकपदरी रूप एकाच वर्गाचे हित जपते. तसेच नेतृत्वाची एकपदरी कल्पना मांडली जाते. उदा. प्रियांका गांधी या इंदिरा गांधींपेक्षा वेगळ्या आहेत. त्या मानसशास्त्र व बुद्धिस्ट विषयातील तज्ज्ञ आहेत. तसेच त्या बौद्ध विचारांच्या पुरस्कर्त्या आहेत. त्यामुळे त्यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. परंतु त्यांचे कार्यकर्ते ‘तुमच्यात इंदिरा गांधी पाहतो’, अशी घोषवाक्‍ये देतात. इंदिरा गांधी व प्रियांकांचे असे एकत्र बोर्ड म्हणजे नेतृत्वाचे एकदरीकरण करणे होय. यांचे भान कार्यकर्त्यांना नसते, तसेच नेत्यांनाही नसते. तंत्रज्ञानाचा वापर करून विरोधक एकसाचाची प्रतिमा तयार करतात. पुलवामा अतिरेकी हल्ल्यांतील एक आरोपी आदिल अहमद डार आहे. राहुल गांधी आणि डार यांचे फोटो सॉफ्टवेअरच्या मदतीने एकत्र करून त्यांचा खोटा प्रचार सोशल मीडियावर केला गेला. वास्तविक, डार आणि गांधी यांचा त्या फोटोंशी काही संबंध नव्हता. परंतु, या दोन गोष्टी सोशल मीडियाने जोडल्या. या फेक बातमीला ‘सत्योत्तर राजकारण’ म्हटले जाते. या राजकारणातून नेतृत्वाची प्रतिमा धूसर आणि अस्पष्ट केली जाते. यामध्ये डावपेच जास्त असतात. डावपेचाचा उद्देश केवळ उपद्रवांकडे राजकारणाला खेचणे हा दिसतो. डावपेचांचा संबंध रणनीती आणि धोरण यापासून वेगळा केला जातो. उदा. कृषी धोरण, औद्योगिक धोरण, सेवा धोरण यांच्यामध्ये समतोल राहिला नाही. त्यामुळे रणनीतीच्या गळ्यांत डावपेचांचे ओढणे घातले गेले, अशी विचित्र अवस्था दिसू लागली. कारण बहुपदरी नेतृत्व म्हणजे एकाच वेळी विविध प्रश्‍नांचा वेध घेणारे नेतृत्व या काळात दिसत नाही. ही अवस्था निवडणूक आणि चळवळीच्या राजकारणात दिसते. तसेच लोकशाही संस्थांमध्ये दिसते. त्यामुळे संस्थात्मक, चळवळीचे आणि निवडणुकांचे राजकारण (लोकसभा-विधानसभा) एकपदरी झाले. म्हणून चळवळीचा दावा असतो, की राजकारण हरवले गेले. राजकीय म्हणजे परिवर्तनवादी अशी राजकारणाची धारणा राजकारणाच्या सत्तासंघर्षाला वगळते. त्यामुळे एकूण राजकारणाचे वैशिष्ट्य एकपदरी राजकारण असे घडते. 

तुटक तुटक धोरण 
‘सत्योत्तर राजकारणा’चे तिसरे सूत्र म्हणजे तुटक तुटक धोरण आखले जाते. असे धोरण हे विवेकाचा अवकाश कमी करते. त्यामुळे धोरणांचे राजकारणातील स्थान कमी कमी होत जाते. अतिमहत्त्वाच्या क्षेत्राबद्दलची धोरणे स्पष्ट आणि विवेकी नसतात. चोवीस तास बातमीच्या वाहिन्या, सोशल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा क्षेत्राबद्दल तुटक-तुटक धोरण आखले जाते. तसेच सामाजिक कल्याणाच्या योजना आखल्या जातात. परंतु योजनांखेरीज धोरण अस्पष्ट असते. यापैकी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उदाहरण जास्त बोलके आहे. सॅम पित्रोदा हे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख. त्यांनी दूरसंचार क्रांती, ज्ञान आयोग, राष्ट्रीय नवप्रवर्तन मंडळ अशी महत्त्वाची कामे केली. भाजपने शाईनिंग इंडिया-डिजिटल इंडिया, नवउद्यमी, मेक इन इंडिया अशा तंत्रज्ञानकेंद्रित योजना आणल्या. तरीही भारतात तंत्रज्ञानाचे धोरण तुटक तुटक होते. नरेंद्र मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी लहानसा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे हा निर्णय शेवटी झाला. कॉम्प्युटर, कंट्रोल रोबोट, सॉफ्टवेअर यांचा संबंध कृत्रिम बुद्धिमत्तेशी येतो. कृत्रिम बुद्धिमत्ता एक शास्त्र आणि अभियांत्रिकीकरण आहे. मानवी मेंदू कसा विचार करतो, कसे शिकतो, कसा निर्णय घेतो, समस्या कशी सोडवतो, या गोष्टी शोधून त्यांचा उपयोग कॉम्प्युटर, कंट्रोल रोबोटमध्ये केला जातो. अशी व्यवस्था (सोशल मीडिया) राजकारण घडविण्यासाठी वापरली जाते. तेव्हा एक तर अतिविवेकाचा किंवा अतिभावनांचा वापर केला जातो. यातून सक्षम तेच टिकेल अशी राजकीय धारणा तयार होते. यामुळे दोन नेत्यांच्या सभांची तुलना, त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता वापराची तुलना केली जाते. या गोष्टीचे समर्थन भाजप व काँग्रेस करते. दोन्ही पक्षांचे नेते कृत्रिम बुद्धिमत्तेचे समर्थक आहेत. परंतु, अशाप्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता विषमता निर्माण करते. रोजगार या क्षेत्रात मोठी समस्या निर्माण झाली. परंतु, त्या खेरीज स्त्री-पुरुष असाही भेदभाव कृत्रिम बुद्धिमत्ता करते. कारण या क्षेत्रातील धोरण तुटक तुटक आहे. विविध गोष्टींना आठवणीत ठेवण्याची क्षमता म्हणजे ज्ञान किंवा बुद्धिमत्ता नसते. व्यक्ती जागृत असणे व सचेतन असणे म्हणजे ज्ञान असते. माहिती ठेवण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्ता करते. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला माहीत नसलेल्या गोष्टीबद्दल भेदभाव केला जातो. ही गोष्ट संशोधनातून सिद्ध झाली आहे. जॉय बुओलामविनी (कॉम्प्युटर शास्त्रज्ञ) यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हानिकारक पद्धतीने भेदभाव करते या गोष्टीचा शोध घेतला. आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉनवर विकल्या गेलेल्या ‘एमआय’ व्यवस्थेत लिंगभेदभाव केला जातो, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. कृत्रिम बुद्धिमत्तेने पुरुषासाठी केवळ एक टक्के चूक केली. परंतु स्त्रीसाठी ३५ टक्के चुका केल्या. थोडक्‍यात, कृत्रिम बुद्धिमत्ता स्त्रीच्या मानव्य, आत्मसन्मान आणि अधिकारांचा आदर करत नाही. त्यामुळे आपोआप स्त्री-पुरुष भेदभावाच्या राजकारणाला अवकाश उपलब्ध झाला. ही घडामोड ‘सत्योत्तर राजकारणा’तील आहे. याचे कारण याबद्दल स्पष्ट धोरण नाही. सुट्या सुट्या योजना अघळपघळ आहेत. त्यामुळे भेदभावाला पुरेसा अवकाश मिळतो. यामुळे राजकारणाची परिभाषा तंत्रस्नेही पायाभूत सुविधा व तंत्रस्नेही अर्थव्यवस्था अशी असूनही त्या अंतर्गत एक भेदभाव शिल्लक राहिला आहे. हा सुट्या सुट्या धोरणांच्या राजकारणाचा परिणाम दिसतो. त्याला ‘सत्योत्तर राजकारण’ संबोधले जाते.      

संबंधित बातम्या