बहुरंगी मागासवाद

प्रकाश पवार
सोमवार, 15 एप्रिल 2019

राज-रंग
 

उत्तर प्रदेश व बिहार या हिंदी भाषिक प्रदेशातील राज्यात लोकसभेच्या बावीस टक्के - १२० जागा आहेत. यापैकी सोळाव्या लोकसभेसाठी एनडीएने ८५ टक्के जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत ही दोन्ही राज्ये महत्त्वाची आहेत. मागासवाद हा या राज्यांच्या राजकारणाचा पाया दिसतो. दोन्ही आघाड्या सरतेशेवटी मागासवादाचे तत्त्वज्ञान मांडत आहेत. बहुरंगी मागासवादाच्या पायावर आघाड्यांची रचना उभी राहिली आहे. बहुरंगी मागासवाद म्हणजे काय, हा प्रश्‍न कुतूहल निर्माण करतो. प्रत्येक पक्ष एका समूहाचा दावा करतो. तो समूह मागास कसा आहे, याचे दावे करतो (यादव मागास, बिगर-यादव अतिमागास, सवर्ण मागास, निषादाचा अनुसूचित समावेशनाचा मागासवाद, पासवान व चर्मकारांचा मागासवाद, मुस्लिमांचा मागासवाद, शेतकरी मागास, महिला मागास). यातून मागासवादाचा इंद्रधनुष्य दिसू लागला. उत्तर प्रदेशात एनडीएच्या जागा कमी झाल्या, तर बिहारमध्ये त्या वाढविण्याची भाजपची व्यूहनीती आहे. ही दोन राज्ये भाजपच्या सत्तेचा रस्ता निश्‍चित करणार आहेत. दोन्ही राज्यांतील आघाड्यांच्या कार्यपद्धतीतून ही निर्णायक घटना दिसते. या दोन्ही राज्यांत राष्ट्रीय व स्थानिक मुद्दे यांच्यात चुरस आहे. स्थानिक मागासवादाच्या परिभाषेत राष्ट्रीय मुद्दे मांडले जातात. यामुळे या दोन्ही राज्यातील राजकारणाची मध्यभूमी मागासवाद हा विचार झाला आहे. 

मागासवादाची स्पर्धा 
उत्तर प्रदेशात भाजपविरोधी आघाडी दोन स्तरांवर काम करते. त्यामुळे या राज्यात दुरंगी-तिरंगी स्पर्धा आहे. आघाड्यांची संरचना दोन प्रकारची असल्यामुळे अशा लढती उदयास आल्या. याची दोन कारणे दिसतात. एक, यासाठी विशेष आघाडीची संरचना घडवली. विशेष आघाडी म्हणजे अतिमहत्त्वाच्या नेत्यांसाठीची; उदा. राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव, अजित सिंग आदी आघाडी होय. अतिमहत्त्वाच्या नेतृत्वाची काळजी घेतलेली दिसते. या कारणासाठी स्थानिक पातळीवर केवळ दोन प्रकारच्या प्रतिद्वंद्वींमध्ये स्पर्धा आहे. तिसरा प्रतिद्वंद्वी या स्पर्धेतून वगळला आहे. म्हणजेच दुरंगी स्पर्धा होय. या अर्थाने एनडीए व युपीए यांच्यातील सत्तास्पर्धा होय. उत्तर प्रदेशात सप-बसप-रालोद यांची आघाडी असूनही त्यांनी काँग्रेससाठी अमेठी व रायबरेली या दोन जागा सोडल्या आहेत. येथे दुरंगी स्पर्धा आहे. तर काँग्रेसने सप-बसप-रालोद आघाडीसाठी सात जागा सोडल्या आहेत. म्हणजे अशा नऊ जागांवर दुरंगी स्पर्धा आहे. काँग्रेसने सातपैकी मुजफ्फराबाद, बागपत या दोन जागा रालोदसाठी सोडलेल्या आहेत. थोडक्‍यात काँग्रेस, सप, बसप व रालोद यांची ही आघाडी विशेष स्तरावरील आहे. या पातळीवर मुख्य नेते अडचणीत येऊ नयेत अशी दखल घेतली गेली. त्याबद्दल एकमत दिसते. दोन, भाजपविरोधी आघाडी मुख्य नेत्यांचे मतदारसंघ वगळून इतर मतदारसंघांत दोन गटांमध्ये विभागली आहे. हा भाजपविरोधी आघाडीचा दुसरा स्तर आहे. या स्तरावर दोन आघाड्या आहेत. एक युपीए आघाडी व दुसरी सप-बसप-रालोद आघाडी. दुसऱ्या स्तरावरील आघाडीमध्ये पक्ष, पक्षांतील दुय्यम नेते, कार्यकर्ते यांच्यात स्पर्धा आहे. त्यांच्यात प्रतिद्वंद्वी अशी खुली स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या पातळीवर नेते व कार्यकर्ते जपण्याचा प्रयत्न दिसतो. तसेच पक्षांचे आधार सुरक्षित ठेवलेले दिसतात. या पातळीवर मात्र पक्षांनी व आघाड्यांनी सोयीनुसार भूमिका घेतल्या आहेत. काँग्रेसने न्याय योजनेच्या (न्यूनतम आय योजना) आधारे गरिबांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने ही योजना अति मागास समाजांशी जोडली. काँग्रेसने बिगरयादव, बिगरकुर्मी, बिगरजाटव यांच्यावर लक्ष केंद्रित केले. मल्लाह समाज तेरा टक्के आहे. त्यांचा प्रभाव ८० पैकी फिरोजाबाद, बदायू, शाहजहांपूर, कैराना, मछलीशहर, जोनपूर, गाजीपूर, फुलपूर, गोरखपूर, सीतापूर, बालिया, देवरिया, उन्नाव, फत्तेपूर, जालौन इत्यादी २० जागांवर पडतो. यांच्याशी काँग्रेस न्याय योजनेच्या मदतीने संवाद करते. गोरखपूर, देवरिया, वांसगाव, महाराजगंज इत्यादी पंधरा जागांवर निषाद समाजाचा प्रभाव पडतो. त्यामुळे सप-बसपने निषाद पक्षातील संजय निषाद यांच्याशी आघाडी केली. तर भाजपने प्रवीण निषाद यांना पक्षामध्ये प्रवेश दिला. सपने जाहीरनाम्यात अतिमागासांसाठी विविध मुद्दे घोषित केले. गरिबांना तीन हजार पेंशन, महिलांना तीन हजार पेंशन, शेतकऱ्यांची कर्जमाफी, अहीर व गुजरात रेजिमेंटची स्थापना इत्यादी. थोडक्‍यात, काँग्रेस आणि सप-बसपने अतिमागासकेंद्रीत राजकारण सुरू केले. त्यामुळे भाजपचे अतिमागास राजकारण एकसंध राहिले नाही. भाजपकडे अतिमागासांचा केवळ एक भाग (तीस-बत्तीस टक्के) शिल्लक राहिला आहे. काँग्रेस (तीस-बत्तीस टक्के) व सप-बसपकडे (तीस-बत्तीस टक्के) असे दोन गट आहेत. मात्र, त्यांच्यात एकोपा नाही. यामुळे अतिमागासांचा भाजपचा पाठिंबा कमी झाला. परंतु, भाजपमध्येदेखील अतिमागासांचे राजकारण घडते. दुसऱ्या भाषेत अतिमागासांचे राजकारण एकसंध नाही. त्यांचे राजकारण पक्षनिहाय तीन गटांमध्ये विभागले आहे. अतिमागास या स्तराच्या खाली स्थानिक पातळीवर एचएम या घटकाचा विलक्षण प्रभाव दिसतो. एचएम म्हणजेच हिंदू-मुस्लीम घटक होय. पश्‍चिम उत्तर प्रदेशात अजित सिंहांचे जाट-मुस्लीम सलोखा (भाईचारा) मेळावे झाले. येथे बेरोजगारी, शेतीचा प्रश्‍न आहे. तेथे जीएसटी, नोटबंदी, रोजगार यापेक्षा जास्त चर्चा पाकिस्तान, बालाकोट, पुलवामा या विषयांवर होते. दिल्ली-मेरठ हायवे अपुरा व अर्धा झाला आहे. यावर चर्चा होत नाही. मेरठ, मुजफ्फराबाद, कैराना, सहारनपुर, बिजनौर येथे ३३-४२ टक्के मुस्लीम आहेत. येथे एचएम ही राजकीय संवादाची भाषा आहे. यामुळे एचएम हा घटक दुरंगी लढती घडवतो. 

बिहारचा बहुरंगी मागासवाद 
बिहारचा मागासवाद हा बहुरंगी आहे. यादव मागास, बिगरयादव अतिमागास, सवर्ण मागास, निषादांचा अनुसूचित समावेशनाचा मागासवाद, पासवान व चर्मकारांचा मागासवाद, मुस्लिमांचा मागासवाद असे विविध रंग बिहारी मागासवादाचे दिसतात. या चौकटीमध्ये बिहारचे राजकारण धरसोडीचे घडते. बिहारमध्ये एनडीए आणि युपीए अशा दोन आघाड्या मुख्य स्पर्धक आहेत. परंतु, तिची संरचनादेखील मागासवादलक्ष्यी केली गेली. येथे भाजपने नीतिशकुमारांच्या बरोबर आघाडी केली आहे (सवर्ण व बिगरयादव मागासवाद). भाजप व जदयू हे दोन समान भागीदार आहेत. कारण दोन्ही पक्ष प्रत्येकी सतरा-सतरा जागा लढवीत आहेत. या शिवाय लोजप हा एनडीएचा भागीदार आहे. त्या पक्षाच्या वाट्याला सहा जागा आल्या आहेत. मागासवादाच्या मुद्यावर भाजपपासून त्यांचे जुने सहकारी दूर झाले. लालूप्रसाद यादव व नलिन वर्मा यांनी ‘गोपालगंज से रायसीना’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात नीतिशकुमार एनडीएमधून बाहेर पडून पुन्हा महाआघाडीत येण्याचा प्रयत्न करत होते, अशी चर्चा छापली आहे. हा तपशील बरोबर आहे, अशी भूमिका शरद यादवांनी मांडली. थोडक्‍यात नीतिशकुमारांच्या धरसोडीवर लक्ष केंद्रित केले आहे (बिगरमागासवाद). भाजपने सवर्ण राजकारणावर लक्ष केंद्रित केले. कारण भाजपने सतरापैकी बारा सवर्ण, तीन यादव, एक अनुसूचित जातीगटातील उमेदवार दिले आहेत. जदयूने सतरापैकी तेरा मागास व अतिमागास उमेदवार दिले आहेत. जदयूचे राजकारण मागास-अतिमागास केंद्रित आहे. एनडीएने अनुसूचित जातीच्या सहा जागांवर पासवान चार, रविदास एक, मुसहर एक अशा उमेदवाऱ्या दिल्या आहेत. लोजपने सहापैकी तीन पासवान उमेदवार दिले आहेत. एनडीएची ही आघाडीची संरचना जातीच्या पायावर आधारित आहे; परंतु मागासवादाचा दावा दिसतो. अशीच युपीएच्या आघाडीची संरचना केली गेली. उदा. मुकेश सहनी यांचे नेतृत्व उदयास आले आहे. त्यांनी बिहारच्या राजकारणात विकसनशील इन्सान पार्टीची (विइंपा) स्थापना केली. या पक्षाचा सामाजिक आधार निषाद समूहामध्ये वाढत आहे. निषाद समूह इतर मागास या वर्गवारीतील आहे. या समूहाचा विकास झाला नाही. राजकीय पक्षांनी विकास केला नाही, अशी भूमिका घेत ‘विइंप’ने सर्वच राजकीय पक्षांपासून अंतर ठेवले. परंतु, मागासवाद ही विचारप्रणाली पक्षाची म्हणून स्वीकारली आहे. या विचारप्रणालीत विकास आणि मागासवाद अशा दोन्ही गोष्टींचे मिश्रण दिसते. या पक्षाने निषाद समूहाला इतर मागासऐवजी अनुसूचित जातीमध्ये सामील करावे, असे आंदोलन केले. त्यांनी या समूहाची प्रतिमा उपेक्षित अशी मांडली. निषाद समूहामध्ये नेतृत्वाची पोकळी आहे. कारण कॅप्टन जयनारायण निषाद यांचे नेतृत्व घसरणीला लागले आहे. शिवाय सहनी यांचे नेतृत्व तरुण आहे. युवकांमध्ये त्यांची प्रतिमा ‘प्रभावी नेता’ अशी आहे. तरुणांमधून हार्दिक पटेलप्रमाणे सहनींना प्रतिसाद मिळतो. बारा लोकसभेच्या जागांवर प्रभाव पडेल इतकी ताकद आहे, अशी सार्वजनिक चर्चा सहनी यांनी घडवली. त्यामुळे बिहाराच्या राजकारणात कुमार आणि यादवांखेरीज सहनी हा नवीन चेहरा पुढे आला आहे. मुकेश सहनी हे मुजफ्फरपूरचे आहेत. त्यांची इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे. ते लोकप्रिय सेट डिझायनर आहेत. त्यांनी देवदास, बजरंगी भाईजान या चित्रपटांचे सेट केले होते. ते व्यवसायाकडून राजकारणाकडे वळले आहेत. त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीपासून राजकारणात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत त्यांना राजकीय ओळख मिळाली. तेव्हा त्यांनी भाजपसाठी प्रचार केला होता. निषाद समूहाची मते भाजपकडे वळली होती, असा सहनीचा दावा होता. भाजपने निषाद समूहाची वर्गवारी बदलण्याची मागणी पूर्ण केली नाही, अशी मतभिन्नता भाजप आणि सहनी यांच्यात झाली. यामुळे विइंप आणि भाजप यांच्यामध्ये मतभिन्नता आहे. परंतु, विइंप हा राज्याच्या राजकारणातील एक नवीन समीकरण घडविणारा घटक ठरतो आहे. युपीएची संरचना मागासवादकेंद्रीत केली गेली. 
युपीएने सात सवर्ण उमेदवार दिले आहेत. तसेच सवर्ण मागासलेला आहे. म्हणून काँग्रेसने सवर्ण आरक्षणाला विरोध केला नाही. युपीएने रालोसपा चार, हाम पक्ष तीन, विइंप दोन व लोजद दोन असे जागांचे वाटप केले आहे. युपीएचा मुख्य घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने (राजद) वीस जागा लढविल्या आहेत. तरीही राजदमध्ये तेजप्रताप यादव व तेजस्वी यादव यांच्यात नेतृत्वावरून सुंदोपसुदी दिसते. तेजप्रताप यांनी लालू-राबडी असे एक राजकीय व्यासपीठ स्थापन केले. सरतेशेवटी त्यांनी जयप्रकाश जनता दलांशी जुळवून घेतले (पंकज सहाय). सारण, जहानाबाद, शिवहार, हाजीपूर येथे तेजप्रतापचे राजदबरोबर मतभेद आहेत. हा फुटीरतावाद लालूप्रसाद यादव यांच्या घराण्यामधील आहे. यादव घराण्यामध्ये नेतृत्वावरून स्पर्धा वाढलेली आहे. याखेरीज सवर्ण एकता मंचाने पाटलीपुत्र, मुजफ्फरपूर व नालंदा येथे वेगळी निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे (विवेक शर्मा). यामुळे बिहारच्या राजकारणात अस्थिरता दिसते. या अस्थिरतेचा सर्वांत मोठा राजकीय फायदा भाजपला मिळण्याची शक्‍यता आहे. एकूण बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांचे राजकारण अस्थिर आहे. या अर्थाने राजकारणाची दिशा निश्‍चित दिसत नाही.
 

संबंधित बातम्या