महारणनीतिकार नवबुद्धिजीवी 

प्रकाश पवार
सोमवार, 22 एप्रिल 2019

राज-रंग
 

आधुनिक भारत (१९४७-१९९०) आणि नवभारत (१९९१- २०१९) अशा दोन टप्प्यात भारतीय राजकारण विभागले गेले. आधुनिक भारताच्या राजकारणाची मुख्य धारणा नेहरूंची होती. तेव्हा विज्ञानाचा उपयोग सामाजिक-आर्थिक समस्या सोडविण्यासाठी झाला. थोडक्‍यात, राज्यसंस्था विज्ञानाला लोककल्याणाची कामे करण्यास भाग पाडत होती (होमी बाबा, साराभाई). यापेक्षा वेगळी भूमिका नवभारताच्या राजकारणाची आहे. नवभारताचे राजकारण दोन टप्प्यात घडले. नवभारताचे आरंभीचे राजकारण म्हणजे खाऊजा (खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) राजकारण होय. आरंभीच्या नवभारताचे राजकारण राजीव गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, अजित सिंग आदींनी घडवले. हा नवभारताच्या राजकारणाचा आरंभीचा टप्पा होता (१९९१-२०१०). त्यांची सूत्रे बुद्धिजीवी समूहाकडे होती. तो टप्पा मागे पडला. त्यानंतर २०११ पासून दुसरा टप्पा सुरू झाला. नवभारताच्या आरंभीच्या टप्प्यापेक्षा वेगळी भूमिका समकालीन दशकातील दिसते. कारण नवभारताच्या दुसऱ्या टप्प्यावर नवबुद्धिजीवी समूह त्यांच्या हेतूप्रमाणे राजकारणाला आकार देतो. या वर्गाने राजकारण घडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले (अरविंद केजरीवाल, प्रशांत किशोर). यांना नवबुद्धिजीवी असे संबोधिले आहे. समकालीन दशकावर या नवबुद्धिजीवी वर्गाचा प्रभाव दिसतो. नवबुद्धिजीवी वर्ग कोठून उदयास आला. त्यांनी राजकारण कसे घडवले. त्यांची रणनीती कोणती आहे. यांचा वेध येथे घेतला आहे.  

आरंभीचे राजकारण 
नव्वदीच्या दशकानंतर हळूहळू नवबुद्धिजीवी समूह उदयास आला. नवबुद्धिजीवी वर्गांचा उदय आयआयटी (२३ संस्था), आयआयएम (२० संस्था), एनआयटी (३१ संस्था) अशा व इतर संस्थांमधून झाला. दुसऱ्या शब्दांत नवबुद्धिजीवी वर्ग म्हणजे ‘आयआयटी’सारख्या संस्थांमधून शिक्षण घेतलेला तरुण वर्ग होय. हा वर्ग आकाराने लहान आहे. परंतु समकालीन ज्ञान व तंत्रज्ञानावर त्यांचे नियंत्रण आहे. नव्वदीच्या दशकापासून राजकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आत्मभान त्यांना आले (अजित सिंग चौधरी, जयराम रमेश इत्यादी). परंतु त्यांना स्वतंत्र राजकारण घडविता येत नव्हते. त्यांना आर्थिक क्षेत्रातील बुद्धिजीवीशी समझोते करावे लागले (मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, जयराम रमेश, अजित सिंग). परंतु समकालीन दशकाच्या सुरुवातीपासून आर्थिक क्षेत्रातील बुद्धिजीवी व हा नवबुद्धिजीवी यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली. तेव्हा काँग्रेसच्या पुढाकाराखालील युपीएचे सरकार सत्तेवर होते. तेव्हाचे पंतप्रधान कार्यालय, सल्लागार मंडळ यांच्याशी नवबुद्धिजीवी वर्गाची तीव्र मतभिन्नता होती. या गोष्टीचा परिणाम म्हणजे बॅंकर्स व तंत्रज्ञ युपीएच्या विरोधात एकत्र आले. दुसऱ्या शब्दांत मनमोहन सिंग राजवटीमधील बुद्धिजीवी वर्गांच्या, जुन्या काँग्रेसच्या, मासबेस राजकारणाच्या विरोधात नवबुद्धिजीवी वर्ग एकत्र आला. त्यांनी युपीए सरकारच्या विरोधात कृती केली. नवबुद्धिजीवी वर्गाची राजकारणातील मोठी झेप काँग्रेसला सत्तेवरून पायउतार करण्याची होती (२०११-२०१२). या दरम्यान अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू झाले. त्यास युपीए विरोध म्हणून नवबुद्धिजीवी वर्गाने पाठिंबा दिला. यातून नवबुद्धिजीवींचा आत्मविश्‍वास वाढला. तसेच नवबुद्धिजीवी आणि काँग्रेस पक्ष, सरकार यांच्यातील ही आरंभीची लढाई झाली. नवबुद्धिजीवींचे काँग्रेस विरोधीचे आरंभीचे युद्ध का? हा प्रश्‍न उपस्थित होतो. या प्रश्‍नाचे धागेदोरे काँग्रेस पक्ष, प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीमध्ये गुंतलेले होते. त्या राजवंशाला त्यांचा विरोध आहे. तसेच नवबुद्धिजीवींना राजकीय महत्त्वाकांक्षा होत्या. मात्र, संसदेचे महाद्वार नवबुद्धिजीवींसाठी खुले नव्हते. जवळपास नव्वद टक्के तरुण खासदार घराणेशाहीमधील होते. दहा टक्के म्हणजे किरकोळ अवकाश इतरांना उपलब्ध होता. त्यामुळे संसदेमध्ये शिरकाव करण्यासाठीची ही क्रांतिकारी घटना होती. संसदेच्या बंद महाद्वाराच्या विरोधातील हा उठाव होता. अण्णा हजारे हे केवळ निमित्त झाले. खरी ताकद नवबुद्धिजीवी होती. ती केवळ मध्यमवर्ग स्वरूपाची नव्हती. तसेच ती केवळ परंपरागत बुद्धिजीवी स्वरूपाची नव्हती. यांचे आत्मभान जवळपास सात वर्षांनंतर अजूनही आले नाही. ते नवबुद्धिजीवी समूहाचे राजकीय बंड होते. यांचे उत्तम उदाहरण म्हणजे अण्णांच्या आंदोलनापाठोपाठ आम आदमी पक्षाची स्थापना झाली. त्यांचे नेतृत्व आयआयटीमधील केजरीवालांकडे गेले. त्यांनी नरेंद्र मोदी या राजकीय नेत्यांच्या विरोधात झुंज दिली. दिल्ली, हरियाना, पंजाब येथे पक्षांच्या शाखा सुरू केल्या. दिल्ली विधानसभेच्या दोन निवडणुका लढविल्या. दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपचे पानिपत केले. यामध्ये विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जुने बुद्धिजीवी असलेले योगेंद्र यादव बाहेर फेकले गेले. नवबुद्धिजीवी असलेले केजरीवाल सत्ताधारी झाले. यातून आपणास हे समजते, की नवबुद्धिजीवी हा राजकीय महत्त्वाकांक्षाधारी म्हणून पुढे आला. तो केवळ मध्यमवर्गीय नव्हता. त्याचे ज्ञान हे परंपरागत नव्हे तर विज्ञान, तंत्रज्ञानाचे होते. त्यांना राजकारणात शिरकाव करायचा होता. त्यासाठी त्यांनी भारतीय राजकारणाच्या महाद्वारावर पहिली धडक दिली. मात्र त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणातील महाद्वाराऐवजी दिल्ली राज्याचा दरवाजा उघडला. पुन्हा नवीन प्रश्‍न उपस्थित होतो, की नवबुद्धिजीवींचे राष्ट्रीय राजकारणात पानिपत झाले का? यांचे उत्तर असे आहे, की नवबुद्धिजीवींचे राष्ट्रीय राजकारणात पानिपत झाले नाही. राष्ट्रीय राजकारणाचे महाद्वारदेखील नवबुद्धिजीवींनी उघडले. त्यासाठी नवबुद्धिजीवींनी भाजपच्या रथाचे सारथी म्हणून काम केले. 

नवबुद्धिजीवी सारथी 
नवबुद्धिजीवी वर्ग नरेंद्र मोदींच्या रथाचा सारथी झाला (२०१४). श्रीकृष्णाच्या भूमिकेत नवबुद्धिजीवी गेले. राजकीय पक्षांची भूमिका अर्जुनासारखी दिसते. कारण अण्णा आंदोलनांच्या पाठोपाठ भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले. नवबुद्धिजीवी वर्गाने त्यांच्या इच्छा-आकांक्षा नरेंद्र मोदींमध्ये पाहिल्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या बरोबर नेतृत्वाचे सादरीकरण, आकर्षक घोषणा, ३ डी प्रचार तंत्र, चाय पे चर्चा यासारख्या नव्या संकल्पना वापरल्या. प्रथमच जनाधार असलेल्या नेत्यांच्या डावपेचांऐवजी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील बुद्धिजीवींचे डावपेच वापरले गेले. डेटा विश्‍लेषण करण्याचे प्रचंड कौशल्य नवबुद्धिजीवी वर्गाकडे आहे. इंडियन पोलिटिकल ॲक्‍शन कमिटी (आयपॅक) ही संस्था नव्याने त्यांनी स्थापन केली. सीएसडीएस ही संस्था लोकशाही आणि निवडणुकांचा अभ्यास करते. या संस्थेत एक बुद्धिजीवी वर्ग आहे. त्यांच्यापेक्षा वेगळी संस्था आयपॅक म्हणून काम करू लागली. आयपॅक ही संस्था असण्यापेक्षा कंपनी आहे. या संस्थेच्या संस्थापकांपैकी एक प्रशांत किशोर आहेत. ते गणितातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी अंकात्मक (डिजिटल) ज्ञानाचा उपयोग डावपेच आखण्यासाठी केला. आयपॅकमध्ये आठशे नवबुद्धिजीवी काम करतात. म्हणजे जवळपास एका विद्यापीठाइतकी वैचारिक ताकद दिसते. ही कंपनी पक्षांना निवडणुकीमध्ये सल्ला देते. निवडणूक जिंकण्यासाठी प्रचार यंत्रणा उभी करते. शिवम शंकर सिंग, रजत सेठी, शुभ्रास्था शिखा यासारख्या तंत्रज्ञांनी भाजपसाठी काम केले (२०१४). सोळावी लोकसभा जिंकण्यात आयपॅकची कामगिरी मोठी होती. त्यानंतर प्रशांत किशोरने काँग्रेसला पंजाब विधानसभा जिंकून दिली. तर रजत सेठी व शुभ्रास्थाने भाजपचा पूर्वांचल राज्यांमध्ये उदय घडवून आणला. मणिपूर, आसाम, त्रिपुरा ही राज्ये त्यांनी भाजपला जिंकून दिली. रजतने आयआयटी खडकपूरमधून इंजिनिअरिंग करून हॉवर्ड विद्यापीठातील केनेडी स्कूल ऑफ लोकप्रशासन मधून शिक्षण घेतले. त्यांनी दि लास्ट बॅटल ऑफ सराईघाट दि स्टोरी ऑफ दि बीजेपीज राइज इन दि नॉर्थ ईस्ट हे पुस्तक लिहिले. शिवम शंकर सिंग हे बिहारचे आहेत. त्यांनी दिल्ली व मिशिगन विद्यापीठ, अमेरिका येथून शिक्षण घेतले. त्यांनी आयपॅक संस्थेच्या माध्यमातून भाजपसाठी व्यूहनीतीकार म्हणून काम केले. नवबुद्धिजीवींची ताकद तंत्रज्ञानावरील पकडीमध्ये आहे. अंकांसंबंधीचे अचूक ज्ञान, डेटा विश्‍लेषणाची क्षमता त्यांच्याकडे आहे. हा नवबुद्धिजीवी वर्ग नियोजनपूर्वक काम करतो. ते निवडणुकीच्या आधी एक-दोन वर्षे, सहा महिने पक्षाशी करार करतात. त्यासाठी प्रचार यंत्रणा राबवितात. भौगोलिक, ऐतिहासिक, आर्थिक, सामाजिक, लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास ते करतात. स्थानिक लोकांशी त्यांच्या समस्यांबाबत 
सतत बोलत राहतात. ते डेटाचा हत्यार म्हणून वापर करतात. सरकारी योजनांचा अभ्यास करतात. पक्षांचा व उमेदवाराचा जनाधार किती टक्के आहे, निवडून येण्यासाठी किती टक्के मतांची गरज आहे. या मतांमध्ये गॅप किती टक्‍क्‍यांचा आहे. गॅप भरून काढणारी मते मिळवून देण्यासाठी ते व्यूहरचना आखतात. त्यासाठी लोकांना पटतील अशी छोटी छोटी प्रारूपे तयार करतात. उदा. किसान यात्रा, मन की बात, चाय पे चर्चा, आसाम-कश्‍मीर बन रहा है. अशा प्रारूपाची आखणी त्यांनी केली. त्याची अंमलबजावणी करण्याचा दिवस, वेळ, ठिकाण, मार्ग ते निश्‍चित करतात. नेत्याची प्रतिमा सकारात्मक घडवितात. आघाड्या घडवून आणतात किंवा आघाड्या तोडतात. घोषणा पत्र तयार करतात. नेत्यांचा लोकांशी थेट संपर्क वाढविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. नेत्यांना भाषणे लिहून देतात. हा नवबुद्धिजीवी वर्ग राजकारणात सक्रिय झाल्याने पारंपरिक पक्षाचे, नेत्याचे निवडणूक तंत्र-मंत्र-यंत्र कुचकामी झाले. मासबेस असणाऱ्या नेत्यांपुढे व पक्षांपुढेही मोठे आव्हान यांनी उभे केले. पक्ष व नेतृत्वाच्या हातातून निवडणुका नवबुद्धिजीवी वर्गाच्या हातात गेल्या. ते राजकारणातले गेम चेंजर व व्यवस्थापक झाले. त्रिपुरामध्ये माणिक सरकार नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्षाचे सरकार होते (पंचवीस वर्ष). काँग्रेसला येथे सत्तांतर करता आले नाही. परंतु, नवबुद्धिजीवी वर्गाने सत्तांतर घडवले. त्रिपुराचे आर्थिक बजेट छोटे व राज्य लहान होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत होते. नवबुद्धिजीवी वर्गाने हा असंतोष ओळखला. 

डेटाचा वापर करून भाजपला नवा वेतन आयोग घोषित करायला लावला. सरकारांची भूमिका गरीब व राज्याला परवडणार नाही. परंतु लोकांनी याकडे दुर्लक्ष करीत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी भाजपला मतदान केले. यामुळे राजकीय नेतृत्व परावलंबी बनले. त्यांच्याकडे आत्मविश्‍वास दिसत नाही. त्यांचा अजेंडा, भाषण, मुद्दे तयार करणारा नवबुद्धिजीवी वर्ग पुढे आला. हा नवबुद्धिजीवी वर्ग सत्तेमध्ये सहभागासाठी प्रयत्न करतो आहे. निर्णय-निश्‍चिती प्रक्रियेमध्ये भागीदारीची मागणी करतो आहे. कारण लोकसभेतील तरुण खासदारांपैकी ९५ टक्के खासदार घराण्यांमधील आहेत. यामुळे नवबुद्धिजीवी वर्गाकडे क्षमता असूनही संसदेचे महाव्दार बंद आहे. समांतर सत्तेचा दावा नवबुद्धिजीवीचा दिसतो. या अर्थाने नवबुद्धिजीवी व राजवंशी एकमेकांचे प्रतिद्वंद्वी झाले. नवबुद्धिजीवी केवळ असा अंतराय उभा करू शकतात. त्यांना थेट आव्हान देत नाही. परंतु एक रणनीतीचा भाग म्हणून दरम्यानच्या काळात ते पक्ष आणि नेत्यांचे सारथी झाले. थोडक्‍यात, सूर्यापासून निर्माण झालेल्या महान राजवंशाला ज्ञान-तंत्रज्ञानातून उदयास आलेल्या नवबुद्धिजीवींनी आव्हान दिले. तंत्रज्ञानाच्या छोट्या तराफ्यावर बसून हा नवबुद्धिजीवी वर्ग राजकारणाचा महासागर ओलांडू इच्छितो, हे भान त्यांना आले.   

संबंधित बातम्या