काश्मिरीयत
राज-रंग
भारतीय राजकारणात काश्मिरीयत, पंजाबियत अशा काही संकल्पना लोकशाहीला पूरक आहेत. यापैकी काश्मिरीयत ही संकल्पना हिंसेचा प्रतिकार करते. जम्मू-काश्मीरमधील राजकीय प्रतिकाराची सर्वांत मोठी ताकद काश्मिरीयत संकल्पनेत दिसते. ही संकल्पना बिगर लोकशाही स्पर्धेला लोकशाही स्पर्धेचा आकार देते. या अर्थाने जम्मू-काश्मीरमधील लोकशाहीची मुळे, काश्मिरीयत या संकल्पनेमध्ये गुंतलेली आहेत. ही संकल्पना लोकशाहीबरोबर मानवता, बंधुभाव, मैत्रीभाव या गोष्टींशी संवादी आहे. लोकशाहीमधील निवडणुकांमध्ये खुली सत्तास्पर्धा असते. या सत्तास्पर्धेला काश्मिरीयत मानवी चेहरा देते. काश्मिरीयत संकल्पनेचा संघर्ष टोकदारपणे सामाजिक अंतरायांशी होतो. सामाजिक अंतराय म्हणजे सामाजिक घटकांमध्ये परस्परविरोधी भूमिका घेणे उदा. हिंदू-मुस्लिम. काश्मिरीयत बहुविविधतेला पाठिंबा देते. परंतु, सामाजिक अंतरायांतील शत्रुभावी सत्तास्पर्धा स्वीकारत नाही. काश्मीरच्या संदर्भात काश्मिरीयतचे चर्चाविश्व धूसर झाले. केवळ सामाजिक अंतरायांमधील हेत्वारोपांपुरती चर्चा होते. मात्र काश्मिरीयत तिचे काम करत राहते. निवडणुकीमध्ये काश्मिरीयतच्या पुढे प्रचंड मोठे आव्हान असते. तसेच दरम्यानच्या काळात मोठी आव्हाने होती. परंतु, तरीही काश्मिरीयत चिवटपणे कृतिशील दिसते. जम्मू-काश्मीरमधील राजकीय घडामोडींचा परिणाम जवळपास सर्व लोकसभेच्या जागांवर होतो. या अर्थाने भारतीय राजकारणात जम्मू-काश्मीरला विलक्षण महत्त्व असते. म्हणून काश्मिरीयत संकल्पनाही महत्त्वाची ठरते.
काश्मिरीयतचा राजकीय व्यवहार
ऐंशीच्या दशकापर्यंत सहिष्णुतेने सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणे हा काश्मिरीयतचा परंपरागत अर्थ होता. या दशकामध्ये (१९८८) स्पष्टपणे या अर्थाला ‘काश्मिरीयत’ म्हटले गेले. या संकल्पनेचा आशय शांततावादाशी व सामूहिकतेशी संवादी आहे. मानवता, लोकशाही व हिंदू-मुस्लिम मैत्रीभाव ही तीन सूत्रे म्हणजे काश्मिरीयत संकल्पना होय. जम्मू-काश्मीर खोरे व लडाख या तीन भागात मिळून सहा लोकसभेच्या जागा आहेत. येथे काश्मिरीयत ही संकल्पना राजकीय स्वरूपाचे काम करते. अर्थातच ही संकल्पना आदर्शवादी आहे. तसेच ती कल्पिलेली आहे. परंतु, या संकल्पनेचा प्रभाव जम्मू-काश्मीरच्या राजकारणात वेळोवेळी दिसतो. बहुसंख्याकवादापेक्षा बहुलतेला काश्मिरीयत स्वीकारते. जम्मू हिंदू बहुल, काश्मीर खोरे मुस्लिम बहुल आणि लडाख बौद्ध बहुल भाग आहे. या तिन्ही भागांमध्ये खुली स्पर्धा असते. एकूण तीन भागात मुस्लिम बहुसंख्य असला, तरी त्यांचे राजकारण वेगवेगळे आहे (६४ टक्के). शिवाय जम्मूमध्ये व लडाखमध्ये बौद्ध बहुसंख्य आहेत. त्यामुळे तीन सामाजिक सत्ताकेंद्रे आहेत. केवळ एक समूह वरचढ नाही, अशी धारणा काश्मिरीयतची आहे. त्यामुळे राजकीय-सामाजिक देवाणघेवाण या तत्त्वाला, या संकल्पनेत पुरेसा अवकाश उपलब्ध आहे. महाराजा हरी सिंग यांनी त्यांच्या शासन व्यवहाराचे सूत्र सहिष्णूतेबरोबर पुढे नेण्याचे ठेवले होते. राजकीय पक्षांकडून काश्मिरीयतचा दृष्टिकोन स्वीकारला गेला (१९८८). यांची उदाहरणे इतिहासात दिसतात. विशेष म्हणजे, अटलबिहारी वाजपेयी यांनी जम्मू भागात काश्मिरीयत ही संकल्पना सामाजिक सौहार्दवाचक आहे, अशी भूमिका घेतली होती. मानवता, लोकशाही व हिंदू-मुस्लिम मैत्रीभाव या त्रिसूत्राचे राजकारण अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वीकारले होते (१९९९-२००४). थोडक्यात, राजकीय पक्षांवर व शासन व्यवहारावर या संकल्पनेचा प्रभाव होता. तसेच ही संकल्पना देशाच्या सीमा ओलांडणारीदेखील आहे.
काश्मिरीयत ही संकल्पना जम्हूरियेत आनिती या कमाल पाशा यांच्या विचारांशी सुसंगत संकल्पना आहे. ही संकल्पना लोकतंत्र, मानवतावाद आणि सामाजिक सलोख्यांचे प्रतीक आहे, अशी पाशांची धारणा होती. तुर्की भाषेत या तीन सूत्रांना जम्हुरियत म्हटले जाते. आनिती म्हणजे स्मारक किंवा स्मृती होय. ही एक सामाजिक जाणीव आहे. म्हणून काश्मिरीयत ही संकल्पना शतकानुशतके सलोखावाचक अर्थाने राहिलेली आहे. ही संकल्पना सामाजिक अंतरायांचे राजकारण कमीतकमी करते. काश्मिरीयत सामाजिक अंतरायांच्यामध्ये मानवता, मैत्रीभाव, बंधुभाव ही मूल्ये सामील करते. त्यामुळे सामाजिक अंतराय परस्परविरोधी भूमिका घेत नाहीत. असूया, द्वेष, हेत्वारोप आणि चुरस यांना नियंत्रित ठेवले जाते. निवडणुकीतील खुली स्पर्धा लोकशाही मूल्यांचा भाग म्हणून उमदेपणाने स्वीकारण्यास काश्मिरीयत भाग पाडते. हे जम्मू-काश्मीरच्या राजकारणाचे खास वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य सामाजिक अंतरायांच्या वादळात अस्पष्ट दिसू लागते. कधी कधी सामाजिक अंतरायांच्या वादळातील धुराळ्यामुळे काश्मिरीयत संकल्पनेचा व्यवहार दिसत नाही. परंतु काश्मिरीयत संकल्पना तिचे काम करते. उदा. या भागातील जम्मू-पुंछ, उधमपूर-डोडा या दोन मतदारसंघांवर भाजपचे नियंत्रण आहे. या दोन्ही मतदारसंघांत काँग्रेस व भाजप अशी दुरंगी स्पर्धा आहे. या भागात रजपूत डोग्रा समाज प्रभावी आहे. उधमपूरमध्ये रजपूत डोग्रा समाजात सत्तास्पर्धा आहे. ही स्पर्धा काँग्रेस व भाजपपेक्षा रजपुतांच्या अंतर्गत जास्त आहे. या मतदारसंघात नेका, पीडीपीचा काँग्रेसला पाठिंबा आहे. काँग्रेसने महाराजा हरी सिंगांचा पणतू विक्रमादित्य सिंग यांना उमेदवारी दिली आहे. हे काँग्रेसचे नेते कर्ण सिंगांचे चिरंजीव आहेत. त्यांचा दुसरा मुलगा भाजपमध्ये आहे. शिवाय डोग्रा स्वाभिमान संघटनेचे चौधरी लालसिंग उमेदवार आहेत. यांच्यातील पक्षीय स्पर्धा आणि सत्तास्पर्धा ही लोकशाही चौकटीत घडते. जम्मू-पुंछमध्ये काँग्रेसचा उमेदवार रमण भल्ला हे आहेत. लडाखमध्ये एक जागा आहे. हा मतदारसंघ सर्वांत मोठा आहे. येथे बौद्ध मते निर्णायक आहेत. गेल्यावेळी भाजपने बौद्धांशी जुळवून घेतले होते.
काश्मीर खोऱ्यात तीन लोकसभा मतदारसंघ आहेत. अनंतनाग-पुलवामा, बारामुल्ला, श्रीनगर-बडगाम या तीन मतदारसंघात मुस्लिम विरुद्ध मुस्लिम स्पर्धा आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाची मतपेटी दोन गटांमध्ये विभागली जाते. नेका, काँग्रेस व पीडीपी अशी येथे आघाडी नाही. त्यामुळे येथे चौरंगी सत्तास्पर्धा आहे. हा तपशील काश्मिरीयत-वाचक आहे. या तपशिलाचा अर्थ लावावा लागत नाही. तो समतोल विवेक बुद्धीला समजतो. जम्मू-काश्मीर लोकशाही मूल्य म्हणून मतदान प्रक्रिया स्वीकारतो. श्रीनगरमध्ये मतदान कमी झाले (१४.१ टक्के). बडगाममधील चाडूरा व श्रीनगरमधील डाऊनटाउनमध्ये दगडफेक झाली. या बरोबरच लोकशाहीची जीवनपद्धती आणि मानवी जीवनाची पद्धती यांचे नाते जुळविणाऱ्या घडामोडीही घडल्या आहेत. त्या चार महत्त्वाच्या घडामोडी काश्मिरीयतशी सुसंगत आहेत. एक, अनंतनाग येथे गुलाम अहमद मीरने काश्मिरी पंडितांकडे धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यांवर मते मागितली. विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मतदानासाठी विशेष मतदान केंद्राची (बूथ) व्यवस्था केली होती. तेव्हा काश्मिरी पंडितांनी मतदान पद्धतीवर विश्वास व्यक्त केला. जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत मतदान करणार अशी भूमिका काश्मिरी पंडितांकडून नोंदविली गेली. मानवी जीवन आणि मतदानाचा हक्क यांचा मेळ घातला गेला. विस्थापित काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाची चर्चा प्रचारात झाली. दोन, अलगतावादी संघटनांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. श्रीनगरमध्ये हिंसा झाली होती. श्रीनगरमधील ८५७ बूथ अतिसंवेदनशील होते. तरीही लोक मतदानासाठी घराबाहेर पडले. त्यांनी मतदान पद्धतीचा म्हणजे लोकशाहीचा आदर केला. विशेष म्हणजे उधमपूर लोकसभा मतदारसंघात सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. तीन, विवाहाच्या वेळचे कपडे घालून काही मतदार मतदानाला आले. मतदानाचा हक्क आणि विवाह पद्धतीने नवीन जीवनपद्धती स्वीकारणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याकडे मतदारांनी लक्ष वेधून घेतले. लोकशाही ही जीवनपद्धती आहे, असा दृष्टिकोन प्रतीक स्वरूपात अभिव्यक्त केला गेला. चार, जम्मू-काश्मीर हा हिंदू, मुस्लिम आणि शिखांचा आहे. हा संमिश्र भारत आहे, अशी भूमिका महबूबा मुफ्तींनी प्रचारात नोंदविली. शारदापीठ यात्रा १९४८ पासून बंद होती. सेवा शारदा कमिटीचे रवींद्र पंडित यांनी धार्मिक सलोख्यांचा मुद्दा मांडला. कारतापूर कॉरिडॉर प्रमाणे शारदापीठ कॉरिडॉरची संकल्पना मांडली. त्यांचे समर्थन महबूबा मुफ्तींनी केले. हा मुद्दा हिंदू-मुस्लिम बंधुभावाचा आशय अभिव्यक्त करतो. त्यामुळे काश्मिरीयत संकल्पनेचा व्यवहार सहमती वाढविणारा व संमतीचे मुद्दे पुढे आणणारा दिसतो.
काश्मिरीयतपुढील आव्हाने
काश्मिरीयत संकल्पनेच्यापुढे सर्वांत मोठे आव्हान सामाजिक अंतरायांचे आहे. सामाजिक अंतराय ही संकल्पना परस्परविरोधी धर्म, जात, वंश, संस्कृती अशा पद्धतीने राजकीय चर्चाविश्वाचा भाग असते. राजकीय पक्ष आणि नेते सामाजिक अंतराय उभे करतात. सामाजिक अंतरायांना धारदार करतात. सुप्त आणि सौम्य सामाजिक अंतरायांचा राजकारणात अंडरकरंट म्हणून उपयोग करून घेतला जातो. या प्रक्रियेत सामाजिक अंतरायांमुळे समूहांचे संबंध शत्रुभावी स्वरूप धारण करतात. ही घडामोड जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू विरोध, मुस्लिम विरोध, जम्मू विरोध, घाटी विरोध, जम्मू-काश्मीर व लडाख यांचा परस्परांना विरोध, दिल्ली विरोध, स्वायत्ततेच्या मागणीला विरोध, संमिश्र राष्ट्रवादास विरोध अशा नानाविध घडामोडी आणि विचार काश्मिरीयतपुढील आव्हाने आहेत. जम्मू-काश्मीर या राज्यात मुस्लिम बहुसंख्य (६४ टक्के) आहेत. या लोकसंख्येच्या धार्मिक धुव्रीकरणाच्या भोवती राजकारण केले जाते. म्हणजे जवळपास राष्ट्रीय पक्ष चाळीस टक्के राजकारणावर समाधानी असतात. तर प्रादेशिक पक्ष साठ टक्के राजकारणाचा अवकाश व्यापतात. पुन्हा मुस्लिमेतर पक्षांमध्ये स्पर्धा असते. त्यामुळे भाजप-काँग्रेस असे मुख्य पक्ष त्यांचे राजकारण जवळपास हिंदू संकल्पनेभोवती घडवितात. यामुळे येथे राजकारण घडविताना काँग्रेस मवाळ हिंदुत्वाची संकल्पना स्वीकारते. भाजप आक्रमक हिंदुत्वाची संकल्पना मांडते. मवाळ आणि आक्रमक हिंदुत्वामध्ये सरतेशेवटी उद्देश राजकीय असतो. निवडणुकीत हिंदू मतपेटी तयार करण्यासाठी या दोन्ही संकल्पना काम करतात. मवाळ हिंदू आणि आक्रमक हिंदू यांचे नाते निवडणुकीतील पक्षीय स्पर्धेचे असते. त्यामुळे या दोन्ही संकल्पना प्रतिद्वंद्वी अशा स्वरूपात राजकारण घडवतात. निवडणुकीतील स्पर्धा खुली असते. त्यामुळे या दोन्ही संकल्पना एकमेकींना शत्रुभावी ठरवितात. शत्रुभावी ठरविण्यासाठी पुन्हा उपसंकल्पनांची पेरणी केली जाते. उदा. नकली धर्मनिरपेक्षता, हिंदू दहशतवाद, देशद्रोह इत्यादी. या गोष्टीमुळे सरतेशेवटी चाळीस टक्के राजकारण एका पक्षाकडे सरकते. त्यापेक्षा जास्त राजकारण घडत नाही. ही एक काश्मिरीयत संकल्पनेला राजकीय व्यवहारातील मर्यादा पडली आहे. राष्ट्रीय पक्ष जम्मू-काश्मीरमधील स्थानिक पक्षांबरोबर आघाडी करतात. यामुळे मवाळ-आक्रमक हिंदुत्वाची धार कमी होते. हिंदू-मुस्लिम मते एकमेकांकडे वळविण्याची प्रक्रिया घडते. भाजप आणि पीडीपीने या पद्धतीचा प्रयोग केला होता. परंतु, हा प्रयोग सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपने मोडला. काँग्रेस, नेका आणि पीडीपीने काही मतदारसंघांत सतराव्या लोकसभा निवडणुकीत घोषित व अघोषित असा प्रयोग केला आहे. यातून काही प्रमाणात काश्मिरीयत काम करते. स्वतंत्रतावादी, अलगतावादी, सीमापार दहशतवाद, दहशतवादी गट यांनी काश्मिरीयतपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. थोडक्यात, काश्मिरीयत संकल्पना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूने तिचे विरोधक असा संघर्ष सुरू आहे. या संघर्षांत काश्मिरीयतची मूळ संरचना तत्त्व शांततावाद, लोकशाही, मानवता आणि सामाजिक सलोखा ही चार आहेत. या चार मूल्यांसाठी काश्मिरीयत काम करते. ती भारतीय राज्यघटनेच्या मूळ मूल्यांशी सुसंगत आहे.