अभिनेत्यांच्या पक्षीय उलाढाली 

प्रकाश पवार
सोमवार, 6 मे 2019

राज-रंग
 

भारतीय राजकारणात अभिनेता/अभिनेत्री या समूहातूनदेखील राजकीय नेता उदयास येतो. नेता आणि अभिनेता (यात अभिनेत्रीही आहेत. दरवेळी वेगळा उल्लेख केलेला नाही) यांच्यामधील फरक कमी होत गेला. भारतीय मतदारांना अभिनेता हा आपला नेता असावा, असे वाटते. तसेच अभिनेतेदेखील स्पष्टपणे पक्षीय भूमिका घेताना दिसतात. आरंभी अमोल पालेकर, नसिरुद्दिन शहा, गिरीश कर्नाड व उषा गांगुली यांनी सहाशेहून अधिक कलाकारांच्या मदतीने भाजप व त्याच्या मित्रपक्षांना सत्तेवरून घालविण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन करणारे पत्र काढले होते. त्यानंतर ‘मजबूर सरकारची नव्हे, तर मजबूत सरकारची गरज’ या आशयाचे पत्रक स्वरूप रावळ, पंडित जसराज, शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल, विवेक ओबेरॉय आदींनी काढले होते. नेशन फर्स्ट कलेक्‍टिव्ह या व्यासपीठावरून त्यांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. थोडक्‍यात, सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये अभिनेते नेते म्हणून कृतिशील झाले. तमिळनाडू, सीमा आंध्र या राज्यांखेरीज इतर राज्यांमध्ये अभिनेत्यांचा बोलबाला जास्त आहे (हेमा मालिनी, जयाप्रदा, सनी देवल, शत्रुघ्न सिन्हा, अनुभव मोहंती, वैजयंती जय पांडा, ऊर्मिला मातोंडकर, अमोल कोल्हे, पवन कुमार, चंद्राबाबू नायडू). अभिनेता कोणाचे प्रतिनिधित्व करतात? राजकीय पक्ष त्यांच्याबरोबर जुळवून का घेत आहेत? अभिनेत्यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे राजकारणात कोणता नवीन प्रवाह उदयास येतो?... असे प्रश्‍न उभे राहिले आहेत. 

व्यवस्थापन महागुरू 
हे सगळे अभिनेते वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागलेले आहेत. तरीही मुख्य प्रश्‍न उपस्थित होतो; तो म्हणजे, पक्षांखेरीज ते कोणाचे प्रतिनिधित्व करतात? तर अभिनेते हे व्यवस्थापन, व्यवसाय, पंजाबियत, राष्ट्रवाद, स्थानिक राष्ट्रवाद यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. राजकारणात व्यवस्थापन जवळपास कळीचे झाले आहे. पक्ष आणि नेत्यांनी व्यवस्थापनाची तंत्रे स्वीकारली आहेत. लोकांचे प्रतिनिधित्व ही संकल्पना हळूहळू राजकारणातून हद्दपार होत आहे. त्या जागी व्यवस्थापकांची भूमिका मुख्य ठरते. उदा. ओडिशातील केंद्रपाडा येथे अनुभव मोहंती हे ‘बीजेडी’चे, तर त्यांच्या विरोधात भाजपचे वैजयंती जय पांडा हे उमेदवार आहेत. अनुभव मोहंती यांनी ‘बिजूबाबू’ या चित्रपटात बिजू पटनायक यांची भूमिका केली. ते उडिया सुपरस्टार आहेत. वैजयंती जय पांडा हे दुसरे उडिया कलाकार आहेत. पांडा हे नवीन पटनायकांचे प्रतिस्पर्धी आहेत. भुवन मोहन जेना हे त्यांचे निवडणूक व्यवस्थापक आहेत. येथे राजकीय चर्चाविश्‍वात जनाधार, लोकप्रिय नेता आणि व्यवस्थापन अशा तीन गोष्टी आहेत. जनाधार या गोष्टी मागे पडत आहेत. लोकप्रियता आणि निवडणूक व्यवस्थापन या दोन गोष्टी पुढे आल्या आहेत. याशिवाय हे दोन्ही अभिनेते प्रदेशवादाचे प्रतिनिधित्व करत आहेत. व्यवस्थापनाचे दुसरे महत्त्वाचे उदाहरण महाराष्ट्रात दिसते. महाराष्ट्रात मनसेने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले नाहीत. परंतु, नरेंद्र मोदी - अमित शहा विरोधात भूमिका घेतली. ही भूमिका गुंतागुंतीची आहे. परंतु, त्यांच्या भूमिकेत व्यवस्थापनाचे कौशल्य उपयोगात आणले गेले. थोडक्‍यात, त्यांनी महाराष्ट्रवादी; पण राष्ट्रीय भूमिका घेतली. राष्ट्रीय भूमिका म्हणजे हे दोन नेते वगळून राष्ट्रीय राजकारण करा, असा त्यात सूर दिसतो. त्यामुळे त्यांनी राज्यातील विरोधी पक्षाची पोकळी भरून काढली. खरे तर गेल्या पाच वर्षांत शिवसेना पक्ष सत्तेत राहून विरोधी पक्ष होता. भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे पोकळी निर्माण झाली. ही पोकळी व्यवस्थापनाच्या पद्धतीने मनसेने भरून काढली. यामुळे शहरी भागात शिवसेना-भाजपचा एक प्रतिस्पर्धी दिसू लागला. थोडक्‍यात, असंतोषाचे व्यवस्थापन केले जात आहे. असंतोषाला सत्ताविरोधी दिशा दिली जात आहे. 

पंजाबमध्ये पंजाबियत ही संकल्पना सामूहिक ओळख म्हणून लोकप्रिय झाली आहे. पंजाबियत ही संकल्पना शीख व पंजाबी सलोख्यावर आधारित आहे. हिंदू-शीख यांच्यात भेदभाव नाही, तर सलोखा आहे. तिचा विकास भाषिक व सामाजिक सलोखा अशा पद्धतीने झाला. पंजाबी संस्कृतीबद्दल ऐक्‍य आणि एकोपा हा त्यांचा अर्थ आहे (अन्न, भाषा, कपडे, संगीत, नृत्य, वाद्य, सन, प्रथा). ही संकल्पना सीमापारदेखील वापरली जाते. जागतिक पातळीवर संस्कृतीची देवाणघेवाण, असे तिचे खुले स्वरूप आहे. गेल्या तीस वर्षांत चित्रपट उद्योगाने ही संकल्पना विकसित केली. याचे उदाहरण म्हणजे यश चोपडा. जागतिक अर्थकारण आणि मीडिया यांनी पंजाबियतला स्पष्ट केले. म्हणजे लोकप्रिय केले. पंजाबमध्ये पंजाबियत आणि भारतात हिंदुस्थानियत अशी ही बंधुभावी संकल्पना आहे. यातून पंजाबियत पुढे आली. पंजाबमधून भाजपने सनी देवल यांना उमेदवारी दिली. त्यांनी चित्रपटांमध्ये राष्ट्रवाद व देशभक्ती या संकल्पनांचे अर्थ लावले आहेत. त्यामुळे सनी देवल राष्ट्रवाद-देशभक्तीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचे वडील राजस्थानमधून लढले होते. तसेच हेमा मालिनी उत्तर प्रदेशातून लढत आहेत. एकूण राष्ट्रवाद आणि पंजाबियत या दोन्ही संकल्पनांमधील संघर्ष दिसतो. तसेच देवल हे लोकप्रियता आणि राष्ट्रवाद या नवीन प्रवाहाचे वाहक आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये बंगालीयत अशी संकल्पना आहे. तिचा अर्थ लोकशाही, मानवता आणि सामाजिक सलोखा असा घेतला जातो. भारताच्या पूर्वेला बांगलादेश आहे. तेथे बंगाली भाषिक मुस्लीम बहुसंख्य आहेत. या देशात फिरदौस अहमद हे सुपरस्टार आहेत. ते पश्‍चिम बंगालमधील उत्तर बंगालमध्ये प्रचार करत होते. उत्तर बंगालमध्ये मोदी विरुद्ध दीदी अशी सत्तास्पर्धा आहे. येथे जवळपास साठ टक्के मुस्लिम समूह आहे. तेथे फिरदौस अहमद यांनी बॅनर्जी यांच्या स्थानिक राष्ट्रवादाची बाजू मांडली. त्यामुळे भाजपचा राष्ट्रवाद विरुद्ध बॅनर्जी यांचा स्थानिक राष्ट्रवाद असे वादक्षेत्र उभे राहिले. यातून बंगालीयत विरुद्ध राष्ट्रवाद असा एक अंतर्विरोध दिसतो. ओडिशातील अनुभव मोहंती यांच्याप्रमाणे पवन कुमार, चंद्राबाबू नायडू यांचा थेट चित्रपटाशी संबंध आहे. हे दोन्ही नेते प्रदेशवादाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी राज्याच्या विशेष दर्जांची मागणी केली. याशिवाय नायडू हे आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कार करत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका महागुरूसारखी दिसते. 

राजकीय इच्छाशक्ती 
राजकीय पक्ष अभिनेत्यांबरोबर जुळवून का घेत आहे? हा प्रश्‍न जास्त महत्त्वाचा आहे. याची तीन सूत्रे दिसतात. एक, राजकीय नेतृत्वाची पुरेशी वाढ झालेली नाही. राजकीय पक्षांनी नेतृत्वाचा विकास केला नाही. नेतृत्व व प्रतिनिधीत्वाचे अर्थ फारच बाळबोध झाले. जनाधारापेक्षा पक्षबाह्य लोकप्रियता जास्त महत्त्वाची ठरते. दोन, लोकसभेचा मतदारसंघ अतिव्यापक आहे. अशा अतिव्यापक मतदारसंघातील कानाकोपऱ्यात अभिनेत्यांची ओळख असते. त्यामुळे राजकीय पक्ष उपलब्ध प्रतिमेचा व ओळखीचा उपयोग करून घेतात. याबरोबरच निवडणूक निधीचा प्रश्‍न मिटतो. तीन, अभिनेते या राजकारणापासून दूर असतात. त्यामुळे पक्षाच्या धुरीणांना त्यांच्यापासून फार बंडखोरीचा धोका नसतो. तरीही शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपविरोधात बंडखोरी केलेली दिसते. परंतु, व्यापक अर्थाने फार धोका नसतो. सत्तावाटप, धोरण निश्‍चितीसाठी छोट्या गटाला पुरेशी संधी मिळते. सत्तेतील भागीदारीच्या पातळीवर अभिनेत्यांना तीव्र इच्छा नसते. त्यामुळे निवडणुकीतील त्यांचे प्रतिनिधित्व पोकळ असते. असे पोकळ नेतृत्व लोककल्याणकारी नसते. त्यामुळे कार्पोरेट व्यवस्थेला ते पोषक ठरते. व्यवस्थेला याचे आत्मभान आहे. म्हणून ही व्यवस्था अभिनेत्यांना झटपट स्वीकारते. चित्रपटाची मर्यादा सत्ताधारी व सत्ताविरोधी अशी होती. चित्रपट या दोन्ही राजकारणाचे समर्थन करतो. निळू फुले व दादा कोंडके यांनी सत्ताविरोधी संघर्षाला वाचा फोडली होती. गेल्या पाच वर्षात सत्ताधारी विरुद्ध बारा चित्रपट तमीळ भाषेत आले (एल.केजी, जोकर, मर्सल, इरुमबुधिराई, तमीळ पारम-२, नटपे थुनाई-२). त्यामध्ये शेतकरी आंदोलने चित्रित केली होती. सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘काला’ चित्रपट हिंदुत्व आणि दलित विचार यांच्यातील भिन्नता स्पष्ट करणारा आहे. ‘ॲक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट युपीए सरकारच्या लकवा धोरणावर आधारलेला आहे. ‘उरी’ हा चित्रपट सर्जिकल स्ट्राइकवर आहे. दोन्ही प्रकार खूपच परंपरागत आहेत. या पलीकडे जाणारे काही चित्रपट आले. परंतु, ते जनमतावर परिणाम करू शकले नाहीत. खरेतर लोकप्रिय चित्रपट करण्याच्या पद्धतीने चित्रपटामधील आशय सपाट केला. राजकारणावर छोट्या पडद्यांचा परिणाम विलक्षण झाला. जवळपास चारशे समाचार टीव्ही वाहिन्या आहेत. त्यांचे महत्त्व टार्गेट रेटिंग पॉइंटशी संबंधित आहे. त्यास टीआरपी म्हणतात. त्यांची संस्था न्यूज ब्रॉडस्टर्स असोसिएशन आहे. ही संस्थादेखील व्यावसायिक आहे. त्यामुळे एकूण राजकारणाचे आकलन कोते झाले. काँग्रेस पक्षाने अभिनेत्यांचा संबंध संमिश्र राष्ट्रवादाशी घातला. सुनील दत्त, गोविंदा, राज बब्बर अशी काही उदाहरणे आहेत. सतराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची ही जुनी भूमिका दिसते. त्यामुळे राज बब्बर, ऊर्मिला मातोंडकर यांची विचारसरणी संमिश्र राष्ट्रवादाचे प्रतिनिधित्व करते. 

राज बब्बर यांनी १९८९ पासून राजकारणात सहभाग घेतला. तसेच जनता दलाशी जुळवून घेतले होते. त्यांची ओबीसी विचारांवर श्रद्धा होती. त्यांनी २००८ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. डिंपल यादव यांचा त्यांनी २००९ मध्ये पराभव केला होता. जयाप्रदा या तमीळ अभिनेत्री आहेत. त्यांनी सुरुवातीला म्हणजे १९९४ मध्ये एन. टी. रामाराव यांच्या तेलगू देशम पक्षामध्ये प्रवेश केला. चंद्राबाबू नायडू यांच्या गटामध्ये त्या सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला. आता २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा हा राजकीय इतिहास पक्षांतराचा दिसतो. त्यामुळे कधी प्रदेशवाद, कधी समाजवाद, तर कधी राष्ट्रवाद अशी त्यांची वैचारिक धरसोड झाल्याचे चित्र दिसते. दक्षिण भारतात अभिनेत्यांनी प्रदेशवाद व वर्चस्ववाद विरोधी भूमिका घेतली. तर उत्तरेकडे जास्तीत जास्त राष्ट्रवादाशी सुसंगत भूमिका घेतली. असे दोन प्रवाह दिसतात. याशिवाय तिसरा प्रवाह हा संमिश्र राष्ट्रवादाची भूमिका मांडणारा दिसतो. राजकारणात प्रदेशवाद, उपराष्ट्रवाद, राष्ट्रवाद, संमिश्र राष्ट्रवाद असे वेगवेगळे प्रवाह आले. त्यांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. या प्रस्थापित राजकीय प्रवाहाखेरीज ओबीसीवादाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. त्यामुळे त्यांचे राजकारण पोकळ असले, तरी त्यांचे धागेदोरे विचारप्रणालीमध्ये गुंतलेले दिसतात. त्यामुळे सरतेशेवटी, अभिनेते पक्षीय राजकारणाचा एक भाग झालेले दिसते.  

संबंधित बातम्या