डिजिटल लोकशाही

प्रकाश पवार
सोमवार, 13 मे 2019

राज-रंग
 

संपर्क क्रांती, दूरसंचार क्रांती, इलेक्‍ट्रॉनिक क्रांती अशा विविध क्रांत्यांनी भारतीय लोकशाहीला नवीन संकल्पना दिल्या. त्यांचा परिणाम निवडणुकीवर झाला. सोळाव्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये डिजिटल माध्यमांचा उपयोग केला गेला. सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सतराव्या लोकसभा निवडणुकीत आभासी लोकशाही, सायबर लोकशाही, डिजिटल लोकशाही अशा संकल्पना वापरल्या जात आहेत. दूरध्वनी लोकशाही आणि इलेक्‍ट्रॉनिक लोकशाही या गोष्टी जुन्या झाल्या. त्यांची जागा डिजिटल लोकशाहीने घेतली. डिजिटल लोकशाहीमध्ये सतराव्या लोकसभा निवडणुकीत माहिती-तंत्रज्ञान आणि संगणकाच्या माध्यमातून संवाद या दोन गोष्टी कळीच्या आहेत. आधारकार्ड, पॅनकार्ड अशा डिजिटल माध्यमांद्वारे मतदारांची ओळख ठरविली जाते. डिजिटल लोकशाहीमध्ये नेतृत्व आणि पक्षाचे स्वरूप बदलले आहे. भाजपमध्ये लालकृष्ण अडवानींचे नेतृत्व मागे पडले आणि त्या जागी नरेंद्र मोदी-अमित शहांचे नेतृत्व स्वीकारले गेले. मासबेस नेतृत्व, केडरबेस नेतृत्व व नेटवर्क असे नेतृत्वाचे वेगवेगळे प्रकार उदयाला आले. यापैकी मासबेस आणि केडरबेस नेतृत्व मागे पडत आहे आणि त्याजागी नेटवर्क आधारित नेतृत्वाचा विकास होत आहे. या तीन प्रकारच्या नेतृत्वामध्ये बदल कसा झाला? नेटवर्क आधारित नेतृत्व कोणत्या पद्धतीने काम करते? तसेच सतराव्या लोकसभा निवडणुकीत नेटवर्क नेतृत्वाने कसे संघटन केले? या मुद्यांची चर्चा करणे जास्त महत्त्वाचे आहे. 

मासबेस नेतृत्व 
 शरद पवार, चंद्राबाबू नायडू, लालू प्रसाद यादव, मायावती, मुलायमसिंह यादव हे नेते मासबेस नेते म्हणून ओळखले जातात. परंतु, सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये डिजिटल लोकशाहीने या नेत्यांच्या पुढे आव्हान निर्माण केले. याबरोबरच परिवर्तनशील प्रकारचे नेतृत्वदेखील मासबेस नेतृत्व होते. त्यांच्यापुढेदेखील डिजिटल लोकशाहीने आव्हान निर्माण केले. उदा. राजू शेट्टी हे परिवर्तनशील व मासबेस नेते आहेत. परंतु, त्यांना त्यांच्या मतदारसंघात आव्हानांना तोंड द्यावे लागले. बारामती, सातारा, माढा अशा मतदारसंघांमध्ये मासबेस नेतृत्वाचा प्रभाव आहे. परंतु, या मतदारसंघात मासबेस नेतृत्वाच्या पुढे डिजिटल तंत्रज्ञानाचे आव्हान आहे. परंतु, मासबेस नेतृत्वाने डिजिटल माध्यमांशी व आभासी लोकशाहीशी जुळवून घेतले. तरीदेखील मासबेस नेता म्हणून एकतर्फी नेतृत्वाचे वर्चस्व राहिले नाही. नेतृत्वाला स्वतःमध्ये बदल करून तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागले. उदा. लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाने तर आयपॅकमधील शिवम शंकर सिंग या सल्लागाराची मदत घेतली. तसेच नीतिशकुमार यांनी आयपॅकशी संबंधित प्रशांत किशोरला पक्षामध्ये उपाध्यक्ष केले. यामुळे मासबेस नेतृत्व बदलत आहे असा एक निष्कर्ष निघतो. दुसरा निष्कर्ष म्हणजे मासबेस नेतृत्व डिजिटल माध्यमांची हाताळणी करू लागले आहे, तसेच विविध पेचप्रसंगांमधून पुढे जात आहे. त्यामुळे लोकशाहीतील मासबेस नेतृत्व राजकारणावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकत नाही, असे दिसू लागले आहे. परिवर्तनशील नेतृत्व डिजिटल माध्यमांवरती टीका करते. परंतु, या नेतृत्वाला डिजिटल माध्यमांशी जुळवून घेण्यामध्ये सध्यातरी अपयश आलेले आहे. थोडक्‍यात नेतृत्वाची पद्धत मासबेस-केडरबेसकडून नेटवर्क नेतृत्वाकडे वळली, असे दिसते.

केडरबेस नेतृत्व 
 मार्क्‍सवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी केडरबेस नेतृत्वाची संकल्पना राबविली. मार्क्‍सवादी पक्ष वर्गावर आधारित अंतराय निर्माण करत होते. परंतु, पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळ या राज्यांमध्ये वर्गावर आधारित निर्माण केलेले अंतराय अपयशी ठरले आहेत. त्यामुळे तळागाळापासून निर्माण केलेला केडरबेस ढासळला आहे. पश्‍चिम बंगालमध्ये मार्क्‍सवादी पक्षांचे केडरबेस नेतृत्व ममता बॅनर्जींशी स्पर्धा करू शकलेले नाहीत. कांशीराम आणि त्यांचे जुने सहकारी यांनी केडरबेस संघटन केले. परंतु, सोळाव्या आणि सतराव्या लोकसभा निवडणुकीत मायावतींच्या पुढे आव्हाने उभी राहिली. केडरबेस नेतृत्व हे परिवर्तनशील प्रकारचेदेखील आहे. त्यांनी वर्ग, जात अशा परंपरागत घटकांवर आधारित राजकीय अंतराय निर्माण केले. उदा. उत्तरप्रदेशात ‘एमवाय’ प्रकारचे नेतृत्व होय (मुस्लिम-यादव). या प्रकारच्या नेतृत्वाची प्रतिमा आज राजकीयदृष्ट्या अडचणीची ठरलेली आहे. महाराष्ट्रात सुरुवातीला बहुजन, नव्वदीच्या दशकात दलित बहुजन आणि आज वंचित बहुजन अशा वेगवेगळ्या संकल्पना उदयाला आल्या. मात्र, यातून नव्याने उदयाला आलेल्या नेतृत्वाला डिजिटल लोकशाहीमध्ये दमदार शिरकाव करता आलेला नाही. तसेच डिजिटल माध्यमांद्वारे समर्थक वर्गही निर्माण करता आलेला नाही. छोट्या-छोट्या पातळीवर केडरबेस नेतृत्वाने नेटवर्कवर आधारित गोष्टीशी जुळवून घेतले. परंतु, व्यापक पातळीवर त्यांना हाताळणी करता आली नाही.  

डिजिटल नेतृत्व 
 डिजिटल माध्यमांच्याद्वारे राजकारण करण्याची पद्धत २०१४ पासून प्रभावी ठरली. या क्षेत्रामध्ये नरेंद्र मोदी हे सुपरस्टार नेते ठरले आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये सुपरस्टार दुहेरी भूमिकेत असतो. परंतु, डिजिटल लोकशाहीमधील नेतृत्व हे सुपरस्टार पेक्षा जास्त भूमिका एकाचवेळी पार पाडते. यामुळे एकूण भारतीय राजकारणाचा रागरंग बदलला. २०१२ च्या आधी मध्यमवर्ग हा राजकारणाचा आधार झाला. परंतु, २०१२ नंतर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील वर्गाने हेतुपूर्वक डिजिटल पद्धतीने नेतृत्व घडविले. तसेच हे नेतृत्व जुन्या राजकारणाच्या पद्धती मोडून पुढे आले. संघ आणि भाजप यांचे नाते २०१२ पर्यंत एकमेकांना पूरक होते. परंतु, २०१३ पासून पुढे संघ हा भाजपसाठी मदतीला येणारा घटक ठरला. परंतु, संघापेक्षा नरेंद्र मोदींचे नेतृत्व विलक्षण प्रभावी ठरले. त्यांनी तंत्रज्ञानातील माध्यमांशी जुळवून घेण्याची क्षमता विकसित केली. त्यामुळे डिजिटल लोकशाहीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा सर्वत्र जयजयकार दिसतो. म्हणूनच ‘मोदी है, तो मुमकिन है’ अशा घोषणाही आल्या. नेतृत्वाने व्यवहार कुशलपणा दाखविला. त्यांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले. यामुळे भाजपने तंत्रज्ञानातील आणि व्यवस्थापनातील ‘थॉट लिडरशीप’ ही संकल्पना स्वीकारली. नरेंद्र मोदी आयडिया पारखून घेतात आणि त्या नव्या ढंगात रूपांतरित करतात. असे काम ‘स्वामी विवेकानंद यूथ मूव्हमेंट अँड ग्रासरूट रिसर्च अँड ॲडव्होकेसी मूव्हमेंट’चे संस्थापक डॉ. रामास्वामी बालासुब्रमण्यम करतात. म्हणजेच नरेंद्र मोदींनी व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील थॉट लीडरशिप ही संकल्पना जवळपास स्वीकारलेली दिसते. त्यांनी व्हॉट्‌सॲप व फेसबुकवरील युजर्सला आपले समर्थक बनविले. भारतात ४० कोटींपेक्षा जास्त लोकांकडे स्मार्टफोन आहेत, ३० कोटी फेसबुकची खाती आहेत, तसेच व्हॉट्‌सॲपवर सक्रिय युजर्स आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा सोशल मीडियावरती प्रभाव आहे. तसेच सोळाव्या लोकसभा निवडणुकीपासून नेतृत्वाने स्वयंसेवकांची टोल आर्मी तयार केली आहे. गेल्या पाच वर्षांत मोदींनी सोशल मीडिया सैनिक घडविले. त्या सैनिकांची वैचारिक बांधिलकी निश्‍चित केली. उदारमतवादी, मार्क्‍सवादी, मुस्लिम, स्त्रीवादी अशा लोकांशी त्यांचा संघर्ष झाला. यातूनच मोदी समर्थक हॅशटॅगचा वापरही केला गेला. यामुळे राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव हे नेतेदेखील डिजिटल माध्यमांद्वारे राजकारण करू लागले. राहुल गांधींनी मोठ्या सभांच्या ऐवजी डिजिटल माध्यमाला कृतिशील केले. त्यांनी डाटामायनिंगचा उपयोग केला. तर आज १० हजार भारतीयांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ट्रेनिंग मायक्रोसॉफ्ट कंपन्या देतात. यावरून असे दिसते की, भारतीय राजकारणात डिजिटल नेतृत्व आणि समर्थकांची संख्या वाढली आहे. प्रत्येक राज्यामध्ये भाजपने डिजिटल नेतृत्वाचा विस्तार केला आहे. उदा. हिमाचल प्रदेशात राहुल डोंगरा हे भाजपचे सुपर ॲडमीन आहेत. ते ३६०० व्हॉट्‌सॲप ग्रुपची जबाबदारी सांभाळतात. त्यांची ४०० लोकांची टीम आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी वेगळी टीम केली आहे. समन्वयकाबरोबर ५ सदस्य काम करतात. त्यांना ‘पांडवसेना’ म्हटले जाते. पांडवसेनेच्या नियंत्रणाखाली २०-२५ लोकांची टीम जिल्हास्तरावर काम करते. अशी संरचना पंचायत स्तरापर्यंत आहे. थोडक्‍यात डिजिटल लोकशाहीशी नेतृत्वाने जुळवून घेतले आहे. सध्या भारतात १ लाख पेज तयार केलेली आहेत. यामुळे लोकांची मते तयार करणे, पक्षाच्या उमेदवाराच्या बातम्या पसरविणे, पक्षाची माहिती देणे, लोकांशी संवाद करणे या गोष्टी डिजिटल नेतृत्व करते. यामुळे डिजिटल नेतृत्वाने लोकशाहीचे स्वरूप बदलविले आहे. हे नेतृत्व शक्तिशाली नेटवर्कच्या मदतीने विचारसरणी तळागाळापर्यंत पोचविते, निवडून येण्याचे ध्येय साध्य करण्याची प्रेरणा देते. डिजिटल माध्यमाद्वारे भाषणातून सार्वजनिक भाषेत कौशल्यपूर्ण पद्धतीने संदेश पाठविला जातो. ‘एस वुई कॅन’ यासारख्या हॅशटॅगचा वापर करून गावात, शहरात, वाडी-वस्तीवरती थेट आपल्या पक्षाचा आणि नेतृत्वाचा प्रचार केला गेला. विशेष म्हणजे जिल्हा, तालुका पातळीवरती आणि लोकसभा मतदारसंघाच्या पातळीवरती वेगवेगळे डिजिटल हॅशटॅग वापरले गेले. उदा. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ‘आमचं ठरलंय’ हा हॅशटॅग अतिगतीशील पद्धतीने काम करत होता. म्हणजेच भारतीय लोकशाहीतील नेतृत्वाचे स्वरूप आणि त्यांच्या समर्थकांचे स्वरूप हे डिजिटल पद्धतीकडे वळलेले आहे. भारतीय लोकशाहीत डिजिटल पद्धतीच्या वापरामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला आहे. तसेच मतदारांच्या मेंदूचा ताबा जुन्या प्रसारमाध्यमांऐवजी नवीन माध्यमांनी घेतला आहे. डिजिटल माध्यमांमधून लोक कोणत्या पक्षाला कोणत्या मुद्यावर विरोध करतात हे पाहून नेतृत्व त्या पद्धतीने प्रचार करते. तसेच हिंदू दहशतवादी हा शब्ददेखील लोकांना आवडत नाही, म्हणून हिंदू दहशतवाद या शब्दाला विरोध करणारा मुद्दा प्रचारात तयार केला गेला. नेतृत्वाने वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या मतदारसंघात वापरल्या. उदा. औरंगाबादमध्ये ‘बाण आणि खान’ अशी एकच ओळ सोशल मीडियात फिरत होती. म्हणजेच एकूण भारतीय लोकशाही मासबेस, केडरबेस नेतृत्वाकडून नेटवर्कबेस नेतृत्वाकडे वळलेली दिसते. पोलादी पुरुष, पुरुषी नेता अशा कणखर नेतृत्वाच्या संकल्पना डिजिटल लोकशाही मांडताना दिसते. त्यामुळे पुरुषसत्ताक लोकशाहीचा आशय डिजिटल लोकशाहीमधून पुढे येतो, त्यामुळे स्त्री उमेदवारांच्यापुढे आव्हाने निर्माण झाली आहेत. डिजिटल लोकशाहीमध्ये स्त्रियांचे नेतृत्व वाढण्यास मर्यादा पडत आहेत. परंतु, एकूण भारतीय लोकशाहीमध्ये मासबेस नेतृत्वाचा ऱ्हास होत आहे आणि डिजिटल नेतृत्वाची वाढ होते, असे दिसते. या बदलामुळे भारतीय लोकशाहीचा आशयदेखील बदललेला आहे. भारतीय लोकशाहीवर डिजिटल लोकशाही प्रत्यारोपीत केली जात आहे. लोकांना धर्मनिरपेक्ष हा शब्दप्रयोग आवडत नाही, असा अंदाज घेऊन भाजपने धर्मनिरपेक्षतेच्या विरोधी भूमिका घेतली. यामध्ये नेतृत्व बदल घडवून आणते, असे दिसते. ही गोष्ट सुरुवातीला दूरध्वनी लोकशाहीपासून सुरू झाली, नंतर ती इलेक्‍ट्रॉनिक लोकशाहीत विस्तारली आणि आज ती डिजिटल लोकशाही म्हणून वाढलेली दिसते. ही लोकशाही भारतीयांसाठी नवीन आहे. परंतु, ती भारतात स्थिरस्थावर झाली आहे. या चौकटीमध्ये सतरावी लोकसभा निवडणूक होत आहे.

संबंधित बातम्या