प्रयोगशील राष्ट्रवादी काँग्रेस 

प्रकाश पवार
सोमवार, 17 जून 2019

राज-रंग
 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला (जून १९९९ - जून २०१९) वीस वर्षे पूर्ण झाली. या पक्षाच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा टप्पा आहे. या वीस वर्षांच्या कालखंडात राष्ट्रवादीने राज्य-राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची कामगिरी केली. काँग्रेसमध्ये नव्वदीच्या दशकाच्या उत्तरार्धात मतभिन्नता वाढत गेली. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या मतभिन्नतेमुळे वेगळा पक्ष स्थापन झाला. शरद पवारांनी काँग्रेसपासून दोन वेळा (१९७८ व १९९९) फारकत घेतली. त्यामुळे सत्तरीच्या दशकातील ‘काँग्रेस एस’चा विस्तार हा नव्वदीच्या दशकातील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ ठरली. या दोन्ही (काँग्रेस) पक्षांचा मुख्य आधार शरद पवार राहिले. शरद पवारांच्या जीवनातील हे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी बहुजन समाजाच्या ऱ्हासाच्या आणि आकांक्षी-आभासी समाजांच्या नवोदयाच्या काळात केले. सत्तेच्या नवीन जुळवाजुळवीशी संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयोग केले. हा पक्ष राज्य-राष्ट्रीय सत्तेच्या स्थापनेतील एक सत्तास्थापक व भागीदार पक्ष राहिला. 

राष्ट्रवादीचे चित्तवेधक प्रयोग 
पक्षाची स्थापना झाली, तेव्हा बहुजन संकल्पनेचा ऱ्हास झाला होता. बहुजनांच्या पुढे आकांक्षी व आभासी समाजव्यवस्थेचे आव्हान उभे राहिले. सत्ताकांक्षी, न्यायकांक्षी, हिंदुत्वकांक्षी व आभासी अशा नवनवीन संकल्पना पुढे आल्या. अशा नवीन समाजांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र-राज्यातील सत्तेचा नवीन फॉर्म्युला उदयास आला. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची वीस वर्षांतील कामगिरी काँग्रेस परिवारातील सर्वांत चांगली झाली. कारण काळाच्या निकषावर आधारित हा पक्ष वीस वर्षे टिकून राहिला. तोही नवीन समाजांच्या वाढीच्या काळात! राष्ट्रवादीच्या तुलनेत इतर काँग्रेस परिवारातील पक्ष चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वीस वर्षांची दखल घ्यावी लागते. जागा आणि मतांखेरीज, २०१४ विधानसभेचा अपवाद वगळता, राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाशी जुळवून घेण्याचाही मोठा प्रयोग केला. म्हणजे तीन विधानसभा व पाच लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी हा युपीएचा सहभागीदार राहिला. किंबहुना काँग्रेसपासून फारकत घेऊन १९८६, १९९९ आणि २०१९ अशा तीन वेळा काँग्रेस पक्षाशी पुन्हा जुळवून घेण्याची कसरत शरद पवारांनी यशस्वीपणे केली. १९८६ व १९९९ मध्ये काँग्रेसशी पुन्हा जुळवून घेण्याची क्षमता हा एक यशस्वी प्रयोग आहे. ऐंशी व नव्वदीच्या दशकामध्ये काँग्रेसशी जुळवून घेण्याचे प्रयोग यशस्वी झाले. त्या तुलनेत समकालीन दशकातील आघाडीचा प्रयोग प्रभावी ठरला नाही. काँग्रेसशी जुळवून घेणे आणि काँग्रेसला जुळवून घेण्याचे राजकीय टॉनिक देणे असा दुहेरी प्रयोग शरद पवारांनी केला. काँग्रेस पक्षाच्या ऱ्हासाच्या काळात शरद पवारांनी आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला साथ दिली. शिवाय समकालीन दशकामध्ये काँग्रेसमुक्त भारताचा बोलबाला राहिला. या दशकामध्ये किरकोळ अपवाद वगळता राष्ट्रवादीने काँग्रेसमुक्त विचारांचा प्रतिवाद केला. अर्थातच काँग्रेसमुक्त विचारांचा प्रतिवाद करण्यात शरद पवार आघाडीवर राहिले. काँग्रेसच्या मूल्यव्यवस्थेचे काँग्रेसच्या बाहेर अचूक आकलन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक सूत्र राहिले. या उलट काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या मूल्यव्यवस्थेबद्दल अंधूक व घसरडे आकलन होते. त्यामुळे समकालीन दशकामध्ये २०१४ च्या निवडणुकीय राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादीची फारकत झाली. परंतु, शरद पवारांच्या सल्ल्याला काँग्रेसमध्ये स्थान मिळत गेले. शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाली. त्या आधी २००४ च्या सुमारास सोनिया गांधी-शरद पवार यांच्यात चर्चा घडल्या होत्या. थोडक्‍यात, शरद पवारांनी काँग्रेसच्या बाहेर राहून काँग्रेसशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. महाराष्ट्रामध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसचा स्पर्धक होता. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने मैत्रीचे सूत्र राष्ट्रीय-राज्याच्या राजकारणात पाळले. जिल्हा, महानगर, पंचायत पातळीवर मात्र अनेकदा मैत्रीपेक्षा खुली सत्तास्पर्धा झाली. महाराष्ट्राखेरीज ओरिसा, गोवा, मध्यप्रदेश अशा राज्यांमध्ये पक्षाला आधार मिळाले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अल्पावधीतच राष्ट्रीय पक्ष म्हणून अधिकृत मान्यता मिळाली. नव्वदीच्या दशकात केंद्रातील सत्तेत सहभागी राहून राज्यातील सत्तासूत्राची पकड राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा फॉर्म्युला या पक्षाने पंधरा वर्षे यशस्वीपणे राबविला. अर्थात हा फॉर्म्युला नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीस १९९२ च्या सुमारास उदयास आला होता. त्यांचे जनकत्व मुलायमसिंगांकडे जाते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने संसदीय राजकारणात हा फॉर्म्युला यशस्वीपणे राबविला. समकालीन दशकामध्ये या फॉर्म्युल्याचा अस्त झाला. त्यामुळे राष्ट्रीय आणि राज्यातील सत्तेची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून निसटली, असे दिसते. 

आकांक्षी-आभासी समाजाची चौकट 
गेल्या दोन दशकांमध्ये आकांक्षी-आभासी समाजाची संकल्पना पुढे आली. समकालीन दशकामध्ये या दोन्ही समाजांशी जुळवून घेताना राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद स्थिर झाली. पक्षाची वाढ खुंटली. उत्तर महाराष्ट्र व विदर्भातून पक्ष जवळपास हद्दपार झाला. मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात पक्षाला काही आधार भक्कम आहेत. पक्ष विसावा वर्धापन दिन साजरा करताना २०१९ मध्ये दोन्ही काँग्रेससह केवळ ५५ मतदारसंघांत मतांची आघाडी मिळवलेला आहे. त्यामुळे पुन्हा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाच्या पुढे आकांक्षी-आभासी समाजाचे प्रचंड मोठे आव्हान आहे. वंचित आघाडी जुळवून घेण्यास तयार नाही. राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संबंध तणावाचे आहेत. विशेष नांदेड व कोल्हापूर या दोन लोकसभा मतदारसंघांतील पराभवामुळे प्रचंड असंतोष धुमसतो आहे. महाराष्ट्रातील आकांक्षी-आभासी समाजात सध्या प्रचंड असंतोष आहे. तालुका विरुद्ध तालुका, जिल्हा विरुद्ध जिल्हा, एक प्रदेश विरुद्ध दुसरा प्रदेश, बहुजन विरुद्ध वंचित बहुजन असा संघर्ष ही महाराष्ट्रातील वस्तुस्थिती आहे. या संघर्षामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढे मोठे पेचप्रसंग उभे राहिले. क्रांती मोर्चांनी गेल्या पाच वर्षांतील समाजरचना पूर्णपणे बदलली. राष्ट्रवादी काँग्रेसला या बदललेल्या समाजरचनेशी जुळवून घेणे खूपच अवघड जात आहे. गेल्या पाच वर्षांतील मोर्चांमध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय असंतोष होता. तो असंतोष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात गेला. कारण या संघर्षांत आकांक्षी-आभासी समाजव्यवस्था जास्त गुंतली आहे. महाराष्ट्रातील शहरी राजकारण वाढत गेले. त्या काळातील राष्ट्रवादी काँग्रेसची ही वीस वर्षे आहेत. शहरी राजकारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चार प्रयत्न केले. एक, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई या भागात महानगरीय राजकारणात शिरकाव केला. परंतु बहुरंगी-बहुढंगी शहरांमध्ये राष्ट्रवादीकडून भाजप-शिवसेनेकडे आकांक्षी-आभासी समाज घटक सरकले. दोन, निमशहरी भागात नगरपरिषदांच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस वाढली. राष्ट्रवादी अशा भागात स्थिर झाली. परंतु, सत्ताकांक्षी गटांवरील राष्ट्रवादीचे नियंत्रण कमी झाले. तीन, शहरी भागातील संरचनात्मक विकास उदा. रस्ते, उड्डाणपूल, उद्योग, सेवा करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला. परंतु, सध्या हा विकास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामास येत नाही. चार, शरद पवारांनी सातत्याने औद्योगिक धोरणाला पाठिंबा दिला. त्यांनी नवीन क्षेत्राचा विकास केला. उदा. पुणे मनपामध्ये आयटी धोरणाला मदत केली. त्यांनी राजीव गांधी पार्कची पायाभरणी केली. त्यांनी पुणे येथे सिडॅकला मदत केली. वीजेसाठीचा तंत्रज्ञानाचा प्रकल्प म्हणून त्यांनी पवनचक्कीचा प्रयोग राबविला. मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी, लवासा सिटी अशी शहराशी संबंधित नवीन धोरणे राबवली. यातून त्यांनी जनता, उद्योगपती, रिअल इस्टेट, तंत्रज्ञान समाजव्यवस्था, अशी एक नवीन साखळी विणली. ही व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरी राजकारण घडविण्यास पंधरा वर्षे मदतीस आली. गेल्या पाच वर्षांत ही यंत्रणा हळूहळू राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर जाताना दिसते. ग्रामीण भागाच्या राजकारणाला खूपच मर्यादा आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बिनीच्या नेत्यांना समजले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण, अर्धशहरी-शहरी असा दुहेरी पक्षाचा चेहरा ठेवला. परंतु, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा धरसोडीची झाली. शेती-औद्योगिक हितसंबंधांचा संघर्ष या काळात वाढला. शेतीक्षेत्रात नवीन पेचप्रसंग उभे राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेऊन राज्यसंस्थेला शेतीक्षेत्राच्या मदतीस उभे केले. महिला, ओबीसी यांच्या राजकीय भागीदारीच्या हक्काचा मुद्दा या काळात पुढे आला. राष्ट्रवादी काँग्रेसने महिला-ओबीसीच्या राजकीय भागीदारीची बाजू घेतली. या घडामोडी एका अर्थाने सामाजिक न्यायकांक्षी आहेत. तर दुसऱ्या बाजूने प्रस्थापित अभिजन सत्ताकांक्षी आहे. हा पेचप्रसंग उभा राहिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलचे समाजातील आकलन गुंतागुंतीचे झाले. समाजव्यवस्थेचा गुंता वाढत गेला. गुंता इतका वाढला, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाचा अर्थ पाहिजे तसा लावला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वीस वर्षांच्या काळात आकांक्षी समाजव्यवस्था उदयास आली. आकांक्षी समाजव्यवस्था म्हणजे अमर्यादित इच्छाशक्तीचा उदय झाला. कोणत्या इच्छा योग्य आणि कोणत्या इच्छा अयोग्य या बद्दलचा विवेक राहिला नाही. आकांक्षी समाजव्यवस्थेची नाळ आभासी समाजव्यवस्थेशी जोडली गेली. आभासी समाजव्यवस्था म्हणजे तंत्रज्ञानाशी संबंधित नवीन नाती तयार झाली. आभासी संकल्पनांचा उदय झाला. अशा नवीन समाजव्यवस्थेचे आकलन शरद पवारांना होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांना मात्र याचे आकलन फारच कमी होते. त्यामुळे पक्षामध्ये धरसोड वृत्ती वाढली. पक्षाच्या निश्‍चित उद्देशाबद्दल अस्पष्टता दिसू लागली. सामाजिक न्यायकांक्षी समूह राष्ट्रवादीवर नाराज झाला. याबरोबरच सत्ताकांक्षी बहुजन समूह पक्षाच्या विरोधात गेला. आकांक्षी आणि आभासी समाजाची राष्ट्रवादीकडून मोठी अपेक्षा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न संघर्षापेक्षा समन्वयाचे राजकारण करण्याकडे राहिला. सत्ताकांक्षी बहुजन, न्यायकांक्षी बहुजन, हिंदुत्वकांक्षी समूह आणि आभासी समूह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थ त्यांच्या त्यांच्या हितसंबंधाशी जुळवून घेतला. या गोष्टीचा परिणाम म्हणजे यातून राजकीय समझोता करणे फारच अवघड गेले. त्यामुळे विधानसभेतील पक्षाची ताकद जास्तीत जास्त सत्तरीच्या घरात गेली. कमीत कमी ताकद चाळिशीच्या घरात राहिली. लोकसभेतील पक्षाची ताकद चार-नऊच्या दरम्यान राहिली. थोडक्‍यात, आकांक्षी-आभासी समूहांनी राज्यातील राजकारणात गुंतागुंत वाढविली. त्यामुळे राजकीय पक्षांची अवस्थाही अस्थिर झाली. परंतु, समकालीन दशकामध्ये बहुजन सत्ताकांक्षी समाजाचा ऱ्हास झाला. न्यायकांक्षी समूहांची पीछेहाट झाली. केवळ हिंदुत्वकांक्षी-आभासी समूह पुढे सरकला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसपुढे नवीन आव्हान उभे राहिले. तरीही शिरूर, सातारा, बारामती आणि रायगड लोकसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसने या नव्याने उदयास आलेल्या दोन्ही समाजांशी जुळवून घेण्यात यश मिळवले. खरेतर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन प्रयोग आहे. या नवीन प्रयोगात नवीन अस्मितांचा उदय झाला. डॉ. अमोल कोल्हे नवीन अस्मितांचे प्रतीक स्पष्टपणे दिसतात. नवीन अस्मिता ही नवबुद्धिजिवींच्या आकांक्षांशी संबंधित आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा वीस वर्षांनंतरचा नवीन प्रयोग आहे. या मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेस जाणार की पुन्हा जुन्या मार्गांकडे वळणार हा या पक्षात मोठा पेचप्रसंग दिसतो. यातून मार्ग काढण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली, तर पुन्हा विधानसभेतील पक्षाची ताकद साठ-सत्तरीच्या घरात पोचण्याची क्षमता बाळगून असलेला पक्ष दिसतो. म्हणून शरद पवार अजूनही पक्षाच्या चांगल्या कामगिरीची आशा बाळगून आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांच्या भाजपला शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी सत्तास्पर्धा आहे, असे वाटते. याअर्थाने, नवीन समाजाच्या क्षेत्रात पक्षाची वाटचाल झाली.  

संबंधित बातम्या