मध्यमवर्गाचे शहरी राजकारण

प्रकाश पवार
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

राज-रंग
 

महाराष्ट्रात शहरी राजकारणाचा मध्यमवर्ग हा एक प्रभावी घटक उदयास आला आहे. एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येत एक चतुर्थांश मध्यमवर्ग असावा. त्यांची संख्यात्मक ताकद सध्या दखल घेण्याइतपत आकाराने मोठी आहे. त्यामुळे सहाजिकच राजकीय पक्ष सातत्याने मध्यमवर्गांच्याबद्दल चर्चा उभी करतात. उदा. भाजप सरकार श्रीमंताचे आहे, मध्यमवर्गीयांच्या गरजांकडे दुर्लक्ष करते, अशी काँग्रेसची भूमिका असते. तर प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी मध्यमवर्गाला आयकरामध्ये सूट देण्याची चर्चा होते. यामध्ये तोच तो पणा असला, तरी मध्यमवर्गांच्या हितसंबंधाचा दावा केला जातो. समकालीन दशकामध्ये काँग्रेस मध्यमवर्गांची शत्रू आहे, अशी चर्चा विरोधक करतात. थोडक्‍यात राजकीय पक्ष मध्यमवर्गाच्या कलाकलांनी पुढे जातो. मध्यमवर्गांचा थेट विरोध राजकीय पक्ष घेत नाहीत. महाराष्ट्रात तर राजकीय पक्षांना या गोष्टीचे आत्मभान सातत्याने ठेवावे लागते. कारण महाराष्ट्रात उद्योग आणि सेवा क्षेत्रांतील उत्पादनाचा वाटा जवळजवळ ९० टक्के आहे (८८ टक्के). त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांशी संबंधित मध्यमवर्गांचे राजकारण घडते.

शहरातील मध्यमवर्गांची संरचना तीन प्रकारची आहे. १) कनिष्ठ मध्यमवर्ग २) मध्यमवर्ग ३) उच्च मध्यमवर्ग आणि अतिश्रीमंत वर्ग.

या तीन प्रकारचा मध्यमवर्ग सॉफ्ट पाॅवर आणि हार्ड पाॅवर अशा दोन घटकांच्या माध्यमातून शहरी राजकारण करतो. शहरी मध्यमवर्गाचे राजकारण ही नवीन घडामोड आहे. ही घडामोड नव्वदीपासून घडू लागली. त्यास ताकद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींनी पुरवली आहे. आरंभी शहरांचे सुशोभीकरण म्हणजे शहरी राजकारण अशी सुरुवात झाली. त्यानंतर स्मार्ट शहर असे नवीन वळण आले. याची सुरुवात पिंपरी चिंचवड येथे नव्वदीच्या आधी झाली होती. कारण तेथे प्राधिकरण अशी संस्था स्थापन केली होती. या घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण ग्रामीण भागातून शहरी भागात घडू लागले. या राजकारणाची ही चित्तवेधक कथा आहे. 

शहरी राजकारणातील हार्ड पाॅवर 
शहरी मध्यमवर्गाच्या राजकारणाचे एक साधन हार्ड पाॅवर हे आहे. हार्ड पाॅवर म्हणजे आर्थिक सत्ताकेंद्रावर नियंत्रण असते. त्या बरोबरच शहराच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा मानलेला असतो. हिंसा, दंगल, दहशतवाद, अतिरेकी संघटना, फुटीरतावाद, शहरी नक्षलवाद, भ्रष्टाचार, रिअल इस्टेट या प्रकारच्या चर्चा शहराच्या सुरक्षिततेबद्दल होतात. त्यांच्याशी संबंधित चर्चा लष्कर, पोलिस, गुप्तहेर, सीसी कॅमेरे अशी वेळोवेळी केली जाते. या घटकांच्या मदतीने शहरात सत्तेचे हार्ड पाॅवर स्वरूपाचे राजकारण केले जाते. हार्ड पाॅवरचे राजकारण महाराष्ट्रात चार गटांमध्ये विभागलेले दिसते. १) आर्थिक सत्ताकेंद्र हे मुंबई आहे. आर्थिक संस्था मुंबईशी संबंधित आहेत. याशिवाय नऊ जिल्ह्यांमध्ये शहरी भागात आर्थिक सत्ताकेंद्रे अति प्रभावी ठरतात. ते नऊ जिल्हे म्हणजे मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, नागपूर, पुणे, सांगली, कोल्हापूर हे आहेत. या शहरी आर्थिक सत्ताकेंद्राचे स्वरूप हार्ड पाॅवरचे आहे. म्हणजे येथील मध्यमवर्ग हा उच्च मध्यमवर्ग आणि अति श्रीमंत मध्यमवर्ग आहे. त्यांचे राजकारण हे शहरांची सुरक्षा आणि आर्थिक सत्ताकांक्षा या भोवती फिरते. हार्ड सत्तेसाठीची सत्तास्पर्धा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांमध्ये दिसते. २) यानंतर दुसऱ्या स्तरावरील शहरी हार्ड पाॅवर असलेले जिल्हे अहमदनगर, अकोला, वर्धा, जळगाव, औरंगाबाद, सोलापूर, रत्नागिरी, सातारा हे आहेत. या आठ जिल्ह्यांतील मध्यमवर्ग हा उच्च श्रीमंत आहे. परंतु, त्यांचे स्थान आरंभीच्या नऊ जिल्ह्यानंतरचे हार्ड पाॅवर म्हणून आहे. एक व दोन स्तरावरील जिल्ह्यांमध्ये मध्यमवर्गांचे राजकारण केंद्रित झाले आहे. मध्यमवर्गांची आर्थिक व ताकदीची हार्ड पाॅवर १७ जिल्ह्यांमधील शहरी भागात दिसते. ३) यानंतर मध्यम स्वरूपाची हार्ड पाॅवर बीड, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, गोंदिया, अमरावती, भंडारा व चंद्रपूर या आठ जिल्ह्यांतील शहरी भागात आहे. ४) सरतेशेवटीची अतिशय दुबळी शहरी मध्यमवर्गांची हार्ड पाॅवर नंदूरबार, गडचिरोली, वाशीम, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, जालना, लातूर आणि धुळे या नऊ जिल्ह्यांमध्ये आहे. तीन आणि चार अशा दोन पातळ्यांवरील हार्ड पाॅवर शहरी राजकारण फार प्रभावी करत नाही. परंतु, एक व दोन स्तरांवरील हार्ड पाॅवर मात्र शहरी राजकारणात प्रभावीपणे करते. 

शहरी सॉफ्ट पाॅवर 
महाराष्ट्रातील शहरी भागातील राजकारणाचे एक महत्त्वाचे माध्यम सॉफ्ट पाॅवर हे आहे. सॉफ्ट पाॅवर म्हणजे आर्थिक व लष्करी ताकदीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येये साध्य करण्याची क्षमता होय. अशा पद्धतीचे राजकारण सध्या शहरी भागात घडते. यांची महाराष्ट्रातील नमुनेदार उदाहरणे पुढील आहेत. 
१)     शैक्षणिक देवाणघेवाण हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या शहरी भागात नव्याने शैक्षणिक संकुले उभी राहिली आहेत. पुणे, मुंबई, नागपूर ही शैक्षणिक केंद्रे झाली आहेत. महाराष्ट्राच्या शहरी भागातील विद्यार्थांची संख्या वाढली आहे. त्यांची भरती मध्यमवर्गांत होते. तसेच त्यांना मध्यमवर्गांच्या राजकारणाशी जुळवून घेतले जाते. 
२)     चित्रपट, साहित्य, कला, विज्ञान, संगणक, नाटक, अशा क्षेत्रांशी संबंधित सांस्कृतिक अभिजन राजकारणात शिरकाव करत आहेत. त्यांचे आणि राजकीय पक्षांचे संबंध अतिउच्च व श्रीमंत मध्यमवर्ग म्हणून येतात. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा संस्था शहरी राजकारणाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. चित्रपट उद्योग संस्था राजकारणात पुढाकार घेतात. ऊर्मिला मातोंडकर, गोंविदा, हेमा मालिनी, जयाप्रदा, सनी देवल असे नेतृत्व या पद्धतीने वाढले. चित्रपट हे एक राजकारणाचे महत्त्वाचे माध्यम आहे. चित्रपट अप्रत्यक्ष राजकीय संवाद करतात. पाणी फाउंडेशन सारख्या संस्था राजकारणात थेट सहभाग न घेता राजकारणाशी जुळवून घेतात. संगीत, वाद्य, नृत्य, गायन या शहरी भागातील संस्था राजकीय पक्ष किंवा नेते यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सरतेशेवटी शहरी राजकारण घडते. 
३)     हिंदुत्व हा शहरी राजकारणाचा एक महत्त्वाचा आधार आहे. महाराष्ट्राच्या शहरी भागात संस्थात्मक बांधणी हिंदुत्वाने केली आहे. त्यांची सॉफ्ट पाॅवर म्हणून चळवळ कृतिशील आहे. 
४)     गांधीवादी व समाजवादी विचार आणि संस्था या शहरी राजकारणाचा भाग आहेत. त्यांची संस्थात्मक ताकद आहे. त्यांचे राजकारण सध्या वैचारिक पातळीवर घडते. 
५)     आंबेडकरवादी संस्था आणि विचार शहरी राजकारण करतात. या संस्थांच्या चळवळीदेखील आहेत. सांगली येथे धर्मनिरपेक्षता चळवळ काम करते. 
६)     महाराष्ट्राच्या शहरी भागात फूड चेन काम करते. मॅकडोनाल्ड, सब-वे, पिझ्झा हट, बर्गर किंग अशी उदाहरणे दिसतात. त्याबरोबर स्विगी, झोमॅटो अशा नवीन साखळ्या तयार झाल्या आहेत. फूड चेन बरोबर डी-मार्ट, स्टार, बिग बाजार, ब्रॅंड-फॅक्‍टरी अशी मॉल संस्कृती स्थिरस्थावर झाली आहे. 
७)     याशिवाय मध्यमवर्गांचे राजकारण आंतरजाल, सोशल मीडिया, विविध वाहिन्या अशा माध्यमांतून घडते. त्यांचे म्हणून एक शहरी राजकारण उच्च मध्यम व अति श्रीमंताचे घडते. या वर्गाने गरीब वर्गाला रोजगार दिला आहे. त्यामुळे शहरातील मध्यमवर्ग आणि गरीब यांची सांधेजोड झाली आहे. यांची सांधेजोड म्हणजेच शहरी राजकारणातील मध्यमवर्ग आणि गरीब यांचा राजकीय समझोता होय. सॉफ्ट पाॅवरमुळे शहरी राजकारणाला अधिमान्यता मिळते. शहरी राजकारण योग्य आणि उचित आहे, अशी धारणा घडली आहे.     

हार्ड व सॉफ्ट मिश्रण 
महाराष्ट्रात शहरी भागात मध्यमवर्गाने केवळ हार्ड किंवा केवळ सॉफ्ट पाॅवरबरोबर या दोन्ही सत्तांचे मिश्रण केले आहे. त्यामुळे शहरी भागात आर्थिक, शारीरिक ताकदीबरोबर सॉफ्ट पाॅवरचे मिश्रण उपयोगात आणले जाते. अशा प्रकारच्या मिश्रणामुळे हार्ड पाॅवरला सॉफ्ट पाॅवर अधिमान्यता मिळवून देते. त्यामुळे या दोन्ही सत्तांची शहरी भागात युती झालेली दिसते. या घडामोडीचा परिणाम म्हणजे शहरातील मध्यमवर्गांची भूमिका दुहेरी दिसते. शहरातील मध्यमवर्ग लवचिक, संदिग्ध, घसरडी अशी भूमिका घेतो. त्याबरोबर या वर्गांची अस्मिता नव्या युगाशी सुसंगत आहे, असाही दावा केला जातो. या गोष्टींमुळे शहरी मध्यमवर्गांचे राजकारण दोलायमान स्वरूपाचे दिसते.   
महाराष्ट्रातील शहरी भागात अशा दुहेरी चौकटीत राजकारण ऐंशीच्या दशकापासून घडू लागले. विशेष म्हणजे अशा दुहेरी चौकटीस ताकद राष्ट्रीय घडामोडींबरोबर आंतरराष्ट्रीय घडामोडींनी पुरवलेली दिसते. कारण त्यामुळे नवीन संदर्भात सॉफ्ट पाॅवरची चर्चा सुरू झाली. उदा. १९८९ मध्ये शीतयुद्धाचा अस्त झाला. त्यामुळे नवीन राष्ट्राचा उदय झाला. यातून राष्ट्रवादाचे स्वरूप पुन्हा युरोपियन म्हणून महाराष्ट्रातील शहरी भागात स्वीकारले गेले. अमेरिकन फ्रान्सिस फुकुयामाने इतिहासाचा अंत सिद्धांत मांडला. त्यांची शहरात चर्चा उभी राहिली. तसेच जोरेफ नाय यांनी सत्तेच्या हार्ड व सॉफ्ट पाॅवरची चर्चा केली. या गोष्टीचा विलक्षण प्रभाव महाराष्ट्रातील शहरी राजकारणावर पडला. म्हणजेच या आधीचे शहरी राजकारण जवळपास हद्दपार झाले. गांधींनी पाश्‍चिमात्य पद्धतीच्या राजकारणाला सुस्पष्ट विरोध केला होता. त्यांनी सॉफ्ट पाॅवरच्या संदर्भात वर्णाश्रम, मोक्ष, ग्रामसंस्था यांचे अर्थ लावले होते. त्यापासून शहरीभागातील राजकारण दूर गेले. शहरीभागातील मध्यमवर्गाने गांधींच्या बरोबर उलट अर्थ लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे महाराष्ट्रातील शहरी राजकारण हे केवळ पाश्‍चिमात्य पद्धतीचे अनुकरण सुरू झाले. यातूनच नवीन शहरांची स्थापना करण्याचा प्रकल्प पुढे आला. नवीन शहरांमध्ये राजकारणाचा पाया हार्ड पाॅवरवर आधारलेला जास्त होता. त्यामुळे शहरी मध्यमवर्गांचे राजकारण हे रिअल इस्टेटने गिळले. शहरी पक्षांचा ताबा मध्यमवर्गाच्या हातून निसटला. साठ-सत्तरीच्या काळातील शहरी पक्ष आज मध्यमवर्गाच्या हितसंबंधांचे दावेदार राहिले नाहीत. परंतु, शहरी पक्षांनी मध्यमवर्गाच्या राजकारणाचा एक भ्रम निर्माण केला. या अर्थाने मध्यमवर्गाचे शहरी राजकारण म्हणजे काय या प्रश्‍नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. तसा प्रयत्न केला जात नाही. थोडक्‍यात शहरी राजकारण मध्यमवर्ग करतोय. परंतु, मध्यमवर्गांच्या राजकारणाचा पोत पुरेसा विकसित झालेला नाही.

संबंधित बातम्या