पक्षांतराचे तत्त्वज्ञान लोकानुनयवादी

प्रकाश पवार
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

राज-रंग
 

महाराष्ट्राचे राजकारण पॉप्युलिझमच्या पद्धतीचे आहे. मराठीमध्ये लोकांनुरंजनवाद, लोकवाद, लोकैकवाद अशा संकल्पना वापरल्या जातात. ऑक्सफर्डने तर पॉप्युलिझमवर हँडबूक प्रकाशित केले आहे. त्यात जाफरलोट यांनी भारतीय संदर्भांत लेख लिहिला आहे. लोकांनुरंजनवादास, लोकानुनयवाद, लोकवाद म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात द. ना. धनागरे यांनी पॉप्युलिझम अ‍ॅंड पॉवर हा ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये पॉप्युलिझमची चर्चा त्यांनी केली आहे. ती चर्चा त्यांनी लोकानुनयवाद या अर्थाने केली होती. समकालीन दशकात लोक भाजपच्या बरोबर आहेत. म्हणून लोकांच्या बरोबर राहण्यासाठी महाराष्ट्रात पक्षांतर घडत आहे, असा दावा केला जातो. याशिवाय सत्ता आणि लोक यांचे संबंध अतूट आहेत. म्हणून सत्ताधारी वर्गांत शिरकाव करण्यासाठी पक्षांतर केले जाते. म्हणजे सत्ताकांक्षा आणि अर्थकांक्षावाचक संकल्पना पक्षांतर आहे. लोकांचे हितसंबंध हा मुद्दा मात्र वगळला जातो. त्यामुळे हा लोकवादी विचार खरे तर लोकांनुरंजनवादी, लोकानुनयवादी विचार आहे. त्यामुळे लोक ही संकल्पना अभिजनांचे हितसंबंध या अर्थाने वापरली जाते.  

लोकवादाचा अर्थ सत्ताकांक्षा
लोक ज्या पक्षाच्या बरोबर असतात त्या पक्षाबरोबर नेते जातात. हा लोकवादाचा अर्थ सत्ताकांक्षावादी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात संरचनात्मक फेरबदल बाराव्या विधानसभा निवडणुकीत झाले. म्हणजेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची जागा राजकारणातील आकाराने छोटी झाली. भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणातील जवळजवळ निम्मी जागा व्यापली. त्यास नवमहाराष्ट्राचे राजकारण म्हटले जाते. त्यामुळे या गोष्टीचा परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर झाला. बाराव्या विधानसभा निवडणुकीत दोन्हीही काँग्रेसकडून भाजपमध्ये सर्वांत जास्त पक्षांतर झाले. ही राजकीय घडामोड वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. याची कारणे पक्षीय स्पर्धा, सत्ताकांक्षा, अर्थकांक्षा, प्रतिष्ठाकांक्षा ही विशेष करून चर्चेत आहेत. परंतु, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्येदेखील याची पाळेमुळे असल्याची दिसतात. 

दिल्लीत सत्ता ज्या पक्षाची असते त्याच पक्षाची सत्ता राज्यात असावी असा महाराष्ट्रात प्रघात पडलेला दिसतो. कारण साठ-सत्तरीच्या दशकात महाराष्ट्र काँग्रेसबरोबर राहिला. परंतु, सत्तरीच्या शेवटी दिल्लीमधील सत्तास्पर्धेचा परिणाम महाराष्ट्रावर होऊन महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यावेळीदेखील नेत्यांनी पक्षांतरे केली. ऐंशीच्या दशकामध्ये पक्षांतरे होत राहिली. नव्वदीच्या दशकामध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये, काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी दोन मोठी पक्षांतरे झाली. परंतु, या दोन्हीही पक्षांतरांनी जवळपास राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेबरोबर जुळवून घेतलेले होते. गेल्या दशकात फार मोठे पक्षांतर झाले नाही. याचे मुख्य कारण दिल्लीत सत्ताधारी काँग्रेस पक्ष होता. दिल्लीतल्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होता. यामुळे राज्यामध्ये धुसफुस, तणाव असूनही नेत्यांनी केंद्रातील सत्तेशी जुळवून घेतले होते. सतराव्या लोकसभा निवडणुकीतून पुन्हा केंद्रात भाजपची सत्ता आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या नेत्यांचे मुख्य तत्त्व म्हणजे केंद्राच्या सत्तेशी जुळवून घेणे हे पुन्हा नव्याने पुढे आले. त्यामुळे दोन्हीही काँग्रेसमधील नेत्यांनी पक्षांतर सुरू केले आहे. याची मुख्य अंतर्गत दडलेली दोन कारणे ही पक्षीय सत्तास्पर्धेबाहेरचीदेखील आहेत. एक म्हणजे, पक्षांतर करणारा समूह हा सत्ताकांक्षी आहे. सत्तेविना त्यांना सार्वजनिक जीवन जगणे अवघड होते. दुसरे कारण म्हणजे, सत्ता आणि अर्थसत्ता यांचे जवळचे संबंध आहेत. आर्थिक सत्तास्थाने ही राजकीय सत्तास्थानांवरती अवलंबून आहेत. त्यामुळे राजकीय सत्ता जवळपास दहा वर्षे भाजपकडे राहणार असल्यामुळे आर्थिक सत्तास्थाने टिकवून ठेवणे खूपच अवघड आहे. असा अर्थबोध घेऊन दोन्ही काँग्रेस पक्षातील सत्ताकांक्षी आणि अर्थकांक्षी नेत्यांनी पक्षांतरे केली. 

दिल्लीतील सत्ता, राज्यातील सत्ता, सत्ताकांक्षा, अर्थकांक्षा या चतुःसूत्रीचा परिणाम होऊन पक्षांतर झाले. परंतु, याखेरीज दोन्ही काँग्रेसमध्येदेखील यापेक्षा वेगळी कारणेही होती. ती कारणे म्हणजे दोन्ही काँग्रेस पक्षांनी गेल्या दहा-पंधरा वर्षांत विचारप्रणालीपासून फारकत घेतली होती. दोन्हीही काँग्रेसचे राजकारण म्हणजे प्रस्थापित घराण्यांमधील सत्तास्पर्धा होती. त्या सत्तास्पर्धेशी सामान्य लोकांचा संबंधच राहिलेला नव्हता. म्हणजेच लोक किंवा मतदार हा घटक आणि नेते हे एकमेकांपासून वेगळे झाले होते. गटांचे सुसूत्रीकरण किंवा व्यवस्थापन म्हणजे दोन्ही काँग्रेस पक्ष होय. अशी नवीन रचना गेल्या दहा-पंधरा वर्षांत काम करत होती. त्यामुळे पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता नव्हता. व्यक्तिगत प्रतिष्ठेसाठी व आर्थिक सत्ताकांक्षेसाठी दोन्ही काँग्रेसचे नेते स्पर्धा करत होते. ही गोष्ट बाराव्या विधानसभेमध्ये उघडी पडली. त्यामुळे अशा गटांनी दोन्ही काँग्रेसच्या ऐवजी भाजप आणि शिवसेनेशी जुळवून घेण्यास सुरुवात केली.  

लोकवाद बहुमताची रणनीती 
 महाराष्ट्रात पक्षांतर निवडणुकीच्या दरम्यान होते. ही प्रक्रिया जवळपास सर्वसाधारण मानली जाते. परंतु, बाराव्या आणि तेराव्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानचे पक्षांतर याआधीच्या पक्षांतरापेक्षा वेगळे आहे. गेल्या पाच वर्षांपासून पक्षांतराची प्रक्रिया घडत गेली. त्या पक्षांतराचा संबंध सत्तांतराशी घट्टपणे जोडलेला आहे. बाराव्या विधानसभा निवडणुकीत सत्तांतर घडणार म्हणून पक्षांतर झाले. दोन्ही काँग्रेसकडून भाजप-शिवसेना पक्षांकडे सत्तांतर झाले. यामध्ये सत्तांतराचा अंदाज राजकीय नेत्यांना आला होता. सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तांतर महाराष्ट्रात होणार नाही, असा अंदाज नेत्यांना आला. त्यामुळे सत्तेसाठी स्पर्धा करण्यापेक्षा सत्ताधारी पक्षांशी जुळवून घेण्याची तडजोडीची विचारसरणी दोन्ही काँग्रेसमधील नेतृत्वाने स्वीकारलेली दिसते. ही घडामोड महाराष्ट्राचे राजकारण, पक्षीय राजकारण आणि नेतृत्व अशा बहुविविध अंगांनी घडते असे दिसते. 

पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबईसह कोकण या भागांमध्ये भाजप-शिवसेना पक्षात प्रवेशासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. या पक्षांतराचा म्हणजेच लोकवादाचा या भागातील राजकारणावर व पक्षीय स्पर्धांवर दूरगामी परिणाम होणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना-भाजपशी सत्तास्पर्धा करू शकतो. या स्पर्धेवर पक्षांतरामुळे परिणाम होणार आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली व पुणे या पाच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद घटणार असे दिसते. या जिल्ह्यांमध्ये प्रथमच भाजपला दमदार शिरकाव करता येईल. राजघराणी, खानदानी मराठा घराणी (माने, मोहिते, पाटील) आणि सहकार क्षेत्रातून नवश्रीमंत झालेली घराणी भाजपशी पश्‍चिम महाराष्ट्रात जुळवून घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या उच्चभ्रू मराठ्यांचे प्रतिनिधित्व करत होता. पक्षांतरामुळे भाजप हा पक्ष उच्चभ्रू व नवश्रीमंत मराठ्यांचे प्रतिनिधित्व करणार हा महत्त्वाचा फेरबदल पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधित्व राजकीय पक्ष करत नाहीत. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांच्या हितसंबंधाचा दावा केला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन वंचित आघाडी हे दोन पक्ष सर्व सामान्यांचे दावेदार आहेत. यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पक्षांतरामुळे सत्तास्पर्धेतून दोन्ही काँग्रेस दूर जाण्याची शक्यता जास्त आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपची नव्याने वाढ व विस्तार सुरू झाला आहे. भाजपला पक्षांतरामुळे खानदानी मराठा आणि सहकार या दोन घटकांचा नव्याने पाठिंबा मिळत आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्राशी मिळता जुळता विभाग उत्तर महाराष्ट्र हा आहे. कारण पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस पक्षामधून भाजप-शिवसेना पक्षात लोकवादी पद्धतीने पक्षांतर सुरू आहे. विखे, भारती पवार, चित्रा वाघ, मधुकर पिचड व वैभव पिचड यांनी पक्षांतर केले. भुजबळ घराण्याबद्दल चर्चा होत राहते. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, आदिवासी व ओबीसी समूहात प्रभावी होती. आदिवासी व ओबीसी समूहातील नेते राष्ट्रवादीकडून भाजपकडे वळण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामाजिक पाया ठिसूळ झाला. भाजपचा सामाजिक पाया मात्र भक्कम झाला आहे. याबरोबरच विखे, पवार, पिचड यांनी भाजपात प्रवेश करण्यामुळे एकूण उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात आदिवासी, ओबीसी, मराठा असा व्यामिश्र पाया भाजपचा उदयास आला. पक्षांतरामुळे भाजप या पक्षाला ताकद मिळाली. हा पक्ष शिवसेना पक्षापेक्षा जास्त शक्तिशाली झाला.  

शहरी भागात लोकवाद जास्त प्रभावी ठरतोय. नवी मुंबईतील नाइकांनी पक्षांतर केले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक हा शहरी भाग आहे. या शहरी भागात महाराष्ट्रात विधानसभेच्या सर्वांत जास्त जागा आहेत. येथे पक्षांतर दोन्ही काँग्रेसकडून शिवसेना-भाजपकडे होत आहे (सचिन अहेर, कोळंबकर इ.). यामुळे दोन्ही काँग्रेस पक्ष शहरी भागातून जवळपास हद्दपार होणार असे दिसते. दुसरे म्हणजे या भागातून भाजपच्या जागांमध्ये वाढ होईल. तसेच भाजप-शिवसेना अशी युतीची संकल्पना केली जाते. परंतु, पक्षांतरामुळे या प्रक्रियेत तणाव वाढत आहेत. पक्षांतर भाजप किंवा शिवसेना या पक्षात होते. परंतु, भाजप आणि शिवसेना यांपैकी शिवसेना पक्षातील प्रवेशाचा अर्थ वेगळा दिसून येतो. कारण तेराव्या विधानसभा निवडणुकीत केवळ भाजपला बहुमत मिळू नये, भाजपला बहुमतासाठी शिवसेना पक्षावर अवलंबून राहावे लागावे, असा शिवसेना पक्षातील प्रवेशाचा एक अर्थ लावला, तर तो वस्तुस्थितीवाचक ठरतो. भाजप पक्षातील प्रवेशाचा अर्थ पूर्ण बहुमत मिळवणे हा आहे. यामुळे शिवसेना-भाजप या दोन पक्षांचा पक्षांतराबद्दलचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. तसेच दोन्ही पक्षांतर्गत पक्षांतराची प्रक्रिया म्हणजे या दोन पक्षामध्ये महाराष्ट्रातील सत्तास्पर्धा आहे, असे सूचित होते. दोन्ही काँग्रेस पक्ष या पक्षांतराकडे हतबलता म्हणून पाहताना दिसतात. पक्षनिष्ठेचा अभाव, व्यक्तिगत कारणे, भरडे पीठ, भाकरी फिरवणे, बळाचा व सत्तेचा वापर करून पक्षांतरे घडवली जात आहेत, असे युक्तिवाद शरद पवार, अजित पवार, रोहित पवार यांनी केले आहेत. पक्षनिष्ठेचा अभाव व व्यक्तिगत कारणे यांची चर्चा म्हणजे विचारप्रणालीचा अंत झाला आहे असा घेतला जातो. परंतु, दोन्ही काँग्रेसमधील नेते हिंदुत्व विरोधी होते, असा होत नाही. कारण अनेक नेत्यांनी हिंदुत्व विचार अमान्य केलेला नव्हता. त्यामुळे व्यक्तिगत कारणे व पक्षनिष्ठांपेक्षा हिंदुत्वाशी मिळताजुळता विचार पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा होता, म्हणून पक्षांतर केले जाते. भाकरी फिरवणे आणि भरडे पीठ या दोन्ही संकल्पना आकर्षक आहेत. परंतु, भाकरी फिरवण्याची राजकीय चर्चा सतत होते. परंतु, भाकरी फिरवली तरी नवश्रीमंतांची भाकरी जाऊन सर्वसामान्यांकडे भाकरी आली नाही. त्यामुळे नेतृत्वात बदल झाले नाहीत. भरडे पीठ म्हटले, तर पिंपरी-चिंचवड, नाशिक, अकोला (अहमदनगर), नवी मुंबई ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यशस्वी राजकीय व संरचनात्मक प्रारूपे होती. त्यांच्यासाठी भरडे पीठ अशी संकल्पना सुसंगत ठरत नाही. म्हणजेच दोन्हीही काँग्रेसमध्ये एक साचलेपणा आला होता. त्यामुळे दोन्ही काँग्रेस पक्षांचे युक्तिवाद वस्तुस्थितीवाचक कमी व राजकीय जास्त वाटतात. एकूणच दोन्ही काँग्रेसची पक्षांतर विषयक चिकित्सेपेक्षा हतबलता दिसते. सत्तांतर झाले नाही तर भाजप सत्ताधारी असेल, परंतु त्या सत्तेचा एक भागीदार वर्ग खानदानी मराठा व नवश्रीमंत वर्ग असेल. म्हणजेच सत्ताधारी वर्गाची अभिजनवादी ही एक विचारसरणी आहे. त्या अभिजनवादी विचारांचे प्रतिनिधित्व भाजप करेल. भाजप-शिवसेना पक्षात पक्षांतर करणारे नेते अभिजनवादी हितसंबंधाचे प्रतिनिधित्व करतात. यामुळे अभिजनेत्तरांचे राजकारण पक्षांतराच्या प्रक्रियेमुळे घडण्याच्या शक्यता लोप पावतात. पक्षांतरामुळे भाजपातील मूळचे अभिजन आणि भाजपमध्ये पक्षांतर करणारे नेते यांची विचारसरणी हिंदुत्वाच्या चौकटीत समरस होईल. परंतु, या दोन वर्गांचे हितसंबंध वेगवेगळे आहेत. या अर्थाने भाजप हा पक्ष पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या अभिजनवादी हितसंबंधांना अवकाश उपलब्ध करून देईल. भाजपने अवकाश उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा नवी मुंबई, ठाणे, सातारा, सोलापूर येथे जाहीरपणे व्यक्त केली गेली. कारण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे त्यांची कोंडी झाली होती. या युक्तिवादाचा सरळ अर्थ हितसंबंधाची कोंडी झाली आहे. भाजपने ही कोंडी फोडली तरच भाजप व पक्षांतरीत यांच्यात समझोता यशस्वी होऊ शकतो. या अर्थाने भाजप नव्या वर्गासाठी नवी क्षेत्रे उपलब्ध करून देईल का? हा एक यक्ष प्रश्‍न निर्माण होतो. हाच नवीन पेचप्रसंग भाजपपुढे उभा राहिला आहे. हा मुद्दादेखील लोकवादाने निर्माण केला आहे.

संबंधित बातम्या