भाजपचे धुरीणत्व 

प्रकाश पवार
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

राज-रंग
 

तेराव्या विधानसभेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी कोणतीही खळखळ न करता झाली. त्यांनी समसमान जागांचे वाटप केले (प्रत्येकी १२५). तसेच तिसरा छोटा गटदेखील केला व त्यांना ३८ जागा दिल्या. या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस पक्षांच्यापुढे एकट्या भाजपचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान तीन गोष्टींमुळे उभे राहिले. त्यातील आरंभी गोष्ट म्हणजे हिंदुत्व ही आहे. मोदी-शहांचा विलक्षण प्रभाव, हे दुसरे कारण आहे. तिसरे कारण म्हणजे सरंजामी स्वरूपाच्या राजकारणाला जनतेचा विरोध हे दिसते. या तीन कारणांमुळे दोन्ही काँग्रेसबरोबरच शिवसेना, डावे पक्ष, आंबेडकरवादी पक्ष, समाजवादी पक्ष, छोटे पक्ष यांचा मोठ्या प्रमाणाव‍र ऱ्हास झाला आहे. म्हणून तेराव्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सर्वांत जास्त धामधूम दिसते. कारण भाजप हा पक्ष महाराष्ट्राचा धुरीण आहे. यामुळे भाजपेतर पक्षांमध्ये जवळपास सामसूम आहे. तरीही भाजपेतर पक्षांनी थोडेफार प्रयत्न केले आहेत. ते प्रयत्न पुरेसे नाहीत. परंतु, व्यूहरचना आखलेली आहे. त्या व्यूहरचनेतील एक भाग हा नवीन आघाडी उभी करण्याचा दिसतो. यामुळे भाजपचे धुरीणत्व हेच या निवडणुकीचे खास वैशिष्ट्य दिसते. 

बाराव्या विधानसभेची चौकट
तेरावी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही बाराव्या विधानसभा निवडणुकीच्या पायावर आधारीत होत आहे. कारण बाराव्या विधानसभा निवडणुकीत संरचनात्मक आणि वैचारिक फेरबदल झाले. त्या बदलांचे सातत्य अजूनही टिकून आहे. तसेच लोकसभा निवडणुकीचा परिणाम बाराव्या विधानसभा निवडणुकीवर झाला. तसाच परिणाम सध्याही तेराव्या विधानसभेवर होत आहे. यांचे दृश्य स्वरूप म्हणजे दोन्ही काँग्रेस पक्षामधून भाजप-शिवसेना पक्षांमध्ये पक्षांतरे होत आहेत. म्हणजेच राष्ट्रीय राजकारणातील बदलाचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर होत आहे. यामुळे दोन्ही काँग्रेस पक्षांमधील नेते आणि कार्यकर्ते यांना गळती लागली आहे. पक्षांतर व गळतीमुळे काँग्रेस पक्ष गलितगात्र झाला आहे. काँग्रेस पक्षाने दुय्यम भूमिका घेण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालादेखील गळती लागली. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पडझडीमधून पुन्हा उभी राहण्याचा प्रयत्न करते आहे, असे चित्र दिसते. यामुळे दोन्ही काँग्रेसचे आघाडी अंतर्गत संबंध, दोन्ही काँग्रेस आणि भाजप-शिवसेना युतीचे संबंध, दोन्ही काँग्रेस आणि युतीत्तर पक्षांचे संबंध यांचे जुने संबंध इतिहासजमा झाले. त्यांचे नवीन संबंध निर्माण झाले. याशिवाय नवीन संकल्पनांच्या आधारे राजकारण सुरू झाले. 

नरेंद्र मोदी-शहांची खेळपट्टी 
दोन्ही काँग्रेस पक्षांच्या पुढे भाजपने प्रचंड मोठे आव्हान उभे केले आहे. कारण आरंभीच्या म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या निवडणुकीप्रमाणे भाजपने बाराव्या व तेराव्या विधानसभा निवडणुकीत स्थान मिळवले आहे. भाजपची सर्व क्षेत्रात धामधूम दिसते. शिवसेना पक्ष भाजपचे बोट पकडून भाजपच्या रस्त्याने जात आहे. भाजपने काँग्रेसलादेखील मवाळ हिंदुत्वाच्या रस्त्यावर आणले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज केंद्रित हिंदुत्वाचे राजकारण सुरू केले. म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणाची मुख्य चौकट हिंदुत्व झाली आहे. हिंदुत्वाच्या खेळपट्टीवर दोन्ही काँग्रेसचे उमेदवार भाजप-शिवसेनेच्या विरोधात उतरणार आहेत. तर भाजपची खेळपट्टी हिंदुत्व ही होम पिच आहे. यामुळे सध्या आखाडा भाजपचा आहे. तो जसा हिंदुत्व विचारांचा आहे, तसाच तो नरेंद्र मोदी-अमित शहांनी घडवलेल्य डिजिटल समाजाचाही आहे. अशी नवीन खेळपट्टी दोन्ही काँग्रेससह शिवसेनेलादेखील नवीनच आहे. जरी शिवसेनेची युती भाजपशी असली, तरी भाजपने शिवसेनेला सुस्पष्टपणे लहान भावाचा दर्जा दिला आहे. यांचे आत्मभान शिवसेना पक्षाला आहे. याखेरीज बहुजन वंचित आघाडी ही पूर्ण चीतपट झालेल्या काँग्रेसच्या विरोधात आहे. बहुजन वंचित आघाडी भाजपच्या नव्या शक्तीचा सामना करण्यासाठी काँग्रेस पक्षांशी जुळवून घेत नाही. शिवाय बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसशी सूत जुळतच नाही. बहुजन वंचित आघाडीची एमआयएमशी मतभिन्नता आहे. थोडक्यात भाजप ही एकमेव शक्तिशाली ताकद दिसते. तर इतर पक्षांमध्ये सैरभैरपणा जास्त दिसतो. त्यामुळे कोणी आघाडी करावी, आघाडी कशी घडावी, आघाडी कशी घडू नये यांचे सर्व डावपेच आणि विचारसरणी भाजपच्या हाती आहे. म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त महाराष्ट्राची चर्चा देवेंद्र फडणवीस करतात. त्यास उत्तर देण्याची कामगिरी मात्र दोन्ही काँग्रेसला करावी लागत आहे. 

परंपरा विरोधी आधुनिकतेतील संघर्ष 
तेराव्या विधानसभा निवडणुकीत परंपरा विरोधी आधुनिकता असा संघर्ष सुरू झाला आहे. त्या घडामोडी चित्तवेधक आहेत. महाराष्ट्राची तेरावी विधानसभा निवडणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीकाभोवती फिरत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या प्रतीकावर लक्ष केंद्रित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक आधुनिक आहे. शिवाजी महाराजांचा आधुनिक विचार मात्र राजकीय पक्ष मांडत नाहीत. तरीदेखील स्वराज्याची संकल्पना, शेतकरी राजा, सामाजिक सलोख्यांचे प्रतीक, स्त्री-पुरुष समता अशी आधुनिक संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीकामधून निवडणूक प्रचारात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुस्लिम नेतृत्वाला पक्षाच्या बांधणीमध्ये स्थान दिले आहे. या अर्थाने तेरावी विधानसभा निवडणुकीत शिवाजी महाराजांचा अर्थ आधुनिकतेशी सांगड घालणारा पुढे आला आहे. अमोल कोल्हे, अमोल मिठकरी यांनी पक्ष संघटनेत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मध्यवर्ती आणला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे मानबिंदू आहेत. याचे आत्मभान दोन्ही काँग्रेसला आलेले सुस्पष्टपणे दिसते. याबरोबरच भाजप-शिवसेना यांनी छत्रपतींच्या संदर्भांत भूमिका घेतली आहे. छत्रपतींचे दोन्ही वारस भाजपकडे असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे भाजप व भाजपेत्तर पक्षांनी आपल्या आघाडीची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोवती गुंफण्यास सुरुवात केली आहे. शिवाजी महाराजांचा संबंध शेतकरी प्रतिमेशी दोन्ही काँग्रेस जोडते. त्याबरोबरच दोन्ही काँग्रेसने सामाजिक एकोप्याचे प्रतीक अशी चर्चा शिवाजी महाराजांच्या प्रतीकाची सुरू केली आहे. शेतकी समजाशी दोन्ही काँग्रेसची नाळ तुटली होती. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने शिवाजी महाराजांच्या प्रतीकांच्या माध्यमातून शेतकरी व तरुण समाजाशी जुळवून घेतले आहे.

सध्याचे राजकारण मिश्र स्वरूपाचे आहे. सरंजामी आणि आधुनिक असे शुद्ध राजकारण महाराष्ट्रात घडत नाही. आधुनिकतेच्या बरोबर सरंजामी राजकारण प्रत्येक पक्षांमध्ये घडते. सरंजामी राजकारणाला जनतेमध्ये विरोध वाढला आहे. सरंजामदार विरोधी जनता असा संघर्ष आहे. परंतु, पक्षांमध्ये सरंजामदारी पद्धतीचे नेतृत्व कृतिशील आहे. त्यामुळे पक्षांच्या विरोधात म्हणजे सरंजामशाहीच्या विरोधात जनता दिसते. जनतेचे सरंजामशाही विरोधी बंड दिसते. या अर्थाने पक्षांच्यापुढे सरंजामशाहीचे मोठे आव्हान आहे. दोन्ही काँग्रेस पक्ष म्हणजे सामाजिक आघाडीचा संघ होता. त्या संघाची संरचना विस्कळीत झाली आहे. संघाच्या केंद्रस्थानी सरंजामी नेतृत्व होते. ते सरंजामी नेतृत्व दोन्ही काँग्रेसकडून भाजप-शिवसेना पक्षांमध्ये गेले. त्यामुळे दोन्ही काँग्रेस आघाडीतील सरंजामी नेतृत्वाचा प्रभाव कमी झाला. यामुळे दोन्ही काँग्रेस पक्षांना सरंजामी नेतृत्वाच्या बाहेर जाण्याची नामी संधी मिळाली आहे. त्यांचा फायदा शरद पवारांनी करून घेण्याची व्यूहरचना आखलेली दिसते. सोलापूर, उस्मानाबाद, परभणी, औरंगाबाद येथील शरद पवारांच्या सभांमध्ये नवीन तरुण वर्ग दिसू लागला. शरद पवारांनी सरंजामशाही विरोधी तरुण अशी घोषणा जवळपास केलेली दिसते. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनंजय मुंडे, अमोल कोल्हे, अमोल मिठकरी अशी युवा ओबीसी फळी उभी केली. त्यांचा प्रभाव तरुण मराठा समाजावर आहे. यामुळे तरुण मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये नवीन सामाजिक एकोपा घडवला जात आहे. या नवीन आघाडीचे स्वरूप सामाजिक आहे. कारण सरंजामशाहीपेक्षा ही वेगळी भूमिका आहे. त्यामुळे अशा प्रकारचे राजकारण एका अर्थाने प्रगत आणि बदलले दिसते. ही दोन्ही काँग्रेस पक्षांची तेराव्या विधानसभेसाठीची नवीन आघाडी म्हणता येईल. दोन्ही काँग्रेसच्या खेरीज भाजपने मराठी संघ घडवलेला आहे. या आधी मराठी संघ आकाराला आला होता. तसाच मराठी संघ फडणवीसांनी घडवलेला आहे. या संघाची कोनशिला फडणवीस आहेत. संघाचे स्वरूप पदसोपानात्मक आहे. त्यांचे वेगवेगळे आधार सामाजिक आहेत. एक, विखे पाटील, मोहिते पाटील, निंबाळकर, भोसले- मोहिते हे सामाजिक आधार आधुनिक आणि सरंजामी असे मिश्र आहेत. दोन, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भांतील भाजपचे सामाजिक आधार ओबीसी आहेत. तीन, भाजपच्या या मराठी संघाचे वैशिष्ट्य म्हणजे सरंजामी राजकारणाला हा संघ आळा घालतो. अशी प्रतिमा भाजपने विकसीत केली आहे. त्यामुळे सरंजामीविरोधी जनता भाजपच्या सरंजामी विरोधी विचारांचे समर्थन करते.     
 भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मुख्य स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही पक्षांमध्ये धामधूम दिसते. हे दोन्ही पक्ष इतरांशी जुळवून घेत आहेत. विशेष स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दोन्ही काँग्रेस यांच्यामध्ये संवादाची शैली विकास पावली आहे. म्हणजेच थोडक्यात शेतकरी, छत्रपती शिवाजी महाराज, तरुण वर्ग अशा तीन घटकांशी नव्याने दोन्ही काँग्रेस पक्ष जुळवून घेत आहेत. ही दोन्ही काँग्रेसची नवीन आघाडी म्हणता येईल. आजच्या घडीला ही आघाडी नवीन आहे. तिची कार्यपद्धती नवीन आहे. परंतु, दोन्ही काँग्रेस तेराव्या विधानसभेसाठी नवीन संरचना उभी करत आहेत. हे सुस्पष्टपणे दिसते. भाजपने विविध छोट्या पक्षांशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे एकूण भाजपचे राजकारण आघाडी आणि स्वतंत्र राजकारण अशी दुहेरी भूमिका एकावेळी पार पाडत आहे. या घडामोडी आधुनिक आहेत. थोडक्यात तेराव्या विधानसभा निवडणुकीत परंपरा आणि आधुनिकता यांची सरमिसळ दिसते. तरीही राजकारणात थोडीफार स्पर्धा आहे. परंतु, भाजपचे वर्चस्वही आहे. भाजपची स्पर्धा वर्चस्वाची तर भाजपेतर पक्षांची स्पर्धा अस्तित्वासाठी आहे.    

संबंधित बातम्या