संरचनात्मक राष्ट्रवादाची दृष्टी

प्रकाश पवार
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

राज-रंग
 

महात्मा गांधीजींचे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष सुरू होते. त्याची या आठवड्यात सांगता झाली. गांधींचा भारतीय राजकारण आणि दैनंदिन व्यवहारावर आजही विलक्षण प्रभाव आहे. गांधींचा संदर्भ घेऊन येथील राजकीय पक्ष सत्तास्पर्धेत उतरतात. परंतु, सत्तास्पर्धेपेक्षा त्यांचे राजकारण वेगळे होते. म्हणजेच संरचनात्मक व क्रांतिकारी होते. या निमित्ताने तीन मुद्दे भारतीय संदर्भांत जास्त महत्त्वाचे आहेत. एक, गांधींचा विचार पाश्‍चिमात्य विचारांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. दोन, त्यांची ऐतिहासिक दृष्टी पाश्‍चिमात्य इतिहास लेखकांपेक्षा वेगळी होती. तीन, गांधींचा संरचनात्मक राष्ट्रवाद हा राजकीय राष्ट्रवादाचा विचार भेदून पुढे गेला होता. या त्रिसूत्रांची पुनर्मांडणी आजच्या संदर्भांत उपयुक्त ठरते. या तीन मुद्यांची कथा गुंतागुंतीची आहे. परंतु, त्यांचे काही कंगोरे चित्तवेधक आहेत. ऐतिहासिक दृष्टी, संरचनात्मक राष्ट्रवाद व समावेश या तीन कथा एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. या तीन कथा राजकारणाला नवीन दिशा देणाऱ्या आहेत. 

ऐतिहासिक दृष्टी
महात्मा गांधींच्या लेखनामधून अभिव्यक्त होणारी पहिली कथा म्हणजे त्यांची इतिहास लेखनाची पद्धती होय. गांधींची ऐतिहासिक दृष्टी हिंदस्वराज्य या पुस्तकामध्ये सुस्पष्टपणे व्यक्त झाली. गांधींच्या आधी पाश्‍चिमात्यांनी हिंदुस्थानाचे इतिहास लेखन सुरू केले होते. पाश्‍चिमात्यांनी हिंदुस्थानाचा इतिहास नकारात्मक आणि तुच्छतावादी पद्धतीने लिहिला. गांधींजीनी इतिहासाच्या विवेचनाची सुरुवात प्रेम, अहिंसा, नवनिर्मिती, बुद्धिजीवी व्यक्ती, कर्तृत्ववान व्यक्ती, विवेकी स्त्री, जबाबदारी अशा गोष्टींना मध्यवर्ती ठेवून केली. गांधींनी राजा-राणीच्या कथा, सरदारांच्या कथा, वैराच्या कथा, हिंसेच्या कथा, युद्धाची कथा, पराभवाची कथा, कटकारस्थानाची कथा, बेबनावाची कथा, हत्यांची कथा इत्यादींना इतिहासामधून बाहेर काढले. थोडक्यात त्यांनी इतिहासाचे शुद्धीकरण सुरू केले. इतिहासातील प्रेमाचे संबंध, कैवल्याचे संबंध, जिव्हाळ्याची नाती त्यांनी इतिहासाचा पाया म्हणून मांडली. या अर्थाने त्यांनी इतिहास हा अंतरायाचा नाकारला. त्यांनी इतिहास हा सामाजिक सलोख्याचा, मानवतेचा, स्वराज्याचा म्हणून अधोरेखित केला. या इतिहासाची दृष्टी सकारात्मक दिसते. इतिहासातील साध्य आणि साधनांची त्यांनी सुसंगती मांडली. ऐतिहासिकदृष्ट्या सध्या इतकेच साधन महत्त्वाचे आहे, अशा कथांचे त्यांनी इतिहास उलगडताना विवेचन सुरू केले. या विवेचनाचा अर्थ म्हणजे त्यांनी समाजाचा इतिहास, समाजातील स्थितीबदलाचा इतिहास, परिवर्तनाचा इतिहास, आत्मबळाचा इतिहास, सहिष्णूतेचा इतिहास, सहकार्याचा इतिहास, समावेशनाचा इतिहास अशी स्वत:ची चौकट विकसित केली. ही गांधींची इतिहासाची हिंदुस्थानी नवीन दृष्टी तसेच नवीन कथा आहे. या दृष्टिकोनातून त्यांनी हिंदुस्थानच्या इतिहासाची त्यांच्या गरजेप्रमाणे चिकित्सा केली. तर इंग्रजांची इतिहास दृष्टी ही भेददृष्टी होती. गांधींची इतिहास दृष्टी ही सकलजनांच्या मांगल्याची जीवन दृष्टी होती. या अर्थाने ती सकलजनवादी दृष्टी आहे. तसेच नवनिर्मितीचा शोध घेणारी त्यांची इतिहास दृष्टी होती. म्हणून गांधींनी सामान्य व्यक्तींचा इतिहास महत्त्वाचा मानला. त्यांनी शेतकरी, कामगार, स्त्रिया, कारागीर यांचा इतिहास पुढे आणला. त्यांना इतिहासाचे नायक केले. त्यांना इंग्रजांच्या इतिहासाची कथा बळाची, दंगलीची, हिंसेची, वैराची वाटत होती. इंग्रजांनी केवळ विघ्नाचा इतिहास लिहिला. त्यांना इतिहासात केवळ संघर्ष, स्पर्धा, द्वेष व कलह दिसला. याउलट गांधींच्या आतल्या आवाजानुसार इतिहास हा अन्याय कायद्यांच्या प्रतिकाराचा आहे. म्हणून सत्य, सत्याचा शोध, सत्याग्रह, अहिंसा हा इतिहासाचा मूल्यात्मक गाभा ठरतो. या मूल्यात्मक आशयाच्या विकासाची दूरदृष्टी इतिहास लेखनात गांधींना दिसते. म्हणून गांधींच्या दृष्टीने सत्याग्रहातून स्वराज्य आणि सत्याग्रहाचा अभाव म्हणजे कुराज्य होय. सत्याचा केवळ आग्रह नव्हे, तर सत्य ग्रहण करणे म्हणजे सत्याग्रह ही इतिहासाची विवेचन शैली गांधींनी विकसित केली होती. ती दूरदृष्टी आज लोप पावली आहे. या अर्थाने गांधींची इतिहास दृष्टी गहाळ झाली आहे. तिचा पुनर्शोध घेण्याची जबाबदारी अर्थातच विज्ञान-तंत्रज्ञानासह सर्व शास्त्रांवर आहे. या दृष्टीच्या शिवाय विज्ञान-तंत्रज्ञानाच्या कथा या बळाच्या ठरतील. मानवी स्वभाव क्षमाशील असलेला वैरी म्हणून पुढे येईल. छोट्यामोठ्या पडद्यावरील नायक-खलनायक यांच्यातून पाझरणारी दृष्टी ही गांधींच्या बरोबर उलटी आहे. त्यामुळे नायकापेक्षा खलनायक जास्त महत्त्वाचा असतो. नायक हादेखील हिंसक असतो. थोडक्यात मोठ्या प्रमाणावर आजचे सांस्कृतिक विश्‍व हे गांधींचे नाही. गांधींची इतिहास दृष्टी हातून निसटलेली आहे. गांधीजींनी इतिहास संशोधनातील बळाची दृष्टी बाजूला सारली. त्यांनी आत्मबळाची ऐतिहासिक दृष्टी जगाला दिली. त्या दूरदृष्टीचा पुनर्शोध भारताच्या संरचनात्मक राष्ट्रवादासाठी गरजेचा आहे. हा विचार आजही गांधींच्या विचारातील भारत घडवण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणून त्यांच्या पुनर्चिंतनाची गरज आहे. यांची जाणीव त्यांच्या इतिहास विवेचन पद्धतीमधून येते. गांधींची ही इतिहास अभ्यासाची पद्धती कार्ल मार्क्ससारखी लोकप्रिय झाली नाही. तिची स्वतंत्र चिकित्सा झालेली नाही. तिचा उपयोग नीटनेटका झाला नाही. या गोष्टी लक्षात येतात. हा त्यांचा दुर्लक्षित राहिलेला इतिहासविषयक पैलू आहे.             

संरचनात्मक राष्ट्रवाद 
 इतिहासाप्रमाणेच गांधींची मुख्य दृष्टी राष्ट्रवादाची होती. परंतु, ती केवळ राष्ट्रवादाची दृष्टी नव्हती. कारण गांधींचा राष्ट्रवाद निव्वळ ब्रिटिश विरोधी नव्हता. या अर्थाने तो राजकीय राष्ट्रवाद नव्हता. राजकीय राष्ट्रवादाची संकल्पना गांधीच्या संरचनात्मक राष्ट्रवादापेक्षा वेगळी निश्‍चित आहे. कारण गांधींना हिंदुस्थानमधील लोकांमध्ये सांस्कृतिक एकत्व दिसते, तर इंग्रज इतिहास लेखकांना ते दिसत नाही. गांधींचा युक्तिवाद असा आहे, की हिंदुस्थानमध्ये राष्ट्र होते, म्हणूनच इंग्रजी राज्यसंस्था स्थापन झाली. जर एकत्वाची भावना नसती, तर इंग्रजांना हिंदुस्थानमध्ये राज्य स्थापन करता आले नसते. राजांमध्ये, सरंजामदारामध्ये संरचनात्मक राष्ट्रवाद नव्हता. त्यामुळे राज्यसंस्थाचा ऱ्हास झाला. परंतु, सामान्य जनतेमध्ये राष्ट्राच्या एकत्वाची जाणीव होती. हा गांधीजींचा युक्तिवाद विलक्षण दूरदृष्टीचा आहे. गांधींची संरचनात्मक राष्ट्रवादाची संकल्पना सकारात्मक आरंभबिंदूपासून सुरू होते. त्यामुळे राजकीय संस्थांचा आधार, आत्मबळ, आत्मसंयम, आतला आवाज असावा असा आग्रह धरते. राजकीय संस्थांचा हेतू हिंसेऐवजी अहिंसेचा पुरस्कार, द्वेषाऐवजी प्रेमाचा पुरस्कार, शस्त्रबळाऐवजी आत्मबळाचा पुरस्कार असा आहे, असे विवेचन त्यांचे साकलिक आणि सौक्ष्मिक अशा दोन्ही पद्धतीचे आहे. प्रतिस्पर्धकांवर विजय मिळवणे हा त्यांच्या राष्ट्रवादाचा उद्देश नाही, तसेच आशयही नाही. त्यांच्या संरचनात्मक राष्ट्रवादाची रचना मूल्यात्मक आहे. राष्ट्रवादाची मूल्यात्मक संरचना म्हणजे साध्याबरोबर साधन ही शुद्ध व पवित्र असावे. प्रतिस्पर्धकाविरोधी संघर्षशील होण्याआधी आत्म्याची शुद्धी झाली पाहिजे. म्हणजे संरचनात्मक राष्ट्रवादी आणि प्रतिस्पर्धक यांच्यातील संघर्ष हा पर्यायी नवीन राष्ट्रवादाची स्थापना करणारा असतो. या अर्थाने गांधींची राष्ट्रवादाची संकल्पना केवळ राजकीय राहत नाही. त्यांची राष्ट्रवादाची संकल्पना इंग्रजांकडून-हिंदुस्थानी लोकांकडे सत्तांतर अशी राहत नाही. त्यांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेत सर्वसामान्य लोकांच्या सामूहिक हितसंबंधांच्या आशयाची संरचना दिसते. त्यांनी मांडलेला राष्ट्रवाद हा सत्तांतराऐवजी मूल्यात्मक परिवर्तनाचा आग्रह धरतो. म्हणून गांधींचा राष्ट्रवाद हा सत्तांतराच्या आणि सत्तास्पर्धेच्या राजकीय राष्ट्रवादापेक्षा वेगळा आहे. गांधींचा संरचनात्मक राष्ट्रवादामध्ये नवा भारत दिसतो. नवीन भारताची संकल्पना गांधींनी संरचनात्मक राष्ट्रवादाच्या मदतीने मांडली. गांधींच्या नव्या भारताच्या संकल्पनेचे तीन महत्त्वाचे पैलू आहेत. एक, पाश्‍चिमात्य राज्यसंस्थेच्या प्रतिकृतीला नकार. परंतु, त्याच वेळी भारतीय राज्यसंस्थेच्या स्थापनेचा पर्यायी आराखडा त्यांनी तयार केला. दोन, पाश्‍चिमात्य आणि विषमता आधारीत भारतीय समाज व्यवस्थेला नकार. परंतु, त्याबरोबर भारतीय समाजाच्या नवर्निमीतीची संकल्पना त्यांनी विकसित केली. तीन, त्यांनी नवीन सांस्कृतिक व्यवस्था मांडली. या मांडणीमध्ये त्यांनी सामाजिक न्याय हा विचार कळीचा मानला होता. गांधींच्या संरचनात्मक राष्ट्रवादाचा न्याय ही खरी प्रेरणा होती. न्याय हा उद्देश होता. ही त्यांची हिंद स्वराज्याची ध्येयदृष्टी होती. थोडक्यात संसदीय व्यवस्था स्थापन करणे हा त्यांचा उद्देश आहे, तर हिंदस्वराज्य ही त्यांच्या संरचनात्मक राष्ट्रवादाची तीव्र इच्छाशक्ती होती. गांधीजींच्या संरचनात्मक राष्ट्रवादामध्ये मूल्यांचादेखील संवाद झालेला दिसतो. कारण गांधीजींनी शठं प्रति सत्य अशी संरचना उभी केली. यामध्ये त्यांनी आत्यंतिक अहिंसा आणि बुद्धाची अहिंसा यांचा संवाद घडवला आहे. तो त्यांच्या संरचनात्मक राष्ट्रवादाचा आशय व गाभा आहे. म्हणून गांधींचा संरचनात्मक राष्ट्रवाद हा राजकीय राष्ट्रवाद नाही. कारण त्यांचा राष्ट्रवाद सत्ताधारी-प्रतिस्पर्धक असा अंतराय उभा करत नाही. सत्तास्पर्धा व सत्तांतर हा केवळ एकमुखी कार्यक्रम संरचनात्मक राष्ट्रवादाचा नव्हता. म्हणून गांधींचा राष्ट्रवाद हा विश्‍वबंधुत्व व आंतराष्ट्रवादाशी संवादी राहतो. 

समावेशनाची दृष्टी 
 गांधींचा संरचनात्मक राष्ट्रवाद समावेशनाचे तत्त्व स्वीकारतो. म्हणूनच गांधीच्या राष्ट्रवादाची दृष्टी ही बहुल समाजांशी सुसंगत अशी आहे. त्यांनी इंग्रजांची एक भाषा, एक धर्म, एक संस्कृतीची संकल्पना नाकारली. अशी दृष्टी पाश्‍चिमात्य वळणाची आहे. गांधींनी इतिहासामधून समावेशन आणि राष्ट्रीय एकत्व यांची सांधेजोड केली. राष्ट्रीय एकत्व हिंदुस्थानमध्ये खोलवर मुरलेले गांधींना दिसते. त्याची राजकीय कथा गांधींनी मानवी स्वभावाशी जोडली. गांधींच्या दृष्टीने मानवी स्वभाव हा क्षमाशील आहे. त्यामुळे मानवी स्वभावातील क्षमाशीलता समाजात दिसते. समाजात क्षमाशीलता असण्यामुळे समावेशनाची प्रक्रिया घडते. हे सूत्र गांधींना इतिहासात सुस्पष्टपणे दिसते. म्हणून गांधी क्षमाशील राष्ट्रवादाची संकल्पना विकसित करतात. त्यामुळेच गांधी हुकूमशाही प्रवृत्तींना विरोध करून लोकशाहीच्या स्थापनेसाठीचा संरचनात्मक राष्ट्रवाद मांडतात. गांधीची ही दूरदृष्टी मॅझिनीसारखी दिसते. कारण मॅझिनीनेदेखील हुकूमशाहीऐवजी लोकशाहीचा पुरस्कार केला होता. म्हणून गांधी व मॅझिनी यांनी बळाऐवजी आत्मबळाच्या दृष्टीचा विकास केला. आत्मबळाची संकल्पना हद्दपारीच्या किंवा वगळण्याऐवजी समावेशनाचे तत्त्व स्वीकारते. समावेश ही संकल्पना धर्म, जात, वर्ण, भाषा, प्रदेश अशा विविध प्रकारच्या भेदांना थरा देत नाही. गांधींची समावेशन ही प्रक्रिया सहजीवनाची संकल्पना आहे. या अर्थाने गांधींचा विचार हा सहजीवनाचा विचार आहे. सत्ताकांक्षा, अर्थकांक्षा, परद्वेषकांक्षा या आत्मशत्रूशी संघर्ष करण्याचे तत्त्वज्ञान गांधी विचारात आपणास दिसते. थोडक्यात गांधींची इतिहास दृष्टी व संरचनात्मक राष्ट्रवाद हा आज पाश्‍चिमात्यांना आणि आशियायी देशांनाही उपयुक्त ठरणारा आहे. हाच या युगाचा युग धर्म आहे. 
 

संबंधित बातम्या