नवीन प्रारूपे आणि सत्तासंघर्ष

प्रकाश पवार
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

राज-रंग
 

महाराष्ट्राच्या राजकारणात तीन नवीन प्रारूपे घडली. फडणवीस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार या तीन प्रारूपांमध्ये सत्तासंघर्ष झाला. सत्तास्थापनेचा संघर्षदेखील फडणवीस विरोधी उद्धव ठाकरे यांच्या प्रारूपांमध्ये सुरू आहे. तर विरोधी पक्षाचे स्थान शरद पवार प्रारूपास मिळालेले आहे. ही तीन प्रारूपे महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यवर्ती आहेत. त्यामुळे या तीन प्रारूपांचा अर्थ काय आहे? त्यांच्या राजकारणाची सामाजिक, आर्थिक वैशिष्ट्ये कोणती आहेत? ही कथा समजून घेणे गरजेचे ठरते. बिगर काँग्रेस पक्ष दुसऱ्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला. याबरोबर बिगर काँग्रेस युतीस स्पष्ट बहुमत मिळाले. ही वस्तुस्थिती एक प्रकारची आहे. या वस्तुस्थितीची अंतर्गत बाजू वेगळी आहे. ती म्हणजे एकट्या भाजपला बहुमत मिळालेले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपची घसरण झाली. शिवसेना पक्षाला बहुमत मिळालेले नाही. शिवसेना पक्षाची पडझड झाली. या दुसऱ्या अंतर्गत बाजूकडे भाजप आणि शिवसेना पक्षाने काळजीपूर्वक पाहिले नाही. त्यांनी केवळ मोठा पक्ष कोणता आहे? यावर लक्ष केंद्रित केले. पडझडीचे आत्मपरीक्षण बाजूला ठेवले गेले. दोन्ही पक्षांनी सत्तावाटप या एकच विषयावर लक्ष केंद्रित केले. जनतेने जागा आणि मतांची टक्केवारी युतीस जास्त दिली. ती मतदार जनता ओल्या दुष्काळात सापडली. अशा मतदारांना मदत करण्यासाठी सरकारची गरज होती. परंतु, युतीने सरकार तयार करण्याऐवजी सत्तावाटपाचा घोळ घातला. यातून युतीची जनतादक्ष ऐवजी सत्तावाटपदक्ष अशी नवीन प्रतिमा पुढे आली. जनता आणि सत्ता यांचे संबंध जवळपास दुर्लक्षित झाले. त्यामुळे युतीने स्वतःबद्दलच्या अपप्रचाराला स्वत:च सुरुवात केली. या दोन्ही पक्षांनी एकमेकाबद्दलचा अविश्‍वास निर्माण केला. ही निवडणुकीनंतरची सर्वांत मोठी घडामोड ठरली. हे आहे सर्वसाधारण आकलन. याकडे सौक्ष्मिकपणे पाहिले, तर असे दिसते की फडणवीस आणि उद्धव ठाकरे अशी दोन स्वतंत्र प्रारूपे बाळासाहेब ठाकरे उत्तर काळात उदयास आली. 

उद्धव ठाकरे प्रारूप
 बाळासाहेब ठाकरेंच्यानंतर उद्धव ठाकरे यांची चर्चा नेहमी नकारात्मक केली गेली. परंतु, वस्तुस्थिती वेगळी होती. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणावर सकारात्मक ठसा उमटवला. त्यांनी शिवसेनेच्या राजकारणाची सौक्ष्मिक सूत्रे नव्याने घडवली. सध्या तर उद्धव ठाकरे प्रारूप घरोघरी पोचलेले दिसते. एक, बाळासाहेब ठाकरेंचा वारसा त्यांनी गरजेप्रमाणे निवडणूक आखाड्यात उपयोगात आणला. परंतु, उद्धव यांच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या नजरेतून ते बाळासाहेबांचा वारसा कौशल्याने उपयोगात आणत आहेत, हे सूत्र निसटले होते. दोन, बाळासाहेब ठाकरे उत्तर काळ हा जास्त गुंतागुंतीचा झाला. मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक येथील आर्थिक-सामाजिक वास्तव अतिजलदपणे बदलले. परंतु, तरीही उद्धव यांनी मुंबई-ठाणे या शहरी भागातून पक्षाची पडझड होऊ दिली नाही. त्यांनी या शहरी भागात नवीन नेतृत्व उभे केले. तसेच येथे भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांशी सातत्याने संघर्ष केला. येथील त्यांचे बालेकिल्ले सुरक्षित ठेवले. किंबहुना अप्रत्यक्षपणे भाजप विरोधात दोन्ही काँग्रेसने शिवसेना पक्षाला रसद पुरवली. हे सूत्र जुने असले तरी नव्या संदर्भांत उद्धव यांनी त्यांची डागडुजी केली. तीन, उद्धव यांनी शिवसेना पक्षाची रणनीती लवचीक ठेवली. परंतु, गरजेप्रमाणे ताठर भूमिका घेतल्या. गेल्या पंधरा दिवसांत त्यांची ताठर भूमिका दिसली. यामुळे पक्षाकडे सत्ता खेचून आणणारा नेता अशी त्यांची प्रतिमा उभी राहिली. याशिवाय नेतृत्व तडजोडीच्याखेरीज संघर्षशील आहे. हा संदेश त्यांनी शिवसैनिक या तळागाळातील घटकाला दिला. फडणवीस यांनी त्यांचे संघर्षशील स्वरूप स्पष्ट करण्यासाठी नृसिंहाचे प्रतीक वापरले होते. हे प्रतीक त्यांनी शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत वापरले होते. थोडक्यात या दोन्ही नेतृत्वात सत्तास्पर्धा होती. त्यांचे डाव प्रतिडाव महत्त्वाचे होते. फडणवीस जागा वाटप, प्रचारात आणि निवडणूक निकालात वरचढ ठरले. परंतु, उद्धव यांनी निवडणुकीनंतर भाजपला कोंडीत पकडले.

देवेंद्र फडणवीस प्रारूप
गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे नेतृत्व विकसित केले. त्यांनी काही वैशिष्ट्ये पुढे आणली. त्या नेतृत्वाला मान्यता दिल्लीने दिली. एक, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वास नरेंद्र मोदी-शहा यांच्या भाजपचा आणि संघाचा असे दोन संस्थात्मक आधार मिळाले. हे फडणवीस प्रारूपाचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांनी पक्षातील त्यांच्या विरोधकांना नियंत्रणात ठेवले. वेळप्रसंगी त्यांनी पक्षातील नेत्यांना पक्षातून हद्दपार केले. त्यामुळे जुनी भाजप जवळपास बाजूला सरकली. हा वळणबिंदू फडणवीस यांनी घडवला. दोन, फडणवीसांनी उच्च जाती आणि मराठा यांच्यामध्ये सत्तावाटपाचा समझोता घडवला. त्यांनी मराठ्यांच्या हितसंबंधाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे मराठा आरक्षण, सारथी संस्था आणि मराठा साखर कारखानदारांना फडणवीसांनी संरक्षण दिले. तसेच उच्च जाती व मराठा यांच्यामध्ये एक संवादाचा पूल तयार केला. मराठ्यांनी जवळपास फडणवीसांचे नेतृत्व राज्यपातळीवर मान्य केले (विखे, मोहिते, भोसले). तीन, उच्च जाती, मराठा, अमराठी, अनुसूचित जाती व जमाती यांच्यामध्ये एक समझोता दिसत होता. ही संरचना पिरॅमिडच्या आकाराची त्यांनी घडवली. पिरॅमिडच्या शिखरावरती फडणवीसांचे स्थान पक्षात उदयास आले. पिरॅमिडचे स्थान दिल्लीने निश्‍चित केले. त्यामुळे पिरॅमिडची संरचना राज्यातील, परंतु पिरॅमिडचा प्रमुख ठरविण्याचा अधिकार दिल्लीकडे आहे. हे फडणवीसांचे शक्तिस्थान आहे. चार, सर्व प्रकारच्या मीडियांशी फडणवीस संवादी राहिले. त्यांनी मीडियाला भाजप विरोधी जाऊ दिले नाही. त्यामुळे सत्ताधारी विरोध उफाळून वर आला नाही. तो अदृश्य स्वरूपात राहिला. यामुळे उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये गेल्या पाच वर्षांत संघर्ष सुरू राहिला. फडणवीस प्रारूपाची दुबळी बाजू म्हणजे त्यांनी शिवसेना पक्षाशी युती केली. त्यामुळे समाजात भाजपचे सामाजिक आधार कच्चे आहेत, शिवसेनेशी संलग्न आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांत स्वतंत्रपणे वाढले नाहीत, अशी प्रतिमा गेली. 

शरद पवार प्रारूप
शरद पवारांनी त्यांच्या जुन्या प्रारूपाची डागडुजी केली. त्यास जनतेने अधिमान्यता दिली. शरद पवारांच्या प्रारूपाची मुळे यशवंतराव चव्हाण प्रारूपात आहेत. त्या मुळावर हल्ला फडणवीस प्रारूपाने केला. त्यामुळे शरद पवारांनी मुळाच्या संरक्षणाची रणनीती आखली. यातून त्यांच्या प्रारूपाची पुनर्रचना झाली. त्यांनी काही प्रमाणात पुनर्मांडणी केली. या प्रक्रियेतून शरद पवार प्रारूपाची नवीन वैशिष्ट्ये विकास पावली. एक, शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक राजकारणात नव्याने स्वीकारले. पवारांनी शिवस्वराज्य ही संकल्पना बोलीभाषेच्या स्वरूपात विकसित केली. त्यास प्रतिसाद मिळाला. दोन, शरद पवारांनी मराठा, ओबीसी आणि मुस्लिम या तीन समूहांमध्ये एकजूट घडवली. त्यांच्या पक्षामध्ये या तीन घटकांचे स्थान कळीचे राहिले. तीन, दिल्ली विरोध हा विचार पवारांनी धारदार केला. त्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्र यांच्यातील राजकीय संघर्ष ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक अशा बहुविविध पद्धतीने मांडला. चार, शरद पवारांच्या नेतृत्वाला युवकांचा प्रचंड पाठिंबा मिळाला. त्यांची प्रतिमा उठावदार झाली. पाच, शरद पवारांच्या नेतृत्वाला सत्तरीच्या दशकापासून काँग्रेसचा प्रचंड विरोध होता. या निवडणुकीत शरद पवारांनी काँग्रेसशी जुळवून घेतले. तसेच काँग्रेसचा शरद पवार विरोध कमी कमी होत गेला. सरतेशेवटी तर शरद पवार आणि काँग्रेस यांच्यामधील अंतर संपुष्टात आले. शरद पवारांनी काँग्रेस पक्षाला हात दिला. परंतु, काँग्रेस अंतर्गत निवडणूक विषयक निराशा होती. त्यामुळे काँग्रेसच्या पाठीशी शरद पवार असूनही पन्नाशीचा आकडा ओलांडता आली नाही. पाच, शरद पवारांनी या आधी पुन्हा पुन्हा पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षता अशी प्रचारात भूमिका मांडली होती. या निवडणुकीत त्यांनी पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षता या दोन्ही गोष्टींचा प्रचार कमीत कमी केला. त्यांनी सर्वधर्मसमभाव ही त्यांची वैचारिक भूमिका निश्‍चित केली होती. त्यांची कण्हेरीच्या मारुतीवर श्रद्धा सुरुवातीपासून होती. त्यांनी ही चौकट खुलेआम स्वीकारली. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांच्या सर्वधर्मसमभावाचा धागा पुढे रेटला. त्यासाठी अजित पवार, अमोल कोल्हे, अमोल मिठकरी त्यांच्या मदतीस आले. विशेष म्हणजे यामुळे सामाजिक संभाजी बिग्रेड या संघटनेचे अनेक युवा नेते राष्ट्रवादीशी जुळवून घेऊ लागले. प्रवीण गायकवाड यांनी सामाजिक संभाजी बिग्रेड आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे चलनवलन घडवून आणले. थोडक्यात सर्वधर्मसमभाव हा विचार ओबीसी आणि मुस्लिम या दोन्ही समाजांनी मान्य केला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत मराठा विरोधी बहुजन असे मोर्चे निघाले होते. ते मराठा विरोधी आणि ओबीसी विरोधी वातावरण दूर झाले. या तीन प्रारूपांच्या खेरीज वंचित बहुजन प्रारूप प्रकाश आंबेडकरांनी घडवले. परंतु, या प्रारूपाने शरद पवार प्रारूपाला विरोध केला. उद्धव व फडणवीस यांच्यापासून दूर राहिले. प्रकाश आंबेडकर प्रारूप वैचारिक दृष्ट्या योग्य होते. परंतु, निवडणूक राजकारणात त्यांची रणनीती यशस्वी झाली नाही. दोन्ही काँग्रेस पक्षांचे उमेदवार पाडले, ही नकारात्मक कामगिरी त्यांनी केली. त्या कामगिरीचे गौरवीकरण केले जाते. परंतु, विधानसभेतील प्रतिनिधित्व त्यांच्याकडे गेले नाही. फडणवीस, उद्धव ठाकरे, पवार या तीन प्रारूपांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. या तीनपैकी दोन प्रारूपांचा समझोता घडून महाराष्ट्रात सत्ता स्थापन होणार आहे. शरद पवार आणि फडणवीस या दोन प्रारूपांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये वादविवाद वाढत गेले. फडणवीस प्रारूपाने थेट शरद पवार प्रारूपावर हल्ले केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस आणि पवार अशा दोन प्रारूपांमध्ये दूरदृष्टीचा, हितसंबंधाचा व सत्तेचा संघर्ष आहे. या तुलनेत उद्धव ठाकरे व फडणवीस आणि उद्धव ठाकरे व शरद पवार या दोन प्रारूपांमध्ये दूरदृष्टीचा संघर्ष नाही. यामुळे उद्धव ठाकरे प्रारूपाचे महत्त्व सत्तास्थापनेसाठी वाढलेले दिसते. हीच उद्धव ठाकरे प्रारूपाची सध्याची ताकद आहे. ती ताकद उद्धव ठाकरेंनी ओळखली असे दिसते. 

संबंधित बातम्या