भाजप अपयशी; चीतपट नाही

प्रकाश पवार
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

राज-रंग
 

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने त्यांचे देवेंद्र फडणवीस प्रारूप लागू करण्याची उघड आणि स्पष्टपणे भूमिका घेतलेली दिसते. त्यामुळे काँग्रेस मूल्यव्यवस्था, चव्हाण प्रारूप, शिवसेनेचे हिंदुत्व प्रारूप या तीन व्यवस्थांमध्ये बदल करण्यासाठीचा हा रणसंग्राम सुरू आहे. ही केवळ सत्तेसाठीची चढाओढ नव्हे, तर फडणवीस प्रारूप स्थिर करण्यासाठीचा रणसंग्राम आहे. सर्वांनाच सत्तेच्या वारुळावरील नागोबाचे स्थान अपेक्षित आहे. परंतु, भाजपला केवळ सत्तेसाठी सत्ता नव्हे तर फडणवीस प्रारूपासाठी सत्ता अपेक्षित आहे. दोन्ही काँग्रेसला चव्हाण प्रारूपाच्या चौकटीसाठी सत्ता पाहिजे. या आधी हिंदू मतपेटी दुहेरी निष्ठांची होती (शिवसेना-भाजप). दुहेरी निष्ठांच्याऐवजी एकेरी निष्ठा स्वीकारण्याचा दावा भाजप व शिवसेना करते. दोन्ही पक्षांमध्ये केवळ एकेरी निष्ठा घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना यांच्यामध्ये महाभारत घडते, तर दोन्ही काँग्रेसमध्ये नेहरू-चव्हाणनिष्ठांची मतपेटी हा वाद विषय झालेला दिसतो. दोन्ही काँग्रेसमधील एक एक गटाला बिगर नेहरू-चव्हाण निष्ठांची मतपेटी अपेक्षित आहे. यामुळे दोन्ही काँग्रेसच्या पोटातून दोन्ही काँग्रेस विरोधी एक बलवान ताकद उदयास आली. दोन्ही काँग्रेस विरोधातील बलवान ताकद खेचून आणण्याचा निकराचा प्रयत्न भाजप करते. यामुळे भाजप सतत दोन्ही काँग्रेसवर चढाई करते. हा संघर्ष विविध पातळ्यांवर सुरू आहे. त्यांची छोटी छोटी रूपे म्हणजे गटनेत्यांची पळवापळवी करणे, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून भाजपशी व्यवहार करणे, राज्यपालांनी तातडीने सरकार स्थापन करून घेणे, सर्वोच्च न्यायालयात जाणे अशी दिसतात. या सुट्या सुट्या घटनांचा अर्थ महाराष्ट्राचे राजकारण मुळापासून बदलण्याचा दिसतो. म्हणून या नव्या घडामोडींचा अर्थ व्यक्ती वैशिष्ट्यांच्या पलीकडे जाऊन समजून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते.    

भाजपची चढाई
महाराष्ट्रात सत्तासंघर्षांची चर्चा व्यक्तिगत केली जाते. मी पुन्हा येणार, सत्तास्थापनेची कौशल्ये पाहण्यासाठी आतुर आहोत, पाहिली का सत्तास्थापनेची कौशल्ये, बोलणे एक आणि करणी दुसरी, खंजीर खुपसणे ही व्यक्तिगत राजकारणाची गमतीशीर उदाहरणे आहेत. अशी व्यक्तिगत वैशिष्ट्ये राजकारणात महत्त्वाची असतात. परंतु, अशी वैशिष्ट्ये म्हणजे राजकारण नव्हे. यापेक्षा राजकारण वेगळे व गंभीर असते. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सत्तास्पर्धेत व्यक्तिगत सत्तास्पर्धा राहिलेली नाही. या दोन्ही नेत्यांमधील सत्तासंघर्ष निश्‍चित उद्देशासाठी सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांना या युगातील शरद पवार होणे पसंत नाही. शरद पवारांचा अवकाश त्यांना पाहिजे, परंतु त्यांना शरद पवारांच्यापेक्षा वेगळे उद्देश असलेले राजकारण घडवायचे आहे. शरद पवारांच्यापेक्षा वेगळे राजकारण म्हणजेच संघाचे मुख्य ध्येय आणि धोरणावर आधारलेले राजकारण. शरद पवारांचे राजकारण यापेक्षा भिन्न आहे. शरद पवारांच्या राजकारणाचा जवळपास सत्तर-ऐंशी टक्के भाग काँग्रेसच्या मूल्यव्यवस्थेने व्यापलेला आहे. वीस-तीस टक्के शरद पवारांचे राजकारण पंडित नेहरू-यशवंतराव चव्हाण यांच्यापेक्षा वेगळे आहे. देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांचे काँग्रेस मूल्यव्यवस्थेचे राजकारण नको आहे. काँग्रेस मूल्यव्यवस्थेच्या बाहेरील वीस-तीस टक्के राजकारण त्यांना मान्य असावे. शरद पवारांच्या काँग्रेस आधारीत मूल्यांशी संबंधित राजकारणाला विरोध म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांचे राजकारण काँग्रेस मूल्यव्यवस्थेशी फारकत घेतलेले राजकारण आहे. त्यामुळे अजित पवारांचे शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यापेक्षा वेगळे राजकारण आहे. अजित पवारांच्या जवळपास जाणारे राजकारण अनेक नेते करतात. असे नेते दोन्ही काँग्रेस, शिवसेना या पक्षांमध्ये आहेत. किंबहुना या तीन पक्षांतील नेते भाजपचे महत्त्वाचे नेते यामुळेच झाले. राधाकृष्ण विखे-पाटील, नारायण राणे, बबनराव पाचपुते, गणेश नाईक इत्यादी. त्यामुळे ऑपरेशन लोटसची जबाबदारी या नेत्यांवर आली. या तपशिलाचा अर्थ म्हणजे दोन्ही काँग्रेसमधील नेहरू-चव्हाण यांनी तयार केलेली मूल्यात्मक चौकट खिळखिळी झाली. नेहरू-चव्हाण यांच्या मूल्यात्मक चौकटीपासून फारकत घेतलेले नेते भाजपमध्ये महत्त्वाच्या स्थानी गेले. संघात काम केले तर भाजपमध्ये संधी मिळते. या बरोबरच बिगर नेहरू-चव्हाण म्हणून काम करणाऱ्यांनाही भाजपमध्ये स्थान मिळते. बिगर नेहरू-चव्हाण मूल्यव्यवस्था स्पष्टपणे अजित पवारांच्या राजकारणात दिसते. त्यांचे राजकारण अर्थातच शरद पवारांच्या चव्हाण प्रारूपाशी मेळ खात नाही. अशी विसंगती शरद पवार - अजित पवारांच्या राजकारणात आहे. तरीही शरद पवारांनी वीस वर्षे अजित पवारांशी जुळवून घेतले. परंतु, त्यांच्यामध्ये खटके उडत राहिले. अजित पवारांना शरद पवारांचे राजकारण मान्य नव्हते. शरद पवारांनी संपूर्ण पक्ष अजित पवारांच्या ताब्यात द्यावा, अशी त्यांची भूमिका होती. शरद पवार विरोधी राजकारणाचा अजित पवारांचा पोत होता. या अर्थाने एक बिगर नेहरू-चव्हाण मूल्यव्यवस्था अजित पवारांमध्ये आहे. हे भाजपने अचूकपणे हेरले. तीच अजित पवारांची ताकद झाली. अजित पवार हे नेते संघ-भाजपची मूल्यव्यवस्था पश्‍चिम महाराष्ट्रात पसरविण्यासाठी भाजपला उपयुक्त वाटले. भाजपने या क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून काम सुरू केले होते. परंतु, अगदी थेटपणे आक्रमक काम नरेंद्र मोदी पर्वात सुरू झाले. भाजपच्या आक्रमक धोरणाचा आरंभीचा टप्पा शिवसेनेशी संबंधित सुरू झाला. तिथूनच भाजपविरोधी व भाजपसमर्थक राजकारण दिसू लागले.      

दुहेरी निष्ठा 
 नव्वदीच्या दशकापासून पुढे शिवसेना-भाजप युतीमध्ये किरकोळ स्वरूपाचे वाद होते. परंतु, भाजपने विस्तारवादी धोरण स्वीकारले नव्हते. या तथ्यामुळे शिवसेना पक्षाला भाजपपासून फार धोका नव्हता. दोन्ही पक्षांमध्ये सलोखा होता. ते नाते हिंदुत्वाच्या आधारे विणले गेले. हिंदू मतपेटी शिवसेना-भाजप यांच्यावर समान निष्ठा ठेवत होती. पंरतु, शिवसेना-भाजप यांच्यावर समान निष्ठा भाजपला नको होती. त्यांना केवळ मोदीनिष्ठ हिंदू मतपेटी अपेक्षित आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व आक्रमक व हिंदूसम्राट असे होते. परंतु, भाजपकडे समकालीन दशकामध्ये नव्याने आक्रमकता आली. तसेच नरेंद्र मोदी दुसरे हिंदूसम्राट झाले. अशी नवीन भाजप केंद्रीय पातळीवर गेल्या सहा वर्षांपासून सत्तेमध्ये आहे. तेव्हापासून महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात नवीन वळण सुरू झाले. महाराष्ट्रामध्येदेखील भाजप मोठ्या झोकात येण्याची घडामोड गेल्या सहा वर्षांत घडत गेली. या सहा वर्षांत भाजपने दोन्ही काँग्रेस, शिवसेना पक्ष आणि छोटे पक्ष यांची ताकद कमी केली. हे दशक महाराष्ट्रातील भाजपने पुढाकार घेण्याचे स्पष्टपणे दिसते. पार्टी विथ ए डिफरन्स ही भाजपची प्रतिमा मागे पडली. सत्तेच्या मागे धावणारा चारचौघा पक्षांसारखा एक पक्ष अशी नवीन प्रतिमा सध्या भाजपची झोकात आहे. भाजपची वाढ करण्यासाठी नरेंद्र मोदी प्रारूप आक्रमकपणे धोरण म्हणून स्वीकारले. त्यामुळे भाजपविरोधी इतर असा थेट संघर्ष-महासंघर्ष सुरू आहे. शिवसेनेबरोबरची युती तोडणे ही सुरुवात होती. ती सुरुवात म्हणजेच हिंदुत्व आणि सत्ता यांपैकी सत्तास्पर्धा जास्त महत्त्वाची ठरली. शिवाय शिवसेना पक्षाशी जुळवून घेणारे जुने नेते काळाच्या पडद्याआड गेले होते (प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे). यामुळे शिवसेनेबरोबरचे नवीन नाते निश्‍चित करणारे नवीन नेते पुढे आले (नरेंद्र मोदी-अमित शहा). त्यामुळे गरजेप्रमाणे शिवसेनेबरोबर निवडणुकोत्तर युती करणे हे नवीन धोरण भाजपने स्वीकारले. यामुळे शिवसेना हतबल झाली. गेल्या पाच वर्षांत भाजप-शिवसेना अशी सत्तेसाठी युती होती. परंतु, शिवसेनेने भाजप विरोधी एक मोहीम सुरू ठेवली होती. भाजप डावपेच म्हणून शिवसेनेशी जुळवून घेत होते. हिंदुत्वाच्या दोन राजधान्या आहेत. अर्थातच आरंभीची हिंदुत्वाची राजधानी नागपूर ही आहे. नंतर शिवसेनेने मुंबई ही हिंदुत्वाची राजधानी घडवली. त्यामध्ये भाजपला वाटा दिला. परंतु, भाजपला केवळ वाटा नको होता. त्यांना शिवसेनेने घडवलेल्या दुसऱ्या राजधानीचा ताबा हवा आहे. त्यामुळे मुंबईमध्ये भाजप-शिवसेना यांच्यात राजकीय स्पर्धा सुरू झाली. शिवसेनेने त्यांच्या हिंदुत्वाची मुंबई राजधानी सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपपासून दूर होण्यास सुरुवात केली. मुंबईमध्ये शिवसेनेची मतपेटी भाजपकडे हळूहळू सरकत राहिली. कट्टर शिवसैनिकांमध्ये दुहेरी निष्ठा उदयास आल्या. अशा दुहेरी निष्ठांमुळे शिवसैनिक अर्धा भाजपवासी झाला. शिवसेनेच्यापुढे दुहेरी निष्ठा हे सर्वांत मोठे आव्हान उभे राहिले. त्यामुळे निवडणुकीनंतर सत्तावाटपाच्या आधारे भाजपकडे जाणाऱ्या शिवसैनिकांची नाकेबंदी केली गेली. तसेच शिवसैनिकांच्या निष्ठांची ही परीक्षा सुरू झाली. यातून भाजपविरोधी शिवसैनिक घडविण्याचा प्रयत्न सुरू झाला. म्हणजेच भाजप विरोधी हिंदुत्व मतपेटीची कल्पना शिवसेनेने केली. तसेच भाजपने सर्व प्रकारची हिंदुत्व मतपेटी एकसंघ करण्याचे काम सुरू केले. या प्रक्रियेमध्ये शिवसेनेचे हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व अशी उभी फूट पडली. त्यामुळे शिवसेना-भाजप यांच्यामध्ये धुमचक्री दिसते.
 यशवंतराव चव्हाण प्रारूपासंबंधी नेतृत्वाचे पक्षांतर आणि सरतेशेवटी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडणे या घडामोडी भाजपच्या आक्रमक धोरणाची मोजकी पण महत्त्वाची उदाहरणे आहेत. दोन्ही काँग्रेसवर जवळपास दररोज भाजपचे हल्ले होत आहेत. काँग्रेसमुक्त धोरणापासून सुरुवात झाली. मात्र, शरद पवारांनी सुरुवातीस तीन वर्षे भाजपशी विरोधाचे धोरण ठेवले नाही. परंतु, गेल्या तीन वर्षांत भाजपने शरद पवार यांच्यावर राजकीय हल्ले सुरू केले. त्यामुळे शरद पवार विरोधी भाजप असे अंतिम महायुद्ध सुरू झाले. भाजपच्या जोरदार हल्ल्यामुळे दररोज सुरक्षिततेसाठी नव्या जागी आमदारांची व्यवस्था केली जाते. शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाचे वारसदार आहेत. त्यामुळे चव्हाण प्रारूपाची राजधानी खरे तर सातारा-कराड ही आहे. त्यावर भाजपने आक्रमण केले. तेथे भाजपला माघार घ्यावी लागली. कारण सातारा लोकसभा निवडणुकीत  भाजपचा पराभव झाला. परंतु, भाजप शांत राहिला नाही. भाजपने साताऱ्याचा मोर्चा बारामतीकडे वळवला. बारामती हा चव्हाण प्रारूपाचा दुसरा बाल्लेकिल्ला. तो रायगड इतका मजबूत किल्ला. या बालेकिल्ल्याच्या जवळ जाणेदेखील अतिशय अवघड होते. याचा अनुभव भाजपने महाजनादेश यात्रेत घेतला. त्यामुळे भाजपने सरळ युद्धाचा मार्ग सोडून दिला. त्यांनी बारामतीचा किल्लेदार फोडला. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रेतून आकाराला आलेल्या संकल्पनेवर हल्ला झाला. शिवस्वराज्य संकल्पनेचे शिलेदार आतून घायाळ झाले. महाराष्ट्रात चव्हाण प्रारूपाच्या जागी नरेंद्र मोदी प्रारूप सुरू झाले. त्यास राज्यपातळीवर देवेंद्र फडणवीस प्रारूप म्हणून ओळखले जाणार आहे. म्हणजेच चव्हाण प्रारूप बाजूला करून त्या जागी फडणवीस प्रारूप येणार आहे. तसेच दुहेरी निष्ठांचा ऱ्हास घडवून केवळ मोदीनिष्ठा म्हणजे हिंदुत्व असे राजकीय अस्तित्वभान घडवले जात आहे. परंतु, शरद पवारांनी तिन्ही पक्षांची युती करून नरेंद्र मोदी प्रारूपावरती कुरघोडी केली आणि त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रारूप जपले. मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचे राजीनामे दिले तरीही हा संघर्ष पुढच्या पाच वर्षांत सुरूच राहणार. 

संबंधित बातम्या