पवारांच्या राजकारणाचा अर्थ 

प्रकाश पवार
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

राज-रंग
 

ऐंशीव्या वर्षात शरद पवारांच्या नेतृत्वाची पुन्हा पुन्हा चर्चा होते. पण ही चर्चा गहिरी होत नाही. परंतु, पवारांचे नेतृत्व गहिऱ्या अर्थाचे आहे. गहिरी संकल्पना म्हणजे नेतृत्वाला खोली, उंची, रुंदी व विस्तृतपणा असणे होय. शिवाय दूरदृष्टी, अंतरदृष्टी असणे होय. या अर्थाने शरद पवारांच्या नेतृत्वाकडे नव्याने पाहिले जात आहे. राजकीय विश्‍वाच्या खेरीज शेती, उद्योग, सेवा, संस्कृती, शिक्षण, तरुण वर्ग, विरोधक अशा क्षेत्रांमध्ये ऐंशी वर्षांचे तरुण ही संकल्पना कधी मोकळेपणे तर कधी परिस्थितीचा दबाव म्हणून स्वीकारली गेली. अशा पार्श्‍वभूमीवर शरद पवारांचे नेतृत्व जास्तच गुंतागुंतीचे झाले. परंतु, माध्यमांनी त्यांच्या नेतृत्वाबद्दल धरसोड केली. कधी विरोध तर कधी कौतुक केले. विशेष म्हणजे त्यांच्या नेतृत्वाचे हे सर्व कंगोरे विशिष्ट अशा आर्थिक-सामाजिक संदर्भांतील आहेत. त्याबद्दल पवारांची एक निश्‍चित भूमिका दिसते. त्यामुळे कडू-गोड मात्रा महत्त्वाची ठरत नाही. तर परिस्थितीच्या पुढे अगतिक न होता, त्यांच्या नेतृत्वाने परिस्थितीला आकार कसा दिला हे महत्त्वाचे ठरते. त्यांनी गेल्या पाच-सहा महिन्यांमध्ये राजकारणातील पोकळी हेरली व राजकारणाला एक आटोपशीर आडोसा दिला. आडदांड राजकारणाच्या मुक्तीचे आशयसूत्र त्यांनी पुढे आणले. तिचा प्रभाव महाराष्ट्राच्या बाहेर आसेतुहिमाचल दिसतो. त्यांचा बोलबाला सुरू झाला. तो या काळातील युगधर्म आहे. अर्थात ही कथा मराठी मुलखात घडली. या कथेचा उलगडा चव्हाण आशयसूत्रामधून होतो. म्हणून शरद पवारांनी अनेकांच्या उचलबांगडीची उठाठेव केली. सुरुवातीस उपहास झाला. परंतु सरतेशेवटी त्यांच्या नेतृत्वाला ऊर्जा मिळाली. कार्य करण्याची क्षमता मिळाली.    

त्रिसूत्रीचा वारसा      
 समकालीन दशकामध्ये शरद पवारांच्या राजकारणापुढे नवीन आव्हाने उभी राहिली. पवार निरुपाय झाले आहेत, असा समज वाढला होता. भाजपशी जुळवून घेण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही, असे अग्रदूत त्यांच्या पक्षातही होते. त्यांनी शरद पवारांच्या राजकारणाची मध्यभूमी यशवंतराव चव्हाण प्रारूपाशी संबंधित आहे हे लक्षात घेतले नाही. चव्हाण-पवार यांचे एक अंतरीक नाते आहे. चव्हाण-पवार यांच्या राजकारणाची एक आकृती आहे. परंतु, त्या आकृतीचा आतला भाग व बाहेरचा भाग असे दोन कप्पे आहेत. चव्हाणांच्या राजकारणाचा अंतरीक भाग जयंत लेले यांनी स्पष्ट केला आहे. यशवंतराव चव्हाणांच्या मुलाखती लेले यांनी घेतल्या होत्या. त्या मुलाखतींचे 'यशवंतराव चव्हाण रिफ्लेक्टस ऑन इंडिया सोसायटी अ‍ॅन्ड पॉलिटिक्स' हा ग्रंथ लेले यांनी प्रकाशित केला आहे. या ग्रंथात चव्हाण प्रारूपाशी संबंधित मनाच्या गाभ्यातील तपशील सविस्तरपणे आला आहे. तो चव्हाणांच्या राजकारणाचा गाभा होता. त्यास चव्हाण प्रारूप म्हटले जाते. चव्हाण प्रारूपाची तीन वैशिष्ट्ये स्पष्टपणे दिसतात. एक, सत्तेची विविध केंद्रे असतात. त्या सत्ताकेंद्रांमध्ये खुली सत्तास्पर्धा ठेवावी. खुली सत्तास्पर्धा ही स्थानिक पातळीवर घडावी. त्यामधून सरतेशेवटी महाराष्ट्राच्या राजकारणाचा लघुत्तमसाधारण मध्य काढावा, अशी धारणा चव्हाणांची होती. दोन, खुल्या सत्तास्पर्धेबरोबर विविध समूहांच्या हितसंबंधाबद्दल आणि राजकीय भागीदारीबद्दल सर्वसमावेशक धोरण ठेवणे ही एक चव्हाण प्रारूपाची दुसरी महत्त्वाची बाजू आहे. तीन, चव्हाण प्रारूपाने शेती-उद्योग अशा दोन क्षेत्रांचा समझोता केला. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांची व्यक्तीवैशिष्ट्ये वेगवेगळी असूनही लेलेंच्या विवेचनानुसार व्यक्त झालेली तीन वैशिष्ट्ये शरद पवारांच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतात. म्हणजेच चव्हाणांच्या राजकारणाच्या विविध सूत्रांपैकी वरील त्रिसूत्री वारसा म्हणून शरद पवारांनी स्वीकारली. तसेच तिला पुढे विकसित केले. या संदर्भांत शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचे राजकीय वारसदार ठरतात. 'लोक माझे सांगाती' या शरद पवारांच्या आत्मकथेमध्येदेखील चव्हाण प्रारूपातील त्रिसूत्री दिसते. परंतु, समकालीन दशकामध्ये या त्रिसूत्रीच्यापुढे भाजपने आव्हान उभे केले. शरद पवारांनी हे आव्हान समजून घेऊन या त्रिसूत्रीसाठी सर्वांत मोठा संघर्ष केला. या त्रिसूत्रीशी संबंधित शरद पवारांचे नेतृत्व वाढले होते. त्यामुळे या त्रिसूत्रीसाठी त्यांचे अंतःकरण तीळतीळ तुटत होते. परंतु, दोन्ही काँग्रेसच्या आत राहून स्वतःचे पोषण करून घेणाऱ्या अंत:परजीवी नेतृत्वाला याबद्दल काळजी वाटत नव्हती. हा फरक शरद पवार आणि दोन्ही काँग्रेसमधील अंत:परजीवी नेतृत्वांमध्ये होता. चव्हाणांच्या राजकारणाची त्रिसूत्री म्हणजे काँग्रेस व्यवस्था व काँग्रेसचे नेतृत्व होते. परंतु, ही गोष्ट शरद पवार वगळता इतरांसाठी एक आदर्शवाद होता. ते म्हणजे व्यवहारी राजकारण नव्हते. दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांना चव्हाणांचे राजकारण म्हणजे ऱ्हास पर्व वाटत होते. उतरती कळा वाटते. त्यापासून त्यांना मुक्ती पाहिजे होती. परंतु, या त्रिसूत्रीपासूनच्या मोक्षविरोधी भूमिका शरद पवारांनी घेतली. पवारांच्या नेतृत्वातील हा विचार अप्पलपोटी नव्हता. कारण त्यांनी आपल्यापुरते पाहणारी कृती केली नाही. त्यांनी उतरती कळा आलेल्या काँग्रेसला प्रदेशवादीतून ऊर्जा दिली. काँग्रेस आणि प्रदेशवादी विविध सत्ताकेंद्रांमध्ये संवादाचे नवीन प्रारूप दिले. त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर त्यांची चर्चा राज्या-राज्यात आणि केंद्रात सुरू झाली. या अर्थाने शरद पवारांच्या नेतृत्वाला एक वैचारिक-बुद्धिजीवी विस्तीर्ण असा पाया आहे, ही गोष्ट पुन्हा दिसून आली. महाराष्ट्राच्या राजकारणाची उथळ चर्चा खूप होते. अशी उथळ चर्चा करून उथळीकरण ही नवीन प्रक्रिया विविध माध्यमे, पक्ष व नेते घडवतात. परंतु, शरद पवारांनी उथळीकरण विरोधी राजकारण केले. हा शरद पवारांच्या राजकारणाचा गेल्या तीन-चार महिन्यातील अर्क दिसतो. कारण बहुविविधतेच्या राजकारणासाठी रामबाण उपाय त्यांनी शोधून काढला. त्यांनी काँग्रेसच्या राजकारणासाठी (औषधासाठी) बहुविविधतेला या निवडणुकीत उकळून सार काढले. ही शरद पवारांच्या नेतृत्वाची अर्थछटा आहे. या अर्थाने ढोबळपणे सारखे दिसणारे पण नीट पाहता वेगवेगळे जाणवणारे अर्थ त्यांच्या नेतृत्वाचे दिसतात.     

पवारांचे अवसान
 समकालीन दशकाच्या सुरुवातीस लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाची घसरण झाली. त्यामुळे हेटाळणी सुरू झाली. त्यामध्येही शरद पवारांनी निवडणुकीपासून व्यक्तिगत फारकत घेतली. निवडणुकांच्या संदर्भांत अंतर पडले. बारामतीनंतर माढ्याची लोकसभेची जागा त्यांनी लढवली नाही. राज्यसभेवर ते गेले. यामुळे अवलियांनी शरद पवारांच्या नेतृत्वाच्या उतरत्या काळाविषयी निरीक्षण नोंदवली. गेल्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या स्थानावर फेकला गेला. दरम्यानच्या काळात स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले नाही. त्यामुळे पवारांच्या शिलेदारांचे अवसान गळले. धाडस कमी झाले. सत्तेपासून पक्षातील नेते कसेबसे चार-साडेचार वर्षे दूर राहिले. शरद पवारांनी तीन वर्षे भाजपशी थेट पंगा घेतला नाही. राज्यातील फडणवीस सरकारला त्यांनी सुरुवातीस बिनशर्त पाठिंबा दिला होता. शरद पवार सत्तेपासून दूर असूनही त्यांना पद्मविभूषण मिळाले. यामुळे त्यांच्या सत्तेच्या खटपटीची चर्चा झाली. तसेच राजकारणात त्यांनी पाच दशकांचा कार्यकाळ पूर्ण केला. पाच दशकांतील कार्यकाळाची सर्व पक्षांतील नेत्यांनी दखल घेतली. तसेच नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी बारामतीस हजेरी लावली. त्यांच्या पक्षात भाजप समर्थक गट उदयास आला. नरेंद्र मोदी आणि शरद पवारांचे राजकीय संबंध तीन वर्षे फार ताणले गेले नव्हते. त्या संबंधांमध्ये तडजोड झालेली नव्हती. परंतु, या दोघांचा वारसा वेगवेगळा होता. यांचे आत्मभान शरद पवार आणि नरेंद्र मोदींनाही होते. मात्र, यांचे आत्मभान अर्धपक्का स्वरूपाच्या नेतृत्वाला नव्हते. त्यांचे राजकीय वारसा म्हणून रस्ते वेगवेगळे होते. नरेंद्र मोदींचा राजकीय वारसदार देवेंद्र फडणवीस झाले. त्यांनी शरद पवारांच्याबरोबर उलटी दिशा स्वीकारली होती. तसेच मोदी भाजपची दिशा चव्हाण प्रारूपविरोधी होती. कारण सत्तेच्या विविध केंद्रांच्याऐवजी सत्तेचे एकच केंद्र, स्थानिक प्रश्‍नांच्याऐवजी राष्ट्रीय प्रश्‍न, शेती, सेवा-उद्योग यांच्यातील समतोलाच्याऐवजी उद्योग व सेवा क्षेत्राला झुकते माप अशी नवीन वैशिष्ट्ये मोदी-फडणवीस प्रारूपाची दिसू लागली. या नवीन गोष्टींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक एक नेता पक्षांत्तर करू लागला. म्हणजेच चव्हाण प्रारूपापासून फारकत घेऊ लागला (विजयसिंह मोहिते, मुन्ना महाडिक). चव्हाण प्रारूप वाचविण्यासाठी शरद पवारांना दोन हात करावे लागले. ही शरद पवारांच्या युगातील नवीन घटना होती. सत्तरीच्या दशकातील सरकारची स्थापना, इंदिरा गांधींशी संघर्ष, राजीव गांधींशी जुळवून घेणे, नवीन आर्थिक धोरण स्वीकारणे, प्रशासकीय घडी बसवणे, पंतप्रधान पदासाठी स्पर्धा करणे, आघाडीचा नवीन प्रयोग करणे (१९९९-२०१४), राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वसमावेशक धोरण ठेवणे यापेक्षा वेगळे राजकीय वास्तव या वर्षांत शरद पवारांच्या पुढे आले. जरी या आधी त्यांनी मोठ्या चढउताराच्या घडामोडी अनुभवल्या असल्या तरी हे राजकीय वास्तव वेगळे होते. यांचे आत्मभान त्यांना लोकसभा निवडणुकीच्यावेळी आले. त्यांनी लोकसभा निवडणुकीपासून त्यांच्या नेतृत्वाला नव्याने गती दिली. त्यांनी नवीन धोरण व नेतृत्वाची शैली विकसित केली. त्यांनी नव्याने पक्षाला अवसान दिले. जुन्या नव्या परिस्थितीला समजून घेऊन त्यांनी काही किरकोळ डागडुजी केली. 

नेतृत्वाची डागडुजी
  शरद पवारांनी या आधी लोकांनुरंजनवादी भूमिका घेतली नव्हती. तसेच त्यांनी आक्रमक शैलीही या आधी स्वीकारली नव्हती. परंतु, लोकसभा निवडणूक प्रचारात त्यांनी 'मी अजून म्हातारा झालो नाही, असे अजित म्हणायचे नाही' अशी टॅगलाइन सुरू केली. ही सुरुवात पिंपरी-चिंचवड येथे सुरू केली. मी अजून म्हातारा झालो नाही ही नवीन शैली त्यांनी विकसित केली. ही टॅगलाइन मवाळ दिसली तरी आक्रमक होती. त्यास तरुणांचा, मध्यम वयोगटातील मतदारांचा आणि त्यांच्या वयोगटातील जुन्या साथीदारांचा पाठिंबा मिळू लागला. त्यांचा या तीन गटांतील मतदारांशी नव्याने संवाद सुरू झाला. यामुळे शरद पवार विरोध हे एक मिथक वितळले गेले. या आधी तरुण वर्गाला शरद पवारांचे आकर्षण नव्हते. परंतु, तरुण वर्गाला शरद पवार लढणारे व प्रेरणा देणारे महत्त्वाचे मिथक वाटू लागले. या गोष्टींचा सर्वांत जास्त कळस सातारा आणि इंदापूर येथे झाला. त्यांनी सुरुवातीस सोलापूर येथे अमित शहांना थेट विरोध केला. तर इडीच्या दरबारी जाण्याची आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्र विरोधी दिल्ली असा आक्रमक शैलीमध्ये अंतराय उभा केला. प्रचारात अधूनमधून त्यांनी पक्षांतर करणारे आणि फडणवीस यांना आक्रमक शैलीत विरोध केला. विशेष म्हणजे त्यांनी सातारा येथे 'चूक दुरुस्त करा' अशी नवीन टॅगलाइन दिली. इंदापूर येथे त्यांनी आडव्या पायाच्या विरोधी स्पष्ट भूमिका घेतली. पाहता पाहता त्यांनी शहांच्या सरकार स्थापनेच्या चाणक्यनीतीला आव्हान दिले. अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आणि सरकार स्थापन केले. यामुळे शरद पवारांना आक्रमक शैली नजरेत भरवण्याची संधी मिळाली. घरापासून, पक्षापासून ते दिल्लीपर्यंत त्यांनी आरपारची भूमिका घेतली. अर्थांतच या त्यांच्या भूमिकेत लोकांनुरंजनवाद होता. टॅगलाइनमुळे भाषणबाजीच्या छटा दिसत होत्या. मराठा स्ट्राँगमॅनची संकल्पना त्यांच्या नेतृत्वात दिसत होती. मराठा स्ट्राँगमॅन म्हणजे शिवकाळावर बेतलेली संकल्पना त्यांनी लोकांच्या मनामध्ये उतरवली. या संकल्पनेमध्ये इंद्रधनुष्यासारखे त्यांनी रंग भरले. त्यामुळे शरद पवार प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कल्पनेतील वाटू लागले. मराठा स्ट्राँगमॅन ही अनेक अर्थांची संकल्पना पुढे आली. कृष्णनीती, शिवनीती व चाणक्यनीती असे बोर्ड पर्वती (पुणे) येथे लावले गेले. या अर्थाने बहुकंगोरे असणारे नेतृत्व भारताने नव्याने पाहिले. मराठा स्ट्राँगमॅन म्हणजे राष्ट्रीय होय, हा एक महत्त्वाचा अर्थ घेतला गेला. मराठा स्ट्राँगमॅन म्हणजे दिल्ली विरोध (भाजपविरोध) होय. यामुळे भाजपची कोंडी शरद पवार नेतृत्वाने केली. मराठा ही संकल्पना जातीपेक्षा वेगळ्या अर्थाने व्यक्त झाली. राज्यात मराठा संकल्पना जात घटकाशी संबंधित कल्पिली जाते. परंतु, राष्ट्रीय पातळीवर मराठी प्रदेश, हिंदुत्व विरोध, नरेंद्र मोदी-अमित शहा विरोध, पर्यायी राजकारणाचा स्रोत असा अर्थ लावला गेला. शरद पवारांच्या नेतृत्वाचा नैसर्गिक एक अर्थ आहे. तर दुसरा अर्थ कृत्रिम लावला जातो. अर्थात अशा प्रकारचा अर्थ पवार समर्थक आणि विरोध दोन्ही बाजूंनी मांडला जातो. समर्थकांना ते महानायक वाटतात. पक्षीय व हितसंबंध म्हणून विरोधकांना ते खलनायक वाटतात.               
 विरोधकांनी त्यांच्या नेतृत्वाचा लावलेला अर्थ कृत्रिम आहे. त्याबद्दल चर्चा संघ, भाजपबरोबर डावे पक्ष व कार्यकर्ते करतात. परंतु, शरद पवारांची मदत गरजेप्रमाणे घेतात. शरद पवार त्यांच्या या विरोधकांना मदत करतात. हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणून त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. तर या निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री केला. यामुळे कृत्रिम अर्थ शरद पवारांच्या नेतृत्वाचा लावणाऱ्या वर्गांमध्ये पावसाळी व संधिसाधू सहानुभूतीदार आहेत. त्यांचा बोलबाला जास्त दिसतो. हे एक प्रकारचे मोठ्याने ओरडणे आहे. ती एक राजकारणातील हीनदशा आहे. कारण राजकारणात विपर्यास व विसंगती असते. परंतु, विसंगती व विपर्यास असूनही निश्‍चित आकृतिबंध असतो. तो आखडलेला आकृतिबंध नेते, कार्यकर्ते, माध्यमे यांना नीटनेटका दिसत नाही. अशा वेळी नेतृत्व स्पष्ट भूमिका घेते. कारण आकृतिबंधाच्या आकाराचा संकोच म्हणजे पक्षासाठी अक्काबाईचा फेरा असतो (लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा). तिचा फेरा रोखण्यासाठी शरद पवारांनी चव्हाण प्रारूपाची स्पष्ट गरज व्यक्त केली. चव्हाण प्रारूपासाठी आगेकूच केली. त्यासाठी त्यांनी आटापिटा केला. हेकेखोर नेतृत्वाच्या विरोधी भूमिका घेतली. चव्हाणांच्या त्रिसूत्री विरोधात गेलेल्या आडमुठेपणाला त्यांनी आडवे केले. विशेष म्हणजे काँग्रेसने शरद पवारांना साथ दिली. तसेच शरद पवारांनी काँग्रेसला हात दिला. हा त्यांच्या नेतृत्वाचा गेल्या पाच-सहा महिन्यांतील आडाखा होता. त्यांची ही कलाटणी देणारी कल्पक कथा घडली. दोन्ही काँग्रेसच्या खिळखिळ्या नेतृत्वाला खंदे पुरस्कर्ते मिळाले. संधिसाधू खुशमस्करे यांची जागा डळमळीत झाली. ही गती पवारांनी दिली. हा गर्भितार्थ त्यांच्या नेतृत्वाने स्पष्ट केला. हाच अर्थ काँग्रेसवादी नेतृत्वाच्या अंतरंगातील आहे. तो लपलेला अर्थ त्यांनी गहिरा केला.   

संबंधित बातम्या