राजारामबापूंची भूमिदृष्टी

प्रकाश पवार
सोमवार, 27 जानेवारी 2020

राज-रंग
 

महाराष्ट्राचे राजकारण अतिजलद गतीने बदलत गेले. डावपेच आणि व्यूहनीतीमध्ये धरसोड दिसली, तरी भूमिदृष्टी मात्र पुन्हा जुन्या चौकटीशी जुळवून घेते असे दिसते. याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत. कारण गेल्या पंधरा वीस दिवसांमध्ये त्यांनी वसंतदादा पाटील संस्था (मांजरी) येथे सहकाराशी जुळवून घेतले. त्यानंतर बारामती येथे कृषी प्रदर्शनास ते शरद पवारांबरोबर होते. यानंतर त्यांनी सांगली जिल्ह्यात सहकार आणि शिवसेना यांच्या संबंधातील विविध कार्यक्रमांची उदघाटने केली. निमित्त होते लोकनेते राजारामबापू पाटील पुण्यतिथी. यामुळे एकूण कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांची जशी एक वैचारिक जोडगोळी होती. तशीच शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्ष अशी नवीन पक्षीय जोडगोळी कृतीप्रवण झालेली दिसते. कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे क्षेत्र राजकारणाखेरीज समाजकारणाचे होते. तर या नवीन जोडगोळीचे क्षेत्र राजकारणाच्या खेरीज महाविकासाचे आहे, असा त्यांचा दावा आहे. यामुळे एक तर शिवसेना पक्षाला शहरी राजकारणाबरोबर ग्रामीण सहकाराची नवीन दृष्टी येणार आहे. तसेच तीन पक्षांमधील कार्यकर्त्यांची एकोप्याने काम करण्याची तयार होणार आहे. खरे तर या तीन पक्षांच्या पुढे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकोपा निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. कार्यकर्ते दुधारी शस्त्रासारखे असतात. कार्यकर्ते असतील तर नेता असतो. परंतु, कार्यकर्ते त्यांचे हितसंबंध नेत्यांमध्ये पाहत असतात. त्यामुळे कार्यकर्ते आपला नेता दुसऱ्या नेत्यांपेक्षा वेगळा कसा आहे. तो संघर्षशील आहे. अशी अटीतटीच्या संघर्षाची कथा कधी खरी, तर कधी भ्रामक रचतात. एवढेच नव्हे तर त्या नेत्यांच्या नंतर अटीतटीच्या भ्रामक कथा रंजकपणे दररोज चौकाचौकांत, घराघरांत जीवन संघर्षाचा एक भाग म्हणून मांडल्या जातात. अशा कथांपेक्षा नेत्यांची भूमिदृष्टी आणि दूरदृष्टी वेगळी असते. नेत्यांची भूमिदृष्टी व दूरदृष्टी वेगळी कशी असते. हे आपणास राजारामबापू पाटील यांच्या राजकीय जीवनाच्या आधारे समजू शकते.
 

राजारामबापूंची भूमिदृष्टी
 सध्या राजारामबापू पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. राजारामबापू यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर आजही प्रभाव आहे. त्यांचा वारसा जयंत पाटील यांच्याकडे वळलेला आहे. अर्थातच ही प्रक्रिया नैसर्गिक पद्धतीने घडली आहे. स्थानिक राजकारणापासून ते राष्ट्रीय राजकारणापर्यंत या घडामोडीचे परिणाम सध्या सकारात्मक होत आहेत. त्यामुळे राजारामबापूंची जन्मशताब्दी जास्त महत्त्वाची ठरते. राजारामबापू यांची भूमिदृष्टी बडोद्याशी संबंधित होती. कारण त्यांचे शिक्षण बडोदा येथे झाले. बापू एका भक्ती चळवळीचा वारसा असलेल्या शेतकऱ्याचा मुलगा होते. भक्ती चळवळ आणि बडोदा म्हणजे सकलजनवाद होय. या दोन्ही चळवळीमधून त्यांची सुरुवातीस भूमीदृष्टी तयार झाली. कारण बापूंचे वडील वारकरी होते. तसेच सकलजनवादाची दृष्टी सयाजीराव गायकवाडांना होती. त्या दृष्टीच्या आधारे बडोदा विकसित झाला होता. ही सकलजनवादाची दृष्टी राजारामबापूंनी सांगली जिल्ह्यात प्रत्यक्षात उतरवली. त्यामुळे दुसऱ्या शब्दांत वाळवा प्रारूप म्हणजे सयाजीराव गायकवाडांच्या बडोदा प्रारूपाची प्रतिकृती म्हटले, तर फार सरधोपट ठरणार नाही. याशिवाय राजारामबापूंची वैचारिक जडणघडण भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या आशयाच्या आधारे झाली. त्यामुळे त्यांचे जीवन स्वातंत्र्य चळवळीशी सरमिसळ झालेले दिसते. उदा. भगत, आझाद, सर्वोदय, भूदान अशा संकल्पना त्यांच्या जीवनाचा एक भाग झाल्या होत्या. राजारामबापूंनी संस्थांची सत्ता, अधिकार, पदे, प्रतिष्ठा इतरांना दिली. ते स्वतः जवळपास विश्‍वस्त राहिले. महात्मा गांधींच्या नावाचा जयघोष करण्यापेक्षा ही कृती महात्मा गांधींच्या आतल्या आवाजाकडे आणि आशयसूत्राकडे जास्त जाणारी होती. विश्‍वस्त, सर्वोदय, भूदान, अहिंसा ही चतुःसूत्री राजारामबापूंच्या जीवनात स्पष्टपणे दिसते. त्यामुळे हिंसेचा ऱ्हास होत गेला. हिंसा त्यांच्या काळातील समाजात जास्त दिसत होती. खोट्या प्रतिष्ठेसाठी हिंसेचा वापर होत होता. सहजासहजी लोकजीवन हिंसेचा आधार घेत होते. विश्‍वस्त, सर्वोदय, भूदान, विकास, लोकशाही आणि आधुनिकता या गोष्टींच्या मदतीने राजारामबापूंनी हिंसेला जवळपास हद्दपार केले. त्यांनी समाजाचे परिवर्तन घडवून आणले. वाळवा व वाळव्याच्या भोवतालच्या गावांमधील कथा हिंसेच्या वीर रसाच्या होत्या. त्या कथांमधील हिंसा राजारामबापूंनी बाहेर काढली. त्या त्या गावांमध्ये लोकशाही पद्धतीची चर्चा आली. 

लोकल बोर्ड आले. ग्रामपंचायत आली. संवाद सुरू झाला. इंच इंच जमीन पाण्याखाली आली. जेथे धरणी आईवर वादविवादातून रक्त सांडत होते, रक्ताची पंचमी होत होती, अशा भागांत त्यांनी लोकशाहीची चर्चा सुरू केली. जमिनीवरील लाल रक्ताची जागा हिरव्यागार शेतीने घेतली. रानोमाळ पाणी, पक्षी, शेती इत्यादी पर्यावरण अहिंसेचे तत्त्वज्ञान सांगू लागली. समाजातून, कृषिक्षेत्रातून, पर्यावरणातून अहिंसेचे नवे जीवन गीत पुढे आले. हा अहिंसक स्थलबदल घडविण्यासाठी राजारामबापू जीवन जगले. म्हणून त्यांचे जीवन म्हणजे समाजामध्ये घडवलेला आमूलाग्र बदल होता. किरकोळ वादविवाद वगळता ही रक्तविहिन समाजक्रांती, राज्यक्रांती आणि आर्थिक क्रांती होती. हे वाळव्याचे खरे स्वत्व आहे. तसेच तो आशय म्हणजे गांधी विचारांतील अर्क आहे. ही कथा महाराष्ट्राला आजूनही नीटनेटकी समजलेली नाही. कारण अटीतटीच्या भ्रामक कथांचा बोलबाला जास्त आहे. अशा स्थानिक अटीतटीच्या चौकटींमध्ये महाराष्ट्र गुंतला आहे. त्यास त्यामधून वेगळ्या अहिंसेच्या व सनदशीर राजकीय प्रतिकाराच्या क्षेत्रात घेऊन जाणे यास राजारामबापू पाटील यांची जन्मशताब्दी असे म्हणता येईल. हा नवीन प्रयोग ठरू शकतो. तो सुरू आहे. 

महाराष्ट्राची आधुनिक दृष्टी
 राजकीय नेतृत्वाला संकल्पना, शास्त्र, प्रयोग आणि उत्पादन अशी बहुपदरी दृष्टी असते. राजकीय नेते विविध संकल्पना कल्पिणारे, संकल्पनांचे रूपांतर शास्त्रात करणारे (तत्त्वज्ञानाचे रूपांतर विज्ञानात), संकल्पनांचे शास्त्रीय प्रयोग करणारे आणि सरतेशेवटी उत्पादन घेणारे असे असतात. त्यामुळे त्यांची संकल्पना समजून घेणे थोडे अवघड जाते. इंच इंच जमीन पाण्याखाली आणणे ही राजारामबापूंची संकल्पना अहिंसेचा प्रयोग करते. तसेच शेतीचे उत्पादन वाढवते. अशी दृष्टी त्यामध्ये असते. राजारामबापूंची भूमिदृष्टी जशी महाराजा सयाजीराव गायकवाड, महात्मा गांधींशी संलग्न होती. तशीच ती पंडित नेहरूंच्या राज्यसंस्थेशी घट्टपणे जोडलेली होती. त्यामुळे राजारामबापूंनी लोकशाही, समाजवाद आणि विकासवाद यावर ठाम विश्‍वास ठेवला होता. त्यांनी जवळपास मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप राज्यात आणि वाळव्यात राबवले. कृषीबरोबर औद्योगिक प्रगतीला त्यांनी महत्त्व दिले.

कृषी-औद्योगिक हितसंबंधांचा त्यांनी मेळ घातला होता. त्यांनी या दोन्ही क्षेत्रांचा समझोता केला. या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी वादविवाद होऊ दिला नाही. ही दृष्टी महाराजा सयाजीराव गायकवाड, पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण यांची होती. या दृष्टीचे एक खंदे समर्थक, शिल्पकार, प्रयोगकार बापू होते. ही दृष्टी आधुनिक भारताची दृष्टी होती. ती आपणास दोन लोककथांच्या मदतीने समजू शकते. त्यांपैकी पहिली कथा महाभारताशी संबंधित आहे. महाभारत कथेतील युद्ध संपले, तेव्हा युद्ध कोणत्या शस्त्रामुळे जिंकले अशी चर्चा सुरू झाली (गदा आणि धनुष्यबाण). हा वाद श्रीकृष्णाकडे गेला. मी सारथी म्हणून काम केले. मला या दोन्हींपैकी कोणते शस्त्र प्रभावी ठरले हे माहीत नाही, असा श्रीकृष्णाने तेव्हा न्यायनिवाडा केला. या न्यायनिवाड्यामध्ये दोन्ही शस्त्र आणि दोन्ही शस्त्रातील वादंग दुय्यम ठरवले गेले. त्याऐवजी दृष्टीला महत्त्व दिले. मात्र, हा न्यायनिवाडा दोन्ही पक्षकारांना मान्य नव्हता. त्यामुळे सरतेशेवटी श्रीकृष्णाने त्यांना एका तटस्थ व्यक्तीकडे पाठविले. त्याने भूमिदृष्टीलक्षी न्यायनिवाडा दिला. त्यांच्या मते दूरवरून मी युद्ध पाहिले, तेव्हा मला ही दोन्ही शस्त्रे दिसत नव्हती. केवळ हिंसा दिसत होती. धरणी आईवर रक्त सांडत होते. थोडक्यात हिंसा आणि शस्त्रपूजाविरोधी म्हणजेच शांततावादी न्यायनिवाडा दिला. ही कथा बापूंच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होती. दुसरी कथा वालचंद हिराचंद यांच्याशी संबंधित आहे. पुणे जिल्ह्यात वालचंदनगर असे एक शहर आहे. तेथे एका मंदिरावर सिंहिण व गाय अशी दोन चित्रे आहेत. गाईला सिंहिणीचा बछडा पितोय आणि सिंहिणीला वासरू पित आहे, असे चित्र काढलेले आहे. या चित्राचा अर्थ अतिबोलका आहे. तो म्हणजे अन्याय गोष्ट नाकारली आहे व समतोल विचार केला आहे. सागरी समतेची ही संकल्पना आहे. शिवाय दोन्ही चित्रांमध्ये अस्मिता महत्त्वाची नाही, तर अस्तित्व महत्त्वाचे आहे. त्यामुळे वंचित समूहाला न्याय देणे आणि अभिजनांना वंचितांच्या पातळीवर खाली आणणे असा अर्थबोध होतो. ही दृष्टी म्हणजे सकलजनवादी दृष्टी आहे. तसेच समतेची दृष्टी आहे. ही दृष्टी संकल्पना, शास्त्र, प्रयोग आणि उत्पादन अशी बहुपदरी आहे. ही दृष्टी प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांत दिसते. या दोन्ही कथा कृषी, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, सेवाक्षेत्र अशा विविध गोष्टींमध्ये निवडक नेतृत्वांमध्ये स्पष्टपणे दिसतात. त्यांपैकी एक लोकनेते राजारामबापू पाटील होते. ही भूमिदृष्टी केवळ राजारामबापू पाटलांची राहत नाही. 

राजारामबापू पाटील यांच्या अंगाने ती वाळव्याची, महाराष्ट्राची आणि भारताची होते. म्हणून त्यांनी सत्ता आणि समाजवाद यांपैकी समाजवादाची निवड ऐंशीच्या दशकात केली. अशा पार्श्‍वभूमीवर राजारामबापूंनी शहदा आणि सोलापूर या दोन्ही अधिवेशनांमध्ये जनता पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारले. शहदा अधिवेशनाच्या वेळी तर त्यांना मुख्यमंत्री पातळीवरील सत्ता देण्यास इंदिरा गांधी तयार होत्या. परंतु, राजारामबापूंची भूमिदृष्टी आणि दृष्टी समतावादाची होती. तेव्हा सत्तेची संकल्पना केवळ वर्चस्ववाचक झाली होती. या गोष्टी अतिसंवेदनशील आहेत. परंतु, त्यांचा निर्णय विवेकशील होता. या गोष्टी व्यक्तीवादी व सत्तावादी होत्या. परंतु, त्यांनी निवड समूहवादी आणि बिगर सत्तावादी केली. ही कथा वाळव्याची आहे. तशीच ती महाराष्ट्राची आहे. ही कथा म्हणजे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. यामध्ये एक प्रकारचा निश्‍चित व ठाम विचार दिसतो. तसेच जीवनाकडे पाहण्याची सकलजनवादी भूमिदृष्टी आहे. या दृष्टीची लोकयुक्ती अलीकडे चौकाचौकांत, घराघरांत बोलली जाते. घरोघरी मातीच्या चुली, तशा जिल्ह्याजिल्ह्यांत सकलजनवादाच्या कथा. ही लोकयुक्तीची सुरुवात नव्याने दिसू लागली आहे. ही कथा शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्ष यांनी नव्याने सुरू केली असे दिसते.

संबंधित बातम्या