ज्ञानाचे राजकारण 

प्रकाश पवार
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

राज-रंग
 

महाराष्ट्रात ज्ञानाबद्दल दोन परस्पर विरोधी संकल्पना आहेत. बहुजन समाजाची जुनी धारणा ज्ञान विकत घेता येते ही आहे. त्यामुळे बहुजन समाज ज्ञान विकत घेतो, तर अभिजन वर्ग ज्ञान विकत असतो. ज्ञानाच्या खरेदी-विक्रीची महाराष्ट्र ही एक नावाजलेली बाजारपेठ आहे. मात्र, ज्ञानाची खरेदी-विक्री पुरुषसत्ताक चौकटीत झाली. स्त्रीला अज्ञानी मानले, तरी महाराष्ट्रातील बहुजन समाजातील राजकीय नेतृत्वाने इंग्रजी शिक्षित स्त्रीशी विवाह केले. अशा पुरुषसत्ताक पद्धतीने इंग्रजी ज्ञान घरी आणले. अशा महाराष्ट्रात सध्या क्रोनी भांडवलशाही ज्ञानाचे राजकारण अतिगतीशील करीत आहे. ज्ञानाचे राजकारण प्रत्येक युगात केले जाते. औद्योगिक भांडवलशाहीच्या काळात ज्ञान केवळ इंग्रजी भाषेत आहे, अशी धारणा होती. म्हणून इंग्रजीला ज्ञानभाषा म्हणून गौरविले गेले. क्रोनी भांडवलशाहीने तिच्या गरजेप्रमाणे ज्ञाननिर्मिती सुरू केली. क्रोनी भांडवलशाही उपयुक्ततेच्या निकषावर आधारीत ज्ञानाला ओळखते. त्यामुळे क्रोनी भांडवलशाहीचे ज्ञान हेच एक मोठे राजकारणाचे क्षेत्र म्हणून पुढे आले. भारतीय आणि जागतिक क्रोनी राजकारणाचे स्वरूप ज्ञानाच्या फरकापेक्षा साम्यस्थळे असलेले जास्त आहे. भौतिक इश्यू आणि सांस्कृतिक इश्यू या दोन्हींपैकी सांस्कृतिक मुद्द्याला दोन्ही राजकारणामध्ये अग्रक्रम दिला जातो. ही वस्तुस्थिती आहे. असे असूनही भौतिक इश्यू हा उच्च पातळीवरती ज्ञान व्यवहार म्हणून काम करताना दिसतो. यामुळे या दोन्ही इश्यूचे संबंध हेच राजकारण म्हणून नवीन क्षेत्र आकाराला आले आहे. उदा. महाराष्ट्रात लोकांची आर्थिक समस्या त्यांच्या आवाक्याबाहेर चालली आहे. अशा प्रसंगी सांस्कृतिक इश्यू जीवनमरणाचे प्रश्‍न म्हणून राजकारण घडवीत आहेत. किंबहुना सांस्कृतिक इश्यू म्हणजेच मुख्य राजकारण आहे, अशी भूमिका घेतली जाते. ही भूमिका नेमकेपणे वर्चस्वशाली समाजाचे हितसंबंध जपते. या गुंतागुंतीच्या राजकारणाची कथा भारतासह जगभरातील सर्व देशांमध्ये क्रोनी भांडवलशाही या सिद्धांतामध्ये दडलेली आहे. ही कथा राजकारणाच्या स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत काम करते. 

क्रोनी भांडवलशाहीचा पैस
क्रोनी भांडवलशाही ही एक भांडवलशाहीची वित्तीय अवस्था आहे. या अवस्थेसाठी कॉर्पेरेट क्षेत्र, प्रशासकीय क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र अशा मुख्य तीन क्षेत्रांचे सहसंबंध कळीचे मानले गेले आहेत. ही तीन क्षेत्रे परस्परांना सहकार्य करतात. त्यांच्यामध्ये देवाणघेवाण होते. त्यास साटेलोटे असे म्हटले जाते. व्यापार-भांडवलशाही या क्षेत्रातील यश हे सरकारी अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधावर अवलंबून असतात, असे या व्यवस्थेचे मुख्य सूत्र आहे. सरकारी अनुदान, कायद्यामध्ये सूट आणि परस्परांच्या हितसंबंधांना संरक्षण असे स्वरूप क्रोनी भांडवलशाहीच्या राजकारणाचे आहे. चीन, अमेरिका, रशिया या देशांमध्ये क्रोनी भांडवलशाही हे प्रारूप सध्या सर्वांत जास्त प्रभावी ठरते. व्यवसाय, व्यापार, उद्योग यांचे संबंध या तीन देशांमध्ये थेट सरकारी उच्च पदावरील अधिकाऱ्यांशी दिसून आले आहेत. चीनचे डिंग झियाआपिंग यांनी सामाजिक सुधारणांना सुरुवात केली. त्यांनी श्रीमंत होणे आनंददायक आणि विलासी आहे, अशी भूमिका मांडली. जनांच्या आनंदाबद्दल डिंग झियाआपिंग बोलत नव्हते. ते कुटुंबांच्या श्रीमंतीबद्दल बोलत होते. नव्वदीच्या दशकात या क्रोनी भांडवलशाहीवर काही बंधने घातली गेली. परंतु आज त्यांची गरज नाही. अशी भूमिका चीनमधील जबाबदार अधिकाऱ्यांची दिसते. त्यांनी राज्यसंस्थेच्या हस्तक्षेपाला विरोध केला. त्यांना राज्यसंस्थेच्या अंकुशाची संकल्पना मान्य नव्हती. मिन्क्सिन पेई हे चीनचे विशेषज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी चायनाज क्रोनी कॅपिटॅलिझम हा ग्रंथ लिहिला आहे (२०१६). या पुस्तकामध्ये प्रशासन आणि व्यापार-उद्योग यांच्यातील साटेलोटे संबंधाची सविस्तर चर्चा केली आहे. तसेच अँडर्स असलुंड यांनी रशियाज क्रोनी कॅपिटॅलिझम हा ग्रंथ लिहिला आहे (२०१९). या ग्रंथाचे लेखक स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ आहेत. तसेच सामाजिक व आर्थिक संशोधन केंद्र (सीएसई) येथे आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी व्लादिमिर पुतिन यांच्या राजकीय अर्थकारणाचे विवेचन केले आहे. पुतिन आरंभी राष्ट्राध्यक्ष होते. नंतर त्यांनी सोईनुसार पंतप्रधान म्हणून स्थान पटकवले. या प्रक्रियेमध्ये साटेलोटे भांडवलशाही प्रक्रिया होती. त्यांचे आर्थिक धोरण साटेलोटे पद्धतीचे होते. या आधी हंटर लुईस यांनी क्रोनी कॅपिटॅलिझम इन अमेरिका हे पुस्तक लिहिले होते (२०१३). ही तीन पुस्तके समकालीन दशकातील आहेत. त्या पुस्तकांचा मुख्य युक्तिवाद साटेलोटे राजकारणाचा आहे. या पद्धतीचे राजकारण अमेरिका, चीन, रशिया या तीन देशांत सर्वांत जास्त घडते. त्यामुळे राजकारणात क्लेप्टोक्रेसी ही नवीन विचारसरणी आली. ही विचारसरणी जवळपास प्रत्येक देशातील राजकारण घडवते. स्थानिक पातळीवर तिचा प्रभाव पडतो. क्लेप्टोक्रेसी हा एक देशातील अधिसत्तावादी उंच उंच झेप घेणारा पक्षी ठरला. अधिसत्तावादाचे समर्थन ही विचारसरणी साटेलोटे भांडवलशाहीच्या संदर्भांत करते. क्लेप्टस या शब्दाचा अर्थ चोर आणि क्रेटॉस या शब्दाचा अर्थ शक्तीचा नियम असा होतो. या दोन्ही शब्दांचा एकत्र अर्थ चोरतंत्र असा होतो. या प्रक्रियेला चोरांचे शासन किंवा सत्ता म्हणून ओळखले जाते. दुसऱ्या शब्दांत त्यास भ्रष्टाचारी शासन किंवा सत्ता म्हणून ओळखले जाते. हे विवेचन राजकारणाचे अमेरिका, रशिया, चीन या तीन देशांत केले जाते. यातूनच दोस्तवाद, भाई-भतीजावाद, धनतंत्रवाद अशा संकल्पना समकालीन राजकारणात सहजासहजी स्थानिक पातळीवर वापरल्या जातात. तळागाळात लोक बोलीभाषांमध्ये दोस्तवाद, भाई-भतीजावाद असे राजकारणाचे विवेचन करतात. भारतामध्ये तर भाई-भतीजावाद हा शब्दप्रयोग घोषवाक्य झाला आहे. तरुण पिढी दोस्तासाठी काहीपण अशी रोखठोक भाषा वापरते. दोस्तवाद (क्रोनीज्म) ही एक सध्याची राजकीय विचारसरणी आणि जीवनदृष्टी झाली आहे. आपल्या घनिष्ठ मित्राची योग्यता, नियम, न्याय यांचा विचार न करता राजकीय व प्रशासकीय उच्च पदावर भरती केले जाते. या प्रक्रियेतून राजकीय क्षेत्रांत भ्रष्टाचार आणि स्वार्थाचा शिरकाव होतो. यामुळे सार्वत्रिक हित, सार्वजनिक कल्याण, सार्वजनिक विवेक, सार्वजनिक राजकीय क्षेत्र अशा स्वरूपाच्या राजकारणाचा ऱ्हास होत गेला. त्यांची जागा दोस्तवाद या विचारसरणीने घेतली. यामुळे राजकारणात पक्षपात केला जाऊ लागला. पक्षपाताचे राजकारण हे सामाजिक न्यायविरोधी म्हणून चीन, रशिया, अमेरिका येथे उदयास आले. एखाद्या गटाची तरफदारी करणारे राजकारण घडू लागले. या राजकारणामधून तत्वनिष्ठा आणि सेवाभाव बाहेर फेकला गेला. कार्यकर्ते आणि नेते यांची नवीन साखळी दोस्तवाद, भाई-भतीजावाद, धनतंत्रवाद या सूत्राच्या आधारे विणली गेली. कार्यकर्ते नेत्यांमधील संघर्षांची कथा त्यांच्या त्यांच्या हितसंबंधाच्या अंगाने मांडतात. कार्यकर्तांच्या साटेलोट्यांची दृष्टी म्हणजे राजकारणाची भूमिदृष्टी झाली आहे. हा फेरबदल जागतिक आहे. परंतु, तो भारतीय राजकारणात तळागाळात पोचला. 

भारतातील दोस्तवाद
नव्वदीच्या दशकापासून भारतीय राजकारणात दोस्तवाद जास्त गतीने वाढला. नरेश खत्री यांनी क्रोनी कॅपिटॅलिझम इन इंडिया या ग्रंथात या प्रकारच्या राजकारणाचे विवेचन केले आहे (२०१६). भारतीय मिश्र अर्थव्यवस्थेवर मात करून हा दोस्तवाद वाढला. त्याने कृषी-औद्योगिक हितसंबंधाचा समझोता मोडीत काढला. सहकार, कृषी-औद्योगिक समाजाचा सर्व अवकाश दोस्तवादाने हस्तगत केला. उदा. सहकारी साखर कारखान्यांच्याऐवजी खाजगी साखर कारखाने सुरू झाले. सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला. या मागे दोस्तवादाचे एक मुख्य सूत्र काम करते. साठ-सत्तरीच्या दशकामध्ये राजकारण सहकार तत्त्वज्ञानाच्या आधारे सेवाभावी स्वरूपाचे केले गेले. उदा. आनंदराव कोंडिबा देसाई हे साठ-सत्तरीच्या काळातील भुदरगडचे (कोल्हापूर) आमदार होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची नुकतीच सांगता झाली. त्यांनी पर्यावरणासह आपले राजकीय जीवन जगले. या तुलनेत आज पर्यावरणविरोधी राजकीय जीवन उदयास आले आहे. म्हणजे पर्यावरणाशी दोस्ती होती, तिची जागा पर्यावरणाला ओरबाडण्याशी दोस्ती अशी झाली. भारताबरोबर इतर देशांमध्ये असा उलट प्रवास सुरू आहे. 

'क्रोनी कॅपिटॅलिझम इन द मिडल इस्ट' या पुस्तकात साटेलोटे भांडवलशाहीचे वर्णन अरबी वसंत ऋतू असे केले आहे. म्हणजेच देशाची ओळख आणि प्रतिमा नवीन रचली जाते. अशीच नवीन ओळख आणि प्रतिमा रचण्याचे काम भारतात अतिजलदपणे सुरू आहे. भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राने प्रतिसांस्कृतिक क्रांती घडवली आहे. भारतातील इतिहास, संस्कृती आणि धर्माला त्यांनी त्यांच्या सोईचे अर्थ दिले आहेत. या क्षेत्रात चित्रपट हे क्षेत्र जास्त कृतीशीलपणे राजकारण करते. यांचे नमुनेदार उदाहरण म्हणजे सध्या अतिलोकप्रिय झालेला चित्रपट 'तान्हाजी'. या चित्रपटामध्ये अतिनाट्यमय गोष्टी आहेत. परंतु, ऐतिहासिक कथेला दोस्तवादी भांडवलशाहीचे स्वरूप दिले आहे. या गोष्टी क्रोनी भांडवलशाहीचे राजकारण करतात. या क्रोनी भांडवलशाहीचा समकालीन आशय आप्तानुग्रह हा आहे. त्यास जुन्या काळी कुणबीपद्धती म्हणून ओळखले जात होते. जवळच्या नातलगांना वशिलेबाजीच्या आधारे सत्ता, अधिकार, संपत्ती व प्रतिष्ठा देणे. समकालीन दशकामध्ये क्रोनी भांडवलशाहीने या कुणबीपद्धतीची पुनर्रचना केली. या पद्धतीला पुन्हा समाजात स्थिरस्थावर केले. वंशपरंपरागत राज्यसत्ता हा सरंजामशाहीचा एक नियम होता. त्यांची प्रतीके अमीर, सुलतान, बादशहा, अशी होती. त्यांची पुनर्स्थापना क्रोनी भांडवलशाहीने केली. यामुळे तळागाळात आप्तानुग्रह ही पद्धत मुरली आहे. अशा पद्धतीला तळागाळात सामान्य लोकदेखील 'कुणबी वसंत ऋतू' असे म्हणतात. म्हणजेच 'अरबी वसंत ऋतू' व 'कुणबी वसंत ऋतू' या संकल्पना भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या आहेत. मात्र, सरतेशेवटी राजकारणाचा एकच अर्थ साटेलोटे हा स्पष्ट करतात. तसेच चीन, रशिया आणि अमेरिका येथील क्रोनी भांडवलशाहीचाही अर्थ सरतेशेवटी साटेलोटेवाचक आहे. यामुळे क्रोनी भांडवलशाहीने राजकारणाच्या जागतिक क्षेत्रावर वर्चस्व निर्माण केले आहे. क्रोनी भांडवलशाही अन्यायकारी असूनही ती लोकांना हवी हवीशी वाटते. तिच्यावर लोकांचे अतिप्रेम आहे. म्हणून ती केवळ लादलेली गोष्ट शिल्लक राहत नाही. तर क्रोनी भांडवलशाही राजकारणाने तिचा समर्थक वर्ग तयार केला आहे. त्या समर्थक वर्गाला आधुनिक भारताची संकल्पना महत्त्वाची वाटत नाही. तर त्याला क्रोनी भांडवलशाही भारताची संकल्पना महत्त्वाची वाटते. या जीवन दृष्टीमुळे ग्रामीण राजकारण बदलले. सेवाभावी राजकारण बदलले. गांधीवादी राजकारण बदलले. त्या जागी ग्रामीण, सेवाभाव, गांधीवाद अशा गोष्टींबद्दल अतिनाट्यमय घडामोडी घडू लागल्या आहेत. विश्‍वस्त ही धारणा जवळपास संपुष्टात आली. भोवताली ज्ञान असते ही संकल्पना क्रोनी भांडवलशाहीने हद्दपार केली. ज्ञान हे ब्रॅडिंग केलेले असते, अशी नवीन संकल्पना मानवी जीवनाच्या व्यवहारात खोलवर पसरवली. ज्ञान म्हणजे राजकारण हेच आजचे क्रोनी भांडवलशाहीने घडवलेले भ्रामक राजकारण मुख्य राजकारण झाले. 

संबंधित बातम्या