पितृसत्ताक राजकारण

प्रकाश पवार
सोमवार, 23 मार्च 2020

राज-रंग
 

राजकारणाचे पितृसत्ता हे खास वैशिष्ट्य आहे. ही वस्तुस्थिती जळजळीत सत्य आहे. कारण पितृसत्ताक समाज हे स्त्री वर्गापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. या अर्थाने पितृसत्ताक समाज ही सर्वांत जास्त धोकादायक जागा आहे. ही समाज अवस्था जगात सर्वत्र दिसते. मात्र, त्यांचा सामना स्त्री वर्ग करत आहे. शेरिल सँडबर्ग (फेसबुकच्या सीईओ), उर्सुला बर्न्स (वेओनच्या अध्यक्ष), फेबे नोवाकोविक (अमेरिकन डायनॅमिक्स संरक्षण कंपनीच्या प्रमुख) अशी काही नावे पाहिली, तरी जगात नवीन बदल होत आहे, असे दिसते. यामुळे जगाच्या भारतालाही बरोबर राहावे लागते. जगाला प्रेरणा देणाऱ्या महिला आणि मुलींच्या कथा सांगण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना केले होते. महाराष्ट्रातील ठाण्यात महिलांनी बाईक रॅली काढली. अशा काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. यापेक्षा महत्त्वाची घटना म्हणजे ग्रेटा थनबर्ग ही शाळेतील एक मुलगी आहे. ती जगभरात पर्यावरण वाचवण्यासाठी आंदोलन करत आहे. ही तिची कृती सकारात्मक आहे. तिला टाइमने 'पर्सन ऑफ द इयर २०१९' घोषित केले आहे. थोडक्यात ही जाणीव विकसित करावी लागते. कारण वर्चस्वाची जाणीव आधीच पक्की झालेली असते. अशा पितृसत्ताक जाणिवांशी यशवंतराव चव्हाण व शरद पवारांना संघर्ष करावा लागला. त्यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये स्त्री-पुरुष समतेची जाणीव जाणीवपूर्वक विकसित केली. शरद पवारांनी लष्करामध्ये महिलांच्या भरतीचा विचार सर्जनशीलपणे मांडला होता. त्यांनी २००४-२०१४ या दहा वर्षांत लैंगिक समतेचा सतत प्रक्रियात्मक पातळीवर पुरस्कार केला. ही पवारांची परंपरा यशवंतराव चव्हाण यांची आहे. कारण चव्हाण युगात पितृसत्ताक समाज होता व राजकारणही पितृसत्ताक होते. तरीही यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाची दिशा स्त्री-पुरुष समतेची होती. यशवंतराव चव्हाण आणि भगतसिंग यांच्या आईची भेट झाली, तेव्हाचा फोटो उपलब्ध आहे. त्या फोटोवरून चव्हाण स्त्री-पुरुष समतेचा विचार स्वीकारत होते असे दिसते. मात्र, ही परंपरा आज जवळपास कोरडी झाली आहे. कारण पुरुष, सैनिक, महिलांना स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळे महिला कमांडिंग पदांसाठी उपयुक्त नाहीत असे सरकारने याचिकेवर उत्तर दिले होते. याचिका लष्करात महिलांना समानता द्यावी अशी होती. शारीरिक कारणांमुळे तैनातीसाठी महिला आणि पुरुष समान मानता येत नाहीत, असा तर्क देण्यात आला. या विरोधाशी शरद पवारांनी दहा वर्षे संघर्ष केला होता. यानंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने लष्करात महिलांना परमनंट कमिशन आणि कमांड पोस्ट देण्याचा निकाल देऊन लैंगिक समानता हा विचार स्वीकारला. न्यायमूर्तींनी लैंगिक आधारावर क्षमतांबाबत संशय व्यक्त केल्यामुळे फक्त महिला म्हणून नव्हे, तर भारतीय लष्कराच्या सदस्य म्हणूनही त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का बसला आहे, अशी भूमिका घेतली. म्हणजे पितृप्रधान समाजाच्या पुढे जाऊन समतेचा विचार व व्यवहार घडावा लागतो.  

आर्थिक स्वातंत्र्य
स्त्रीवादी राजकारणाचे विविध अर्थ आहेत. परंतु, तीन महत्त्वाच्या गोष्टी सध्या घडत आहेत. एक, स्त्री-पुरुष समतेचा प्रयत्न केला जातो. दोन, स्त्रियांना राजकारणात ओढून घेतले जाते. तीन, स्त्रियांना राजकारणात ढकलले जाते. या तीन गोष्टी आर्थिक क्षेत्रातदेखील घडत आहेत. कारण महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दल खूप मतभिन्नता आहे. घटस्फोट आणि संपन्न कुटुंब यांचा संबंध संघटनांचे नेते जोडतात. शिक्षण व पैशांमुळे अहंकार येतो आणि कुटुंबे विभाजित होतात, अशी मानसिकता एकविसाव्या शतकातदेखील सनातन स्वरूपाची आहे. हा सरळ सरळ समताविरोधी विचार राजकीय पक्ष आणि संघटनांमध्ये आहे. मात्र, तळागाळात बदल होत आहेत. समकालीन युगात महिला उद्योग क्षेत्रात कृतिशील झाल्या आहेत. शेतीपासून अंतराळापर्यंतच्या क्षेत्रांत त्यांची भागीदारी व सहभाग वाढला आहे. फॉरच्युन कंपन्यांची एक यादी आहे. त्यामध्ये ५०० कंपन्यांचा समावेश होतो. त्यांपैकी ३३ कंपन्यांच्या सीईओ महिला आहेत. सोनी वर्ल्ड फोटोग्राफ अवॉर्डच्या अंतिम फेरीत कान्ह फान यांचे चित्र गेले आहे. हे चित्र स्वावलंबी जीवनाचे प्रतीक आहे. कारण व्हिएतनामची राजधानी हनोईतील क्वांग फू काउ या गावातील आहे. चित्र अगरबत्तीच्या काड्या सुकवणाऱ्या महिलांचे आहे. क्वांग फू काउला हे गाव अगरबत्तीचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील प्रत्येक घरात किमान एका शतकापासून अगरबत्ती तयार केली जाते. अगरबत्ती हा कुटिरोद्योग गावातील महिलांनी राबविलेला उद्योग आहे. अगरबत्ती विकून एक महिला दरमहा जवळपास तीस हजार रुपये मिळवते. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील श्री सिटी ही उद्योगनगरी आहे. येथे ५० टक्के कर्मचारी महिला आहेत. १० हजार महिला तर एकट्या फोक्सकॉन कंपनीत आहेत. कंपनीच्या कर्मचारी वर्गात जवळपास ८५ टक्के. २०१५ मध्ये कंपनीत केवळ ८० महिला होत्या. नंतर ही संख्या १० हजार झाली. १० वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या मुली येथे मोबाइलचे काम करतात. 

भाडोत्री कूस धोरणास विरोध 
 व्यक्तीचा विचार केवळ साधन म्हणून केला जातो, त्यास विरोध होत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीस 'आमची कूस भाडोत्री नाही, ना एक तासासाठी, ना नऊ महिन्यांसाठी' अशी घोषणा पॅरिसमध्ये दिली गेली. फ्रान्सच्या राजधानीत शेकडो महिलांनी बायोएथिक्स विधेयक विरोधात आंदोलन केले. या महिला फ्रान्सच्या संसदेसमोर जमा झाल्या होत्या. सर्व महिला आपल्याबरोबर बाबागाडी घेऊन आल्या होत्या. त्यात त्यांनी डमी बालकांना ठेवले होते. या सर्व महिला सरोगसी आणि असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह (एआरटी) संबंधी विधेयकाचा विरोध करण्यासाठी आल्या होत्या. त्यामुळे आमच्या हक्कांचे हनन होत असल्याचे महिलांनी म्हटले आहे. आंदोलनाचे आयोजन प्रोटेट फॉर एव्हरीवन समूहाने केले होते. पॅरिसशिवाय फ्रान्सच्या मुख्य शहरांमध्येही या प्रकारचा विरोध करण्यात आला आहे. महिलांची कूस भाडोत्री नसल्याचे महिलांनी आंदोलनादरम्यान खडसावून सांगितले. ही चळवळ व्यक्तीच्या प्रतिष्ठेसाठी आणि आत्मसन्मानाची म्हणून जास्त महत्त्वाची ठरली.  

अट्टकल पोंगल 
 भारतात स्त्री समतेचा विचार उत्सवांमध्ये दिसतो. तसेच प्रतीकांमध्ये दिसतो. भवानी ही न्यायाची देवता आहे. भवानी म्हणजे पार्वती होय. राजकीय भागीदारी, भौतिक उत्पादन शक्ती आणि स्त्री-पुरुष समता अशी भवानी प्रतीकाची तीन आधुनिक वैशिष्ट्ये लोककथांमध्ये आहेत. या गोष्टीचा विलक्षण प्रभाव शेती समूहावर आजही आहे. याचे उत्तम उदाहरण पोंगल उत्सव हे आहे. अट्टकल पोंगल उत्सव मुख्यत: केरळ राज्यात साजरा केला जातो. तिरुअनंतपुरम शहराच्या जवळ अट्टकल भगवती मंदिर आहे, जगदंबा म्हणून ते ओळखले जाते. हा द्रविड लोकांचा शेती आणि निसर्गाशी संबंधित उत्सव आहे. २००९ मध्ये सर्वांत जास्त महिलांनी हा उत्सव साजरा केला अशी जागतिक नोंद झाली होती. या वर्षात मार्च महिन्यामध्ये केरळमध्ये अट्टकल पोंगलला सुरुवात झाली आहे (९ मार्च २०२०). या उत्सवात सुमारे चाळीस लाख महिला उपस्थिती लावतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा उत्सव महिलांकडून दरवर्षी साजरा केला जातो. पोंगल तयार करणे हा या उत्सवाचा भाग आहे. एका मातीच्या भांड्यात तांदूळ, गूळ, नारळ आणि केळी एकत्र करून पोंगल हा प्रसाद तयार केला जातो. हा उत्सव जगातील सर्वांत मोठा उत्सव असून हा केवळ महिला साजरा करतात. दहा दिवसांचा हा उत्सव असतो. या उत्सवाचा संबंध शिलप्पादिकारम या तमिळ साहित्यांशी आहे. हे प्रथम महाकाव्य म्हणून ओळखले जाते. यांचा शाब्दिक अर्थ नूपुरची कथा असा आहे. पुर्णकांडम, मदरैक्कंडम आणि वियोगिकांडम अशा तीन भागांत क्रमश: चोल, पाण्डय आणि चेर या तीन राज्यांचे वर्णन केलेले आहे. या कथेचे अर्थांकन राजकीय भागीदारी, भौतिक उत्पादन शक्ती आणि स्त्री-पुरुष समता असे तिहेरी स्वरूपाचे आहे. 

राजकीय स्वातंत्र्य 
 राजकीय स्वातंत्र्यासाठी महिला जगभर संघर्षशील आहेत. या क्षेत्रात अशा घडामोडी प्रत्येक देशात घडत आहेत. यांची महत्त्वाची उदाहरणे या महिन्यामध्ये दिसून आली. एक, फिनलंडमध्ये सध्या आघाडीचे सरकार आहे. तेथे सना मरीन यांनी राजकीय भागीदारीसाठी संघर्ष केला. कारण तेथे चार पक्षांच्या प्रमुख महिला आहेत. सना मरीन या चार पक्षांच्या आघाडीच्या पंतप्रधान झाल्या आहेत. दोन, पाकिस्तानमध्ये १९९६ पूर्वी महिलांना शुक्रवारच्या नमाजावेळी मशिदीच्या वरील भागात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र १९९६ नंतर दहशतवादाच्या प्रश्‍नामुळे महिलांना मशिदीत प्रवेश नाकारण्यात आला. परंतु, यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सुनहरी मशिदीचे दरवाजे महिलांसाठी चोवीस वर्षांनंतर खुले करण्यात आले. देश स्वतंत्र झाला तरी महिलांना स्वातंत्र्य मिळालेले नाही. स्वातंत्र्याची मागणी स्त्रीवर्ग वेगवेगळ्या देशात करत आहे. पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य मार्च काढण्यास कट्टरपंथीय लोकांचा विरोध झाला. मार्चवर बंदी घालावी अशी याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली. स्त्रियांना एकत्र येण्याचा मूलभूत अधिकार आहे अशी भूमिका न्यायालयाने घेतली. इस्लामाबाद, कराची, लाहोर, मुलतान आणि क्वेटा येथे मार्च काढला गेला, तेव्हा मार्चची थीम 'माझे शरीर-माझी इच्छा' ही निवडली होती. मेक्सिकोमध्ये ९ मार्च रोजी महिलांवरील हिंसाचाराचा निषेध म्हणून स्त्रियांनी एका दिवसासाठी सार्वजनिक जीवनातून गायब होण्याचे आंदोलन केले. तसेच आपल्या सखीच्या जगण्याचा सन्मान व्हावा म्हणून तिच्या स्मृती निसर्गातील सुंदर घटकांच्या छायाचित्रांमधून समाजमाध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आल्या. तीन, साटेलोटे भांडवलशाही आणि पितृसत्ताक समाज यांचे साटेलोटे आहे. त्यामुळे समकालीन दशकामध्ये जगातील जवळपास सर्व देशांमध्ये स्त्री-पुरुष समतेचा बनाव केला जातो. परंतु, प्रत्यक्षात स्त्री-पुरुष समताविरोधी कामकाज राजकीय संस्था, सार्वजनिक धोरण निश्‍चिती आणि मूल्यात्मक व्यवहार अशा तीन पातळ्यांवर केला जातो. यांचे सर्वांत जास्त लक्षवेधक उदाहरण अमेरिका हे आहे. या गोष्टीचे अनुकरण तिसऱ्या जगातील शासन व्यवस्था करत आहेत. थोडक्यात यशवंतराव चव्हाणांच्या इतका स्त्री-पुरुष समतेचा प्रामाणिकपणा दिसत नाही. त्यामुळे आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा क्षेत्रांमध्ये स्त्रियांची दडपणूक जास्त होते. त्यामुळे दडपणूकविरोधीच्या घडामोडी घडत आहेत. यांचे कारण पितृसत्ताक समाज हेच आहे. अशा शोषण प्रधान समाजांशी जुळवून घेण्याची प्रक्रिया जास्त घडते. पितृसत्ताक समाजातील वर्चस्वाला त्या तुलनेत कमी विरोध होतो.

संबंधित बातम्या