मानवी अस्तित्वाची लढाई

प्रकाश पवार
सोमवार, 20 एप्रिल 2020

राज-रंग
 

कोविड - १९ निर्मूलनाचा राजकीय प्रश्न अस्तित्व वाचक आहे. हा विषय महादेवाच्या एका लोककथेतून नीटनेटका समजतो. भारतात महादेव अथवा शंकराबद्दल एक लोककथा आहे. समुद्र मंथनातून विष बाहेर पडले, तेव्हा ते स्वत: महादेवाने पचविले. ही लोककथा म्हणजे राजकारणाची खरीखुरी जाणीव आणि इच्छाशक्ती होय. महादेवाच्या लोककथेत अस्तित्वाचे राजकारण खचून भरलेले आहे. परंतु, संधीसाधू समाजाची एक उलटी गंगा वाहते. 'रोजचे मडे त्याला कोण रडे' अशी राजकारण विषयक एक धारणा झाली आहे. यामुळे राजकारण ही गोष्ट अतिशय तुच्छतेची आणि स्वार्थासाठी अतिशय लाडकी गोष्ट समजली गेली. यामुळे मानवी अस्तित्वाचे राजकारण छोटे-छोटे होत गेले, तर मानवी अस्तित्वाचा अर्थ लावण्यासाठी अडथळा येत गेला. यामुळे कोविड - १९ची लढाई अवघड होत चालली आहे. कोविड - १९ हा महामारीचा आजार आहे. हा आजार राजकारणाच्या आकलनाचे लक्षण नाही, तर कारण आहे. ही महामारी रोखण्यासाठी अपयश आले. याचे खरे कारण राजकारण समजत नाही हे असून हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. राजकारणाबद्दलचा तुच्छता भाव सोडून विचार करावा. मरणाच्या दारातून बाहेर काढण्याचा अतिजलद महामार्ग केवळ राजकारण हाच आहे. हे विष राजकारण पोचवू शकते आणि मानवी अस्तित्वाची लढाई जिंकू शकते, हा आशय लोककथेत दिसतो. 

राजकीयत्वाच्या आकलनाचा यक्षप्रश्न
 कोविड - १९ची साथ जागतिक आहे. या साथीचे जागतिकीकरण अतिशय जलदगतीने झाले. लोकांच्या विचार करण्याच्या गतीपेक्षा याची गती जास्त आहे. या गतीचा परिणाम समजण्याच्या आधीच दुसरा परिणाम घडत आहे. कोविडची गती आणि राजकीयत्वाची समज यांपैकी राजकीयत्वाची समज जास्त गतीशील, सर्वव्यापी, सर्वस्पर्शी अपेक्षित होती. परंतु, सध्या तरी कोविड पुढे आणि राजकीय जाणीव मागे पडलेली दिसते. खरे तर ही वस्तुस्थिती अपेक्षित नाही. याची कारणमीमांसा नीटनेटकी केली जात नाही. महामारीची साथ नियंत्रणात येत नाही, याचे कारण कोविड साथीची गती जास्त आहे हे नाही, हे तर लक्षण आहे. कारण यापेक्षा वेगळे आहे. त्या कारणाचा शोध घेतला जात नाही. अर्थात त्यांचे कारण राजकारण हे आहे. परंतु, या राजकारणाचा अर्थ वेगळा आहे. हातावर हात ठेवून बसणे हा राजकारणाचा विषय नसतो. हा मुद्दा महादेवाच्या लोककथेत मांडला गेला आहे. महादेव कैलास पर्वतावर ध्यानधारणा करत होते. शेजारी नंदी आणि सिंह होता. त्यांना भूक लागत नाही. पण कैलासाच्या खाली जनतेला भूक लागते, तेव्हा पार्वतीने शंकराला जनतेच्या भूकेची आठवण करून दिली. यामुळे ध्यानधारणा आणि राजकारण वेगवेगळे आहे. राजकारणात भूकेचा प्रश्न मुख्य आहे. हा विचार पार्वतीचा होता. यामुळे राजकारण म्हणजे सत्तास्पर्धा नव्हे. सत्तास्पर्धा तर राजकीयत्वाच्या जीवनातील एक कटू सत्य आहे. मुद्दा सत्तास्पर्धेच्या सीमारेषा भेदून पुढे जाण्याचा आहे. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. एक, केवळ सत्तास्पर्धा म्हणजे राजकीयत्व नव्हे. हे राजकीयत्वाचे आकलन कोते आहे. राजकीयत्वाची कोती आकलनशक्ती अशक्त असते. त्यामुळे अशा अशक्त राजकारणाला कोविड मागे टाकतोय. दोन, आणीबाणीच्या काळातील राजकीयत्वामध्ये उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम अशी सरळसोट धारदार टोके नसतात, तर एक लवचीकता असते. मध्यममार्गी राजकारण अशा वेळी घडवावे लागते. यांचे समंजस आकलन म्हणजे राजकीयत्व होय. अतिशय मोठ्या पेचप्रसंगांच्या काळात हेच आकलन जास्तीतजास्त गतीने पुढे सरकते. नेमकेपणाने ही गोष्टच आज आपल्या सर्वांच्या जीवनात दिसत नाही. त्यामुळे कोविडची गती राजकारणाला मागे टाकते. तीन, मध्यममार्गी म्हणजे राजकीयत्व होय. परंतु, मध्यममार्गी म्हणजे गणितामधील लघुतम साधारणमध्ये असतो. ही गोष्ट जीवित, वित्त, भीती व गावाची ओढ यांच्याशी सेंद्रियपद्धतीने जोडलेली असते. त्यामुळे लोकांच्या या भावना अनावर होऊ नयेत याची काळजी घ्यावी लागते. चार, आरोग्य आणीबाणी ही घटना मुळात व्यक्तीच्या अस्तित्वाशी निगडित आहे. त्यामुळे ''सर सलामत तो पगडी पचास'' या लोकयुक्तीमधील आशय समजून घ्या. केवळ अर्थकारण-सत्ता, केवळ पक्ष-सत्तास्पर्धा, केवळ समाजकारण-सत्ता, केवळ धार्मिक-सत्ता अशा तुकड्यातुकड्यांत अशावेळी विचार केला जात नाही. केवळ व्यक्तीचे अस्तित्व आणि त्या व्यक्तीला विश्र्वास वाटावा लागतो. यामुळे अशा पेचप्रसंगांचे आकलन हाच राजकीयत्वाचा एक मोठा भाग आहे. 

संघाचे नवीन राजकीयत्व
संघ आणि राज्य शासने कोविड - १९ मुळे हादरली आहेत. त्यांच्या मनामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. परंतु, राज्य शासनांची चिंता चिंतनशील प्रवृत्तीची दिसते. राज्य शासने मा. गांधीजींच्या सत्याग्रह वीरासारखी दिसतात. हे अमेरिका आणि भारत येथे दिसते. राज्य शासने खचून गेली नाहीत. त्यांची भाषा शैली आश्वासित करणारी आहे. यामुळे जनमत त्यांच्या बाजूने घडू लागले. यामुळे देशातील सर्वात मोठे पक्ष इव्हेंट मॅनेजमेंट दणकट करू लागले. अमेरिका, भारत, पाकिस्तान अशा देशांत अंतर्गत इव्हेंट मॅनेजमेंट आणि मॅनेजर अशी नवीन साखळी निर्माण झाली आहे. विरोधीपक्षदेखील फार ठाम भूमिका घेत नाहीत. विरोधीपक्ष कोविड - १९ च्या प्रश्नापासून दूर आहेत. कारण समस्येचे गेले सत्ताधारी पक्षाच्या लक्षात आणून देणे हे फार मोठे काम नाही. सत्ताधारी पक्षाला पर्याय दिला पाहिजे. लोकांच्या समस्यांपासून दूर राहून ते राजकारण बिगर रचनात्मक कार्य करीत आहेत. कोविड - १९ च्या निर्मूलनासाठी संरचनात्मक पर्याय विरोधीपक्षांनी उपलब्ध करून दिला नाही. यामुळे सत्ताधारी पक्षांना आता राज्य शासने मुख्य स्पर्धक वाटत आहेत. हे संघाचे अमेरिका आणि भारत येथील आकलन बाळबोध स्वरूपाचे आहे. यामुळे राज्य शासनाच्या कामकाजात संघ अडथळे निर्माण करते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान केयर फंड असा कृत्रिम संघर्ष घडवला गेला. ही या आशयाची घटना आधी अमेरिकेत घडली. त्या पाठोपाठ भारतात घडली. खरे तर अशा मोठ्या पेचप्रसंगांच्या काळात राज्य सरकारला मदतीच्या हाताची गरज असते. परंतु, अशा आणीबाणीच्या काळात मदतीचे हात राज्य शासनाच्या विरोधात जातात. अशा घटना पंडित जवाहरलाल नेहरू युगात घडलेल्या होत्या. त्यामुळे संघाने अशा आणीबाणीच्या प्रसंगी राजकारणात एक कल्पित शत्रुची निमिर्ती केली आहे. मानवी अस्तित्वासाठी शत्रुभावी नात्यांना विवेकाच्या आधारे बाजूला सारून ठेवले जाते. हे अस्तित्वासाठीच्या राजकारणाचे खरे लक्षण असते, पण सध्या हे राजकीय आकलन शोधून सापडत नाही.

राज्य संस्थामधील बदल 
कोविड - १९ मुळे राज्यव्यवस्थांमध्ये दोन मोठे बदल स्पष्टपणे दिसू लागले आहेत. एक, लोकशाही राजवट जाऊन हुकूमशाही राजवट स्वीकारली गेली. यासंदर्भात हंगेरीचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. १९८९ मध्ये लोकशाही राजवट तेथे आली. परंतु, महासाथीचा आधार घेऊन व्हिक्टर ओबन यांनी संसदेत त्यांना कायमस्वरूपी सत्तेत राहण्याचा अधिकार दिला. ही घटना दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करण्यात आली. यामुळे जनमत अजमावण्यावर बंदी घातली. ही बंदी अनिश्चित काळासाठी घालण्यात आली. न्यायिक स्वातंत्र्यावर घाला घातला गेला. लोकशाही मार्गाने हंगेरीत हुकूमशाही आली. ही घटना फार बदल घडेल, असे सूचित करते. ही घटना म्हणजे लोकशाहीचा विलय घडवते. महामारीच्या निर्मूलनासंदर्भात लोकशाही राजवटीवरील विश्र्वास या देशात संपुष्टात आला. लोकशाहीऐवजी वर्चस्व, नियंत्रण, हिंसा, दमन अशा नवीन संरचनांचा पुरस्कार उघडपणे मान्य केला. ही हंगेरीची कथा हळूहळू सर्वत्र अबोलपद्धतीने स्वीकारली गेली आहे. यास युरोप आणि अमेरिका अपवाद नाहीत. परंतु, तेथे हा मोठा बदल करण्याऐवजी सर्वार्थाने अंतर्गत बदल केले आहेत. दोन, संघराज्यव्यवस्था असलेल्या देशात अंतर्गत बदल अतिशय जलदगतीने झाले. जवळपास संघराज्याच्या सिद्धांताचा कोविड - १९ च्या आरोग्य समस्येनिमित्ताने नवीन अर्थ आणि स्वरूप पुढे आले. संघराज्यावर सत्ता केंद्रीकरणाचा आरोप समिक्षकाचा होता. सत्ता केंद्रीकरणाबरोबर संघराज्यातील लोकांच्या निसरडा दुहेरी झाल्या. म्हणजे केंद्र सरकारबद्दल अतिशय जपून जपून व्यवहार केला गेला. राज्य सरकारांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. राज्य सरकारचे कोविड - १९ निर्मूलनाचे कार्य प्रभावी आहे. यांची उघडपणे कबुली दिली जाते. ही घटना अमेरिका आणि भारतीय संघराज्यातील राज्यांमध्ये जास्तच खुलून दिसते. राज्य शासनाने जास्तीत जास्त आश्वासक वातावरण निर्माण केले. हा मुद्दा राज्य शासनासंदर्भात सूर्यासारखा आश्र्वासन देतो. म्हणजे सूर्यप्रकाशामुळे वनस्पतींची वाढ होईल, रोगराई जाईल, जीवनसत्त्वे मिळतात हा आशावाद सूर्यामुळे व्यक्त होतो. नेमकी तशीच अपेक्षा राज्य शासनासंदर्भात अमेरिका आणि भारत येथे व्यक्त झाली. विशेष महाराष्ट्र राज्य याबद्दल सध्या आघाडीवर आहे. अशीच काहीशी परिस्थिती अमेरिकेच्या गव्हर्नरबद्दल आहे. या घडामोडींमुळे अस्वस्थता कमी होते. राज्य शासने दुहेरी संवाद साधताना दिसतात. तसेच सर्वच राज्य शासने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. राज्य शासने पारदर्शक आहेत, असे वाटते. राज्य शासनाच्या नेतृत्त्वाबद्दल योग्य आणि उचित असे अमेरिका आणि भारत येथे बोलले गेले. या उलट संघराज्य शासनासंदर्भात फार मोठा आशावाद व्यक्त झाला नाही. दोन्ही संघराज्य शासनाचे नेतृत्व प्रचंड लोकप्रिय आहे. परंतु, संघाच्या तुलनेत राज्य शासनाने कोविड - १९ विरोधी लढण्यासाठी नवीन राजकीयत्व समजून घेण्यासाठी तत्पर दिसली. यामुळे अर्थातच अमेरिका आणि भारत या दोन्ही संघराज्यांत राज्य शासनाचे राजकीयत्वाबद्दलचे आकलन अव्वल दर्जाचे दिसले. 

मानवी जीवनावर नियंत्रण
 राज्यसंस्थेला राजकीयचे पुरेसे आत्मभान नाही. अशा वेळी मानवी जीवनावर सामाजिक, धार्मिक संस्थांचे विविध मार्गांनी नियंत्रण येणार आहे. सामाजिक संस्था जास्त शक्तीशाली होणार आहेत. जुन्या संस्थांच्या मदतीने भेदभाव आणि दमन यंत्रणा पुढे येईल. गावातील जुन्या यंत्रणा नव्याने जुनी शोषणाची शक्यता नाकारता येणार नाही. अशा वेळी राज्य शासनाच्या पुढे सर्व प्रकारच्या संस्थांना नवीन दिशा देण्याचे मोठे आव्हान आहे. गावांच्या पुढे नवीन आव्हान उभे ठाकले आहे. गाव अनेक रोगांचे माहेरघर आहे. परंतु, गावांकडे मानवी जीवनावरील विविध सामाजिक धार्मिक संस्थांचे नियंत्रण दूर करण्यासाठीची क्षमता आहे. संचारबंदी, जिल्हाबंदी, तालुकाबंदी, गावबंदी, घरबंदी यांचे समंजस अर्थ महत्त्वाचे ठरतात. बंदीची घोषणा आणि संकल्पना मानवतेच्या संरक्षणासाठी आहे, पण ती मानवतेच्या विरोधात जात आहे. उदा. एक मुलगा मुंबईवरून चालत निघाला आणि पंधरा दिवसांनी घरी पोचला. त्याला घरात घेण्यास विरोध झाला. ही घरबंदीची संकल्पना जवळजवळ मानवता विरोधातील आहे. याचे आत्मभान घराघरांत दिसत नाही. जवळपास सर्वच देशांमध्ये धार्मिक संस्था आणि धर्म प्रमुख धार्मिक सत्तेचा गैरवापर करत आहेत. गैरसमज या संस्थेने वाढवले आहेत. मानवतेची उन्नती म्हणजे धर्म होय. विज्ञान आणि निसर्गाच्या कुशीत धर्म भावना वाढते. कोविड - १९ चार संदर्भ घेऊन मानवतेची अवनती, विज्ञानविरोध, निसर्गावर आक्रमण होत आहे. कोविड - १९ मुळे दगावलेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार कसा करावा? हा राजकीय विषय होऊ शकत नाही. परंतु, हा विषय मुंबई, पुणे, बारामती येथे पुढे आला. याचे कारण समस्येचे निराकरण करण्याची राज्य शासनाची ताकद सामाजिक, धार्मिक संस्थाच मागत आहेत. हा धर्माचा आशय नाही. हा केवळ संधीसाधू आणि बेगडी राजकारणाचा विषय आहे. धर्म म्हणजे काय हे न्या. रानडे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या साहित्यांमधून समजून घ्यावे. वारकरी परंपरा हा तर यावरील चांगला उपाय आहे. अशा प्रसंगी कोविड - १९ विरोधातील लढ्यासाठी रानडे, शिंदे, भांडारकर अशा विचारवंतांचे विचार मदतीस येणारे आहेत. ही गोष्ट राज्यसंस्थेने समजून घ्यावी, अशी सरळ आहे.

संबंधित बातम्या