सारासार विवेकबुद्धीचे राजकारण

प्रकाश पवार
बुधवार, 6 मे 2020

राज-रंग
 

कोविडोत्तर काळात जगाबरोबर भारताला सार्वजनिक धोरणात बदल करावा लागेल. या बदलाचा एक मोठा भाग म्हणजे नवीन व्यक्ती (New Man) घडवावी लागेल. १९९० ते  २०२०  या दरम्यानच्या व्यक्तीपेक्षा कोविडोत्तर काळातील व्यक्ती पूर्णपणे नवीन भूमिका घेणारी असेल, तरच भारताचे अर्थकारण आणि राजकारण नव्याने मूळ स्थितीवर येऊ शकते. देशाचे धोरण बदलले आणि व्यक्ती कोविडपूर्वीच्या काळातील राहिली, तर फार मोठे अपयश येऊ शकते. 
या मुद्द्यांची  कारणमीमांसा सारासार विवेक या संकल्पनेशी संबंधित आहे. सारासार विवेकाची संकल्पना भारतीय समाजातून हळूहळू कमी झाली होती. सारासार विवेक आधी व्यक्तीमध्ये आणि नंतर समाजामध्ये कसा येईल हेच प्रमुख धोरण असले पाहिजे. हे धोरण असेल,  तर अर्थकारण आणि राजकारण सुधारण्याची शक्यता आहे.

सार्वजनिकतेचा गाभा : सारासार विवेक
राजकारणामध्ये सार्वजनिकता मध्यभागी असते. राजकारण सार्वजनिकतेच्या भोवती फिरते. सार्वजनिकतेचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सारासार विवेकबुद्धी हे असते. कोरोनाच्या काळात मानवी प्रेरणेमध्ये प्रचंड बदल झाला. मानवी प्रेरणेत प्रचंड बदल होण्यामुळे सामाजिक संबंध आणि राजकीय संबंधदेखील बदलत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे 'सारासार विवेक' ही कल्पना बाजूला जाऊन केवळ विवेकाची कल्पना पुढे आली. टाळेबंदीच्या काळात मानव हा मानवसृष्टीतून प्राणीसृष्टीत उलटा प्रवास करत आहे. हीच त्याची सर्वात जास्त दुःखमय कथा आहे. या कथेमध्ये मानवाने आपली सारासार विचार करण्याची बुद्धी बाजूला ठेवली. यामुळे राजकारणातील सार्वजनिकतादेखील फार कमी झाली. या कथेमुळे युरोप, अमेरिका, चीन, भारत येथील व्यक्ती, समाज आणि राष्ट्र राज्य यांच्यापुढे कोरोनाच्या निमित्ताने विविध समस्या उभ्या राहिलेल्या  आहेत. या देशांतील नेतृत्व सारासार विवेकाऐवजी  विवेकी किंवा हिशोबी पद्धतीने संवाद करत आहे. देशातील नेतृत्वाचा संवाद सातत्याने एकमेकांवरती आरोप-प्रत्यारोप करणारा शंका-कुशंका घेणारा आणि परस्परांचा द्वेष करणारा घडत आहे. या सर्व घडामोडींमधून मानवाची प्रेरणाशक्ती बदलल्याचे लक्षण दिसते.  प्राणीसृष्टी आणि मानवसृष्टी यामध्ये सारासार विवेकबुद्धीचा फरक आहे. मानव हा मुलतः प्राणी आहे. परंतु,  तो प्राणीसृष्टीतून  मानवसृष्टीत  येतो. मानवसृष्टीत येतो, कारण तो नकार द्यायला शिकलेला असतो. नकारात्मक विचार हाच त्याच्या मानवसृष्टीतील प्रवेशाचा आरंभबिंदू असतो. प्राणीसृष्टीचा नियम सहज प्रवृत्ती असतो. आजूबाजूच्या जगाचा प्राणी स्वीकार करतात. मानव मात्र आजूबाजूच्या निसर्गाचा आहे तसा स्वीकार न करता त्यामध्ये बदल करतो. यामुळे मानव आणि निसर्ग यांचे संबंध सामाजिक सलोख्याचे किंवा नैसर्गिक संवादी राहत नाहीत. मानव निसर्गाचे नियम समजून घेतो आणि त्याप्रमाणे बदल करत जातो. यामुळे मानव निसर्गाच्या संवादी व्यक्तिमत्त्वामध्ये हस्तक्षेप करतो. मानवाने निसर्गाच्या जीवनात हस्तक्षेप करण्यामुळे मानवाची प्रगती होत जाते. या प्रक्रियेमधून मानव स्वत्वाची  जाणीव असलेला, बुद्धी असलेला आणि प्रतिभा असलेला म्हणून विकसित होतो. या प्रक्रियेमधून मानव निसर्गाचे संतुलन व शांतता भंग करतो. या प्रक्रियेत माणसाचे स्वत्व व बुद्धी आणि प्रतिभा यांस  मर्यादा पडतात. या तीनही गोष्टींमध्ये सारासार विवेकबुद्धी कमी कमी होत जाते. हीच  प्रक्रिया एकविसाव्या शतकामध्ये जगभर सर्वत्र घडली  आहे. तसेच ती भारतात आणि महाराष्ट्रात देखील घडली  आहे. यामुळे माणसांमध्ये दुभंगलेपण आले आहे. हे दुभंगलेपण दुरुस्त  कसे करावे हा विचार केवळ सारासार विवेकामध्ये असतो. अशावेळी सारासार विवेकाचे साहित्य व्यक्तीला दुभंगलेपणातून बाहेर काढण्यासाठी मदत करते. उदाहरणार्थ न्यायमूर्ती रानडे यांनी भागवत धर्मावर व्याख्याने दिली. ती व्याख्याने रमाबाई रानडे यांनी संपादित  केली आहेत. या साहित्यामध्ये दुभंगलेल्या व्यक्तीला त्याच्या सारासार स्वत्वाची, त्याच्या सारासार विवेकाची आणि त्याच्या सारासार प्रतिभेची जाणीव करून दिली आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी सामूहिक प्रार्थना ही कल्पनादेखील प्रतिभा, बुद्धी आणि स्वत्व यांची वाढ सारासारपद्धतीने घडावी असाच विचार मांडला होता. अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये सदानंद मोरे यांनी 'तुकाराम दर्शन' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकामध्येदेखील सारासार विवेकाची कल्पना व्यक्त झालेली आहे. जुन्या काळाच्या संदर्भात भागवत धर्म किंवा वारकरी परंपरा सारासार विवेक जपत होते. तसेच सारासार विवेकाची  जोपासना करत होते. अलीकडच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर सारासार विवेक आणि व्यक्ती यांची ताटातूट झाली आहे. यामुळे व्यक्तींमधील  सामाजिक सलोखा आणि नैसर्गिक संतुलन ढळले आहे. यामुळे व्यक्ती निसर्गाच्या विरोधी आणि स्वतःच्या विरोधी कृती करताना दिसते. व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यक्तीला क्षणभंगूर वाटते. तसेच व्यक्तीला प्रत्येक गोष्टीचा उपभोग घ्यायचा आहे असे वाटते. वर्चस्वाच्या  कल्पना यातून उदयाला आल्या आहेत. व्यक्ती वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करते. वर्चस्व जपण्याचा प्रयत्न करते. व्यक्तींचा समाज होतो. त्यामुळे समाजदेखील वर्चस्वाच्या संरचनेला अग्रक्रम देतो. समाजातून राष्ट्र राज्य उदयाला येते. त्यामुळे राष्ट्र राज्यातदेखील वर्चस्वाचा विचार पुढे येतो. ही प्रक्रिया अबोध मनाची आणि सामूहिक मनाची आहे. या प्रक्रियेवर जाणीवपूर्वक मात करण्याचा प्रयत्न करावा लागतो. सामूहिक अबोध मन आणि अबोध मन यावर मात करण्याचा प्रयत्न भारतीय राजकीय प्रक्रियेमध्ये सातत्याने झाला. याची अनेक उदाहरणे दिसतात. उदाहरणे अत्यंत चित्तवेधक आहेत. सुरुवातीचे उदाहरण रामायणातील सीतेच्या लोककथेतील आहे. कारण सीता सातत्याने निर्वैर ही भूमिका मांडत राहते. निर्वैर विचार हा  महत्त्वपूर्ण  बदल व्यक्तीमध्ये, समाजामध्ये आणि राष्ट्र राज्यात घडवतो. दुसरे उदाहरण महात्मा गांधी यांचे सांगता येते. महात्मा  गांधी यांनीदेखील निर्वैर हा विचार मांडला होता. महात्मा गांधींनी या प्रक्रियेतूनच हिंसेपासून आणि परद्वेश यांपासून स्वतःची, समाजाची आणि राष्ट्राची सोडवणूक केली होती. कोरोनाच्या काळातील संचारबंदी आणि लॉकडाऊनमध्ये एकदम सीता आणि महात्मा गांधीजींच्या विचारांच्या विरोधातील घटना घडताना दिसतात. कारण या काळातील व्यक्ती आणि समाज सारासार विवेकाचा विचार करत नाही. सारासार विवेकाच्या विरोधात व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडलेले आहे. हे व्यक्तिमत्व कोविडोत्तर काळात दुरुस्त करून नवीन माणूस घडवण्याची गरज आहे. 

युगांचा विपर्यास
सारासार विवेकाच्या अभावामुळे  विपर्यास होत आहे.  सरकारने पुढाकार घेऊन हा  विपर्यास दुरुस्त करण्याची गरज आहे. एकाच युगातील लोक,  एका  युगातून दुसऱ्या युगात सहजासहजी प्रवास करतात. यास विद्याक्षेत्रीय मान्यता नाही. युग म्हणजे काय हा प्रश्न उपस्थित होतो. सरंजामी युग, परंपरागत युग, आधुनिक युग, यंत्र युग, तंत्रज्ञानाचे युग, डिजिटल युग अशी युगाची वर्गवारी केली जाते. ही वर्गवारी बंदिस्त स्वरूपाची आहे. व्यक्तीची प्रेरणा शक्ती युगाप्रमाणे असते, असे मानले जात होते. परंतु,  वस्तुस्थितीत डिजिटल युगात सरंजामी आणि परंपरागत युगातील काही घडामोडी घडत होत्या. त्याला भक्कम आधार मिळत होते,  तर सरंजामी युगात काही घडामोडी आधुनिक घडलेल्या दिसतात. ही एक वस्तुस्थिती आहे. परंतु, वर्गीकरण करताना याचे आत्मभान दिसत नाही. आज डिजिटल युग आणि उत्तर आधुनिक काळ असूनदेखील आजचा समाज जवळपास ऐंशीच्या काळाच्या आधीच्या युगामध्ये पाठीमागे गेला आहे. म्हणजेच एका बाजूला डिजिटल युग किंवा उत्तर आधुनिक युग आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक किंवा कल्याणकारी युग असा दोन  टोकांचा विपर्यास निर्माण झाला आहे. हा मुद्दा कोविडोत्तर काळात सोडवण्याची जबाबदारी धोरणकर्त्यांवरती मोठी आहे. 

डिजिटल युगात कोरोना, अण्वस्त्र स्पर्धा आणि जागतिक तापमानवाढ असे नवनवीन प्रश्न मोठी आव्हाने म्हणून पुढे आले आहेत. त्याबरोबरच अंधश्रद्धा व अविवेक अशा गोष्टीसुद्धा मोठी आव्हाने म्हणून पुढे आल्या. या विषयांवरील चर्चा गंभीरपणे परंपरागत आणि अविवेकी पद्धतीने  होते. किंबहुना अविवेकी पद्धतीवर  समाजातील मोठा वर्ग विश्वास ठेवतो. विज्ञान, विवेक अशा गोष्टी मानवी जीवनातील वरवरचे पापुद्रे आहेत, असे वाटते. विज्ञान, विवेक, तंत्रज्ञान यांचाही रुढीवादी पद्धतीने  वापर केला जातो. म्हणजे व्यक्तीची प्रेरणा विज्ञान, विवेक, तंत्रज्ञानाची आहे. एवढेच पुरेसे ठरत नाही. असे का होते याचे मुख्य कारण मानवाला एक अबोध मन असते. ते मन जागृत मनाच्या तुलनेत नऊ पटीने जास्त काम करते, असा मानसशास्त्राचा एक सिद्धांत आहे. या सिद्धांताप्रमाणे मानवी मन वर्चस्वाच्या परंपरागत संरचनांना पुढे आणते. जागृत मनाच्या तुलनेत अबोध मन जास्त कृतिशील  राहते. म्हणून कोरोनाच्या काळामध्ये रूढी, परंपरा, चालीरीती, जुन्या जीवनपद्धती यांना चालना मिळाली आहे. मानवी प्रेरणा अतिजलदपणे बदलली आहे. शहरी भागात रहाणे ही एक मानवी प्रेरणा घडवली गेली आहे. ही प्रेरणा कृत्रिम आहे. शहरात मुलांचे शिक्षण, शहरात आरोग्याच्या सुविधा अशी  कारणे मुख्य प्रेरणा म्हणून सहज बोलली जातात. ही मानवी प्रेरणा केवळ विवेकबुद्धीने घडली आहे. यामध्ये बदल करून सारासार विवेकबुद्धीने नवीन मानवी प्रेरणा घडवावी लागेल. सारासार विवेकबुद्धीने मानवी प्रेरणा घडवली,  तरच परोपकार, परहित, निर्वैर विचार, सहकारी प्रवृत्ती उदयास येईल. या गोष्टी केवळ नवीन माणसाची कल्पना करून घडणार आहेत. त्याचा आधार केवळ सारासार विवेक हाच असेल. विसाव्या शतकामध्ये भारताकडे सारासार विवेकबुद्धीचा फार मोठा साठा होता. आता नव्याने विसाव्या शतकाच्या संदर्भात धोरणांची आखणी करावी लागेल आणि व्यक्तीचे सामूहिक वर्तन सारासार विवेकबुद्धीप्रमाणे घडवण्यासाठी सरकारला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. यासाठी अनेक वर्षे  घालवावी लागतील, तरच विसावे शतक आणि एकविसाव्या शतकात सातत्य राहील. नाहीतर दोन्ही शतकातील संस्कृती वेगवेगळी असेल. याचे आत्मभान भारताने जपले, तरच भारत हा भारत राहील.

संबंधित बातम्या