पब्लिक इंटेलेक्च्युअल बाबा

प्रकाश पवार
शुक्रवार, 19 जून 2020

राज-रंग
श्रमिक, वंचित,  हमालांची  संघर्षशील  विचारसरणी विकसित करणारे एक  महत्त्वाचे  नाव म्हणजे डॉ. बाबा आढाव. त्यांनी  समतावादी  भारताचे स्वप्न उराशी बाळगून समाजकार्यास सुरुवात केली. कष्टकऱ्यांच्या गरजा ओळखून  आरोग्य, शिक्षण, निवारा, पोषण, हवा, पाणी, निसर्ग, विवेकवाद, सामाजिक सलोखा अशा समतावादी लोकशाहीचा पुरस्कार केला. बाबांनी नुकतेच ९१व्या वर्षात पदार्पण केले आहे, त्यानिमित्ताने  त्यांच्या  संघर्षमय वाटचालीचा घेतलेला आढावा...   

स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समतावादी भारत असे स्वप्न उराशी बाळगून बाबा आढाव सार्वजनिक जीवनात आले. समतावादी भारतासाठी त्यांनी करिअरचा  त्याग केला. जाणीवपूर्वक अभ्यासकापेक्षा वेगळे पब्लिक इंटेलेक्च्युअल असे व्यक्तिमत्व घडवले. समतावादी भारत या संकल्पनेची निवड त्यांनी स्वतः केली. ही संकल्पना समाजवादी पक्षांच्या संसदीय राजकारणाशी मिळतीजुळती नव्हती. नानासाहेब गोरे यांनी बाबांना त्यांचे काम पक्षात राहून करणे शक्य नाही असे म्हटले होते. म्हणजेच संसदीय पद्धतीने करणे शक्य नाही. हे उदाहरण खुद्द बाबा आढाव पुन्हा पुन्हा सांगत असतात.  
बाबांना त्यांच्या आईकडून स्वातंत्र्य चळवळ आणि समतेचा वारसा मिळाला. त्यांची आई रमाबाई रानड्यांच्या सेवा सदन संस्थेत शिकत होत्या. यामुळे रानडेंचा आणि सत्यशोधक चळवळीचा म्हणजेच महात्मा फुले यांचा वारसा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेष म्हणजे बाबा आढाव यांच्या जीवनामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त पर्याय होते. त्यांच्या पुढे राजकीय, सामाजिक व डॉक्टरी पेशा असे पर्याय होते. यामधून त्यांनी समतावादी भारत हा पर्याय निवडला. त्यांनी 'आम्ही हमाल हो हमाल हो, घेतो कामाचा दाम' अशी नवीन ओळख स्वीकारली. फुकट काम करणार नाही, वेतनाविना काम करणार नाही, रात्री काम करणार नाही अशी त्यांनी हमालांची नवीन संघर्षशील विचारसरणी विकसित केली. 'माझी पाठ माझ्या मालकीची' हे घोषवाक्य त्यांनी समतावादी भारत संकल्पनेचे प्रेरणास्थान म्हणून पुढे आणले. आम्ही पाठ भाड्याने देतो, त्याचा मोबदला घेतो, हा मोबदला हक्काचा आहे, असे सामाजिक तत्त्वज्ञान त्यांनी विकसित केले. या अर्थाने त्यांनी सामाजिक समता आणि सामाजिक न्यायांवर आधारलेला नवीन समाज निर्माण करण्याचा पर्याय निवडला. अशा पब्लिक इंटेलेक्च्युअल बाबा आढावांनी ९१व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्यांनी सामाजिक न्यायाच्या क्षेत्रांमध्ये पन्नाशीच्या दशकापासून सातत्याने काम केले. म्हणजेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती चळवळपासून बाबा आढावांचे काम सुरू झाले होते. त्यांच्या डोळ्यासमोर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अगदी ताजा इतिहास होता. त्यांच्या सामाजिक न्यायाच्या कामाला देखील सत्तर वर्षे  झाली आहेत. सातत्याने सत्तर वर्षे  त्यांनी समतावादी भारत संकल्पनेसाठी काम केले. हे काम त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन केले. 

संसाधनांच्या समान वाटपाची लोकशाही
साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबई शहरात मोठे बदल घडू लागले. यातून समतावाद विरोधी विचार पुढे आला. तसेच विकासाचे प्रकल्प राबवले गेले. विकास प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचे विस्थापन झाले. तेव्हा बाबा आढाव यांनी विकासाला विरोध नाही,  पण पुनर्वसन झाले पाहिजे अशी भूमिका घेतली. 'खणाला खण, फणाला फण' अशी मागणी पुढे आली. या मागणीचे त्यांनी समर्थन केले. विशेषतः यशवंतराव चव्हाण यांनीदेखील याबद्दल संवेदनशील निर्णय घेतला. १९६९ मध्ये नवरात्रात कुकडी धरणाजवळ  एक प्रसंग घडला होता. तो प्रसंग म्हणजे 'धरण बांधून आमचा संसार बुडवता व तुमचा संसार घडवता' अशा घोषणा दिल्या जात होत्या. यशवंतराव चव्हाण यांच्या समोरील ताट सखुबाई जोरी यांनी उधळून दिले. चव्हाण यांनी धरणाचे उद्घाटन थांबवले. तेव्हा तात्पुरते मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. शंकरराव चव्हाण यांना यशवंतराव चव्हाणांनी पुनर्वसन कायदा करा आणि नंतर धरणाचे उद्घाटन करा अशी भूमिका सांगितली. ही कथा बाबांनी सातत्याने मांडलेली आहे. असे संवेदनशील व समतेवर आधारलेले राजकारण घडावे असा बाबांचा आग्रह राहिला आहे. 

समाजाचे सामाजिक आरोग्य हा त्यांच्या चिंतनाचा आणि कामाचा विषय राहिला आहे. हमाल नैसर्गिकपणे आजारी पडण्यापेक्षा अतिश्रमामुळे व अंगमेहनतीच्या कामामुळे आजारी पडतात. म्हणून कामाचे व कष्टाचे समान वाटप झाले पाहिजे अशी सार्वजनिक आरोग्यासाठी बाबा आढाव यांची भूमिका आहे. मानवी हक्कांप्रमाणे  सामाजिक आरोग्य हा एक जागतिक हक्क व्हावा अशी बाबा आढाव यांची विचारसरणी विकसित होत जाते. सध्या सार्वजनिक आरोग्य हा जागतिक हक्क व्हावा यासाठी अमर्त्य सेन व जेनिफर असे विद्वान प्रयत्न करत आहेत. त्या विचारांच्या साखळीमधील बाबा आढाव यांचे हे काम आहे. जेनिफर या हेल्थ इक्विटी  अँड  पॉलिसी क्लबच्या संस्थापिका आहेत. सामाजिक न्याय व समता या मूल्यांवर आधारित जागतिक आरोग्य घटना त्यांनी तयार केली  आहे (ग्लोबल हेल्थ कॉन्स्टिट्यूशन). बाबा आढाव यांनी देखील आरोग्यापासून सामाजिक आरोग्यापर्यंत वाटचाल केली आहे. महात्मा फुले समता प्रतिष्ठान, हमाल पंचायत, कष्टाची भाकरी, विषमता निर्मूलन समितीचे काम, एक गाव एक पाणवठा, एक गाव एक मसनवटा, जोगतीणीच्या पुनर्वसनाचे काम, मोलकरणीचे प्रश्न, कागद-काच-पत्रा कष्टकऱ्यांचे  प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न अशा कामांमध्ये त्यांनी न्याय आणि समतेच्या मूल्यांचा आग्रह गेली सत्तर वर्षे  धरला. हा सामाजिक आरोग्याच्या हक्काचा पाया आहे. 

बाबा आढाव यांचे काम केवळ सामाजिक सुधारणा या क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या कामाला एक महात्मा फुले यांच्या विचार आणि तत्त्वज्ञानाची प्रेरणा होती. तसेच समतावाद हे अधिष्ठान होते. त्यांचा विचार निव्वळ सामाजिक विचार किंवा निव्वळ आर्थिक विचार नव्हता. निव्वळ सामाजिक विचार आणि निव्वळ आर्थिक विचार हा सदोष असतो अशी निश्चित भूमिका बाबा आढावांची राहिली आहे. कारण सामाजिक आणि आर्थिक विचारांबरोबर त्यामध्ये अामुलाग्र बदल करण्यासाठी पर्याय उभे करण्याचा विचार द्यावा लागतो. तो त्यांनी दिला. उरुळीकांचन या भागात कॅनॉलने शेतीला पाणीपुरवठा होऊ लागला. तिथे  बागायतदारांनी जिरायतदारांच्या जमिनी विकत घेतल्या, तेव्हा बाबा आढाव यांनी वसंतराव नाईक यांना विरोध केला. जिरायतदारांनादेखील जगण्याचा हक्क आणि संपत्तीचा हक्क आहे अशी त्यांची भूमिका होती. बाबा आढाव यांनी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, इंदिरा गांधी यांना समतेच्या व न्यायाच्या मुद्द्यावर आधारित विरोध केला. परंतु, त्यांनी व्यक्ती द्वेष केला नाही. चव्हाण आणि नाईक यांना विरोध करूनदेखील त्यांनी सन्मानाची वागणूक दिली अशा बाबांच्या आठवणी आहेत.

समतावादी लोकशाही
बाबा आढाव यांनी स्त्री पुरुष समतेसाठी सातत्याने काम केले. तसेच विचारही मांडलेले. हमालांची भूक  स्त्रियांच्या कष्टात भर घालते. म्हणून त्यांनी 'कष्टाची भाकरी' ही कल्पना पुढे आणली. जटा घेऊन जगावे लागते, म्हणून देवदासींच्या क्षेत्रात काम उभा केले. त्यांनी जगण्याच्या हक्काचे स्त्रियांच्या संदर्भात समर्थन केले. स्त्री-पुरुष समतेची  गरिबांमधील संकल्पना बाबांनी स्पष्ट केली. भूक वाटून घेण्याची संकल्पना त्यांनी मांडली आहे. म्हणजे उपलब्ध अन्न समान व्यक्तींमध्ये वाटून देणे आणि सर्वांनी समान भूकदेखील वाटून घेणे. ही संकल्पना म्हणजे गरिबांमधील  सहअस्तित्वाची आणि सहजीवनाची संकल्पना आहे. ही कल्पना एका महिलेकडून बाबांना समजली. ही संकल्पना गरिबांच्या समतावादी लोकशाहीचा आधार आहे. 

विषम संधी हा आपल्या लोकशाहीवर लागलेला कलंक आहे, असे बाबा आढाव यांचे लोकशाहीबद्दलचे विचार आहेत. निरक्षरता, अनारोग्य, अपूर्ण जमीन सुधारणा, अंधश्रद्धा अशा अनेक विषम गोष्टी म्हणजे विषम लोकशाही प्रक्रियेची उदाहरणे आहेत. समान संधी हा लोकशाहीसाठी महत्त्वाचा विचार आहे, अशी बाबा आढाव यांची ठाम विचारसरणी गेल्या सत्तर वर्षांत  दिसते. बाबा आढाव यांनी लोकशाहीसाठी भौतिक सुधारणांचा विचार मांडला. परंतु, त्यांचा भौतिक सुधारणांचा विचार जीडीपी, जीएनपी अशी ग्रोथ ओरिएंटेड भाषा त्यांची आढळत नाही. बाबा आढावांनी आरोग्य, शिक्षण, निवारा, पोषण, हवा, पाणी, निसर्ग, विवेकवाद, सामाजिक सलोखा अशा क्षेत्रातील गोष्टींचा आग्रह धरला. यामुळे हार्ड पॉवरपेक्षा सॉफ्ट पॉवरचा बाबा आढावांनी सतत विचार मांडला.  
बाबा आढावांनी हमाल पंचायतीची स्थापना केली. त्याबरोबरच त्यांनी हमालांच्या पाठीचे तत्त्वज्ञान मांडले. पाठ हक्काची आणि भाकरीसाठी म्हणजे जगण्यासाठी आहे. पाठ शोषणाचे साधन नाही. पाठीच्या शोषण विरोधाची भूमिका बाबा आढाव यांनी मांडली. पाठीवरच्या कामाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, अशी त्यांची भूमिका राहिली. जमिनीची मालकी असते तसेच पाठीशी मालकी असते आणि त्या पाठीचा वापर कसा करायचा याबद्दलचा त्यांनी विचार मांडला. हमालांची पाठ निसर्गाचा एक भाग आहे. हमालांच्या पाठीचे शोषण करणाऱ्या व्यापारी व उद्योजक वर्गाच्या धोरणास त्यांनी विरोध केला. 

बाबा आढाव हे पेशाने डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रावीण्य संपादन केले होते. परंतु, बाबांनी आपल्या क्षेत्रातील प्रावीण्याच्या  व मास्टरीच्या पुढील विचार केला. त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले. तसेच त्यांनी विचार मंथन घडवून आणले. बाबा आढाव केवळ अभ्यासक नाहीत. अभ्यासकापेक्षा त्यांची भूमिका भाष्य करण्याची व विचारमंथन करण्याची आहे. त्यांनी सामाजिक प्रश्न समजून घेऊन त्यामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी समाजाची जबाबदारी आणि उत्तरदायित्व स्वीकारले. यामुळे बाबा आढाव हे  सर्जनशील विचारवंत तर आहेतच, परंतु त्याबरोबरच ते पब्लिक इंटेलेक्च्युअल देखील आहेत. समाजात बुद्धिमान, इंटेलिजंट आणि एक्सपोजर मिळालेल्या अनेक व्यक्ती असतात, तशा पद्धतीचे मात्र बाबा आढाव नाहीत. बाबांनी समाजासाठी पूर्णपणे स्वतःची बुद्धिमत्ता खर्ची घातली आहे. समाजात पब्लिक इंटेलेक्च्युअल्स फार कमी असतात. नागरी समाजामध्ये पब्लिक इंटेलेक्च्युअल्सचे महत्त्व खूप मोठे असते. नव्वदीच्या दशकानंत र स्वयंघोषित  आणि कृत्रिम पद्धतीचे पब्लिक इंटेलेक्च्युअल्स तयार झाले आहेत. नागरी समाजात पब्लिक इंटेलेक्च्युअल्सचा दुष्काळ दिसतो. स्वयंसेवी संस्थांमधील स्वयंघोषित पब्लिक इंटलेक्च्युअल्स उदयाला  आले आहेत. अशावेळी व्यवसायिकतेपासून बाजूला राहून केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक समता या विचारांसाठी प्रयत्न करणारे बाबा आढावांचे व्यक्तिमत्व आहे. बाबा आढाव पन्नाशीच्या दशकापासून नागरी समाजातील नानासाहेब गोरे, एस.एम.जोशी, निळू फुले, श्रीराम लागू, पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर  काम करत राहिले. त्यांनी आरंभी बालगंधर्वच्या उभारणीला विरोध केला होता. परंतु, चांगल्या समाजाच्या जडणघडणीसाठी चिंतनशीलता, कलात्मकता आणि सर्जकता या मापदंडाची गरज असते, असा संवाद पु. ल. देशपांडे आणि बाबांचा झाल्यानंतर त्यांनी बालगंधर्वाच्या उभारणीला पाठिंबा दिला. असे त्यांचे बहुआयामी आणि दूरदृष्टीचे व्यक्तिमत्व आहे. आजही ते सातत्याने समतावादी भारत संकल्पनेसाठी काम करतात, विचार करतात आणि संघर्षही करतात.

संबंधित बातम्या