महाराष्ट्र स्थापनेचा अर्थ व बोध

प्रकाश पवार
सोमवार, 6 जुलै 2020

महाराष्ट्राचे हे हीरकमहोत्सवी वर्ष सुरू आहे. अशावेळी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना म्हणजे काय? साठ वर्षांपूर्वीचे स्वप्न काय होते? कोणती मुख्य कल्पना मांडली होती? मराठी भाषिकांचे राज्य एवढाच मर्यादित भौगोलिक आणि भाषिक अर्थ मराठी भाषिक राज्याचा अपेक्षित नव्हता. यापेक्षा वेगळी कल्पना त्यावेळी व्यक्त झाली होती. त्या अर्थाचा पुनर्शोध घेण्याची आज गरज आहे. 

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, तेव्हा लोकशाही आणि राष्ट्रवाद ही जुळी विचारसरणी होती. लोकशाही म्हणजे राष्ट्रवाद आणि राष्ट्रवाद म्हणजे लोकशाही असे सूत्र महाराष्ट्राने स्वीकारले होते. या दोन्ही विचारसरणी एकमेकांपासून वेगळ्या करता येत नव्हत्या. किंबहुना हे महाराष्ट्राचे तत्त्वज्ञान होते. ही महाराष्ट्राची तत्त्वनिष्ठा होती. हा मुद्दा महाराष्ट्राने समजून घेतला पाहिजे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी हे तत्त्वज्ञान महाराष्ट्राने भारताला दिलेले योगदान होते. म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून पुढे महाराष्ट्र आणि राष्ट्र यांचे संबंध नव्याने निर्माण झाले. महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा विचार आणि लोकशाहीचा विचार वेगवेगळा नाही. हा विचार एकच आहे. ही गोष्ट पंडित जवाहरलाल नेहरूंनी मान्य केली होती. हा मुद्दा मराठी भाषिक प्रदेशात सातत्याने व्यक्त झाला. म्हणून महाराष्ट्रात एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात राष्ट्रवाद आणि लोकशाही एकमेकांच्या हातात हात घालून विकास पावली होती. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप खूप झाले. परंतु, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक चळवळ राष्ट्रवादी होती. महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील चळवळी विशेषतः अव्वल राष्ट्रवादी होत्या. तसेच त्या अव्वल लोकशाहीवादी होत्या. सत्यशोधक चळवळ, दबलेल्या लोकांची चळवळ आणि आंबेडकरवादी चळवळ या तीनही चळवळींनी महाराष्ट्रामध्ये लोकशाही म्हणजे राष्ट्रवाद आणि राष्ट्रवाद म्हणजे लोकशाही याची खंबीर पायाभरणी केली. त्यांनी महाराष्ट्राच्या या जोड विचारप्रणालीची गुंफण एकत्रित केली. हाच मुद्दा न्यायमूर्ती रानडे, शाहू महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सयाजीराव गायकवाड यांच्या विचारांमध्ये आणि कार्यात होता. एकोणिसाव्या शतकाच्या आधी हिंदी राष्ट्राचा विचार हिंदी राष्ट्राचा स्वाभिमान आणि स्वातंत्र्य प्रेम जिवंत ठेवण्याचे श्रेय व्यास वाल्मिकी कालिदास यांच्याप्रमाणे ज्ञानेश्वर तुकाराम यांनाही जाते. हा मुद्दा प्रल्हाद केशव अत्रे यांनी मांडलेला होता. तो मुद्दा लोकमान्य ते महात्मा गांधी या पुस्तकांमध्ये डॉ. सदानंद मोरे यांनी विस्ताराने स्पष्ट केलेला आहे. म्हणजेच थोडक्यात महाराष्ट्राला लोकशाही म्हटल्यानंतर राष्ट्रवाद असा अर्थ लागत होता आणि राष्ट्रवाद म्हटल्यानंतर लोकशाही असा अर्थ लागत होता. हा अर्थ केवळ आधुनिक युगात नव्हे, तर मध्य युगातदेखील लागत होता. इतक्या जुन्या काळापासून महाराष्ट्रात राष्ट्रवादाची आणि लोकशाहीची संकल्पना एकमेकांशी संबंधित आहे. विशेषत: कालिदास यांनी हिंदी राष्ट्राचा अभिमान आणि स्वातंत्र्यप्रेम जिवंत ठेवले. ते कालिदास विदर्भातील वाकाटकांच्या दरबारी होते. यामुळे ज्ञानेश्वर, तुकाराम आणि कालिदास असा एक हिंदी राष्ट्राचा स्वाभिमान आणि स्वातंत्र्यप्रेम जिवंत ठेवणारा प्रवाह महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकजीव झालेला आहे. कालिदास, ज्ञानेश्वर आणि तुकाराम हिंदू असूनही हिंदुत्ववादी व एकसंघीकरणचा पुरस्कार करणारे नाहीत ही मात्र विशेष गोष्ट आहे. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला म्हणजे राष्ट्रवाद आणि लोकशाही ही विचार प्रणालीची जोडगोळी स्वीकारली गेली. या दोन्ही विचारप्रणालींची स्थापना झाली. जोडगोळी म्हणजे केवळ दोन घटक नव्हते. जोड विचारप्रणाली म्हणजे हा जुळा विचार होता. तो विचार एका अर्थाने जैविक होता. या मुद्द्यावर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाने विश्वास ठेवला होता. तसेच हा विचार यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र राज्यामध्ये मुरविला होता. यामुळे भारत-चीन युद्धाच्यावेळी पंडित नेहरू नैतिकदृष्ट्या खच्ची झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण यांची संरक्षण मंत्री म्हणून निवड केली होती. यास महाराष्ट्रातील विरोधी पक्ष म्हणून समाजवादी पार्टीचा मनापासून पाठिंबा होता. हाच मुद्दा दुसऱ्या शब्दांत असा दिसतो, की संयुक्त महाराष्ट्राची स्थापना म्हणजे महाराष्ट्राने सुट्टा लोकशाहीचा विचार आणि सुट्टा राष्ट्रवादाचा विचार स्वीकारला नाही. साठीच्या दशकामध्ये या गोष्टींशी महाराष्ट्र सार्वजनिक पातळीवर खूप प्रामाणिक राहिला. सत्तरीच्या दशकामध्ये आणि ऐंशीच्या दशकामध्ये व्यक्तिगत पातळीवरती यशवंतराव चव्हाण या विचारांशी प्रामाणिक राहत होते. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर राष्ट्रवाद हळूहळू वाढत गेला आणि लोकशाही हळूहळू कमी होत गेली. राष्ट्रवादाचा पोतदेखील भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा ऐंशीच्या दशकापासून पुढे राहिला नाही. यामुळे ऐंशीच्या दशकापासून पुढे महाराष्ट्राने स्वतः ठरवलेली गोष्ट त्याने अडगळीला टाकून दिली. म्हणजे एक तर हा जोड विचार त्यांनी सुटा केला. 

शिवाय या दोन्ही विचारांतील रचनात्मक 
आशय पातळ केला. यामुळे ऐंशीच्या दशकापासून पुढे महाराष्ट्राने स्वतःला दिलेला शब्द आणि राष्ट्राला दिलेला शब्द दोन्ही गोष्टींमध्ये फरक पडत गेला. यामुळे महाराष्ट्राची स्थापनेवेळेची प्रतिमा आणि आजची प्रतिमा ही एकमेकांशी मिळतीजुळती राहिलेली नाही. महाराष्ट्राला आपल्या जुन्या शब्दांचे आणि स्वप्नाचे पुनरुज्जीवन करावे लागेल, तरच महाराष्ट्राचा हीरकमहोत्सव साजरा करण्यात अर्थ शिल्लक राहतो.  
 

बहुविविधता
महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन झाले. ही वस्तुस्थिती आहे. परंतु, याबरोबरच ही वस्तुस्थिती होती, की संयुक्त महाराष्ट्राने मुंबईचा आग्रह धरला होता. बहुभाषिक, बहुरंगी, बहुढंगी मुंबईला संयुक्त महाराष्ट्राने मनापासून स्वीकारले होते. म्हणजेच महाराष्ट्र हा बहुभाषिक प्रांत होता. मराठी भाषिक बहुसंख्य असूनदेखील हा प्रांत इतर भाषांची अस्मिता जपत होता. त्यांच्या भाषा आणि लिपी जपत होता. मराठी भाषा आणि इतर भाषा यांना तो बहिणी बहिणी मानत होता. हा महाराष्ट्रात भगिनीभाव भाषांच्या बद्दल जपण्याचा विचार संयुक्त महाराष्ट्र स्थापनेवेळी स्वीकारला होता. हा मुद्दा महाराष्ट्रात साठीच्या दशकात जपण्याचा प्रयत्न झाला. परंतु, साठीच्या दशकात भूमिपुत्र ही संकल्पना उदयाला आली. भाषांमधील भगिनीभाव आणि भूमिपुत्र या दोन संकल्पनांचे नाते अंतरायचे निर्माण झाले. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक या भागांत या गोष्टी जलद गतीने वाढल्या. यामुळे महाराष्ट्राचा हीरकमहोत्सव साजरा करताना भाषा भगिनीभावाची संकल्पना पुन्हा प्राप्त करणे ओघानेच येते. भाषा भगिनीभावाचे राजकारण हे सहमतीचे राजकारण आहे, तर भाषा भगिनीभाव संकल्पना दूर ठेवणे म्हणजे संघर्षाचे राजकारण सुरू झाले आहे. या संघर्षामध्ये अंतराय उभा केला आहे. त्या अंतरायामध्ये लोकशाहीचा पोत कमी आहे आणि लोकशाहीविरोधी घडामोडी जास्त घडत आहेत. म्हणून ही गोष्ट संयुक्त महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवी वर्षात नव्याने समजून घेतली पाहिजे. 

   संयुक्त महाराष्ट्राची स्थापना म्हणजे भाषेबरोबरच विविध प्रांतातील आणि जिल्ह्यातील लोकांना राज्यात संधी दिली जात होती. त्यामुळे एका अर्थाने महाराष्ट्र इतर प्रांतांशी जोडला गेलेला आहे. महाराष्ट्र मुंबईमार्फत आणि शहरीकरणामार्फत बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक तामिळनाडू अशा राज्यांशी खूप जैविक पद्धतीने जोडलेला आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्य यांच्यातील जनता ही एका अर्थाने एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील आहे. या गोष्टीचे स्वप्न संयुक्त महाराष्ट्र स्थापन होण्याच्या वेळी पाहिलेले होते. स्वप्नाबद्दल गेल्या साठ वर्षांत घडामोडी उलट-सुलट घडलेल्या आहेत. 

 संयुक्त महाराष्ट्र स्थापनेवेळी बहुविविधता आणि बहुलता या दोन्ही गोष्टी स्वीकारल्या होत्या. एकसंघीकरण हा विचार महाराष्ट्राने नाकारलेला होता. त्यामुळे महाराष्ट्र हा विविधतेत एकता या मुद्द्यावर स्थिर होता. हा विचार एका अर्थाने महाराष्ट्राला राष्ट्र विचारांशी जोडून घेणारा होता. महाराष्ट्राने ऐंशीच्या दशकानंतर एकसंघीकरण ही प्रक्रिया जलद गतीने राबवली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुलता धूसर झाली आहे. 

लोकशाही 
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेअगोदर महाराष्ट्राने लोकशाही विचार स्वीकारला होता. परंतु, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी महाराष्ट्राने जाणीवपूर्वक लोकशाहीची प्रेरणा जपण्याची नव्याने मनापासून शपथ घेतली होती. मनाशी लोकशाहीची खूणगाठ बांधली होती. यामुळे लोकशाही ही केवळ पाश्चिमात्य पद्धतीची राहणार नाही. तसेच महाराष्ट्र राज्यातील लोकशाही ही केवळ राष्ट्रीय पद्धतीची राहणार नाही. महाराष्ट्रातील लोकशाही चिकित्सक विचारांतून स्वीकारलेली होती. लोकशाहीबद्दल जास्तीत जास्त समीक्षा केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांनी लोकशाहीचा चिकित्सक विचार विकसित केला होता. या गोष्टीची बांधीलकी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी स्वीकारली गेली होती. म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र एका जातीचे, एका भाषेचे, एका वंशाचे राज्य नाही. अशी स्पष्टपणे भूमिका घेतली होती. माडखोलकरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील लोकशाही ही सकलजनवादी असेल अशी विचारप्रणाली मांडली होती. यशवंतराव चव्हाण बहुजनवादाच्या परिभाषेत बोलत असले, तरी बहुजनवादाचा खरा अर्थ सकलजनवाद होता. यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी उजवा विचार, सत्ताधारी विचार, मध्यम विचार आणि डावा विचार या सर्वांनाच लोकशाहीमध्ये सामील करून घेतले होते. महाराष्ट्राने आपल्या परंपरेशी सुसंगत अशी लोकशाहीची संकल्पना स्वीकारली होती. कालिदास यांनी अभिज्ञान शाकुन्तलम्‌ लिहिले आहे. त्यामध्ये भारतीय लोकशाहीतील जुनी कल्पना आली आहे. या महाकवी कालिदास यांचा महाराष्ट्राशी एकेकाळी संबंध होता. विदर्भात वाकाटकांचे राज्य होते. त्यांच्या दरबारी कालिदास कवी म्हणून होते. यामुळे कालिदासांमधील ओरिजनल लोकशाहीची संकल्पना महाराष्ट्राच्या मातीशीदेखील एकरूप झालेली होती. राजा दुष्यंताला भेटण्यासाठी माता गौतमी आणि शकुंतला येते, तेव्हा जवळपास अर्धी रात्र झालेली असते. गौतमी रक्षकांना विनंती करते, की राजा दुष्यंताला भेटायचे आहे, तेव्हा रक्षक एका वाक्याकडे तिचे लक्ष वेधून घेतो. ते वाक्य 'आयुष्य मोयम् लोकतंत्रसे् सर्वाधिकारा' हे होते. लोकशाहीसाठी हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या वाक्यात राज्यकर्त्यांना जनता कधीही भेटू शकते आणि तो त्यांचा मूलभूत हक्क आहे असे लोकशाहीने मान्य केले होते. हा विचार कालिदास यांनी मांडलेला आहे. हा विचार महाराष्ट्रात लोकशाही म्हणून स्वीकारला गेला. म्हणूनच यशवंतराव चव्हाण अत्यंत सामान्य व्यक्तींनासुद्धा सहज उपलब्ध होत असत. हा महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेचा लोकशाही विचार होता. हा विचार महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवाच्यावेळी पुन्हा नव्याने मांडण्याची गरज आहे. त्याबद्दल महाराष्ट्र बांधील आहे का? यांचे पुनर्परीक्षण केले पाहिजे.

संबंधित बातम्या