बहुजनवादाची चित्तरकथा

प्रकाश पवार
मंगळवार, 28 जुलै 2020

राज-रंग

महाराष्ट्रात काँग्रेसच्या बहुजनवादाची चित्तरकथा सत्तरीच्या दशकापासून पुढे दिसून आली आहे. आरंभी काँग्रेस पक्षाकडील बहुजनवाद भारतीय स्वातंत्र्य संग्रामामधील होता. तसेच स्वातंत्र्यसंग्रामाची चिकित्सा करणाऱ्या गटाकडूनदेखील बहुजनवाद स्वीकारला होता. या अर्थाने बहुजनवाद अर्क रूपात होता. परंतु, गेल्या साठ वर्षांच्या काळात काँग्रेसमधील बहुजनवादामध्ये मोठे फेरबदल घडून आले. यामुळे काँग्रेसच्या बहुजन राजकारणामध्ये फेरबदल दिसू लागले. काँग्रेसच्या संदर्भात सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंत बहुजनवादाची उतरती कळा दिसून येते. 

आरंभीचा बहुजनवाद 
आरंभीच्या काळातील बहुजनवाद हा सकलजनवाद होता.  ही एक आदर्श आणि समाजामध्ये बदल करण्याची दृष्टी असणारी संकल्पना होती. महाराष्ट्रातील सत्तेचे वाटप समतोल पद्धतीने करण्याचा बहुजनवादाचा उद्देश होता. साठीच्या दशकामध्ये आबासाहेब खेडकर हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते (१९६०-१९६३). तेव्हा सुरुवातीला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. परंतु, नंतर मारोतराव कन्नमवार आणि वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री झाले. तेव्हा मराठा आणि ओबीसी या दोन गटांमध्ये बहुजन या विचारसरणीवरून मतभिन्नता होती. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा नेतृत्वाला सत्तेवर नियंत्रण अपेक्षित होते. परंतु, यशवंतराव चव्हाण यांनी मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये एक समन्वय निर्माण केला. त्यांच्यामध्ये ऐक्य घडवले. यामुळे आबासाहेब खेडकर यांच्यानंतर विनायक पाटील (१९६३-१९६७) आणि वसंतदादा पाटील (१९६७-१९७२) यांना महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष करण्यात आले. थोडक्यात मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये सत्ता आणि अधिकार या घटकांचे वितरण करण्यात आले. संघटनात्मक पातळीवरील सत्ता आणि अधिकार मराठा समाजाकडे होता, तर मुख्यमंत्री या पातळीवरील सत्ता आणि अधिकार ओबीसी समाजाकडे होता. मंत्रिमंडळामध्ये सत्तेचे वाटप समतोल पद्धतीने केले होते. विधान परिषद या पातळीवरदेखील सत्ता समतोल पद्धतीने विभागली होती. या वाटपाच्या सूत्रांमध्ये अनेक दोष दाखवता येतील. परंतु, या काळातील सत्तेच्या वाटपाची प्रक्रिया समता आणि न्याय या दोन मूल्यांची प्रेरणा घेऊन झाली होती. त्यामुळे साठीच्या दशकातील बहुजनवाद हा महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड यांच्या विचारांशी संवादी होता. विशेषतः साठीच्या दशकातील बहुजनवादाचे नाते या विचारवंतांच्या बहुजनवादी विचारांच्या विरोधी नव्हते. अंमलबजावणीच्या पातळीवरती तीव्र इच्छाशक्ती झाली होती. हा मुद्दा समजण्यासाठी विधानसभा, विधान परिषद, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ,  जिल्हा परिषद यांचा एकत्रित विचार केला पाहिजे. परंतु सुट्यासुट्या विचारांमुळे या काळातील बहुजनवादाचे नीटनेटके आकलन स्पष्ट करत नाही. साठीच्या दशकातील बहुजनवादाचा विचार वसाहतवादी आणि तो अभिजनवादी मानसिकता सोडून केला पाहिजे. शिवाय १९७० पासून आजपर्यंतच्या बहुजनवादाशी आणि समरसता हिंदुत्व विचारांशी तुलना करून केला पाहिजे. या संदर्भात विचार केला तर साठीच्या दशकातील बहुजनवादाची पुढे जवळ जवळ अर्धशतक भर चित्तरकथा झालेली दिसते. 

बहुजनवादाची आरंभीची चित्तरकथा
सत्तरीच्या दशकामध्ये बहुजनवादात बदल सुरू झाले. वसंतराव नाईक यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळावर दिल्लीचा प्रभाव होता. या विधानाचा दुसरा अर्थ म्हणजे वसंतराव नाईक यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळावर बहुजनवादाचा प्रभाव फार कमी होता. वसंतराव नाईक जरी ओबीसी गटातील असले तरीही सत्तेवर नियंत्रण दिल्लीचे होते. सत्तेवर नियंत्रण दिल्लीचे म्हणजेच इंदिरा गांधींचे होते. इंदिरा गांधी यांनी बहुजनवादी इच्छाशक्तीच्याऐवजी राजकारणामध्ये निवडणूक मेरीट या गोष्टीला पुढे आणले. ही प्रक्रिया १९६९ मध्ये सुरू झाली होती. यामुळे जवळपास १९६९ पासून बहुजनवाद हा पोकळ स्वरूपात काम करू लागला होता. पी. के. सावंत हे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष होते (१९७२-१९७८). सावंत यांच्या काळात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. सत्तरीच्या दशकात शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार हे तीन मुख्यमंत्री मराठा समाजातील झाले. या तीन पैकी शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांची भूमिका यशवंतराव चव्हाण यांच्या बहुजन वादापेक्षा वेगळी होती. यामुळे वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण आणि यशवंतराव चव्हाण यांच्या बहुजनवादाच्या इच्छाशक्ती वेगवेगळ्या होत्या. विशेष म्हणजे शरद पवार हे सत्तरीच्या दशकातील काँग्रेसच्या बहुजनवादापासून वेगळे झालेले पहिले मुख्यमंत्री होते. त्यामुळे काँग्रेस परिवारामध्ये यशवंतराव चव्हाणांचा बहुजनवाद, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांचा बहुजनवाद आणि शरद पवारांचा बहुजनवाद असे एकूण तीन बहुजनवादाचे प्रकार उदयास आले. १९७८ मध्ये नरेंद्र तिडके काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले (१९७८). यानंतर नाशिकराव तिरपुडे (१९७८-१९७८) व रामराव आदिक (१९७९- १९८०) महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. या काळात काँग्रेस पक्षाने साठीच्या दशकात वाढविलेल्या बहुजनवादाच्या विरोधात भूमिका घेतली. शरद पवार सत्तरीच्या दशकातील काँग्रेसच्या बहुजनवादापासून वेगळे झाले. यामुळे हा काळ दिल्लीच्या वर्चस्वाचा काळ होता. तसेच या काळात महाराष्ट्रातील बहुजनवादाचा ऱ्हास झाला. उच्च जाती आणि मराठा, मराठा आणि ओबीसी, मराठा आणि अनुसूचित जाती, मराठा आणि अल्पसंख्याक त्यांच्यामध्ये सत्ता आणि अधिकाराच्या वाटपाचे सूत्र पूर्णपणे मोडले गेले. सामाजिक सलोखा आणि राजकीय सलोखा त्या दोन्ही गोष्टी अडचणीत आल्या.   
ऐंशीच्या दशकामध्ये प्रमिलाताई चव्हाण (१९८०-१९८१) व गुलाबराव पाटील (१९८१- १९८२) हे प्रदेशाध्यक्ष झाले. हे प्रदेशाध्यक्षदेखील इंदिरा गांधी यांच्या विश्वासातील होते. त्यानंतर एस. एम. आय. अमीर (१९८३), एन. एम. कांबळे ( १९८३-१९८५ व १९८९-१९९०), प्रभा राव (१९८५-१९८८), प्रतिभा पाटील (१९८८-१९८९) आणि सुशीलकुमार शिंदे (१९९०-१९९१) हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. तर मुख्यमंत्री सातत्याने बदलले गेले. यामुळे ऐंशीच्या दशकातदेखील काँग्रेस पक्षाला बहुजन विचारप्रणालीवर आधारित राजकारण करता आले नाही. ऐंशीच्या दशकामध्ये नवीन विचारप्रणाली उदयाला आली होती. नवहिंदुत्ववाद ही ऐंशीच्या दशकातील महत्त्वाची विचारप्रणाली होती. महाराष्ट्र काँग्रेस पक्षामध्ये पक्षसंघटना दिल्लीनिष्ठ आणि राज्यातील काँग्रेसमध्ये नव हिंदुत्ववादाच्या विचारांबद्दल आपुलकी असल्यामुळे मोठा फेरबदल झाला होता. यामुळे बहुजनवाद म्हणजे काय, याचे आकलन ऐंशीच्या दशकात राहिलेले नव्हते. उलट बहुजनवाद विरोधी घडामोडींना अवकाश उपलब्ध झाला. या अवकाशात ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाण यांच्या समोर त्यांच्या बहुजनवादाच्या विरोधातील राजकारण घडले. 

जागतिकीकरणाच्या संदर्भातील चित्रकथा
शरद पवार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात केला. त्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये बहुजनवादाचा विचार नव्याने सुरू झाला. शरद पवार यांना पाठिंबा प्रस्थापित विरोधी गटाचा मिळालेला होता. त्यामुळे शरद पवारांची भूमिका बहुजनवादी होती. परंतु, शरद पवार महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ऐंशीच्या दशकाच्या शेवटी सामील झाले. यामुळे बहुजनवाद व नवहिंदुत्ववाद त्यात दोन विचारप्रणालींमध्ये आणि पक्षांमध्ये महाराष्ट्राचे राजकारण घडू लागले. शरद पवार यांनी बहुजन राजकारण आणि काँग्रेसमधील दिल्लीवर निष्ठा असणारे राजकारण यांचा समन्वय ऐंशीच्या दशकाच्या शेवटी आणि नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला घातला. तेव्हा यशवंतराव चव्हाणांचा बहुजनवाद संपुष्टात आला होता. शरद पवार यांना नव्याने बहुजनवादाची पुनर्रचना करावी लागली. शरद पवारांच्या बहुजनवादाला प्रतिस्पर्धी नवहिंदुत्ववादी विचार पुढे आला. यामुळे नव्वदीच्या दशकातील बहुजनवाद हा पूर्णपणे वेगळा होता. 
नव्वदीच्या दशकामध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर (१९९१-१९९२), शिवाजीराव देशमुख (१९९२-१९९३), सुशीलकुमार शिंदे (१९९३-१९९७), रणजित देशमुख (१९९७-१९९८), प्रतापराव भोसले (१९९८) हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. थोडक्यात सुशीलकुमार शिंदे वगळता इतरांना शरद पवारांचा बहुजनवाद मान्य नव्हता. प्रदेशाध्यक्ष दिल्लीनिष्ठ होते. रणजित देशमुख यांचा जुना संबंध संजय गांधी गटाशी होता. यामुळे नव्वदीच्या दशकामध्ये खुद्द शरद पवार यांना बहुजनवादी विचारसरणी जपण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यामुळे पुन्हा काँग्रेस बहुजनवादापासून पूर्णपणे मोकळी झाली. 

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला रणजित देशमुख महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होते (२००३-२००४). त्यानंतर प्रभा राव (२००४- २००८), माणिकराव ठाकरे (२००८-२०१५), अशोकराव चव्हाण (२०१५-२०१९) आणि बाळासाहेब थोरात (२०१९) हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात काँग्रेस पक्षाने ओबीसी, मराठा आणि अनुसूचित जाती या समूहांमध्ये थोडासा विश्वास निर्माण केला. परंतु काँग्रेस पक्षाला या दशकामध्ये यशवंतराव चव्हाणांचा बहुजनवाद किंवा शरद पवारांचा बहुजनवाद यापैकी कोणताही विचार नीटनेटका मांडता आला नाही. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर तो व्यक्त होईल अशी संघटनात्मक संरचना उभी करता आली नाही. सत्ता आणि अधिकाराचे वाटप करण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेसने धरसोड केली. यामुळे काँग्रेस बहुजनवादाकडे पूर्ण ताकदीने पुन्हा जाऊ शकली नाही.
एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकांमध्ये काँग्रेसचा बहुजनवाद हा प्रतिकात्मक रूपातदेखील शिल्लक राहिलेला नव्हता. महाराष्ट्र काँग्रेस पक्ष दिल्लीनिष्ठ काँग्रेस विचारप्रणालीवर काम करत होता. यामुळे एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातील समरसता हिंदुत्व विचाराने काँग्रेसचा बहुजनवाद संपूर्ण संपुष्टात आणला. बहुजनवाद म्हणजे काय? त्याचे आज सुस्पष्ट आकलनदेखील नाही. थोडक्यात, या बहुजनवादाच्या राजकीय इतिहासातून असे दिसते, की बहुजनवादाची सत्तास्पर्धा आणि आर्थिक स्पर्धा समरसता हिंदुत्ववादाशी होती. या स्पर्धेची सुरुवात साठीच्या दशकातच झाली होती. सत्तरीच्या दशकामध्ये बहुजनवादावर एक सत्तेचा हल्ला समरसता हिंदुत्ववादाने केला होता. ऐंशीच्या दशकात बहुजनवादावर दुसरा हल्ला नवहिंदुत्ववादाने  केला. नव्वदीच्या दशकामध्ये बहुजनवादाची डागडुजी करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यास यश आले नाही. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात बहुजनवादाचा आणि समरसता हिंदुत्ववादाचा निर्णायक सामना झाला. या सामन्यात हा काँग्रेसचा बहुजनवाद पराभूत झाला. यामुळे साठीच्या दशकातील बहुजनवाद या विचारसरणीचे दोन गोष्टींबरोबर शत्रुभावी नाते होते, असे दिसते. एक, साठीच्या दशकातील बहुजनवाद आणि सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काँग्रेसचा बहुजनवाद यांच्यामध्ये शत्रुभावी नाते आहे. दोन, साठीच्या दशकातील बहुजनवाद आणि नवहिंदुत्ववाद, समरसता हिंदुत्व यांच्यामध्ये ही शत्रुभावी नाते आहे. थोडक्यात नवहिंदुत्व व समरसता हिंदुत्व यांना साठीच्या दशकातील बहुजनवाद हा आपला शत्रू आहे, याचे पूर्ण आकलन आहे. परंतु साठोत्तरी काळातील काँग्रेस पक्षातील बहुजनवादाला नवहिंदुत्ववाद व समरसता हिंदुत्व हे आपले मुख्य शत्रू आहेत याचे आकलन नीटनेटके नाही. 

संबंधित बातम्या