मूल्यव्यवस्थांमधील सत्तास्पर्धा

प्रकाश पवार
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

राज-रंग
 

महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ सत्तास्पर्धा नाही, तर मूल्यव्यवस्थांमध्येदेखील स्पर्धा आहे. मूल्यव्यवस्थेला पक्ष व्यवस्थेपेक्षा वेगळे व स्वतंत्र स्थान दिले गेले आहे. या गोष्टींचे भान न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, उत्तमराव पाटील, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय घडामोडींमध्ये दिसते. 
महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस पक्ष आणि कॉंग्रेस मूल्यव्यवस्था; तसेच जनसंघ-भाजप आणि भाजप मूल्यव्यवस्था अशा दोन स्वतंत्र घडामोडी घडल्या. काँग्रेस पक्ष, जनसंघ पक्ष - भाजप हे पक्ष केवळ सत्तेसाठी स्पर्धा करणारे नव्हते. सत्तास्पर्धा हा या पक्षांचा एक भाग होता. परंतु या पक्षांपेक्षा एक वेगळी मूल्यव्यवस्था घडवली गेली होती. यामुळे या दोन्ही पक्षांना त्यांच्या त्यांच्या मूल्यव्यवस्थेची पूर्ण कल्पना आहे. त्यांच्यामध्ये मूल्यव्यवस्थेची कल्पना जेव्हा कमी कमी होत जाते, तेव्हा त्या पक्षांमध्ये अंतर्विसंगती निर्माण होते. कारण पक्ष वेगळा आणि मूल्यव्यवस्था वेगळी असे रूप प्राप्त होते. महाराष्ट्राच्या राजकारणात जनसंघ - भाजप आणि त्यांची मूल्यव्यवस्था यांच्यामध्ये कधी अंतर पडले नाही. परंतु काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसची मूल्यव्यवस्था या दोन गोष्टींमध्ये १९७० पासून आजपर्यंत मोठे अंतर पडले. यामुळे काँग्रेस हा मूल्यव्यवस्थेचा पाठिंबा नसताना अस्तित्त्वात असलेला पक्ष आहे. तर भाजप हा पक्ष मूल्यव्यवस्थेशी जुळवून घेऊन सत्तास्पर्धा करणारा पक्ष आहे. हा अत्यंत महत्त्वाचा फरक १९७० नंतर भारतीय राजकारणात दिसतो. 

काँग्रेस आणि मूल्यव्यवस्था 
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाची स्थापना महाराष्ट्रात झाली. ही गोष्ट पक्ष म्हणून सर्वसाधारण प्रकारची आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रामधील नेतृत्वाने काँग्रेस पक्षाला एक मूल्यव्यवस्था निर्माण करून दिली. जहाल आणि मवाळ असे दोन गट काँग्रेसमध्ये होते. ही सत्तास्पर्धा वेगळी. परंतु, न्यायमूर्ती रानडे आणि लोकमान्य टिळक यांनी काँग्रेस म्हणजे लोकशाहीचा प्रयोग, राष्ट्रवादाचा प्रयोग, बहुविविधतेला पुरेशी जागा इत्यादी.. अशा गोष्टींतून महाराष्ट्रात काँग्रेसची मूल्यव्यवस्था तयार केली. यामुळे काँग्रेस पक्ष ही गोष्ट वेगळी आणि काँग्रेसची मूल्यव्यवस्था वेगळी याचे भान स्वातंत्र्यपूर्वकाळात होते. स्वातंत्र्योत्तर काळात दोन दशके महाराष्ट्रात या दुहेरी भूमिकेचे भान होते. यामुळे पक्ष म्हणून काँग्रेसमध्ये डावपेच, रणनीती अशा गोष्टी होत्या. परंतु यापेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे मूल्यव्यवस्था म्हणून काँग्रेसमध्ये एक प्रकारचा तत्त्वनिष्ठपणा होता. तात्त्विक पाया होता. त्या तत्त्वांशी तडजोड काँग्रेस करत नव्हती. परंतु काँग्रेसने मूल्यव्यवस्था राजकारणातून हद्दपार केली. या गोष्टीची सुरुवात १९६९ पासून झाली होती. या गोष्टीला महाराष्ट्रात पन्नास वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. गेल्या पन्नास वर्षांत काँग्रेस ही काँग्रेस मूल्यव्यवस्थेच्या शिवाय राजकीय व्यवहार करत आली आहे. यामुळे काँग्रेसची मूल्यव्यवस्था कोणती? हे अनेकांना समजत नाही. या गोष्टीचा परिणाम महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांमध्येदेखील झालेला आहे. उदा. मध्यप्रदेशात काँग्रेस पक्षातून भाजपत प्रवेश करताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी केवळ पक्षीय स्पर्धेचा विचार केला. त्यांनी मूल्यव्यवस्थेचा विचार केला नाही. असेच दुसरे उदाहरण म्हणजे सचिन पायलट यांनीदेखील केवळ सत्तास्पर्धेचा विचार केला. काँग्रेसच्या मूल्यव्यवस्थेचा विचार केला नाही. महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी भाजपत पक्षांतर केले. त्यांनी सत्तास्पर्धा आणि मूल्यव्यवस्था यापैकी सत्तास्पर्धा मान्य केली. मूल्यव्यवस्था मान्य केली नाही. हीच गोष्ट काँग्रेस परिवाराबद्दलदेखील लागू होते. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर झाले. तेव्हा शरद पवार सातत्याने सत्तास्पर्धेबरोबर एका मूल्यव्यवस्थेची मांडणी करत होते. मूल्यव्यवस्था अर्थातच काँग्रेस पद्धतीची मूल्यव्यवस्था आहे. अजित पवार यांनी भाजपबरोबर जाऊन सरकार स्थापन केले. तेव्हा भाजप, भाजपची मूल्यव्यवस्था जपत होती. परंतु अजित पवार यांनी केवळ सत्तास्पर्धा प्रमाण मानली. या सर्व उदाहरणांवरून असे दिसून येते, की काँग्रेस आणि काँग्रेसची मूल्यव्यवस्था असा एक चेहरा आहे. याचे भान केवळ शरद पवारांना आहे. अशाप्रकारचे भान पृथ्वीराज चव्हाण यांनादेखील आहे. परंतु हे भान जवळजवळ काँग्रेस आणि काँग्रेस परिवारामधून संपुष्टात आले आहे.  

भाजप आणि भाजपची मूल्यव्यवस्था 
महाराष्ट्राच्या राजकारणात आरंभी काँग्रेस आणि काँग्रेसची मूल्यव्यवस्था उदयाला आली. त्यानंतर जनसंघ आणि जनसंघाची मूल्यव्यवस्था उदयाला आली. या गोष्टीचा विस्तार म्हणजे भाजप आणि भाजपची मूल्यव्यवस्था वाढली. भाजप सातत्याने सत्तास्पर्धेबरोबर मूल्यव्यवस्थेच्या संरक्षणासाठी प्रयत्न करतो. सत्तास्पर्धा हा एक आधारस्तंभ आणि तात्त्विक मूल्यव्यवस्था हा दुसरा आधारस्तंभ अशी भाजपची संरचना आहे. ही रचना काँग्रेस पक्षाची आणि काँग्रेस मूल्यव्यवस्थेची स्पर्धक व्यवस्था आहे. काँग्रेस पक्षाकडील मूल्यव्यवस्थेचा ऱ्हास झाल्यामुळे काँग्रेस पक्ष केवळ पक्ष म्हणून सत्तास्पर्धा करतो. मूल्यव्यवस्थेच्या मैदानावर काँग्रेस पक्ष गेल्या पन्नास वर्षांत कधी आला नाही. यामुळे गेल्या पन्नास वर्षांत भाजपची मूल्यव्यवस्था काँग्रेस मूल्यव्यवस्थेशी युद्ध न करताच विजयी झालेली मूल्यव्यवस्था आहे. काँग्रेसनेदेखील गेल्या पन्नास वर्षांत भाजपच्या मूल्यव्यवस्थेबरोबर दोन हात करण्याचा फार गंभीरपणे विचार केला नाही. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप मूल्यव्यवस्थेला स्पर्धक राहिलेला नाही. तसेच काँग्रेसने काँग्रेस मूल्यव्यवस्थेची पुनर्रचना केलेली नाही. यामुळे भाजपची मूल्यव्यवस्था आणि काँग्रेसची मूल्यव्यवस्था यांच्यामध्ये अटीतटीचा सामना महाराष्ट्रात १९७० नंतर फार झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय जाणकारांनादेखील काँग्रेसची मूल्यव्यवस्था आणि भाजपची मूल्यव्यवस्था यांच्यातील स्पर्धेचे स्वरूप समजलेले नाही. 

भाजपने त्यांची मूल्यव्यवस्था अत्यंत विचारपूर्वक मांडली. मूल्यव्यवस्थेशी तडजोड केली नाही. सुरुवातीला उत्तमराव पाटील यांनी सत्तास्पर्धा आणि मूल्यव्यवस्था या दोन्ही गोष्टी जपल्या. तसेच पुढे वसंतराव भागवत, बाळासाहेब देवरस यांनीदेखील सत्तास्पर्धा आणि मूल्यव्यवस्था असे दोन्ही प्रकारचे भान सातत्याने भाजपला दिले. यामुळे भाजपने सत्तास्पर्धेबरोबर हिंदू अस्तित्त्वभान घडवण्याचा प्रयत्न केला. उत्तमराव पाटलांच्यानंतर गोपीनाथ मुंडे, सूर्यभान वहाडणे, ना. सं. फरांदे, पांडुरंग फुंडकर या ब्राह्मणेतर नेत्यांना भाजप मूल्यव्यवस्था पूर्णपणे समजलेली होती. सत्तास्पर्धा म्हणून भाजपच्या अंतर्गत गट होते. परंतु मूल्यव्यवस्था म्हणून गटबाजी नव्हती. यानंतर नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील यांनीदेखील भाजप म्हणजे सत्तास्पर्धा आणि मूल्यव्यवस्था असे भान जागृत ठेवले. या भानामुळेच भाजपने सातत्याने सत्तास्पर्धेत सत्तेपेक्षा मूल्यव्यवस्थेला अग्रक्रम दिला. भाजपने माधव (माळी, धनगर, वंजारी) हे प्रारूप घडवले होते. परंतु, या प्रारूपापेक्षा त्यांची बांधिलकी भाजप मूल्यव्यवस्थेबरोबर जास्त होती. या गोष्टीमुळे सत्तास्पर्धा आणि मूल्यव्यवस्था यांच्यामध्ये समतोल राखला गेला. म्हणून भाजपने शिवसेनेबरोबर युती केली आणि सत्तास्पर्धेत बरोबर मूल्यव्यवस्था जपली (१९९०- २०१४). परंतु सत्तास्पर्धा आणि मूल्यव्यवस्था या दोन्ही गोष्टी जपताना भाजपने २०१४ नंतर शिवसेनेपासून फारकत घेतली. सत्तास्पर्धा आणि मूल्यव्यवस्था जगताना भाजपने २०१९ मध्ये सत्तास्पर्धेबरोबर मूल्यव्यवस्थेलाही महत्त्व दिले. त्यामुळे या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर करणारे नेते केवळ सत्तास्पर्धेचा विचार करत आहेत. भाजप मात्र पक्षांतर करून येणाऱ्या नेत्यांनी सत्तास्पर्धेबरोबर मूल्यव्यवस्था स्वीकारावी या  विचारांचा पाठपुरावा करत आहेत. पक्षांतर करून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांना काँग्रेसची मूल्यव्यवस्था समजलेली नाही. त्यांना भाजपची मूल्यव्यवस्था समजेल का? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. यामुळे पक्षांतर करून भाजपमध्ये गेलेले नेते केवळ सत्तास्पर्धा या मुद्द्यावर स्थिर होणार, की मूल्यव्यवस्था स्वीकारणार असा एक पेचप्रसंग उभा राहिलेला आहे. जशी भाजप आणि काँग्रेस पक्षाची रचना आणि मूल्यव्यवस्था वेगवेगळी आहे. तशीच काहीशी अवस्था शिवसेनेतदेखील अदृश्य स्वरूपात दिसते. शिवसेना पक्ष वेगळा आणि शिवसेनेची बहुजन हिंदुत्व ही मूल्यव्यवस्था वेगळी आहे. शिवसेनेने पक्षापेक्षा बहुजन हिंदुत्व या मूल्यव्यवस्थेला २०१४ आणि २०१९  मध्ये अग्रक्रम दिला. एका प्रादेशिक पक्षाला पक्ष आणि त्यांची मूल्यव्यवस्था यातील फरक करता येतो. तो फरक राजकारणाच्या आखाड्यात जपला जातो. याचे उत्तम उदाहरण शिवसेना हे आहे. परंतु राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या काँग्रेसला असा फरक करण्यामध्ये अडचणी आहेत. अशा प्रकारचा फरक महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना काँग्रेस पक्षाने केला. काँग्रेस पक्षाला पक्षापेक्षा मूल्यव्यवस्था वेगवेगळी आहे याचे भान महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना आले होते. परंतु सत्तास्पर्धा आणि मूल्यव्यवस्था यासाठीचा प्रयोग काँग्रेसचा पन्नास वर्षानंतर नव्याने सुरू झाला आहे. या प्रयोगाचे भान असणारे एक नेते पृथ्वीराज चव्हाण आहेत. परंतु ते सत्तेच्या बाहेर आहेत. पक्षामध्ये त्यांना सत्तास्पर्धा आणि काँग्रेस मूल्यव्यवस्था अशा दोन गोष्टींची सांगड घालावयाची आहे. अशी घडामोड इथून पुढे काही काळ घडत राहिली तर महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षव्यवस्था आणि मूल्यव्यवस्था दोन आखाड्यातील संघर्ष पाहायला मिळेल. यामध्ये सुरुवातीला भाजपत व्यवस्था आणि मूल्यव्यवस्था वरचढ ठरेल. परंतु मनापासून काँग्रेसने या दोन गोष्टी घडवल्या तर दोन मूल्यव्यवस्थांमध्ये एक  नवा राजकीय आखाडा उदयाला येईल. १९७० नंतर भाजप त्यांची त्यांची मूल्यव्यवस्था मांडत आलेला आहे. त्यांनी राजकीय आखाड्यात आणि मूल्यव्यवस्थेच्या आखाड्यात स्पर्धा केलेली नाहीत. ही स्पर्धा झाली तर राजकारणाचे रंग व स्वरूप पूर्णपणे वेगळे निर्माण होण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तास्पर्धा आणि मूल्यव्यवस्था या दोन्ही गोष्टींची पुनर्रचना करावी लागते. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील सामान्य मतदारदेखील सत्तास्पर्धेबरोबर मूल्यव्यवस्थेच्या चर्चांमध्ये भाग घेतो. मूल्यव्यवस्थेचे समर्थन करतो. एवढेच नव्हे, तर प्रसारमाध्यमे सत्तास्पर्धा आणि मूल्यव्यवस्थेच्या वादांमध्ये आपापल्या बाजू मांडत असतात. यामुळे महाराष्ट्राचे राजकारण समजून घेताना सत्तास्पर्धेबरोबर मूल्यव्यवस्था समजून घ्यावी लागते. मूल्यव्यवस्थेचे भान ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणातील मध्यवर्ती आहे.

संबंधित बातम्या