पक्षांपुढील पेचप्रसंग 

प्रकाश पवार 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

राज-रंग

भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये सत्तास्पर्धा आहे. याशिवाय काँग्रेस पक्षांतर्गतदेखील गटा-गटांमध्ये स्पर्धा आहे. याबद्दल सतत नकारात्मक बातम्या येतात. या दोन कारणांमुळे कॉंग्रेस पक्षाला भाजपशी आणि स्वतःशीदेखील संघर्ष करावा लागत आहे. काँग्रेस पक्षाचा भाजपशी असलेला संघर्ष नैसर्गिक आहे. परंतु काँग्रेस पक्षाचा स्वतःशीच एक मोठा संघर्ष सुरू आहे. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसची मूल्यव्यवस्था यापैकी काय निवडावे, हा एक कॉंग्रेस पक्षाचा महत्त्वाचा संघर्ष आहे. तसेच निष्ठावंत काँग्रेस आणि काँग्रेस संघटनेचा विस्तार करणारा गट यांच्यामध्येदेखील एक मोठा संघर्ष दिसतो. यामुळे काँग्रेस पक्ष हा एका अर्थाने राजकीय ताकद हरवून गेलेला पक्ष आहे. पक्षांतर्गत चर्चा, वाद-विवाद, निवडणुका अशा गोष्टी म्हणजे पक्षासाठी एक नवीन ताकद असते. ही ताकद वाढविण्याचा प्रयत्न जे पक्ष करतात ते टिकून राहतात. ज्या पक्षांकडून असे प्रयत्न होत नाहीत, ते पक्ष नवीन परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाहीत. 

नेतृत्वाची समस्या 
काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्वाची मोठी समस्या आहे. हा पक्ष नेतृत्वहीन झाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष आहेत. कॉंग्रेस पक्षाला प्रभावी नेतृत्व नाही. कार्यकर्त्यांसमोर दिशा नाही. अशा अवस्थेत पक्षाविषयी आस्था असणाऱ्या नेत्यांनी पत्र लिहिले. काँग्रेस पक्ष कुटुंबकेंद्रित पक्ष राहिलेला आहे. नेहरू-गांधी कुटुंबाच्याभोवती या पक्षाची वाढ झाली. एवढेच आकलन या पक्षाचे सध्या आहे. हे आकलन पूर्ण काँग्रेस पक्षाबद्दल सत्य नाही. कारण काँग्रेस पक्षामध्ये पक्षव्यवस्था आणि काँग्रेस मूल्यव्यवस्था असे दोन वेगवेगळे प्रवाह स्थापनेपासून दिसून येतात. सत्तरीच्या दशकापासून काँग्रेसची मूल्यव्यवस्था बाजूला गेली. २०१४ नंतर काँग्रेसची मूल्यव्यवस्था काय आहे? हे काँग्रेस पक्षाच्या लक्षात येत नाही. काँग्रेसमध्ये कर्तृत्ववान नेतृत्वापेक्षा गांधी कुटुंबावर निष्ठा ठेवणाऱ्या नेतृत्वाचा वर्ग प्रभावी ठरत आला आहे. यामुळे काँग्रेसची मूल्यव्यवस्था बाजूला पडत चालली आहे. ‘निष्ठावंत’ ही वर्गवारी एका मर्यादेपर्यंत उपयुक्त ठरते. परंतु निष्ठावंत गट एक संस्था म्हणून पक्ष संघटनेला संपवतो. तेव्हा निष्ठा या सरंजामी ठरतात. तसेच निष्ठा या आधुनिक पद्धतीच्या पक्ष व्यवस्थेच्या विरोधातल्या असतात. १९९० नंतर जागतिक राजकारणात आणि भारतीय राजकारणातदेखील आधुनिक पद्धतीच्या पक्षनिष्ठेपेक्षा साटेलोटे पद्धतीच्या सरंजामी निष्ठा वाढलेल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये केवळ नातेसंबंधांची साखळी तयार झाली. यामुळे राजकीय पक्ष लोकांसाठी आहे का? राजकीय पक्ष सत्तेसाठी आहे का?  हे प्रश्न महत्त्वाचे म्हणून पुढे आणले. सत्ता, लोक, आणि साटेलोटे यांची साखळी यापैकी लोक आणि सत्ता दुय्यम ठरू लागली आहे. नेतृत्वाची वाढ ही लोकांच्या प्रश्नांमधून होत असते. नेतृत्वाच्या वाढीसाठी जनता चळवळींशी संपर्क साधावा लागतो. परंतु भारतामध्ये या दोन गोष्टींपेक्षा उच्च पातळीवरील गटाशी संपर्क महत्त्वाचा मानला जातो. हीच भारतीय राजकारणात मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे तळागाळात आणि स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष काम करणारा कार्यकर्ता दिसत नाही. कारण कार्यकर्त्यांमधून नेतृत्व उदयाला येत नाही, अशी आजची धारणा झालेली आहे. हा एक भारतीय राजकारणातील मोठा पेचप्रसंग आहे. 

सत्तेचा प्रश्न 
राजकीय पक्षाचा अंतिम उद्देश सत्ता मिळवणे हा असतो. परंतु भारतामध्ये केवळ सत्ता हा मुद्दा फार प्रभावी ठरत नाही. सत्ता आणि लोक यांचा मेळ राजकीय पक्षांना घालावा लागतो. काँग्रेस पक्ष सत्ता आणि लोक यांचा मेळ घालण्यात २०१४ पासून अपयशी ठरत आलेला आहे. हा काँग्रेस पक्षाचा नवीन आणि ताजा इतिहास आहे. काँग्रेस पक्ष पुन्हा सत्ताधारी होणार का? या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नाही. त्यामुळे सत्ता आणि काँग्रेस यापैकी सत्तेला स्वीकारणारा एक गट काँग्रेसमध्ये सतत प्रभावी ठरत आलेला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडली आणि त्या राज्यातील पक्षाची सत्ताही गेली. तेव्हा त्यांनी सत्तेचे गणित मांडलेले होते. सचिन पायलट यांनी बंड केले. तेव्हा त्यांनीही सत्तेचे गणित मांडले होते. यामुळे सत्तेचे गणित हा काँग्रेस पक्षामध्ये जुना विचार आहे. आज मात्र काँग्रेस सत्ता नवीन नेतृत्वाला देऊ शकत नाही. त्यामुळे काँग्रेसमधूनच काँग्रेसच्या विरोधात एक गट कृतिशील होतो ही वस्तुस्थिती आहे. यामुळे सत्ताकांक्षी आणि लोक चळवळी यांचा मेळ घालण्याबद्दल काँग्रेस पक्षात पोकळी आहे. या पोकळीमुळेच काँग्रेस पक्षाला ताकद मिळत नाही. सत्तेची कल्पना लोकांशिवाय करता येत नाही. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी हा मुद्दा काँग्रेसच्या जीवनामध्ये बिंबविला होता. ही गोष्ट नव्याने पुन्हा समजून घेण्याची वेळ काँग्रेसवरती आलेली आहे. 

पक्षाची पुनर्रचना 
सत्ता आणि पक्ष संरचना यापैकी पक्षाचे संरचना नव्याने करावी अशी भूमिका पुढे आली. पक्षाने लोकांसाठी आणि देशासाठी कृतिशील झाले पाहिजे, अशी भूमिका घेतली गेली. निवडणुकांच्या मार्ग वापरावा यावर भर दिला. गुलाम नबी आझाद, वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण, भूपिंदर हुडा, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, शशी थरूर, जितीन प्रसाद, पी. जे. कुरियन, मनीष तिवारी, विवेक तनखा, राजेंद्र कौर भट्टला, राज बब्बर, रेणुका चौधरी, अजय सिंह, अरविंदर सिंग लव्हली, अखिलेश प्रकाश सिंग, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, संदीप दीक्षित आदी नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ सक्रिय आणि जनतेत वावरणाऱ्या अध्यक्षाची गरज असल्याची मागणी केली आहे. या पत्रामध्ये गांधी कुटुंबावर टीका केलेली नाही. तसेच या पत्रामध्ये सक्रिय आणि पूर्णवेळ काम करण्यावर भर दिलेला आहे. या गोष्टी अप्रत्यक्षपणे सध्या पक्ष सक्रिय नाही  
आणि पूर्णवेळ काम करत नाही याबद्दल खुली चर्चा करणारे पत्र हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेले आहे. काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान गटाने यास बंड, पक्षविरोधी कृती असे नाव दिले. हा त्यांचा सरंजामी विचार दिसतो. राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी सारवासारव केली. तर अधीर रंजन चौधरी, अमरिंदर सिंग, भूपेश बघेल, सलमान खुर्शीद, अश्विनीकुमार, डी.के. शिवकुमार, सिद्धरामय्या, बाळासाहेब थोरात, कुमारी सेलजा, के. एस. अळागिरी, एम. रामचंद्रन, अनिल चौधरी, गोविंद सिंग दसतोरा या नेत्यांनी गांधी कुटुंबाप्रती आपली निष्ठा व्यक्त केली आहे. शिवाय या गटाने इतरांना दोषी ठरवले आहे. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे. यामुळे निष्ठावंत आणि बंडखोर अशा दोन गटांमध्ये काँग्रेस विभागली गेली. या पत्रातील ‘पूर्ण वेळ’, ‘प्रभावी’, ‘दिसणारा’ आणि ‘सक्रिय’ या संकल्पनांमुळे राहुल गांधी विरोध स्पष्टपणे दिसला. त्यामुळे राहुल गांधी संतापले. या गोष्टीचा परिणाम महाराष्ट्रातदेखील दिसून आला. 

भारतात पक्ष व्यवस्था ही केवळ घराण्यांच्या भोवती वाढते या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवला गेला आहे. विशेष म्हणजे यामुळे स्वकर्तृत्वावर विश्वास राहिलेला नाही. तसेच राजकीय पक्ष हे लोकांचे असतात यापेक्षा ते घराण्यांचे असतात ही एक मध्ययुगीन सरंजामी वृत्ती घातक ठरत आहे. १९९० नंतरच्या जागतिकीकरणाच्या विश्वात मध्ययुगीन सरंजामशाही वृत्ती पक्षांच्या अंतर्गत काम करू लागली आहे. यामुळे नव उदारमतवाद आणि आणि सरंजामी वृत्ती यांचे मिश्रण असणारे पक्ष भारतीय राजकारणात पुढे आले. पक्षांनी लोकांचे प्रश्न हाती घेतले नाहीत. काँग्रेसमधील एका गटाने लिहिलेल्या पत्रामध्ये जे उल्लेख केलेले आहेत ते सर्व लोकांशी संबंधित आहेत. यामुळे त्यांची मागणी लोकशाही चौकटीतील आहे. तसेच त्यांची मागणी आधुनिक चौकटीतील आहे. परंतु एकूण भारतीय राजकारणाची चौकट सरंजामी आणि नवउदारमतवादी यांच्या मिश्रणाची आहे. यामुळे अशी मागणी बंडखोर ठरते. तसेच मागणी करणारा गट पक्षांतर्गत विरोधी गट म्हणून ओळखला जातो. विरोधी पक्षाला मिळालेला गट म्हणूनदेखील त्याची प्रतिमा तयार केली जाते. विशेष म्हणजे ज्यांच्या नेतृत्वाला काहीच आधार नसतो. असे नेते आक्रस्ताळी भूमिका घेऊन पक्षातील आपले स्थान पक्के करतात. ही परंपरा भारतात खूपच जलद गतीने वाढलेली आहे. ही परंपरा केवळ काँग्रेसमध्ये नाही. भारतातील सर्वच पक्षांमध्ये ही परंपरा कमी जास्त प्रमाणात दिसते. थोडक्यात काँग्रेस पक्षापुढे केवळ हा पेचप्रसंग नाही. हा पेचप्रसंग भारतीय राजकारणातील आहे. या पेचप्रसंगांमधून भारतीय राजकारणाला बाहेर पडावे लागणार आहे.

संबंधित बातम्या