महाराष्ट्रातील नवीन संघर्ष 

प्रकाश पवार 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

राज-रंग

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून बहुजन हिंदुत्व आणि सामाजिक समरसता हिंदुत्व या दोन मूल्यव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचे राजकारण विभागले आहे. सरकारच्या स्थापनेपासून प्रत्येक दिवशी परस्परविरोधी घटना घडताना दिसतात. त्यापैकी निवडक घटना म्हणजे कोरोनाच्या काळातील रेल्वेचा प्रश्न ही एक महत्त्वाची घटना आहे. यानंतर मुंबईबद्दलचा प्रश्न आणि मुंबई पोलिसांबद्दलचा प्रश्न या निवडक घटनांमधून असे दिसून येते, की या घटना मूल्यवाचक स्वरूपाच्या जास्त आहेत. या घटनांमधून भाजप त्यांची मूल्यव्यवस्था मांडत आहे. तसेच शिवसेना त्यांची बहुजन हिंदुत्व ही मूल्यव्यवस्था मांडत आहे. विशेष म्हणजे भाजप बाळासाहेब देवरस आणि वसंतराव भागवत यांनी मांडलेल्या समरसता हिंदुत्वापासून थोडेसे वेगळे होऊन नवीन वैशिष्ट्ये स्वीकारत आहे. 

मूल्यांमधील संघर्ष 
महाराष्ट्र हे राज्य मूल्यव्यवस्थेबद्दल जास्त आग्रही असणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षीय बांधीलकीबरोबर मूल्यव्यवस्थेची बांधीलकी हा मुद्दा जास्त प्रभावी ठरतो. या कारणामुळे महाराष्ट्रातील सामान्य लोकदेखील विशिष्ट अशा मूल्यांचे समर्थक आहेत. महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोक मूल्यांचा त्यांच्या दैनंदिन जीवनात पाठपुरावा करतात. लोक केवळ पक्षाचे समर्थक आहेत म्हणून त्या पक्षाचे समर्थन करतात एवढीच गोष्ट महाराष्ट्रात घडत नाही. महाराष्ट्रामध्ये पक्षापेक्षा मूल्यव्यवस्था जास्त महत्त्वाची मानली जाते. याची अनेक उदाहरणे इतिहासामध्ये दिसून आली आहेत. उदा. न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा फुले यांच्यामधील मतभिन्नता ही मूल्यव्यवस्थेच्या स्वरूपातील होती. शेतकऱ्यांबद्दल आणि महिलांबद्दल दोघांनाही सुधारणा अपेक्षित होत्या. परंतु कोणती मूल्ये प्रमाण असावीत याबद्दलची मते वेगवेगळी होती. गोपाळ कृष्ण गोखले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या दोघांच्या विचारांमध्ये मवाळ आणि जहाल अशी दोन वेगवेगळी मूल्ये होती. मवाळ आणि जहाल या दोन गटांमधील मूल्यात्मक संघर्ष महाराष्ट्राला माहीतच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे मूल्यांची नव्याने मांडणी केली. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता अशी मूल्ये त्यांनी भारतीय इतिहासाच्या आधारे आणि आधुनिक क्रांती या संकल्पनांमधून स्पष्ट केली. त्यांनी पक्ष आणि मूल्य यापैकी मूल्यांना जास्त महत्त्व दिले. ही वस्तुस्थिती स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात राहिलेली आहे. 

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राने मूल्यव्यवस्थेबरोबर असणारे आपले नाते कायम ठेवले. उदा. महाराष्ट्रामध्ये संघ, जनसंघ आणि भाजप या संघटनांनी मिळून नवीन मूल्यव्यवस्था घडवली. विसाव्या शतकाच्या तिशीच्या दशकांमध्ये संघाची विचारसरणी वेगळी होती. विसाव्या शतकाच्या साठीच्या दशकात संघ व जनसंघाची मूल्यव्यवस्था नव्याने घडवली गेली. सत्तरीच्या दशकापासून बाळासाहेब देवरस, वसंतराव भागवत, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी भाजपची मूल्यव्यवस्था निर्माण केली. भाजपची मूल्यव्यवस्था ही हिंदुत्व मूल्यांची होती. परंतु एवढीच गोष्ट साठ व सत्तरीच्या दशकात सत्य नाही. याच दशकात बाळासाहेब देवरस यांनी समरसता हिंदुत्व किंवा हिंदुत्व समरसता अशी मूल्यव्यवस्था निर्माण केली. ही मूल्यव्यवस्था मुख्यत्वेकरून राजकीय संघटन करण्यासाठी उपयुक्त होती. परंतु तेव्हाच बहुजन हिंदुत्व ही मूल्यव्यवस्था शिवसेनेने घडवली होती. ऐंशीच्या दशकामध्ये वि. दा. सावरकर यांच्या विचारांचे पुनरुज्जीवन हिंदुत्ववादी संघटनांनी केले. त्यांना नव-हिंदुत्ववाद म्हणून ओळखले जाते. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वर वर हिंदुत्व दिसले तरी बहुजन हिंदुत्व, नव हिंदुत्व आणि समरसता हिंदुत्व अशा तीन मूल्यव्यवस्था आहेत. याशिवाय क्षत्रियत्वाशी संबंधित एक मूल्यव्यवस्था आहे. यामुळे महाराष्ट्राच्या समाजात चार प्रकारची हिंदुत्वाची वेगवेगळी मूल्यव्यवस्था आहे. या चार प्रकारच्या मूल्यव्यवस्थांची समाजाबद्दलची धारणा वेगवेगळी आहे. तसेच त्यांचे समाजकारण आणि राजकारणही वेगवेगळे आहे. या चार मूल्यव्यवस्था परस्परविरोधी राजकारण करतात. या कारणामुळे या चारपैकी दोन किंवा तीन मूल्यव्यवस्था एकत्र येतात. तसेच या चारपैकी दोन किंवा तीन मूल्यव्यवस्था परस्परविरोधी भूमिका घेतात. ही घडामोड १९६० पासून आजपर्यंत सातत्याने घडत आलेली आहे. उदा. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ऐंशीच्या दशकात काहीकाळ संघर्ष होता. म्हणजेच बहुजन हिंदुत्व आणि समरसता हिंदुत्व या दोन मूल्यव्यवस्थांमध्ये संघर्ष होता. बाळासाहेब देवरस, वसंतराव भागवत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर समझोता करत बहुजन हिंदुत्व आणि समरसता हिंदुत्व या दोन मूल्यव्यवस्थांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केले होते. नव्वदीचे दशक आणि एकविसाव्या शतकातील पहिले दशक अशी दोन दशके बहुजन हिंदुत्व आणि समरसता हिंदुत्व या दोन मूल्यव्यवस्थांनी एकत्रित राजकारण केले. परंतु या दोन मूल्यव्यवस्थांमध्ये सत्तास्पर्धा आणि समाजाबद्दलची धारणा एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी बदलली. या बदलामुळे बहुजन हिंदुत्व आणि समरसता हिंदुत्व यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत बहुजन हिंदुत्व मूल्यव्यवस्था ही समरसता हिंदुत्वाच्या तुलनेत कमी प्रभावी आहे. अशी महाराष्ट्राच्या राजकारणात एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात चर्चा सुरू झाली. यामुळे या दोन मूल्यव्यवस्था त्यांच्या अस्तित्वासाठी वेगवेगळ्या झाल्या. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकांमध्ये या दोन मूल्यव्यवस्थांमध्ये केवळ सत्तासंघर्ष नव्हे तर समाजधारणा आणि एकूण भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याबद्दलही वेगवेगळी भूमिका आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यापासून ही भूमिका जास्त स्पष्ट होत गेली. त्यांनी वेगवेगळ्या वेळी ज्या भूमिका मांडल्या त्यातून बहुजन हिंदुत्वाची काही वैशिष्ट्ये दिसून आली. 
 

  1. अमेरिका जनतेला वाऱ्यावर सोडू शकते परंतु महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जनतेला वाऱ्यावर सोडू शकत नाही असा एक फरक उद्धव ठाकरे यांनी केला होता. जनतेबद्दलची बांधीलकी हे बहुजन हिंदुत्वाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. 
  2. विकास आघाडीचा कारभार चालविताना उद्धव ठाकरे यांनी संयमी भूमिका घेतली. यामुळे बहुजन हिंदुत्व हे विविध बहुजन लोकांच्या संयमाचा एक प्रकार आहे अशीच धारणा त्यांनी विकसित केली. 
  3. कोरोनाच्या काळात त्यांनी कुलुपबंदी उठवण्यासाठी उतावळेपणा दाखविला नाही. आर्थिक दबावाला ते बळी पडले नाहीत. त्यांनी आर्थिक हितसंबंध आणि मानव यापैकी मानवाला प्रथम क्रमांक दिला. यामुळे कुलुपबंदीची प्रक्रिया पुढे पुढे गेली. 
  4. गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना अनेक गोष्टींशी तडजोडी कराव्या लागल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, केंद्रातील भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्ष यांच्याशी व्यवहार करताना त्यांनी राजकीय समंजसपणा आणि राजकीय प्रगल्भता या दोन्ही गोष्टी व्यक्त केल्या. त्यांनी भाषाशैलीमध्ये कमालीचा फेरबदल केला. काळानुसार बदलण्याची क्षमता विकसित केली. ही बहुजन हिंदुत्वाची मूल्यव्यवस्था उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केली आहे. ही मूल्यव्यवस्था अर्थातच सामाजिक समरसता हिंदुत्वाशी जुळतीमिळती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये संघर्ष दिसू लागला आहे. गेल्या सहा महिन्यांत भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील या दोन वेगवेगळ्या मूल्यव्यवस्थांबद्दल पूर्णपणे जाणीव निर्माण झालेली दिसते. या दोन मूल्यव्यवस्थांचे भान परस्परांना आलेले आहे. नव्वदीच्या आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात हे परस्पर वेगवेगळ्या मूल्यव्यवस्थांचे भान अस्पष्ट झाले होते. स्वच्छपणे दोन वेगवेगळ्या मूल्यव्यवस्था आहेत याचे भान एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून सुरू झाले. गेल्या सहा महिन्यांमध्ये हे भान पूर्णपणे व पूर्ण ताकदीने व्यक्त झाले आहे. 

नवीन संघर्षाची कथा 
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एक मूल्यव्यवस्था आहे. तसेच भारिप बहुजन महासंघ आणि बहुजनवाद किंवा वंचित बहुजनवाद ही एक मूल्यव्यवस्था आहे. काँग्रेस आणि काँग्रेसची नेहरूवादी एक मूल्यव्यवस्था आहे. विशेष म्हणजे समरसता हिंदुत्व ही मूल्यव्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजनवाद आणि नेहरूवादी मूल्यव्यवस्था यांच्याशी समाजसुधारणा आणि राजकारण म्हणून परस्परविरोधी भूमिका घेते. त्यामुळे समरसता हिंदुत्व ही मूल्यव्यवस्था शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ या पक्ष आणि संघटनांच्या मूल्य व्यवस्थांना नाकारते. ही प्रक्रिया सोशल मीडियामधून जास्त गतीने घडून आली. सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी समरसता हिंदुत्व आणि इतर मूल्यव्यवस्था यांच्यामध्ये तीक्ष्ण ध्रुवीकरण घडवले आहे. या प्रक्रियेमुळे महाराष्ट्रात जनतेमधून प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जन्मलेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे अशी भूमिका मांडली. तर सरकारबद्दल म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या बहुजन हिंदुत्वाबद्दल काही प्रश्न भाजपने उपस्थित केले. भाजपने उपस्थित केलेले प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेपेक्षा वेगळे आहेत. यामुळे मुंबईबद्दलचा प्रश्न नव्याने चर्चेचा विषय झाला. तसेच मुंबई पोलिसांबद्दलचा विषय नव्याने चर्चेचा विषय झाला. या दोन्ही मुद्द्यांबरोबरच कुलुपबंदीच्या काळात त्यांच्या गावी (राज्यात) जाणाऱ्या कामगारांचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. यामध्ये लोकांना भाजप आणि शिवसेना दररोज परस्परविरोधी भूमिकेत दररोज दिसत होत्या. या सर्व घडामोडी महाराष्ट्रामध्ये मूल्यव्यवस्था म्हणून घडत आहेत. बहुजन हिंदुत्व प्रदेशवादी राहूनही राष्ट्रवादाची भूमिका मांडत आहे. म्हणजेच प्रादेशिक आकांक्षा आणि राष्ट्रवादी विचार या दोन्ही गोष्टी लोकशाही पद्धतीने गेल्या सहा महिन्यात घडवण्याचा प्रयत्न बहुजन हिंदुत्वाचा आहे. ही शिवसेनेने त्रिकोणी जोडणी केलेली दिसते. प्रादेशिक आकांक्षा, राष्ट्रवाद आणि लोकशाही या तीन गोष्टी गेल्या सहा महिन्यांमध्ये शिवसेनेने बहुजन हिंदुत्वाची मूल्यव्यवस्था म्हणून विकसित केल्या. या तीनही वैशिष्ट्यांबद्दल महाराष्ट्राच्या बाहेरदेखील विचारवंतांनी आणि अल्पसंख्याकांनी शिवसेनेच्या बहुजन हिंदुत्वाची दखल घेतली. विशेषतः या नवीन घडामोडींचे स्वागत परिवर्तनवादी गटांनी केले. बहुजन हिंदुत्वाची मध्यममार्गी भूमिका शिवसेनेने मांडली. मध्यममार्गी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ जाणारी आहे. याउलट बहुजन हिंदुत्वाची भूमिका समरसता हिंदुत्वाच्या विरोधी जाणारी आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये सातत्याने नवनवीन प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या प्रश्नांची चर्चा शिवसेना आणि भाजप यांच्याभोवती फिरताना दिसते. वसंतराव भागवत आणि बाळासाहेब देवरस यांनी बहुजन हिंदुत्वाशी जुळवून घेतले होते. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन हिंदुत्वाशी जुळवून घेण्याचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवला होता. हे वैशिष्ट्य एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मागे पडले आहे. या ऐवजी सामाजिक समरसता हिंदुत्व बहुजन हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेत आहे. हा नवीन फेरबदल झालेला दिसतो. त्यामुळे बाळासाहेब देवरस आणि वसंतराव भागवत यांच्या समरसता हिंदुत्वात नवीन आशय आलेला दिसतो. हा सूक्ष्म परंतु दूरगामी परिणाम करणारा मूल्यात्मक बदल महाराष्ट्रात घडून आला आहे.

संबंधित बातम्या