महाविकास आघाडीचे एक वर्ष

प्रकाश पवार
सोमवार, 7 डिसेंबर 2020

राज-रंग

महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केले. या काळातील आणि भविष्यातील राजकीय स्थैर्याबद्दल चर्चा खूप लोकप्रिय झाली. या मुद्द्या बरोबर एक वर्षात महाविकास आघाडीने कोणती राजकीय प्रक्रिया घडवून आणली? हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. महाविकास आघाडीच्यामुळे गेल्या वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात संरचनात्मक बदल झाले का? असाही एक प्रश्न उपस्थित होतो. तसेच भाजपने या एक वर्षात विरोधी पक्ष म्हणून कोणती राजकीय प्रक्रिया घडवली? एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या दोन्ही मुद्द्यांची चर्चा करणे प्रस्तुत ठरते. 

त्रिकोणी सत्तास्पर्धा
वर्षभरात महाविकास आघाडीमध्ये त्रिकोणी सत्तास्पर्धा आणि सुंदोपसुंदी होती. हा मुद्दा दिसून आला. राजकारणाचे हे खास वैशिष्ट्य आहे. परंतु महाविकास आघाडीने ही सत्तास्पर्धा आणि सुंदोपसुंदी गेल्या वर्षात बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवली. सत्तास्पर्धा आणि सुंदोपसुंदी नियंत्रणात ठेवणे ही एक राजकीय प्रक्रिया उद्धव ठाकरे सरकारने घडवली. कारण सरकारच्या स्थापनेच्या चर्चेपासून प्रचंड सत्तास्पर्धा रंगली होती. तसेच नेतृत्व कोण करणार, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा होता. शिवसेनेचे नेतृत्व कोण करणार, राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार, काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार, हा मुद्दा यक्षप्रश्न म्हणून पुढे आला.  सरकारमध्ये शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील हे गेल्या वर्षात निश्चित झाले. तसेच सरकारमधील उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व यशस्वी होऊ शकते, हा विश्वास मंत्रिमंडळ, तिन्ही पक्ष आणि जनता यांना आलेला आहे. हा मुद्दा गेल्या वर्षात राजकीय प्रक्रिया म्हणून घडत गेला. कोरोनाची जागतिक साथ असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यापुढे अनेक प्रश्न होते. जनसंपर्क आणि महाराष्ट्राची तिजोरी हे दोन अति जटिल प्रश्न होते. परंतु या प्रश्नांचा सामना करत उद्धव ठाकरे यांनी त्यांचे नेतृत्व सिद्ध केले आहे. एक वर्षात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यापेक्षाही जास्त आश्वासक नेतृत्व अशी प्रतिमा उद्धव ठाकरे यांची निर्माण झाली. यामुळे राज्यातील प्रभावी नेतृत्व अशी राजकीय प्रक्रिया उद्धव ठाकरे यांनी घडवून आणली. भाजपने शिवसेनेशी सत्तास्पर्धा करताना मोठे कच्चे दुवे मागे सोडले. त्यांचा शिवसेनेने कौशल्याने उपयोग करून घेतला.

 • शिवसेना पक्ष भाजपपासून वेगळा होणार नाही, या भ्रामक समजुतीचा कच्चा दुवा निर्माण केला. हा मुद्दा शिवसेनेने कौशल्याने राजकीय प्रक्रिया घडवण्याचा विषय बनविला. कारण वेगवेगळ्या प्रश्नांवर शिवसेनेने सातत्याने भाजप विरोधी भूमिका घेतली. महत्त्वाचे प्रश्न म्हणजे केंद्राकडून राज्याला मिळणारा निधी हा  मुद्दा शिवसेनेने भाजप विरोधात राजकीय प्रक्रिया म्हणून मांडला. तसेच मुंबईच्या संदर्भात कंगना यांनी उपस्थित केलेला मुद्दा देखील त्यांनी राजकीय प्रक्रिया म्हणून भाजप विरोधात पुढे आणला. तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया हा एकाच पक्षाची बाजू घेतो. यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियावरील विश्वास कमी होत चालला होता. हा मुद्दा देखील शिवसेनेने राजकीय प्रक्रिया घडवण्यासाठी अत्यंत कौशल्याने उपयोगात आणला. जागतिक कोरोनाच्या साथीमुळे एकूण राजकीय प्रक्रिया मंदावली होती. राजकीय प्रक्रिया घडवणारे घटक राजकीय क्षेत्र ऐवजी प्रशासकीय क्षेत्रातील पुढे आले होते. या मुद्द्याचा ही शिवसेनेने कौशल्याने उपयोग केला. त्यामुळे शिवसेनेला फार प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले नाही.
   
 • राजकीय प्रक्रिया घडविणारा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विचारप्रणाली आहे. हा मुद्दा शिवसेनेने गेल्या वर्षात कौशल्याने विकसित केला. विचारप्रणालीच्या संदर्भात शिवसेना इतर तीनही पक्षांच्या पुढे होती. शिवसेनेच्या विचारप्रणालीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला. तसेच शिवसेनेने भाजपची विचारप्रणाली आणि शिवसेनेची विचारप्रणाली यामध्ये अंतर स्पष्ट केले. भाजपने यामुळे हिंदुत्वाच्या दोन प्रकारांवरती भर दिला (भगवा आणि भेसळयुक्त भगवा). शिवसेनेने प्रबोधनकार ठाकरे पासूनच्या ब्राह्मणेतर हिंदुत्व या मुद्द्यावर भर दिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा आणि शुद्ध हिंदुत्वाचा संबंध जोडला. तसेच प्रदेश आणि राष्ट्रीयत्व यांचाही संबंध जोडला. यामुळे शुद्ध हिंदुत्व, राष्ट्रवाद राष्ट्रप्रेम, या मुद्द्यांच्या मदतीने राजकीय प्रक्रिया घडवण्याचा शिवसेनेने प्रयत्न करून भाजपच्या विचारसरणीला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती असूनही हिंदुत्व या विचारांचे समर्थन केले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय प्रक्रियेमध्ये बहुजन हिंदुत्व, सावरकरवादी हिंदुत्व, आणि सामाजिक समरसता हिंदुत्व आशा तीन प्रकारच्या हिंदुत्वाशी संबंधित तीन राजकीय प्रक्रिया घडत आहेत. या तीनही प्रक्रियांमध्ये ऐक्य आणि एकोप्यापेक्षा राजकीय गटबाजीची राजकीय प्रक्रिया गेल्या वर्षभरात सुरू झाली. ही प्रक्रिया एका अर्थाने १९८९ ते २०१४ या काळापेक्षा वेगळी आहे.
   
 • हिंदुत्वाचे विविध गटात विभाजन ही एक रचनात्मक पातळीवरील प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेशी आणि सावरकरांशी नव्याने जुळवून घेत आहे. परंतु शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये हिंदुत्वाचा दावा करण्यावरून विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे शिवसेना हिंदुत्वाच्या भाषाशैलीत बोलत राहिली आणि प्रश्न उठवीत राहिली तर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधील संवादाचा पूल दुबळा होत जातो. ही गोष्ट हा विकास आघाडीच्या राजकीय प्रक्रियेने जन्माला घातलेली आहे. हा मुद्दा महाविकासआघाडी पुढील सर्वात मोठे आव्हान आहे.
   
 • महाविकास आघाडीने गेल्या वर्षभरात सांस्कृतिक पातळीवरील रचनात्मक प्रक्रिया घडवून आणलेली नाही. कारण महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश या क्षेत्रांमध्ये मोठे फेर बदल झालेले नाहीत. राजकीय प्रक्रियेला सांस्कृतिक क्षेत्रातून अधिमान्यता मिळत असते. या क्षेत्रातील प्रक्रिया घडली नाही. ही बाब भाजपची ताकद बनली आहे. शैक्षणिक क्षेत्रात देखील महत्त्वाची राजकीय प्रक्रिया गेल्या वर्षात घडली नाही. शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरती, सामाजिक सलोखा, स्वच्छ कारभार, सुशासन असे प्रश्न मोठे आहेत. यामुळे महाविकास आघाडीची संरचना आणि सांस्कृतिक संरचना यांच्यातील देवाण-घेवाणीचा पूल भक्कम नाही.
   
 • महाविकास आघाडी आणि सामाजिक संबंध हा मुद्दा संरचनात्मक पातळीवर दुबळा आहे. कारण आरक्षण, ॲट्रॉसिटी, लैंगिक अत्याचार या तीनही प्रश्नांना सामाजिक न्यायाच्या आणि घटनात्मक कायद्याच्या चौकटीत कृती करण्यास भाग पाडणे या क्षेत्रात प्रचंड मोठे आव्हान आहे. गेल्या वर्षभरामध्ये भाजपने या क्षेत्रातील प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधी पक्ष म्हणून भाजपला या पातळीवर काम करण्यासाठी संधी उपलब्ध झाली. हा मुद्दाच महाविकास आघाडीतील संरचनात्मक पातळीवरील दुबळा दुवा आहे.

कच्चे दुवे
भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्ष म्हणून पहिल्या वर्षात हिंदुत्व, महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंगती, आर्थिक पेचप्रसंग, शरद पवार यांचा रिमोट कंट्रोल असे काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत राजकीय प्रक्रिया घडवली. भाजपने सातत्याने आक्रमक भूमिका घेतली. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ऐक्य आणि एकोपा आहे. परंतु यामुळे भाजपतील ओबीसी नेतृत्व आणि भाजप यांच्यामध्ये एक संघर्ष उभा राहिला आहे. एकनाथ खडसे यांनी पक्षांतर केले. तसेच मुंडे आणि फडणवीस यांच्यामध्ये एक संघर्ष आहे. या यामुळे ओबीसी समूह राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळला आहे. गेल्या वर्षभरामध्ये असे बदल दिसून आले. या घडामोडींचा अर्थ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढण्यामुळे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संरचनात्मक संबंध संवेदनशील झाले आहेत. पक्षांतराच्या मुद्द्यांवरती या तीनही पक्षांना राजकीय प्रक्रिया घडवताना मर्यादा येत आहेत. जिल्हा आणि पक्ष यांचे संबंध लक्षात घेऊन तेथील प्रक्रिया घडवावी लागत आहे. थोडक्यात यामुळे जिल्हा पातळीवरील चौकटीत राजकीय प्रक्रिया घडवण्याची पद्धत गेल्या वर्षभरात सुरू राहिली. राज्य पातळीवरील समीकरणामुळे जिल्हा पातळीवरील राजकीय समीकरणांशी जुळवून घेण्याचे बंधन महाविकास आघाडीवर पडलेले दिसते. हा मुद्दा म्हणजे जिल्हा पातळीवरील राजकीय प्रक्रियेला नव्याने शक्ती मिळणार आहे. 

कोरोना साथीच्या काळात अजित पवार, अनिल देशमुख, राजेश टोपे या तीन नेत्यांचा विशेष प्रभाव दिसून आला. मंत्रालयामध्ये प्रशासनावर अजित पवारांचे नियंत्रण राहिले. पोलिसांमध्ये अनिल देशमुख लोकप्रिय झाले. राजेश टोपे यांनी विचारपूर्वक आरोग्यविषयक प्रश्न हाताळले. म्हणजेच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुंबईच्या बाहेर या तीन नेत्यांचा भक्कम आधार मिळत गेला. मुंबई, ठाणे येथे मात्र दोन्ही काँग्रेसला फार प्रभावी कार्य करता आले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेनेचे स्थान या विभागात निर्णायक राहिले आहे. काँग्रेस पक्षाने निश्चित अशी कामगिरी कोणत्या एका विभागात, जिल्ह्यात केलेली दिसत नाही. यामुळे गेल्या वर्षातील सरकारच्या कामगिरीत काँग्रेस पक्षाने सुधारणा केली नाही. उलट शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये मतभिन्नता राहीली. काँग्रेस पक्ष महाविकासआघाडी मध्ये राहून पक्षाचा विस्तार करण्यात मागे राहिलेला दिसतो. खुली सत्तास्पर्धा हे वैशिष्ट्य ठेवूनही सत्तास्पर्धा नियंत्रणात आणण्याची क्षमता काँग्रेसने गेल्या वर्षात मिळवली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या संरचनेतील हा एक कच्चा दुवा राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांची मुळे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील ब्राह्मणेतर चळवळीत होती. त्या सांस्कृतिक वारश्यापर्यंत महाविकास आघाडीला गेल्या वर्षभरामध्ये पोहोचता आले नाही. उलट महाविकास आघाडी हिंदुत्वाच्या चौकटीत राजकीय प्रक्रिया घडवत राहीली. ब्राह्मणेतर चळवळ ही जुनी घडामोड असली तरी तिला नव्या संदर्भात विकसित करता आले असते. परंतु तशी दूरदृष्टी व्यक्त झाली नाही. यामुळे पोकळ सामाजिक-राजकीय पायावर महाविकास आघाडीची संरचना उभी आहे. तिचा आधार गेल्या वर्षात भक्कम केला गेला नाही.  थोडक्यात गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या राजकारणात स्थैर्य निर्माण करता आले नाही. महाविकास आघाडी एक वर्ष सरकार देण्यात यशस्वी झाली. परंतु राजकीय स्थैर्य याबद्दल निश्चित जनमत घडवता आले नाही.

संबंधित बातम्या