सहिष्णुता

प्रकाश पवार
सोमवार, 21 डिसेंबर 2020

राज-रंग

राजकीय विचारांच्या संकल्पनेचे महत्त्व महाभारतात युधिष्ठिराने स्पष्ट केलेले आहे. धनुष्य बाणाने मनुष्याचा मृत्यू होईल किंवा होणार नाही; परंतु राजकीय संकल्पनेने राज्याची नवीन उभारणी होते किंवा राज्याचा विनाश होतो, या प्रकारचे आकलन महाभारतात मांडले गेले आहे. अशीच एक संकल्पना प्राचीन काळापासून आजपर्यंत प्रभावी ठरत आलेली आहे. ती संकल्पना म्हणजे सहिष्णुता. हे एक राजकीय तत्त्व आहे. या तत्त्वाचा राजकीय प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेतला जातो. कोणत्याही राजकीय विचारांची संकल्पना महत्त्वाची असते. परंतु मध्ययुगानंतर सहिष्णुता या संकल्पनेचे महत्त्व वाढत गेले, असा युक्तिवाद पाश्चिमात्य राजकीय प्रक्रियेत केला जातो. ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ स्टॅंडर्ड’मध्ये सहिष्णुतेच्या संदर्भात आढावा घेण्यात आलेला आहे. परंतु त्यांच्या विवेचनात भारतातील सहिष्णुतेच्या राजकारणाची दखल घेतलेली नाही. ‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’मध्ये सम्राट अशोकाचा ओझरता उल्लेख आहे. परंतु भारतात प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत फार गंभीरपणे व विचारपूर्वक सहिष्णुतेचे राजकारण केले गेले, याबद्दलचे विवेचन स्वतंत्रपणे केले जात नाही. आधुनिक काळातील भारतीय राजकीय प्रक्रियेवरती  सहिष्णुता मूल्याचा प्रभाव आहे. यामुळे पाश्चिमात्य राजकारणातील सहिष्णुता आणि भारतीय राजकारणातील सहिष्णुता यांची कथा खूपच महत्त्वाची ठरते. 

सहिष्णुता आणि भारतीय राजकारण
सहिष्णुता आणि  भारतीय राजकारण यांच्यामध्ये एका बाजूने सातत्याने संघर्ष सुरू राहिलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने  सहिष्णुता आणि राजकारण यांचा सुमेळ घालून नागरी समाज निर्माण करण्याचे प्रयत्न झाले आहेत. ही प्रक्रिया मध्ययुगात आणि आधुनिक युगात देखील सुरू होती. भारतात कल्याणकारी राज्यसंस्थेचा ऱ्हास एकोणीसशे ऐंशीपासून पुढे होत गेला. त्यानंतर सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता यांच्याबरोबर राज्यसंस्थेने जुळवून घेणे कमी कमी केले. राज्यसंस्थेने म्हणजे त्या त्या काळातील सरकारांनी सहिष्णुतेपासून बाजूला होण्याची भूमिका घेतली. यामुळे सातत्याने सहिष्णुता या मूल्यांबद्दल आणि या विचारांचा आग्रह धरणाऱ्या चळवळीबद्दल तीव्र द्वेष आणि मतभेद निर्माण झाले. सहिष्णुता या मूल्यांवर  ठाम विश्वास असणारे पक्ष, संघटना, नेते आणि कार्यकर्ते   यांच्यामध्ये  धरसोड सुरू झाली. या गोष्टीला देखील जवळपास पन्नास वर्षे होत आली आहेत. कारण या गोष्टीची सुरुवात सत्तरीच्या दशकामध्ये झाली होती.  

सत्तरीच्या दशकाच्या आधी सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता यांच्याबद्दल राजकारणात वाद विवाद होता. परंतु पन्नाशीच्या आणि साठीच्या दशकात काँग्रेस मूल्यव्यवस्थेने सहिष्णुता आणि  
धर्मनिरपेक्षता या दोन्ही मूल्यांना महत्त्व दिले, ही महत्त्वाची बाब आहे. परंतु यापेक्षा दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस मूल्यव्यवस्थेने सारासार विवेक आणि टोकाचा आक्रस्ताळेपणा न करता या दोन्ही मूल्यांना जपण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारतातील सामाजिक परंपरा आणि धार्मिक परंपरा यांच्या अंगाने सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षतेचे  समर्थन केले. भारतातील सामाजिक परंपरा आणि धार्मिक परंपरा सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षतेला पाठिंबा देणाऱ्या आहेत. या दोन्ही गोष्टींवर भर दिला. यामुळे राजकारणाच्या बाहेर सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातून देखील सहिष्णुतेचे समर्थन केले गेले. या दोन्ही क्षेत्रांमधून सहिष्णुतेला आणि धर्मनिरपेक्षतेला बळ मिळत गेले. याचा महत्त्वाचा धागा पन्नास आणि साठीच्या दशकात दिसतो. एवढेच नव्हे तर मध्ययुगातील राजकीय घडामोडींचा अर्थ लावणाऱ्या विचारवंतांनी तो सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता यासंदर्भात लावला. त्यामुळे ऐतिहासिक संदर्भात देखील सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षतेला पाठिंबा मिळत गेला.
 
मध्ययुगातील सहिष्णुतेचा आधुनिक अर्थ
मध्ययुगातील सहिष्णुतेचा आधुनिक अर्थ महात्मा फुले, लोकहितवादी, राजाराम शास्त्री भागवत, न्यायमूर्ती रानडे यांनी लावला. छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यसंस्था आणि सामाजिक, धार्मिक सलोखा यांची चर्चा विशेष करून केली गेली आहे. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये जवाहरलाल नेहरूंनी देखील धार्मिक आणि सामाजिक सलोख्याची मांडणी केली. त्यामुळे सहिष्णुता या मूल्यांला आत्मबळ मिळत गेले. आधुनिक काळात सहिष्णुतेच्या संदर्भात अकबराच्या राज्यसंस्थेची देखील चर्चा झाली. विशेषतः ‘सुलह कूल’ संकल्पनेची चर्चा सहिष्णुतेच्या संदर्भात केली गेली. अलीकडे ‘भारतीय राज्यसंस्था आणि सामाजिक न्याय’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. पुस्तकाच्या प्रास्ताविकात अशोक चौसाळकर यांनी ‘सुलह कूल’ संकल्पनेचा उल्लेख सहिष्णुतेच्या संदर्भात केलेला आहे. तसेच  विज्ञानाच्या एका अभ्यासकाने ही संकल्पना भारतीय संदर्भात स्पष्ट केली आहे. 

‘सुलह कूल’ ही मध्ययुगीन राजकीय विचारातील संकल्पना आहे. सूफी रहस्यवादी तत्त्वानुसार ‘सुलह कूल’ (Sulh-i-kul) ह्या अरबी शब्दाचा अर्थ  ‘वैश्विक शांती’ किंवा ‘संपूर्ण शांती’ असा आहे. सम्राट अकबर याने (शासन काळ: १५५६-१६०५) आपल्या राज्यात ही संकल्पना लागू केली. जिचे वर्णन, वेगवेगळ्या धर्मांमधील शांततापूर्ण आणि सुसंवादी संबंध असे केलेले आहे. आपल्या राज्यातील भिन्न भिन्न लोकांना एकमेकात गुंफण्याच्या प्रयत्नातून, अकबराने मानवा-मानवातील ऐक्य व शांतीची संकल्पना मांडली. ‘सुलह कूल’ संकल्पनेतून केवळ सहिष्णुता एवढाच अर्थ सूचित होत नाही, तर समतोल, सौजन्य, परस्पर आदर आणि तडजोड असाही अर्थ प्रतिध्वनित होतो. भिन्न लोकांमध्ये ऐक्य व सुसंवाद राखण्यासाठी या सर्व बाबींची आवश्यक असते. मूलतः अकबराच्या कारकिर्दीत व त्याच्या नंतर काही काळ मुघल दरबारात ‘सुलह कूल’चे धोरण राबवले गेले. भारतातील काही सुफी चळवळीमधून सुद्धा ‘सुलह कूल’चा वापर केला जात होता. आज प्रामुख्याने ही संज्ञा, मुघल संस्कृती व भारतातील सूफी चळवळीच्या क्षेत्रात संशोधन करणारे इतिहासकार, कला इतिहासकार, अभ्यासक आणि काही प्रमाणात इतर विद्वान आणि शांततावादी कार्यकर्त्यांकडून वापरली जाते. आंतरधर्मीय चर्चाविश्वात विधायक सुसंवादासाठी ‘सहिष्णुता’ महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे ‘सुलह कूल’ या संकल्पनेला भिन्न सांस्कृतिकता व आंतरसांस्कृतिक चर्चेमध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘सुलह कूल’ ही संकल्पना धार्मिक सहिष्णुता, सर्वांना समान वागणूक आणि सार्वत्रिक शांततेच्या प्रस्थापनेसाठी मांडण्यात आली. बहुल सांस्कृतिक लोकांमध्ये, जिथे वारंवार धार्मिक संघर्ष होतात, तिथे ही ऐतिहासिक संकल्पना पुनर्जीवित करून, आधुनिक साधन म्हणून उपयोगात आणण्यास उपयुक्त आहे. याबरोबर बहुसांस्कृतिक कार्य शक्तींचे व्यवस्थापन करण्यात सुद्धा ही संकल्पना मार्गदर्शक ठरू शकते. असा युक्तिवाद भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील सहिष्णुतेची संकल्पना राज्यकारभारात स्त्री- पुरुष, विविध जाती, विविध धर्म, यांच्या संदर्भात वापरली होती. अकबराच्या सहिष्णू धोरणाची आठवण शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला करून दिली होती. सहिष्णुतेचा हा युक्तिवाद देखील आधुनिक भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा युक्तिवाद आहे. या युक्तीवादाने भारतीय राजकारणातील सहिष्णुतेला आत्मबळ पुरविले. 

पाश्चिमात्य सहिष्णुता संकल्पना आणि राजकारण
पाश्चिमात्य राजकीय विचारांमध्ये सहिष्णुता या संकल्पनेचे विवेचन आहे. प्रचलित निकष किंवा धोरणांबद्दल असहमती दर्शविण्यासाठी सहमती दिली जाते, हे सहिष्णुतेचे तत्त्व आहे. राज्यसंस्था नकाराधिकार वापरण्यास मान्यता देते. हा विचार हेतुपुरस्सर स्वीकारला जातो. या विचारांची सुरुवात पाश्चिमात्य जगात सोळाव्या-सतराव्या शतकात धार्मिक संघर्षाच्या संदर्भात झाली. तेव्हा भारतात ही संकल्पना सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अशा  क्षेत्रांच्या संदर्भात वापरण्याची प्रथा होती. विशेष करून अकबर आणि छत्रपती शिवाजी महाराज ही दोन महत्त्वाची उदाहरणे आहेत. त्याआधी सम्राट अशोकाचे प्राचीन काळातील उदाहरण महत्त्वाचे आहे. विशेषतः राजकीय सहिष्णुता आणि धार्मिक सहिष्णुता या दोन्ही गोष्टी भारतात एकत्रित होत्या. पाश्चिमात्य राजकीय संदर्भात या विचारांची मांडणी जॉन लॉक, जॉन स्टुअर्ट मिल,जॉन रॉल्स यांनी केली. या पैकी जॉन स्टुअर्ट मिल यांनी भारतीय राजकारणाची चर्चा असहिष्णूतेच्या चौकटीत केली. यामुळे भारतीय राजकारणात असहिष्णुता ही एक चौकट विकसित झाली. ही वस्तुस्थिती असूनही भारतीय राजकारणात सहिष्णुता ही संकल्पना महत्त्वाची राहिलेली आहे. उदा. राज्यसंस्था आणि राजकीय चळवळी यांच्यामध्ये मोठी मतभिन्नता असते. परंतु चळवळींना त्यांचा स्वतंत्र विचार मांडण्याचा अधिकार दिला जातो. भारतात सहिष्णुतेची संकल्पना परवानगी, स्वयम् प्रतिष्ठा (self dignity), सहजीवन आणि नागरिकांमधील आदर अशा स्वरूपात मोठ्या प्रमाणावर कृतिशील आहे. बहुसंख्याकांच्या मूल्यांबरोबर अल्पसंख्यांकांच्या श्रद्धा, कृती, पद्धती यांना स्वीकारले गेले आहे. यासाठी जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक प्रयत्नही झाले. हा मुद्दा अगदी आताच्या चार कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनामध्ये देखील दिसून आला आहे. यामुळे अजूनही सहिष्णुता हे तत्त्व भारतीय राजकारणाचा मुख्य आधार आहे, हे अधोरेखित होते

संबंधित बातम्या