सुभाषचंद्र बोस आणि महाराष्ट्र

प्रकाश पवार
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

राज-रंग

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष गेल्या २३ जानेवारीपासून सुरू झाले आहे. या निमित्ताने जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण वर्षभर एक कार्यक्रम करण्याचा तसेच सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, पश्चिम बंगाल सरकारने सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेची राष्ट्रीय जननेता अशी नव्याने मांडणी केली. केंद्र आणि राज्य सरकारांप्रमाणेच आजच्या युवकांनाही नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रचंड आकर्षण आहे. त्यांच्यासाठी सुभाषचंद्र बोस महानायक आहेत, तसेच ते आजच्या काळातील मोठे प्रश्न सोडविण्यासाठी प्रचंड ताकद पुरविणारे एक सांस्कृतिक प्रतीकदेखील आहेत. याच कारणामुळे सुभाषचंद्र बोस यांच्या भोवती राजकारण घडविले जात आहे. 

सुभाषचंद्र बोस यांचा राष्ट्रवाद विषयक विचार साधनांच्या संदर्भात महात्मा गांधींपेक्षा वेगळा होता. महात्मा गांधी साम्राज्यवादाच्या विरोधात होते. तसेच सुभाषचंद्र बोसदेखील साम्राज्यवादाच्या विरोधात होते. सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वराज्याची संकल्पना महात्मा गांधींच्या आधी मांडली होती. आझाद हिंद सेनेतील दोन तुकड्यांना त्यांनी ‘गांधी’ आणि ‘नेहरू’ अशी नावे दिली होती. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांनी सुभाषचंद्र बोस यांची देशभक्ती आणि राष्ट्रवाद हा विचार मान्य केला होता. परंतु राष्ट्रवादाचा मार्ग महात्मा गांधींना मान्य नव्हता. सुभाषचंद्र बोस यांनी क्रांतिकारी राजकीय प्रतिकाराचा मार्ग स्वीकारला होता. तर महात्मा गांधी यांनी अहिंसात्मक राजकीय प्रतिकाराचा मार्ग स्वीकारला होता. परंतु दोघांचाही मूळ उद्देश समान होता. 

सुभाषचंद्र बोस यांना लोकशाहीची संकल्पना मान्य होती. फॅसिझममधील लोकशाही विरोधी भाग त्यांनी नाकारला होता. फॅसिझममधील अन्य काही गोष्टीही हळूहळू त्यांच्या विचारातून विरघळत जाऊन ते लोकशाहीचे विचार स्वीकारत होते. लोकशाही विचारांची लाट ज्यावेळी जगामध्ये आली होती त्याचवेळी सुभाषचंद्र बोस विचार मांडत होते. लोकशाहीची पहिली लाट आली तेव्हाच लोकशाही विरोधातील लाट देखील आली होती. पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध ही त्याची उदाहरणे आहेत. सुभाषचंद्र बोस यांनी क्रांतिकारी राजकीय प्रतिकाराचा मार्ग वापरला असला तरी त्यांनी फॅसिझमचा विचार स्वीकारला नाही, याची अनेक उदाहरणे दिसून येतात. त्यामुळे लोकशाहीविरोधातील घडामोडींचे समर्थन सुभाषचंद्र बोस करत नाहीत. 

सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. तेव्हा त्यांनी निवडणुकांचा मार्ग स्वीकारला होता. त्यांनी निवडणुका घेतल्या यातून त्यांचा लोकशाहीकडे असलेला कल सुस्पष्टपणे दिसतो. सुभाषचंद्र बोस आणि हिटलर यांच्या विचारांमध्ये प्रचंड फरक होता. कारण ‘माईन काम्फ’ या हिटलरच्या पुस्तकातील काही विचारांबद्दल सुभाषचंद्र बोस यांनी स्पष्ट विरोध व्यक्त केला होता. फॅसिझमचे धोरण अल्पसंख्याक विरोधी होते. आझाद हिंद सेनेमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी होती. आझाद हिंद सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्येदेखील मुस्लिम ठळकपणे दिसत होते. म्हणजेच सुभाषचंद्र बोस यांचे धोरण अल्पसंख्याक विरोधी नव्हते. त्यांनी बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक असा फरक केला नाही. यामुळे वंशश्रेष्ठत्व हा विचार त्यांचा नव्हता. याउलट सुभाषचंद्र बोस हे प्रादेशिक सामाजिक सलोखा आणि धार्मिक सामाजिक सलोखा या दोन्ही गोष्टींचा पुरस्कार करत होते. या दोन मुद्द्यांमुळे सुभाषचंद्र बोस फॅसिझमच्या विचारांपासून खूप वेगळे झालेले होते. केवळ काही भाषणांमध्ये त्यांनी फॅसिझमचे समर्थन केले म्हणून सुभाषचंद्र बोस फॅसिस्ट ठरत नाहीत, याचे भान लोकशाही समर्थकांनी ठेवले पाहिजे. सुभाषचंद्र बोस यांनी युवकांच्या पुढे स्वातंत्र्याचा म्हणजेच लोकशाहीचा आदर्श निर्माण केला, लोकशाही आणि स्वातंत्र्याचा एक मानदंड तयार केला.

ब्रिटिश साम्राज्यवादाला विरोध आणि मुक्त भारताची संकल्पना त्यांनी मांडली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा अन्वयार्थ एक तत्त्व राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या संदर्भात लावला. तसेच त्या तत्त्वाचा व्यवहारही त्यांनी त्यांच्या कृती कार्यक्रमातून स्पष्ट केला. छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राष्ट्रवादाचे प्रतीक आहेत, हा मुद्दा सुभाषचंद्र बोस यांनी १९२८मध्ये पुण्याच्या सभेत स्पष्ट केला होता. शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करून लष्करावर भर दिला. आधुनिक काळात हा प्रयत्न सुभाषचंद्र बोस यांनी केला होता. सैन्याबद्दलचा विचार इतर विचारवंतांमध्ये अस्पष्ट स्वरूपात आलेला आहे. परंतु सुभाषचंद्र बोस आणि वि. दा. सावरकर यांनी मात्र सैन्य या गोष्टीची मांडणी गंभीरपणे केली. यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना त्यांनी संरक्षण खात्याची पुनर्रचना केली. हा महत्त्वाचा दुवा महाराष्ट्र आणि सुभाषचंद्र बोस यांना जोडणारा आहे.

स्वातंत्र्य समता

सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्याबरोबरच समतेचा पुरस्कार केला होता. त्यांनी जाती भेदभाव नाकारला. त्यांनी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहाची संकल्पना स्वीकारली होती. हा त्यांचा विचार प्रगतशील होता. महाराष्ट्रातील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परंपरेशी त्यांचा हा विचार सुसंगत होता. त्यामुळे सुभाषचंद्र बोस महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळींशी संवादी आहेत. सुभाषचंद्र बोस यांनी आध्यात्मिक विचार स्वीकारला होता. त्यांनी आध्यात्मिक विचार स्वीकारूनदेखील अध्यात्म आणि राज्यसंस्था यांचा प्रवाह एकमेकांना पूरक असाही मांडला होता. परंतु त्यांच्या विचारांची उत्क्रांती सरतेशेवटी धर्मनिरपेक्ष पद्धतीने झाली, याची अनेक उदाहरणे सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन आणि चरित्रामध्ये दिसतात. त्यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याप्रमाणेच मुस्लिम धर्मीय व्यक्तींचा सहभाग होता. हे उदाहरणदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहिष्णुतेच्या धोरणासारखे आहे. यातून दोघांच्याही विचारातील सहिष्णुता आणि सामाजिक सलोखा या दोन गुणांचे दर्शन होते. हे गुण युवकांना आकर्षित करणारे आहेत.

सुभाषचंद्र बोस यांचा स्त्री-पुरुष समानतेचा विचार पूर्णपणे फॅसिझमचा विचार नाकारणारा आहे. कारण सुभाषचंद्र बोस यांनी पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना आझाद हिंद सेनेमध्ये स्थान दिले. त्यांनी राणी लक्ष्मी रेजिमेंटची स्थापना केली. या रेजिमेंटमध्ये दिडशे महिला होत्या. त्यांचा हा निर्णय पूर्णपणे फॅसिझमच्या विरोधातील दिसतो. लष्करामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातदेखील बऱ्याच वर्षांनी महिलांना संधी मिळाली. विसाव्या शतकात त्यांना संधी फारशी मिळाली नाही. शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकात तशी नोंद केलेलीच आहे. 

लष्करी अधिकारी महिलांना समान संधी देण्यास तयार नव्हते. परंतु शरद पवारांनी हस्तक्षेप करून महिलांना समान संधी मिळवून दिली. सुभाषचंद्र बोस यांनी मात्र १९४५ पूर्वी स्त्री पुरुष समानता म्हणून महिलांना लष्करात समान संधी दिली. तसेच महिलांच्या क्षमतांवर व कौशल्यांवरती विश्वास ठेवला. महिलांना लष्करात संधी देण्याचा मुद्दादेखील महाराष्ट्र आणि सुभाषचंद्र बोस यांना जोडणारा दुवा आहे. सारांश म्हणजे सुभाषचंद्र बोस महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात आजही विचारांच्या रूपाने कृतिशील आहेत.

संबंधित बातम्या