स्वदेशी वसाहतवादाची लाट

प्रकाश पवार
सोमवार, 19 एप्रिल 2021

राज-रंग

स्वदेशी वसाहतवाद लोकांच्या सार्वत्रिक हितसंबंधांच्या विरोधात भूमिका घेतो, हेच स्वदेशी वसाहतवादाचे आणि स्वदेशी वसाहतवादाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांचे राजकारण असते.

महाराष्ट्राला लशीचा पुरवठा कमी प्रमाणात होतो, अशी तक्रार होते आहे, आणि दिवसेंदिवस ती वाढत चालली आहे. या तक्रारीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील सत्तेची चढाओढ दिसून येते. परंतु त्याबरोबर स्वदेशी वसाहतवाद विरुद्ध लोक असाही संघर्ष उभा राहिलेला दिसतो. लोक विरुद्ध स्वदेशी वसाहतवाद या मुद्द्यावर सर्वात आधी संघर्षाला सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झालेली होती. स्वातंत्र्योत्तर काळात देखील स्वदेशी वसाहतवाद विरुद्ध लोक अशी चर्चा झाली. म्हणजे स्वदेशी वसाहतवाद लोकांच्या सार्वत्रिक हितसंबंधांच्या विरोधात भूमिका घेतो, हेच स्वदेशी वसाहतवादाचे आणि स्वदेशी वसाहतवादाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांचे राजकारण असते.

स्वदेशी वसाहतवादाची कथा
स्वदेशी वसाहतवादाच्या कथा अनेक आहेत. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर पन्नाशीच्या दशकात ‘स्वदेशी वसाहतवाद’ हा शब्दप्रयोग यशवंतराव चव्हाण यांनी वापरला होता, ती एक महत्त्वाची कथा आहे. त्यांनी हा शब्दप्रयोग राजकीय तसेच आर्थिक अर्थाने वापरला होता. हा शब्दप्रयोग त्यावेळी मोरारजीभाई देसाई यांच्या राजकारणाला विरोध म्हणून वापरला गेला होता. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांनी लोक विरोधी अर्थकारणाला विरोध म्हणून हा शब्दप्रयोग वापरला होता. अर्थात ते राजकारण स्वदेशी वसाहतवादाचे होते. त्यानंतरच्या काळात नव्वदीच्या दशकामध्ये जागतिकीकरणाच्या संदर्भात वसाहतवाद हा शब्द वापरला गेला. त्याकाळात स्वदेशी भांडवलदारांना जागतिकीकरण प्रक्रिया घडावी असे तीव्रतेने वाटत होते. भारतात जागतिकीकरणा विरोधी आंदोलने झाली. स्वदेशी भांडवलदारांच्या खुल्या स्पर्धेच्या तत्त्वाच्या विरोधात ही आंदोलने झाली होती. स्वदेशी भांडवलदारांनी जागतिकीकरणाचा पुरस्कार केला. गेल्या एक वर्षापासून स्वदेशी वसाहतवाद कोरोना साथीच्या अनुषंगाने उभा राहिला. स्वदेशी वसाहतवाद हा समता, बंधुभाव, समन्यायी वितरण अशी मूल्य नाकारतो, अशी चर्चा भारत स्वतंत्र झाल्यानंतर सतत झाली आहे. त्याचे हे तीन संदर्भ आहेत. यातील शेवटचा संदर्भ आजच्या काळातील आहे. विशेषतः गेल्या एक आठवड्यापासून या स्वदेशी वसाहतवादाची चर्चा खासगीमध्ये होते आहे. वृत्तपत्रे देखील या विषयावर चर्चा करीत आहेत. महामारीच्या काळात राष्ट्रवाद आणि स्वदेशी वसाहतवाद नसावा अशी भूमिका महाराष्ट्रातून पुढे आली आहे.

राष्ट्रवादाचा गुंता
‘लस घ्या आणि लसवंत व्हा,’ अशी जाहिरात केली जाते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरून लस महोत्सव साजरा होतो आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न वेगळ्याच पद्धतीने उभा राहिला आहे. त्याची काही निवडक उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. एक, महाराष्ट्राला लस कमी प्रमाणात मिळते आहे, अशी तक्रार सत्ताधारी पक्ष गेल्या दोन महिन्यांपासून करतो आहे. यावर प्रतिक्रिया म्हणून विरोधी पक्षनेते ‘लशीचे राजकारण करू नका’ अशी भूमिका मांडत आहेत. लशीचे राजकारण सत्ताधारी पक्ष करतो आहे की विरोधी पक्ष करतो आहे हा सध्या महाराष्ट्रामधला एक प्रचंड गुंतागुंतीचा प्रश्न आहे. महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये देखील आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. यामुळे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या विरोधात राजकारण करते का केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारच्या विरोधात राजकारण करते असाही एक गुंतागुंतीचा प्रश्न पुढे आलेला आहे. दोन्ही पक्षांच्या समर्थकांसाठी, त्यांच्या त्यांच्या निष्ठांशी हा प्रश्न संबंधित आहे; त्यांच्या त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणाशी संबंधित आहे. 

पक्षीय पातळीवरील सत्तास्पर्धा म्हणून हे राजकारण घडणार ही वस्तुस्थिती आहे. परंतु मुद्दा यापेक्षा वेगळा आहे. स्वदेशी वसाहतवाद आणि राष्ट्रवाद अशा गोष्टीचे मिश्रण आजच्या काळात शक्य आहे का? असा तो मुद्दा आहे. दोन, महाराष्ट्रातील लसीकरण केंद्रांवरती बंदच्या पाट्या लावलेल्या होत्या. यामुळे पुन्हा नव्याने एक प्रश्न निर्माण झाला. तो म्हणजे लस मोठ्या प्रमाणावरती तयार करण्यासाठी हाफकिन या संस्थेला अधिकार देण्यात यावेत. खासगी कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीच्या सूत्राचा निर्णय सरकारने सार्वजनिक हिताच्या संदर्भात करायला हवा असा विचार महाराष्ट्रातून मांडला गेला. परंतु त्यावर सरकारी पातळीवर निर्णय झाला नाही. पुन्हा मुद्दा तोच आहे राष्ट्र-राज्याचे हितसंबंध महत्त्वाचे आहेत की स्वदेशी वसाहतवादाचे हितसंबंध महत्त्वाचे आहेत. देश आणि देशातील लोक हे राष्ट्र राज्याचे घटक आहेत. देश आणि देशातील लोकांच्या तुलनेत स्वदेशी कंपन्या हा मुद्दा वेगळा आहे. 

स्वदेशी कंपन्या देश आणि देशातील लोकांच्या तुलनेत दुय्यम स्थानावर आहेत. परंतु एकूण निर्णय प्रक्रियेवरती स्वदेशी वसाहतवादाचा प्रचंड प्रभाव पडलेला दिसतो. त्यामुळे ‘लसवंत व्हा’ आणि ‘लस महोत्सव’ हे कार्यक्रम स्वदेशी वसाहतवादी विचारांना पाठबळ देणार आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माणूस महत्त्वाचा आहे अशी कल्पना केली तर आर्थिक सुधारणांच्या युगामध्ये उपक्रमशील भांडवलदारांमध्ये खुली स्पर्धा असली पाहिजे. परंतु उपक्रमशील भांडवलदार या वर्गातील एका गटाच्या पाठीशी सरकार आणि दुसरा गट मात्र त्यापासून वंचित, असे चित्र उभे राहिले आहे. यामुळे खुल्या बाजारपेठेतून लस घेऊन ‘लसवंत’ होण्याचा अधिकार राहिलेला नाही. जीविताचे रक्षण हा एक अधिकार आहे. मानवी जीवित हे मानवी संसाधन म्हणजे साधन संपत्ती आहे. या दोन्ही गोष्टीचे संरक्षण करण्यासंदर्भात अनागोंदी निर्माण झालेली आहे. या अनागोंदीचा पाया राष्ट्रवाद आणि स्वदेशी वसाहतवाद या दोन गोष्टींमध्ये आहे. भारतीय सत्तेचा हमरस्ता हिंदू हार्ट लँड मधून जातो. तसेच लसीकरणाचा हमरस्ता सध्यातरी सत्तेच्या हार्ट लँड मधून जातो. सत्तेची इच्छा असेल तर लसवंत होणे शक्य आहे. सत्तेचे स्वरूप कसे आहे यावर ती देखील लसीकरण प्रक्रिया अवलंबून आहे. थोडक्यात राष्ट्रवाद आणि स्वदेशी वसाहतवाद या दोन गोष्टी लसीकरणाची प्रक्रिया निश्चित करणारे आहेत. त्यांचे नियंत्रण या प्रक्रियेवरती आहे.

संबंधित बातम्या