अ-स्वयंशिस्त राजकारणाची ज्ञानगंगा

प्रकाश पवार
मंगळवार, 27 एप्रिल 2021

राज-रंग

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एकूण राजकारण सैरभैर झालेले दिसत आहे. याचे कारण स्वयंशिस्त पाळण्याची परंपरा दिसत नाही. लोक, राजकीय नेते राजकीय पक्ष यांनी ‘अ-स्वयंशिस्त’ या घटकाच्या अवतीभवती राजकारण घडवलेले दिसते. आजच्या काळातील राजकारणाची ही मुख्य कथा झाली आहे. 

शिस्त आणि बेशिस्त ही परस्पर विरोधी दोन टोके आहेत. राजकारणात शिस्त आणि बेशिस्त यांना महत्त्व नसते. राजकारणात स्वयंशिस्तीला जास्त महत्त्व असते. राजकारणाला स्वयंशिस्त लावावी लागते, अशी भूमिका महात्मा गांधी यांनी सतत घेतली होती. राजकारणाला स्वयंशिस्त नसेल तर राजकारण नियंत्रणाच्या बाहेर जाते. ‘अ-स्वयंशिस्त’ हाच राजकारणाचा एक आधार बनतो. ‘अ-स्वयंशिस्त’ म्हणजे बेशिस्त नव्हे, परंतु तिथे स्वयंशिस्तीची घडी विस्कटलेली असते. आजकाल महाराष्ट्रातील आणि भारतीय राजकारण ‘अ-स्वयंशिस्त’ या घटकाच्या अवतीभवती  फिरत आहे. केवळ राजकीय पक्ष आणि राजकीय नेते यांना शिस्त असणे/ लावणे पुरेसे आहे, इतकाच याचा अर्थ मर्यादित नाही. राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांच्या बरोबर कार्यकर्ते आणि जनता यांना देखील राजकीय स्वयंशिस्त असावी लागते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एकूण राजकारण सैरभैर झालेले दिसत आहे. याचे कारण स्वयंशिस्त पाळण्याची परंपरा दिसत नाही. उदाहरणार्थ बाजारपेठा, धार्मिक उत्सव, जत्रा-यात्रा इत्यादी. यामुळे ‘अ-स्वयंशिस्त’ या घटकाच्या अवतीभवती लोक, राजकीय नेते आणि राजकीय पक्ष यांनी राजकारण घडवलेले दिसते. आजच्या काळातील राजकारणाची ही मुख्य कथा झाली आहे. 

लोक राजकारणाचा स्रोत 
लोक हा घटक राजकारणाचा एक मुख्य स्रोत असतो. त्या लोकांची प्रतिमा समाजशील प्राणी आणि विवेकी प्राणी अशी कल्पिली जाते. जनतेकडे विवेकबुद्धी असते. हा मुद्दा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये दिसत नाही. सरकार लोकांना स्वयंशिस्त पाळण्याची विनंती करत आहे. परंतु लोक स्वयंशिस्त पाळत नाहीत. लोक आर्थिक कारणे देऊन रस्त्यावर उतरले. म्हणजेच ‘समाजशील प्राणी आणि विवेकशील प्राणी’ या गोष्टीवर ‘मानव हा आर्थिक प्राणी आहे’, या गोष्टीने मात केली. सरकारने लोकांचे काही आर्थिक प्रश्नही सोडवले. तरीही लोक झुंडीने एकत्र येत आहेत. आर्थिक प्रश्नांपेक्षाही लोकांना रस्त्यावरती येणे जास्त महत्त्वाचे वाटते. भारतीय राजकारणात रस्त्यावरती येणे आणि झुंडीने राहणे यास बऱ्यापैकी अवकाश उपलब्ध आहे. हा एक गुण लोकांमध्ये सुप्त अवस्थेत कायमस्वरूपी आढळतो. त्यावरती विवेकाने मार्ग काढावा लागतो. यासाठी लोकांना शिस्त लावावी लागते. भारतीय राजकारणात लोकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न झाला नाही. मास बेस राजकारणाच्या ऐवजी १९९० नंतर केडर बेस राजकारण सुरू झाले. तरीही लोकांना ‘स्वयंशिस्त’ या प्रकारचे राजकारण करता आले नाही. महात्मा गांधी यांनी मात्र राजकारणाला शिस्त लावली होती. राजकारणाला शिस्त लावणे म्हणजे लोकांना शिस्त लावणे होय.  
चौरीचौरा येथे सत्याग्रहींनी अहिंसेची स्वयंशिस्त पाळली नाही म्हणून महात्मा गांधी यांनी आंदोलन मागे घेतले होते. असे उदाहरण समकालीन काळात दिसत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोक निर्बंध असताना देखील रस्त्यांवरती फिरतात. एवढेच नव्हे तर ज्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, असे लोक देखील मास्कचा वापर न करता घराबाहेर पडतात. ही काही निवडक उदाहरणे असली तरी अशा अ-शिस्तबद्ध लोकांना हाताशी धरून राजकारण केले जाते. त्यामुळे लोक ही राजकारणातील धारणा आज-काल भुसभुशीत झालेली दिसते. 
राजकीय नेते 
राजकीय नेतृत्वाचा एक मोठा गुण म्हणजे त्यांना एखाद्या प्रश्नावर सहमती निर्माण करता येते. यामुळे लोकांच्या प्रमाणे राजकीय नेते हे देखील राजकारणाचा एक मोठा स्रोत आहेत. परंतु राजकीय नेते मतभिन्नतेमध्ये गुंतलेले आहेत. मतभिन्नता आणि मतैक्य यातील सीमारेषा पुसट झाली आहे. राजकीय नेते लोकांमधून पुढे येतात. लोक हीच संकल्पना आज काल भुसभुशीत असल्यामुळे कचखाऊ राजकीय नेतृत्व उदयाला आलेले आहे. नेतृत्व आणि लोक यांच्यातील संवाद तुटलेला आहे. राजकीय नेतृत्व त्यांचे पाठीराखे असलेल्या लोकांचा देखील विचार करत नाही. यामुळे विरोधासाठी विरोध हे सूत्र राबवले जाते. सोशल मीडियावरती राजकीय नेतृत्वाची प्रतिमा नायक म्हणून पुढे येत नाही. सरसकट सर्व राजकीय नेत्यांच्या प्रतिमा जवळपास खलनायक म्हणूनच सोशल मीडियावरती पुढे येतात. 
नेतृत्वाला दूरदृष्टी असते. जो समाजाला पुढे घेऊन जातो, त्याच्याकडे नेतृत्व असते. या गोष्टी आज कालच्या राजकारणात लोप पावलेल्या आहेत. नेतृत्व लोकांना पुढे घेऊन जाण्याऐवजी भुसभुशीत समाजात रुतून बसलेले दिसून येते. यामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन करावा की नको याबद्दलच्या चर्चेत प्रचंड वेळ गेला. तरीही महाराष्ट्र सरकारला लॉकडाउन हा शब्दप्रयोग वापरता आला नाही. त्यांनी विरोधी पक्ष आणि कार्पोरेट व्यवस्थेला बरोबर घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथेही त्यांना अपयश आले. ही सर्वच उदाहरणे एक प्रकारची एका प्रश्नावरती सहमती निर्माण करता येत नाही ही दर्शविणारी आहेत. म्हणजेच ही उदाहरणे ‘अ-स्वयंशिस्त’ या घटकाशी संबंधित आहेत. ‘अ-स्वयंशिस्त’ हाच त्यांच्या दृष्टीने राजकीय सत्तेचा एक स्रोत आहे.
राजकीय पक्ष 
विवेकी राजकारणाला पक्षीय राजकारण सतत आव्हाने देते. राजकारणाला पक्षीय राजकारणामुळे स्वयंशिस्त लागत नाही. पक्षांतर हा यातील दृश्य रूपात दिसणारा घटक आहे. निवडणुकांच्या काळात पक्षांतरे होतात. परंतु अलीकडे वर्षभर पक्षांतरे सुरू असतात. तसेच राजकीय पक्ष सत्तेत आणि विरोधात यापैकी कोठे आहेत? हेच समजत नाही. सत्तेत असणारे पक्ष विरोधी पक्षांचे काम करतात. तर विरोधी पक्षातील लोक सत्ताधारी पक्षाचे काम करतात. हे सार्वत्रिक सत्य जवळजवळ गेले दशकभर दिसून आले. सत्तारूढ पक्षाला एक शिस्त असते. तशीच विरोधी पक्षाला देखील एक शिस्त असते. हीच शिस्त मोडली गेली आहे. त्यामुळे एकूण लोककल्याणासाठी विरोधी पक्षाने काम करायच्या ऐवजी विरोधी पक्ष केवळ सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करते. या ‘अ-स्वयंशिस्ती’च्या वाहत्या गंगेत सोशल मीडिया आणि कार्पोरेट व्यवस्था त्यांचे त्यांचे हितसंबंध जपत आहे. थोडक्यात ‘अ-स्वयंशिस्त’ हाच 
आजच्या राजकारणाचा मुख्य आधार झाला आहे.

संबंधित बातम्या