राजकीय क्षत्रिय संकल्पनेचे वरदान

प्रकाश पवार 
सोमवार, 24 मे 2021

राज-रंग

महाराष्ट्राचे राजकारण ‘क्षत्रिय’ आणि ‘क्षेत्रप’ या दोन संकल्पनांनी ढवळून काढलेले आहे. क्षत्रिय संकल्पनेचे राजकारण सातत्याने धामधुमीचे दिसते. त्या तुलनेत क्षेत्रप संकल्पनेबद्दल सामसूम आढळते. मराठा आरक्षणाच्या संदर्भात पुन्हा पुन्हा या दोन संकल्पनांच्या संदर्भात चर्चा होते. या दोन संकल्पनांची मांडणी आधुनिक पूर्व काळात झाली. तसेच या दोन्ही संकल्पनांचे अर्थ आधुनिक काळातही स्पष्ट केले गेले. या दोन संकल्पनांपैकी कोणत्या संकल्पनेची निवड आधुनिक काळात करावयाची? हा सातत्याने एक पेच निर्माण झालेला  दिसतो. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही एक ‘बिग स्टोरी’ आहे. 

क्षत्रिय संकल्पना
मध्यमवर्गीय लेखक व संशोधकांनी राजकारणाचा क्षत्रिय हा आखाडा तयार केला. क्षत्रिय या संकल्पनेने क्षत्रियत्वाचे राजकारण घडवले. उदाहरणार्थ, मध्ययुगापासून आधुनिक काळापर्यंत लेखकांची एक छावणी क्षत्रियत्व संकल्पनेची मांडणी करणारी दिसते. जयराम पिंडे यांनी ‘राधामाधवविलासचंपू’ हे काव्य लिहिलेले आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी क्षत्रियत्वाची संकल्पना मांडलेली आहे. नंतरच्या काळात वि.का. राजवाडे यांनी हे पुस्तक संपादित केले. त्या पुस्तकाला प्रस्तावना जोडली. त्यांनी त्या प्रस्तावनेत मराठ्यांचे दोन प्रकार कल्पिलेले आहेत. त्यांनी राज्यकर्त्या घराण्यांचा संबंध उत्तरेकडील क्षत्रियांशी जोडलेला आहे. गोपाळ दाजीबा दळवी यांनी मराठा कुळांचा इतिहास, भाग-१, २ व ३ छापले आहेत. त्यांनी भाग एकमध्ये जाधव घराण्याची कैफियत छापली. त्यांनी प्रस्तावनेमध्ये, ‘हल्ली प्रत्येक मराठा बंधूंची प्रवृती आपणास क्षत्रिय म्हणावे या गोष्टीकडे विशेष दिसून येत आहे.’ अशी एक विशेष नोंद केलेली आहे. म्हणजेच थोडक्यात आधुनिक काळात क्षत्रियत्वाचा दावा अति जलद गतीने केला गेला. अमरावती येथील के.बी. देशमुख यांनी ‘क्षत्रियांचा प्राचीन इतिहास’ हे पुस्तक १९२९ मध्ये लिहिले. या शिवाय ग्रँड डफ यांनी मराठ्यांमधील काही निवडक कुळांचे विवेचन केले होते. ग्रँड डफ यांनी सातारा येथील कागदपत्रांचा उपयोग केला होता. तसेच त्यांनी माने व घाटगे यांचे कुलवृत्तांत ही पाहिलेले होते. परंतु यावरून मुख्य: तीन संकल्पना पुढे येतात. एक, हे लेखन राजकीय सत्तेच्या अधिकाराला अधिमान्यता म्हणून लिहिले गेले होते. दोन, या लेखनामध्ये आधुनिक काळात प्रतिष्ठा हा नवीन मुद्दा सामील झाला. तीन, हे लेखन क्षेत्रप या संकल्पनेची काटेकोरपणे मांडणी करणारे नाही. उलट या लेखनामध्ये क्षेत्रप ही संकल्पना वगळण्यात आलेली आहे. त्यामुळे वरील पुस्तकांमध्ये कुणबी समाज आणि त्यांच्या इच्छा-आकांक्षा गहाळ झालेल्या आढळतात. यामुळे आधुनिक काळातील ‘क्षत्रिय’ या विषयावरील साहित्य क्षत्रिय आणि क्षेत्रप असा अबोल पद्धतीने भेदभाव करते. या गोष्टीचा विलक्षण प्रभाव महाराष्ट्रावरती पडलेला दिसतो. ही चौकट उघडपणे आणि शक्य नसेल तेव्हा अबोलपणे स्वीकारली जाते. हेच एक महत्त्वाचे राजकारण आज-काल घडत आहे. 

क्षेत्रप
‘क्षत्रिय’ आणि ‘क्षेत्रप’ या संकल्पना वेगवेगळ्या करून मांडण्याचे महत्त्वाचे काम संत तुकाराम महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. संत तुकाराम महाराज यांनी कुणबी ही संकल्पना ‘क्षेत्रपती’ म्हणून स्वीकारली. महात्मा फुले यांनी क्षेत्रप ही संकल्पना विकसित केली. या दोन्ही विचारवंतांनी क्षेत्रप या संकल्पनेची पुढील वैशिष्टे नोंदवली आहेत. एक, क्षेत्रप ही संकल्पना जमिनीशी संबंधित आहे. शेतीचे काम करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. त्यांना कुणबी, कुळवाडी, कुळंबीन अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. दोन, क्षेत्रप म्हणजे उत्पादक जाती समूह होय. तीन, क्षेत्रप हे बहुजन आहेत. संत तुकाराम महाराजांनी त्यांची ‘कुणबी’ म्हणजे शूद्र अशी व्याख्या केली. महात्मा फुले यांनी सरळ सरळ क्षत्रिय ही संकल्पना नाकारली. त्यांनी त्याऐवजी क्षेत्रप ही शेती व्यवसायाशी संबंधित संकल्पनेचा विकास केला. चार, संत तुकाराम महाराज आणि महात्मा फुले यांनी क्षेत्रप ही संकल्पना अहिंसा आणि मानवतावाद या दोन गोष्टींशी अंतर्गतपणे जोडलेली आहे. संत तुकाराम महाराज आणि महात्मा फुले यांची क्षेत्रप ही संकल्पना बौद्ध साहित्याशी साधर्म्य असणारी आहे. वासुदेवराव बिर्जे यांनी  ‘क्षत्रिय आणि त्यांचे अस्तित्व’ हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ १९०३ मध्ये प्रकाशित झाला. त्याचे परीक्षण चिंतामणराव वैद्य यांनी केले होते. ते १९०५ मध्ये ‘विविध ज्ञान विस्तार’मध्ये प्रकाशित झाले. तो ग्रंथ महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ ठरला. वासुदेवराव बिर्जेंचे दुसरे पुस्तक ‘हू वेअर द मराठाज्’ हे महत्त्वाचे होते. विसाव्या शतकातील पन्नाशीच्या दशकापासून पुढे क्षेत्रप या छावण्यांतील राजकारण कमी कमी होत गेले. 

पन्नासच्या दशकापासून लोकशाही राजकारण विस्तारत गेले. लोकशाही राजकारणात संख्याबळ महत्त्वाचे ठरले. त्यामुळे या दोन संकल्पनांपैकी कोणत्या संकल्पनेचे पुनरुज्जीवन करावयाचे? हा यक्षप्रश्न पुढे आला. यशवंतराव चव्हाण यांनी प्रत्यक्षपणे क्षेत्रप या संकल्पनेवर भर दिला. चव्हाण यांनी आखलेली चौकट महाराष्ट्रात नव्याने उदयास येणाऱ्या मध्यमवर्गाला मान्य झाली नाही. ही चौकट मार्क्सवादी, समाजवादी, आंबेडकरवादी पक्ष आणि गटाने मान्य केली. परंतु ही चौकट सत्तरीच्या दशकापासून पुढे नव्याने उदयाला येणाऱ्या मराठा मध्यमवर्गाला मान्य झाली नाही. त्यांनी स्थूल मानाने क्षत्रिय ही चौकट स्वीकारली. क्षत्रिय चौकट अंतिमतः हिंदुत्व राजकारणाचा एक भाग होत गेली. क्षत्रिय चौकटीने शुद्धतेचा अबोल पद्धतीने दावा केला. सामाजिक मानखंडना या चौकटीने स्वीकारली नाही. म्हणजेच स्वातंत्र्योत्तर काळातील जवळपास ७४ वर्षे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मूळ क्षेत्रप किंवा कुणबी समाज राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये लुप्त झालेला दिसतो. अशा लुप्त समाजाच्या नावाने राजकारण क्षत्रिय संकल्पना घडवते. 

लुप्त समाजाचा इतिहास संशोधकांना माहीत नाही. त्यांना तो शोधता येत नाही. कारण मराठा मध्यमवर्ग क्षत्रिय आणि हिंदुत्व या चौकटीशी जुळवून घेतो. त्यामुळे त्यांना लुप्त क्षेत्रप एक समूह आहे. याचे आत्मभानदेखील नाही. ही क्षत्रिय संकल्पना सत्ताधारी राजकीय पक्ष, विरोधी पक्ष, राजकीय नेते यांच्या वर्चस्वासाठी वरदान ठरली आहे. हे एक राजकीय शस्त्र आहे. परंतु शोषण मुक्तीच्या राजकारणाची क्षेत्रप संकल्पना पराभूत होत गेली. क्षेत्रप संकल्पना पराभूत झाली परंतु या संकल्पनेचे राजकारण सकारात्मक होते

संबंधित बातम्या