क्रांतीचा रंग फिकट

प्रकाश पवार
सोमवार, 31 मे 2021

राज-रंग

केरळमध्ये डाव्या पक्षांनी कामराज प्लॅनच्या जवळपास जाणारा प्रयोग केला आहे. या पुढच्या काळात हा प्रयोग ‘विजयन प्रयोग’ म्हणून ओळखला जाईल. या प्लॅनमुळे डाव्या पक्षांना जनाधार मिळेलच, परंतु तरीही या प्रयोगात पितृसत्ताक राजकारणाची चौकट आणि सत्तेवरील अंतिम नियंत्रण हे डाव्या पक्षांच्या विरोधात जाणारे दोन महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत.

पश्चिम बंगालमधील आणि त्रिपुरामधील डाव्यांचा प्रयोग निवडणुकीच्या राजकारणात आता जुना झाला. पश्चिम बंगालमध्ये भद्रलोकांचे वर्चस्व आणि घराणेशाही यामुळे सत्तेचे केंद्रीकरण झाले. त्रिपुराचा प्रयोग नवीन राजकीय आकांक्षाशी जुळवून घेण्यास अपयशी ठरला होता. यामुळे केरळमध्ये क्रांतिकारी निर्णय घेतला गेला. या दोन्ही प्रयोगांच्या नंतर केरळ राज्याने नवीन धोरण स्वीकारले. त्यांनी सत्तेतील भागीदारी फिरती ठेवण्याचा निर्णय घेतला. हा प्रयोग निवडणुकीच्या राजकारणासाठी महत्त्वपूर्ण आहे. नवीन युगामध्ये पक्षाचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी त्यांची ही उपक्रमशीलता दिसून येते. केरळ राज्यामध्ये कामराज प्लॅनच्या जवळपास जाणारा हा प्रयोग डाव्या पक्षांनी केला आहे, त्या प्रयोगास या पुढे ‘विजयन प्रयोग’ म्हणून ओळखले जाईल. या प्लॅनमुळे डाव्या पक्षांना जनाधार मिळेलच, परंतु तरीही या प्रयोगात पितृसत्ताक राजकारणाची चौकट आणि सत्तेवरील अंतिम नियंत्रण हे डाव्या पक्षांच्या विरोधात जाणारे दोन महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत.

पितृसत्ताक राजकारणाची चौकट 
केरळमध्ये राजकीय सत्तेच्या संदर्भात क्रांतिकारी निर्णय घेतला गेला. या निर्णयाची चतुःसूत्री पुढील प्रमाणे दिसून येते. एक, पिनाराई विजयन यांनी नवीन मंत्रिमंडळात संपूर्ण पुनर्रचना केली. त्यांनी सतरा नवीन चेहरे निवडले. केरळमध्ये डावी लोकशाही आघाडी ही उत्तरदायी म्हणून विकसित करण्याची तीव्र इच्छाशक्ती व्यक्त केली.मुख्यमंत्री पिनाराई विजयन वगळता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) मागील कार्यकाळातील कोणत्याही मंत्र्याला मंत्रिमंडळात घेतले नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) चारही मंत्री नवीन आहेत. आठ मंत्री पहिल्यांदा आमदार झालेले आहेत. दोन, मंत्रिमंडळाच्या रचनेत राज्यातील सामाजिक विविधता प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न झाला आहे. तीन, विशेषतः दोन स्त्रियांना, प्रा. बिंदू व वीणा जॉर्ज यांना, मंत्रिमंडळात घेतलेले आहे. माकपने केरळमधील सामाजिक पायाची महत्त्वपूर्ण किंमत देऊन पुनर्रचना केली आहे. मंत्रिमंडळ निवडीच्या माध्यमातून या प्रवृत्तीला आणखी बळकटी देत ​​आहे. चार, सेंट्रल त्रावणकोरमधील ख्रिश्चन मतदारांना पक्षाकडे वळवण्याबद्दल वीणा जॉर्ज आणि साजी चेरियन यांना मंत्रिमंडळात घेतलेले आहे, असे सुस्पष्टपणे दिसते. एका अर्थाने हे त्यांना राजकीय बक्षीस दिले आहे.  
युवक आणि अनुभवांचे विवेकी मिश्रण मंत्रिमंडळात केलेले दिसून येते. माकपने  मतदारांना नवीन संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु यातून एक मोठी मर्यादा दिसून आली. अर्थातच ही मर्यादा पितृसत्ताक राजकारणाची आहे. कारण आरोग्यमंत्री म्हणून चर्चेत राहिलेल्या के.के. शैलजा यांना वगळण्यात आले. मोठ्या फरकाने विजय मिळविल्यानंतर, कोरोना साथीच्या विरुद्ध त्यांनी सातत्याने पुढे काम करावे अशी अपेक्षा होती. त्यांना वगळणे म्हणजे  सत्तेची भाकरी फिरविण्यासारखे आहे. या फेरबदलांना विजयन प्लॅन म्हणून ओळखले जाईल. परंतु मुख्य प्रश्न म्हणजे के. के. शैलजा यांचे नेतृत्व रोखण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. डाव्या पक्षांमध्ये स्त्री-पुरुष भेदभाव राजकीय सत्तेच्या संदर्भात केला जातो. हा भेदभाव करण्याची परंपरा केरळमध्ये जुनीच आहे. या आधी गौरी अम्मा आणि पक्ष यांच्यामध्ये राजकीय संघर्ष झाला होता. गौरी अम्मा यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले होते. गौरी अम्मा यांचे नेतृत्व चळवळीमधून घडलेले होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर काळातील साम्यवादी चळवळीत त्या कृतिशील होत्या. जमीन सुधारणा क्षेत्रात त्यांनी मैलाचा दगड ठरणारे काम केले होते. १९८७च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून त्यांचा प्रचार केला गेला. ‘के. आर. गौरी नारळाच्या झाडाच्या भूमीवर राज्य करेल’ अशी घोषणा तेव्हा वापरली गेली होती (‘Keram tingum Kerala naadu K R Gouri bharicheedum’ - translating to ‘K R Gouri will rule the land of coconut trees). त्यानंतर पक्षाने त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्या मुख्यमंत्री झाल्या नाहीत. हीच कथा शैलजा यांच्या संदर्भात घडलेली आहे. त्यामुळे डाव्या पक्षांची गौरी अम्मा आणि शैलजा यांच्याबद्दलची भूमिका पितृसत्ताक राजकारणाची दिसते. ही गोष्ट त्यांच्या क्रांतिकारी निर्णयाची लक्ष्मणरेषा ठरते. 

सत्तेवर नियंत्रण
सत्तेवर एका व्यक्तीचे नियंत्रण ठेवण्याचा प्रयोग केला जातो. अशा प्रयोगाला ऑटोक्रसी शासन म्हणून ओळखले जाते. या स्वरूपाचा प्रयोग केरळमध्येदेखील घडून आला आहे. त्याची तीन वैशिष्ट्ये दिसतात. एक, व्यक्ती आणि पक्ष या दोन्हींपैकी पक्षाला प्राधान्य देण्यात आले असा युक्तिवाद केला जात आहे. यामुळे पक्षाने  व्यक्तींपेक्षा संघटनेला प्राधान्य देऊन केवळ नवीन चेहरे मंत्रिमंडळात घेतले.  या प्रकारच्या निवडीमुळे मंत्रिमंडळातील सर्व सत्ता आणि अधिकार विजयन यांच्या हाती एकवटली जाणार आहे. दोन, नवीन मंत्रिमंडळात खुलेपणाने चर्चा करण्यास मर्यादा येणार आहे. कोणत्याही विषयावरील मुक्त चर्चा करणे अवघड असेल. कारण सर्व मंत्री नवीन आहेत. पक्ष आणि सरकार यांच्यावर विजयन यांची संपूर्ण सत्ता निर्माण होणार आहे. तीन, विशेषतः विजयन हे चळवळीतून घडलेले नेतृत्व नाही. त्यांचे नेतृत्व प्रशासनातून पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यांचा दृष्टिकोन जागतिकीकरणाला केरळच्या संदर्भात नवीन आकार देण्याचा आहे. यामुळे मध्यमवर्ग आणि नोकरशाही यांच्यावरती विजयन यांची सत्ता अवलंबून असणार आहे. नवीन काळातील मध्यमवर्ग, प्रशासन, जागतिक अर्थकारण यांचा प्रभाव एका बाजूला दिसतो. तर दुसऱ्या बाजूने सत्तेचे सामाजिक संदर्भात फिरते स्वरूप दिसते. अशा दोन्ही गोष्टी आजच्या काळाच्या संदर्भात औचित्यपूर्ण आहेत. परंतु तरीही गौरी अम्मा आणि शैलजा अशा कार्यक्षम महिला नेतृत्वाला सामाजिक न्याय मिळण्याबद्दलचा प्रश्न शिल्लक राहिलेला दिसून येतो. हीच डाव्यांच्या क्रांतिकारी राजकीय प्रयोगाची लक्ष्मणरेषा आहे. तसेच ही क्रांतीची मर्यादा आहे. लाल क्रांतीचा रंग फिकट दिसू लागतो.

संबंधित बातम्या