सत्तेच्या चौकटी

प्रकाश पवार
सोमवार, 21 जून 2021

राज-रंग

जितीन प्रसाद यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर केले, तसेच मुकुल रॉय यांनी भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये पक्षांतर केले. आजकाल पक्षांतर सरतेशेवटी सत्तेसाठी केले जाते, हा प्रघात आहे. या आधी नगर जिल्ह्यातल्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांनीही पक्षांतर केले होते. तेदेखील सत्तेच्या संदर्भातील होते. पण निलेश लंके आणि जितीन प्रसाद, मुकुल रॉय यांच्या पक्षांतरामध्ये नेमका कोणता फरक आहे?

प्रशांत किशोर हे नीतिश कुमार यांच्या पक्षात होते. त्यांनीही पक्ष सोडला होता. आता ते निवडणूक सल्लागार आहेत. निलेश लंके आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये नेमका फरक कोणता आहे? यामध्ये सत्तेचे दोन प्रकार आहेत, असे दिसते. या सत्तेच्या चौकटी आहेत. त्या सत्तेच्या चौकटी परस्परविरोधी आहेत. एक सत्तेचा प्रकार आदर्शवादी आहे. त्यास सत्तेचा ‘युटोपिया’ म्हटले जाते. तर सत्तेचा दुसरा प्रकार वर्चस्वशाली असतो. म्हणून त्यास सत्तेचा ‘डिस्टोपिया’ म्हटले जाते. राजकारणात ही चर्चा नायक-खलनायक (युटोपिया-डिस्टोपिया) या दोन चौकटीमध्ये घडते.     

सत्तेची डिस्टोपिया चौकट
पक्ष आणि नेतृत्व काही काळ आदर्श ठरते. याची दोन उदाहरणे आहेत. एक, पन्नाशीच्या दशकात काँग्रेसची सत्तेची संकल्पना युटोपियावाचक होती. परंतु ऐंशीच्या दशकानंतर कॉंग्रेस पक्षाची सत्तेची धारणा डिस्टोपिया चौकटीकडे वळली. दोन, नव्वदीच्या दशकात लालूप्रसाद यादव यांनी सत्तेची स्पर्धा सुरू केली, तेव्हा त्यांची सत्तेची धारणा आदर्शवाचक होती. परंतु एकविसाव्या शतकातील दोन्ही दशकात त्यांची सत्तेची संकल्पना लोकांना कटकारस्थान वाटू लागली. ही गोष्ट हिंदी चित्रपटातील नायक आणि खलनायकही अशा दुहेरी भूमिकेसारखी आहे. या मुद्द्याची चर्चा उमेदवारांचे वाटप आणि मंत्रिमंडळातील सत्ता वाटपाच्या संदर्भात  सतत घडते. उदाहरणार्थ, लालूप्रसाद यादव यांच्या काळातील सत्तेला ‘जंगलराज’ म्हटले जाते. सत्तेचा डिस्टोपिया असा आकाराला येतो. 

सत्तेचा युटोपिया सत्ता वंचित समूहातून पुढे येतो. तो राजकीय सहभागाचा एक संकल्प असतो. तर सत्तेसाठीची स्पर्धा ही सत्ताधारी समूहांमध्ये वर्चस्वासाठी घडते. तो सत्तेचा डिस्टोपिया हा प्रकार असतो. थोडक्यात डिस्टोपिया हा सत्तेचा भ्रष्ट प्रकार आहे. कारण त्यामध्ये प्रचंड भय, असंवेदनशीलता, अनैतिकता, असंवैधानिकता, दुष्टप्रवृत्ती अशा गोष्टींचा जन्म होतो. दुसऱ्या भाषेत ‘बळी तो कान पिळी’ हा सत्तेच्या डिस्टोपियाचा राजकीय व्यवहार ठरतो. ही धारणा वर्चस्वशाली पक्ष आणि नेतृत्वाची होते. त्यामुळे पक्षाची व नेतृत्वाची हळूहळू घसरण होते. अशा वेळी वर्चस्वासाठी पक्षांतराची घसरण सुरू होते. या प्रकाराला बोली भाषेत ‘भ्रष्ट सत्ता’ म्हणून ओळखले जाते. जितीन प्रसाद व मुकुल रॉय यांच्या पक्षांतराच्या मुळाशी हा व्यवहार दिसतो.  

सत्तेची युटोपिया चौकट
सत्तेची दुसरी चौकट युटोपिया ही आहे. बदल करण्यासाठी एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला जातो. काही आदर्शवादी राजकीय नेते सत्तेचा व्यवहार या चौकटीत करतात. यांची दोन उदाहरणे आहेत. एक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही चौकट कसोशीने पाळली होती. परिवर्तनाच्या त्यांच्या इच्छाशक्तीला युटोपिया म्हणून ओळखले जाते. दोन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या विचारांच्या आधारे बहुजन वंचित आघाडी वंचितांच्या सत्तेचा आदर्श राजकीय प्रक्रियेत मांडला जातो. या चौकटीत सत्तेच्या युटोपियाची अनेक उदाहरणे राजकारणात दिली जातात. ‘भाकरी फिरवा नाही तर करपते’ ही उपमा लोकांना समजेल अशा भाषेत वापरली जाते. थोडक्यात प्रतिनिधी बदला असा याचा अर्थ आहे. एका अर्थाने हा  सत्तेचा युटोपिया म्हणून विकसित होत आहे.

या प्रक्रियेची महाराष्ट्रात दोन उदाहरणे दिसून आली आहेत. एक, सत्तेचा युटोपिया शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या बाविसाव्या वर्धापन दिनानिमित्त मांडला. सत्ता एकाच ठिकाणी राहिली तर ती भ्रष्ट होते. म्हणजेच सत्तेचे केंद्रीकरण भ्रष्टतेचे लक्षण आहे. सत्ता भ्रष्ट होऊ द्यायची नसेल तर ती अधिक लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे. याचा अर्थ सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. असे घडले तर समाजातील प्रत्येक घटकाला आपण सत्तेतील वाटेकरी आहोत असे वाटेल. थोडक्यात सत्तेत वंचित समूहांना भागीदारी द्यावी. त्यामुळे पक्षाला अधिक लोकांचा पाठिंबा मिळेल. म्हणजे पक्षाचा विस्तार होतो आणि पक्षाला पाठिंबा मिळतो. दोन, सत्तेचा संघर्ष सत्ताधारी आणि सत्ता वंचित समूह अशा दोन गटांमध्ये सुरू असतो. ही गोष्ट महाराष्ट्राच्या २८८ मतदारसंघात दिसते. या चौकटीतील उदाहरण पारनेर मतदारसंघात निलेश लंके यांनी घडवलेले दिसते. हे उदाहरण गेल्या एक वर्षापासून भारतभर लोकप्रिय झाले आहे. 

निलेश लंके जीवन पद्धती साध्या स्वरूपाची आहे. त्यांच्या मतदार संघात भाळवणी येथे त्यांनी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमुळे त्यांनी नेतृत्वाची शैली आदर्श स्वरूपाची विकसित केली. त्या नेतृत्वाच्या शैलीचे वर्णन ‘फकिरी स्वरूपा’ची म्हणून केले जाते. त्यांचा सत्ता मिळवण्याचा प्रकार ‘परिवर्तनवादी’ या अर्थाने आदर्शवादी आहे. तसेच भारतीय राजकारणात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची एक राजकारणाची शैली विकसित झाली आहे. अलीकडेच ते सध्या शरद पवार यांना भेटले. निलेश लंके आणि प्रशांत किशोर यांच्या मार्गांमध्ये भिन्नता दिसते. निलेश लंके वंचितांची भागीदारी आणि वंचितांसाठी सार्वजनिक धोरणाची आखणी असा एकत्रित विचार करतात, तर प्रशांत किशोर हे वंचितांसाठी योजना राबवण्याचा विचार मांडतात. हा महत्त्वाचा फरक दोघांमध्ये दिसतो. हा सत्तेचा युटोपिया आहे. एका अर्थाने हे सत्तेचे परिवर्तनशील स्वरूप आहे. ही प्रक्रिया भारतीय राजकारणात घडत आहे. परंतु या प्रक्रियेची फार दखल घेतली जात नाही. तरीही निलेश लंके आणि प्रशांत किशोर यांना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.  

सत्तेच्या युटोपिया अंतर्गत प्रचंड संघर्ष आणि तणाव असतो. उदाहरणार्थ,  केरळमध्ये डावे कार्यकर्ते स्त्रीमुक्तीची भाषा बोलतात. महिलांना राजकीय भागीदारी आणि सत्तेतील भागीदारी मिळाली पाहिजे अशी त्यांची वैचारिक भूमिका होती. अशा प्रकारच्या भूमिकेमुळे डाव्या पक्षांच्या काही स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांमध्ये विवाह झाले. परंतु विवाहानंतर संसार किंवा राजकारण या3पैकी एक असा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला जातो. हा केरळचा इतिहास फार जुना आहे. परंतु या उदाहरणावरून सत्तेचा युटोपिया पूर्णपणे क्रांतिकारक नसतो असे दिसते. थोडक्यात निष्कर्ष म्हणजे सत्तेच्या युटोपियातून डिस्टोपिया सत्ता प्रकार तयार होतो.

संबंधित बातम्या