तिसरी ताकद

प्रकाश पवार
सोमवार, 28 जून 2021


राज-रंग

एकविसाव्या शतकामध्ये आरंभी आघाड्यांचा प्रयोग झाला. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुस्पष्ट बहुमत मिळाले. ही दुसरी महत्त्वाची घडामोड होती. त्यानंतर आता तिसरी घडामोड घडण्यासाठी एक ताकद संघटित होत आहे. त्याचे वर्णन ‘गैरभाजप’ व ‘गैरकाँग्रेस’ असे केले जाते. 

भारतीय राजकारण वरवर स्थिर आणि भक्कम दिसत आहे. परंतु पश्चिम बंगाल, केरळ आणि तमिळनाडू या तीन राज्यांच्या निवडणुकांच्या नंतर दोन महत्त्वाच्या राजकीय घडामोडींनी वेग घेतला. एक, प्रस्थापित राजकारणाची डागडुजी सुरू झाली. दोन, पर्यायी राजकारणाची फेरमांडणी सुरू झाली. या दोन्ही घडामोडी सध्या घडताना दिसतात. या दोन्ही घडामोडींमुळे प्रादेशिक पक्षांचे व प्रादेशिक नेतृत्वाचे महत्त्व पुन्हा एकदा वाढलेले दिसते. प्रादेशिक पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये पुन्हा नव्याने जुळवाजुळवी  सुरू झाली. तसेच प्रादेशिक पक्षांच्या मदतीने गैरभाजप व गैरकाँग्रेस हे प्रारूप विकसित होत आहे. 

भाजपची धामधूम

भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजप आणि प्रादेशिक पक्षांमध्ये अंतर पडत चालले होते. परंतु नंतरच्या काळात भाजप आणि प्रादेशिक पक्ष यांच्यामध्ये नव्याने वाटाघाटी सुरू झाल्या. या क्षेत्रातील तीन उदाहरणे सहजासहजी पुढे आली आहेत. एक, बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षात जवळजवळ फूट पडली आहे. लोकजनशक्तीचे पशुपती पारस आणि चिराग पासवान यांच्यात राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. चिराग पासवान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात नाहीत अशी त्यांची भूमिका आहे. हीच भूमिका चिराग पासवान यांनी निवडणुकीतदेखील घेतलेले होती (‘मोदी हे राम, मी त्यांचा हनुमान’). चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस यांनी सहापैकी पाच खासदार आपल्या बाजूला वळवले आहेत. त्यांनीही भाजपशी जुळवून घेतले आहे. म्हणजे नितीश कुमार व चिराग पासवान आणि पशुपती पारस व चिराग पासवान यांच्यात संघर्ष असला तरी हे तीनही नेते भाजपचे नियंत्रण मान्य करत आहेत. नीतीश कुमार आणि पशुपती पारस यांचा संघर्ष चिराग पासवान यांच्याशी आहे. परंतु या प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेण्याची क्षमता भाजपने विकसित केली आहे. प्रादेशिक पक्ष त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांसाठी भाजपबरोबर जुळवून घेत आहेत. 

दुसरे महत्त्वाचे उदाहरण महाराष्ट्रामधून पुढे येऊ लागले आहे. कारण प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घेण्याचा विचार मांडला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भाजपशी जुळवून घेतले नाही तरी प्रताप सरनाईक सारखे नेते नवीन दिशा स्वीकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गोष्टीचा एक भाग म्हणून चंद्रकांत पाटील यांनी प्रताप सरनाईक यांना सच्चे शिवसैनिक असे म्हटले आहे. शिवाय भाजपने शिवसेनेची प्रतिमा ‘सोनिया सेना’, ‘नैसर्गिक हिंदुत्वापासून दूर जाणारी’ अशी अधोरेखित केली आहे. एवढेच नव्हे तर दोन्ही काँग्रेसचा विस्तार शिवसेना करते, तसेच धर्मनिरपेक्षता आणि अल्पसंख्यांकांचा अनुनय हा मुद्दा भाजपने प्रचारात आणलेला आहे. थोडक्यात उद्धव ठाकरे प्रणीत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या खेरीजची शिवसेना असा फरक महाराष्ट्रात होऊ लागला आहे. 

तीन, उत्तर प्रदेशात राजकारणात बदल दिसू लागले. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यात चर्चा घडल्या. यानंतर उत्तर प्रदेशातील प्रादेशिक पक्षांचे नेते भाजपबरोबर जुळवून घेऊ लागले. विशेषतः काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असला तरी तो उत्तर प्रदेशाच्या संदर्भात फार महत्त्वाचा पक्ष नाही. परंतु त्या पक्षातील नेतृत्वाने भाजपत पक्षांतर केले. तसेच अनुप्रिया पटेल यांचा पक्ष केंद्रातील सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. या सर्व उदाहरणांवरून भाजप आणि प्रादेशिक पक्ष यांच्यामध्ये नवीन संदर्भात जुळवाजुळवी सुरू झाली आहे. यामुळे राजकारणाचा चेहरा बदलण्याची शक्यता निर्माण झाली. 

पर्यायी राजकारणाची जुळणी

नरेंद्र मोदी यांना राजकीय पर्याय उभा करण्याची चर्चाही सुरू झाली आहे. राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांना पर्याय होऊ शकत नाहीत, अशी भूमिका प्रादेशिक पक्षांमध्ये मांडली जात आहे. एवढेच नव्हे तर नरेंद्र मोदींना पर्याय उभा करताना गैरकाँग्रेसवाद असाही विचार स्वीकारावा, अशी मांडणी केली गेली आहे. म्हणजे थोडक्यात भाजप व काँग्रेस वगळून प्रादेशिक पक्षांची आघाडी करण्याचा विचार पुढे आला. हा मुद्दा विशेषतः बिहार मधून पुढे आलेला आहे. प्रशांत किशोर हे निष्णात निवडणूक रणनीतीकार आहेत. त्यांनी हा मुद्दा मांडला आहे. गेली दहा वर्षे प्रशांत किशोर निवडणुकांची रणनीती ठरवीत आहेत. दहा वर्षानंतर त्यांच्याही राजकीय आकांक्षा उंचावल्या आहेत. यामुळे बिहार मधून प्रशांत किशोर यांचे नवीन नेतृत्व पुढे येण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी पंजाब, गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांची निवडणूक रणनीती निश्चित केली होती. त्यामुळे त्यांचा अनुभव या क्षेत्रातील महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रक्रियेतून प्रशांत किशोर यांचे लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याशी देवाणघेवाणीचे संबंध निर्माण झाले आहेत. 

थोडक्यात नरेंद्र मोदींना पर्याय उभा करण्यासाठी प्रादेशिक पक्ष आणि निवडणूक रणनीती तज्ज्ञ अशा दोन घटकांचा समझोता घडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या घडामोडी सरळ, साध्या आणि सोप्या नाहीत. परंतु भारतीय राजकारणामध्ये प्रशांत किशोर यांची एक नवीन इच्छाशक्ती आहे. त्यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. ही गोष्टदेखील दुर्लक्षित करता येत नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील खासदारांची प्रतिमा अनेक वर्षे ‘मौनी खासदार’ अशी होती. परंतु संसदीय कामकाजामध्ये महाराष्ट्रातील खासदार कृतिशील झालेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे खासदार संसदीय कामकाजामध्ये सक्रिय आहेत. संसदीय कामकाजात सक्रिय भाग घेण्यामुळे राजकीय महत्त्वाकांक्षा उंचावलेल्या आहेत. उदाहरणार्थ सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची संसदेतील कामगिरी चांगली मानली जाते. सुप्रिया सुळे यांना अनेक वेळा संसदरत्न म्हणून स्थान मिळाले. त्यांचा संपर्क भारतभर सर्वत्र आहे. याची चर्चा आणि माहिती बरीच कमी उपलब्ध आहे. परंतु त्यांनी भारतभर संपर्क ठेवलेला आहे. विशेषतः प्रशांत किशोर, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे हे नेते हिंदी, मराठी बरोबर इंग्रजी भाषांवर वर्चस्व असणारे आहेत. यामुळे दक्षिण भारतामध्ये पर्यायी राजकारणाची गणिते जलद गतीने विकसित होण्याची शक्यता आहे. तसेच बिहार आणि उत्तर प्रदेश या हिंदी भाषिक प्रदेशात यादवांचे राजकारण आणि प्रशांत किशोरांचे राजकारण भाजप विरोधात पर्यायी शक्तीचा शोध घेताना दिसते. प्रशांत किशोर यांचे राजकारण आयटी क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांनी डिजिटल समाजाशी संपर्क ठेवलेला आहे. यामुळे भारतीय राजकारणाच्या पोटातून नवीन राजकीय महत्त्वाकांक्षा उदयास येत आहेत. या राजकीय महत्त्वाकांक्षा एका अर्थाने जुन्या पिढीपेक्षा वेगळ्या आहेत. म्हणजेच लालूप्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, शरद पवार, देवेगौडा यांच्यापेक्षा वेगळे नेतृत्व विकसित होत आहे. जगन मोहन रेड्डी, सुप्रिया सुळे, प्रशांत किशोर, अखिलेश यादव, स्टॅलिन यांचे राजकारण पूर्णपणे नवीन दृष्टी असणारे आहे. म्हणजेच नवीन शतकातील ही तिसरी मोठी राजकीय घडामोड ठरण्याची शक्यता आहे. त्याची चाचपणी प्रशांत किशोर करत आहेत.

संबंधित बातम्या