स्वतःची स्पर्धा स्वतःशीच

प्रकाश पवार
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

राज-रंग

‘भारत विरुद्ध इंडिया’ ही घोषणा शरद जोशी यांनी लोकप्रिय केली होती. ऑलिंपिक आणि किसान संसद या दोन गोष्टींमुळे शरद जोशी यांची ही घोषणा एकदम समोर आली. खरे पाहिले तर आज ऑलिंपिक आणि किसान संसद यांच्यामध्ये शरद जोशी यांना अभिप्रेत असणारा विरोधाभासात्मक अर्थ राहिलेला नाही.

ओडिशा सरकारचा खेळांना मनापासून पाठिंबा आहे. ओडिशा हे राज्य गरीब राज्य आहे. तरीही ओडिशाला खेळांचे ‘पॉवर हाऊस’ होण्याची तीव्र इच्छाशक्ती आहे (शक्तिमान, गतिमान, कीर्तिमान). म्हणजेच गरीब राज्याची इच्छाशक्ती सॉफ्ट पॉवरमध्ये सर्वोच्च स्थान मिळविण्याची आहे. तर दुसरीकडे भारतातील शेतकरी जंतरमंतरवर किसान संसद आयोजित करीत आहेत. या दोन्ही घटना भारतीय राजकारणाच्या आणि भारतीय समाजशास्त्राच्या दृष्टीने प्रचंड वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
शरद जोशी यांच्या सत्तरीच्या दशकातील ‘भारत विरुद्ध इंडिया’ या घोषणेच्या जवळ जाणाऱ्या आहेत. एवढेच नाही तर खेळांच्या पॉवर हाऊसची संकल्पना शरद जोशी 
यांच्या उत्तर आयुष्यातील राजकीय भूमिकेशी मिळती-जुळती आहे. थोडक्यात ‘भारत विरुद्ध इंडिया’ हे राजकीय ध्रुवीकरण आज सुरू आहे असे दिसते. तसेच ‘भारत विरुद्ध इंडिया’ या सत्तास्पर्धेत ‘इंडिया’चा निर्णायक विजय झालेला आहे, तर ‘भारत’ ही धारणा सत्तेच्या परिघावर गेलेली दिसते. ओडिशाची पॉवर हाऊस आणि किसान संसद  या दोन संकल्पनांच्या मदतीने ही कथा समजून घेता येते. 

पॉवर हाऊस
नव्वदीच्या दशकापासून ‘इंडिया’मध्ये सत्तेच्या वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या गेल्या. सुपर पॉवर हे नव्वदीनंतरचे एक भारताचे स्वप्न आहे. तिसरी सुपर पॉवर अशीही संवाद शैली वापरली जाते. बाजारपेठेची सुपर पॉवर अशी कल्पना राजकारणात सहज सक्रिय झालेली आहे. सुपर कॉम्प्युटरच्या निर्मितीनंतर ‘इंडिया’ कॉम्प्युटर क्षेत्रातील एक महत्त्वाचा देश म्हणून पुढे आला. ही प्रक्रिया तीन टप्प्यातून घडली. एक, या घडामोडी घडत असताना क्रिकेट, हॉकी या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे बदल घडून आले. पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल अशा श्रीमंत राज्यांमधून खेळांवर नियंत्रण असलेले खेळाडूही पुढे आले. एवढेच नव्हे तर खेळाच्या क्षेत्रात घडलेल्या घटनांवर आधारित ‘चक दे इंडिया’ हा चित्रपट प्रचंड गाजला. एम.एस. धोनी, मेरी कोम, सचिन तेंडुलकर, मिल्खा सिंग अशा काही खेळाडूंवरती चित्रपट आले. यातून खेळाच्या क्षेत्रातील सॉफ्ट पॉवर ही कल्पना आकाराला आली. दोन, पुढे हळूहळू खेळाचा क्षेत्रातील सॉफ्ट पॉवर आणि राजकारण यांची सांधेजोड सुरू झाली. विशेषतः खेळाच्या क्षेत्रात चमकदार घोषणांचा वापर केला जाऊ लागला (खेलेगी तो खिलेगी). परंतु भारतीय पातळीवरती खेळांच्या संबंधातील मंत्रालय मात्र फार कृतिशील नव्हते. खेळाबद्दल मंत्रालयात व मंत्र्यांमध्येदेखील सातत्य नव्हते. थोडक्यात शरद पवार कृषिमंत्री होण्याच्या आधी जी अवस्था कृषी खात्याची होती, तशीच अवस्था खेळाशी संबंधित मंत्रालयाची आहे. परंतु खेळ ही गोष्ट अनेकांना राजकीय दृष्ट्या एकमेकांशी जोडणारी असल्याने काही नेत्यांनी त्याकडे लक्ष दिले. विशेषतः क्रिकेटच्या क्षेत्रातील ट्वेंटी-ट्वेंटी  हा प्रकार अतिगतिशीलपणे पुढे आला. तीन, या प्रकारामुळे अनेक राज्यातील खेळाडूंना जागतिक पातळीवर खेळण्याची संधी मिळाली. क्रिकेटच्या मदतीने सत्ता, संपत्ती, अधिकार, प्रतिष्ठा मिळाली. एम. एस. धोनी, मेरी कोम अशी काही यातील महत्त्वाची उदाहरणे आहेत. यानंतर एकदम ‘वूमेन इन स्पोर्ट्स’ या गोष्टीला सुरुवात झाली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानू यांनी रौप्य पदक प्राप्त केल्यापासून आजपर्यंत राजकीय पक्ष, राजकीय नेते, राज्य सरकार, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया यांनी या मुद्द्याच्या भोवती राजकारण घडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विशेषतः टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या खेळाडूंची आर्थिक स्थिती प्रचंड गरिबीची होती. अशा गरीब खेळाडूंनी प्रयत्न करून भारतास जागतिक पातळीवरती सन्मान मिळवून दिला. परंतु ही कामगिरी भारताची नसून ‘इंडिया’ची आहे, अशा प्रकारची धारणा राजकीय पक्ष, राजकीय नेते यांची झालेली आहे. अर्थात प्रत्यक्ष ग्राउंडवर खेळणारे खेळाडू शरद जोशी यांच्या धारणेप्रमाणे ‘भारता’चे प्रतिनिधित्व करत होते तर राजकीय पक्षांच्या दृष्टीने पदके मिळवलेले खेळाडू  केवळ सॉफ्ट पॉवरचे  प्रतिनिधित्व करतात. 

नवीन पटनायक यांनी ओडिशामध्ये २०१८ पासून खेळाच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली होती. ओडिशा राज्यात हॉकी ही जीवनशैली आहे अशी भूमिका नवीन पटनायक यांनी घेतली होती. ओडिशाने फुटबॉलच्या क्षेत्रातही कामगिरी केली. 

सुंदरगड जिल्ह्यात त्यांनी प्रत्येक तालुक्यात हॉकीसाठी ग्राउंड आणि प्रशिक्षक दिले. त्यामुळे सुंदरगड जिल्हा हा ओडिशाचा खेळांचा पॉवर हाऊस झाला. ओडिशामध्ये ११४ ब्लॉकमध्ये ग्राउंड आणि प्रशिक्षण अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. यावरून ओडिशाचे राजकारण खेळाचे पॉवर हाऊस या धारणेकडे वळलेले सुस्पष्टपणे दिसते. ही मुख्य धारणा राजकारणाची तळागाळात रुजलेली दिसते. ही सत्तेची कल्पना अर्थातच नव्वदीनंतरच्या जागतिकीकरणातून उदयाला आलेली आहे. 

किसान संसद
खेळाचे पॉवर हाऊस (शक्तिमान, गतिमान, कीर्तिमान)  या संकल्पनेपेक्षा ‘किसान संसद’ ही संकल्पना  वेगळी आहे. अर्थातच शरद जोशी यांच्या आरंभीच्या विचारांचा हा एक विस्तार दिसतो. भारतीय संसद आणि सांकेतिक संसद म्हणून किसान संसद या दोन्ही संस्थांचे कामकाज सुरू आहे. पुन्हा त्यामध्ये महिला संसददेखील आयोजित करण्यात आली. अर्थातच सांकेतिक स्वरूपात किसान संसद व महिला संसद या संकल्पना राबवल्या गेल्या. चौदा पक्षांचे खासदार सांकेतिक किसान संसदेमध्ये हजर होते. यामुळे प्रतीकात्मक स्वरूपात दोन मुद्दे पुढे आले. एक, संसदेवर दबाव निर्माण करण्यासाठी सांकेतिक संसद भरवण्याची कल्पना पुढे आली. राजकीय प्रतिकाराचे हे नवीन अस्त्र उदयाला आले. भारतीय राजकारणामध्ये ही नवीन परंपरा सुरू झाली आहे. दोन, शरद जोशी यांच्या जीवनातील आरंभीचा वैचारिक पैलू नव्याने प्रस्तुत करण्याची प्रक्रिया अतिजलद गतीने पुढे येत आहे.

यामुळे एकूण शरद जोशींच्या संकल्पनेप्रमाणे राजकारण ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या दोन कल्पनांमध्ये विभागलेले दिसते. विशेषतः भारताची इतर देशांशी स्पर्धा करून सुपर पॉवर होण्यापेक्षा स्वतःची स्वतःशी स्पर्धा सुरू झालेली दिसते. यामुळे एकूण भारतीय समाज, भारतीय नागरिक, भारतीय राजकीय पक्ष, भारतातील राष्ट्रीय सरकार, राज्या-राज्यातील सरकारे यांच्यापुढे नेमकी कोणती सत्तेची संकल्पना स्वीकारायची, याबद्दलचा मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे. राजकीय पक्षांच्या बरोबर हा मुद्दा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीचादेखील भाग झाला आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या हक्कांनुसार व्यक्तीने व्यक्तीगत कामगिरी करून देशाच्या कामगिरीत भर घालावी, अशी अपेक्षा आहे. परंतु सामान्य खेळाडूंच्या व शेतकऱ्यांच्या जीवनशैलीला या सत्ता संकल्पनेमध्ये कोणते स्थान आहे? हा प्रश्न नव्याने उपस्थित यानिमित्ताने झाला आहे. 

काँग्रेस शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, अशी एक भूमिका महात्मा फुले यांनी मांडली होती. महात्मा फुले यांच्या त्याच धारणेप्रमाणे सुपर पॉवर, खेळांचे पॉवर हाऊस अशा संकल्पना सामान्य खेळाडू आणि सामान्य शेतकरी यांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. यामुळे एक देश आणि दोन विचारसरणी अशी अवस्था निर्माण झालेली आहे. म्हणून भारत इतरांशी नव्हे तर स्वतःच स्वतःशी स्पर्धा करत आहे.

संबंधित बातम्या