तिसऱ्या घंटेचा ‘नादच खुळा’...

राज काझी
मंगळवार, 5 जानेवारी 2021

रंगभूमी

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या रंगभूमीवरचा पडदा अनलॉकच्या एकंदर प्रक्रियेत कधी वर जातो आणि तिसरी घंटा होऊन नांदीचे स्वर पुन्हा केव्हा कानावर पडतात याची प्रतीक्षा रंगकर्मीं इतकीच नाट्यरसिकांनाही होती. या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांच्या पोटापाण्याचा जसा हा प्रश्न होता तसाच तो सांस्कृतिक उपासमारीचासुद्धा होता. संबंधितांचे अथक प्रयत्न व माध्यमांचा रेटा यामुळे टप्प्याटप्प्यांच्या ‘अनलॉक’मध्ये रंगमंदिरं खुली होण्यास शेवटी दिवाळीचा मुहूर्त सापडला. त्यानंतर रंगमंदिरं नव्या काळजीवाहू मार्गदर्शक सूचनांनुसार नव्यानं सज्ज होण्यास व तिकडं नाटकवाल्यांच्या राहुट्यांमधून तालमींना सुरुवात झाली. 

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वर्तमानपत्रांमधून गेली आठ-नऊ महिने अदृश्य असलेल्या नाटकांच्या जाहिराती तुरळक का होईना पण चक्क पुन्हा दिसू लागल्या. प्रशांत दामलेंच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’च्या पुण्यातील प्रयोगांची तिकीट विक्री सुरू होण्याची जाहिरात आली आणि त्या तारखेला बुकिंग सुरू होण्याआधीच तिकीट खिडकीपुढं रसिकांची रांग आकारास येताना दिसणं हे अवघ्या मराठी रंगभूमीला हर्षभरीत व उल्हसित करणारे दृश्य होतं!

नाट्यगृहांच्या थोडीशीच आधीच खुली झालेली चित्रपटगृहं जिथं अजूनही प्रेक्षकांच्या वाटेवर डोळे लावून बसली होती, तिथं नाटकांच्या तिकिटासाठीची ही रांग सुखद धक्का देणारीच होती. नाटकांच्या जवळपास निम्म्या दरात मिळणाऱ्या आलिशान मल्टिप्लेक्सच्या लक्झुरियस सुखसुविधा जिथं रसिकांना भुरळ पाडू शकल्या नव्हत्या तिथं नाटकांच्या स्वागतासाठी लागलेली ही रांग मराठी माणसाच्या नाट्यप्रेमाची साक्षात प्रचिती होती. विशेष म्हणजे ‘मास्क’ वगैरे लावून व्यवस्थित ‘सोशल डिस्टन्स’ ठेवीत ही रांग वाढताना दिसत होती!

प्रयोगाचा दिवस आणि वेळ, प्रत्यक्ष प्रयोग सुरू होण्याक्षणीची ती बहुप्रतिक्षित तिसरी घंटा एकदाची खणखणू लागली. प्रेक्षागृहातला प्रकाश मंदावू लागला आणि होणाऱ्या काळोखात नाटकाच्या अनाऊन्समेंटचं संगीत कानी पडू लागलं… आता पडदा उघडणार, हळूहळू प्रकाशित होणाऱ्या रंगमंचावर एक निराळंच ठिकाण प्रकटणार. पुढचे दोन-अडीच तास सभोवतीचं जग विरघळून टाकणारी ती ‘तिसरी घंटा’…

कोरोनामुळे जगातल्या अनेक गोष्टींप्रमाणे नाटकालाही बदलावं लागत आहे. रंगमंदिरात स्वागताला जिथं पूर्वी अनेकदा अत्तर माखून रंगमंदिरात पाऊल ठेवलं तिथं आता सॅनिटायझर्स होती. एका आड एका खुर्चीवर तोंडावर मास्क लावून बसायचं होतं… पण तरीही बंद पडद्यासमोर बसलेल्या, त्या ‘नाटक’ नावाच्या जिवंत अनुभवाला कैक महिन्यांनंतर सामोरे जाणाऱ्या प्रेक्षकांच्या मनात एक विलक्षण  असोशी दाटलेलीच होती. पडद्याआडच्या कलावंतांच्या मनामध्येही ती तितकीच होती. आयुष्यात जेव्हा कधी पहिल्यांदा रंगमंचावर प्रवेश केला असेल त्या वेळची अस्वस्थताही. मात्र या वेळी काही वेगळेच प्रश्नही चिंता निर्माण करीत होते…

‘मास्क लावून आपले प्रेक्षक हसणार कसे?’ हा अतिशय मूलभूत प्रश्न प्रशांत दामलेंना पडला होता!... विनोदी नाटक रंगायला रंगमंचावरच्या कलावंतांना समोरच्या प्रेक्षकांच्या हशा अन टाळ्यांची सोबत बरोबरीनं असायलाच लागते.. ‘आता आपलं नाटक रंगणार तरी कसं?’ साक्षात प्रशांत दामलेंच्यासुद्धा मनात आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच ही चिंता निर्माण झाली होती!

नाटकाच्या अस्सल रसिकांनी ही चिंता प्रयोगाच्या पहिल्या क्षणातच पार धुवून टाकली. प्रेक्षकांमधून ‘एन्ट्री’ घेणाऱ्या कविता मेढेकरांचं प्रेक्षकांनी टाळ्यांचा जल्लोषात स्वागत केलं. तितकीच भरभरून दाद प्रशांतच्या पहिल्या ‘पंच’पासून मिळत गेली आणि उत्तरोत्तर रंगतच गेलेला प्रयोग, नाटकांचं पुनरागमन यशस्वी होणारच हा विश्वास केवळ प्रशांतलाच नाही तर तमाम मराठी नाट्य व्यावसायिकांना देऊन गेला. जल्लोषात झालेलं स्वागत केवळ कवितांचं नव्हतं तर एका अर्थी अवघ्या रंगभूमीचं होतं. 

मुळातच मराठी माणसाचं नाटकावर प्रेम आहे हे जरी खरं असलं तरी केवळ या प्रेमापोटी हे घडलेलं नाही. नाटकाला चित्रपटांपेक्षा प्रेक्षकांचा प्रतिसाद अधिक आणि लगेच मिळाला या मागची कारणं रंगभूमीची बलस्थानं व नाट्यानुभवाच्या एकमेवाद्वितीयपणात आहेत. ‘लॉकडाउन’मध्ये चित्रपटगृहे बंद असली तरी या बंदिवासात ज्या टीव्हीसमोर आपल्याला बसणं क्रमप्राप्तच झालं त्या टीव्हीच्या पडद्यावर चित्रपट धो-धो कोसळत असतातच. त्यातून या काळात ‘ओटीटी’ या माध्यमानं अत्यंत झपाट्यानं आपलं बस्तान बसवलं. सर्वसाधारणपणानं लोकांना टीव्हीचा सर्वार्थानं उबग येत चाललेला असल्यामुळं घरात अडकलेली ही माणसं ‘ओटीटी’ला आयती हाती लागली. या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती अक्षरशः हजारो तासांचं मनोरंजन मटेरियल उपलब्ध आहे. या माध्यमासाठीच एक्सक्लूझिव्ह बनवले गेलेल्या व चित्रपटगृहांचं भवितव्य तेव्हा अधांतरीच असल्यामुळे थेट ‘ओटीटी’वर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे चित्रपटांपासून तुटल्याची किंवा त्या आनंदाला पारखे झाल्याची जाणीवच कुठं मनाला स्पर्शली नाही. नाटकांच्या बाबतीत मात्र हे घडलं. तसे नाटकांचेही काही प्रयोग ऑनलाइन होत होते, ‘टाटा स्काय’सारख्या चॅनल्स प्रोव्हायडर्सनी खास नाटकांसाठी सुरू केलेल्या चॅनल्सवरही बहुभाषिक नाट्यप्रयोग होत होते, पण प्रत्यक्ष रंगमंचावर नाटक पाहिल्याचं समाधान मात्र यातून मिळत नाही हे खरंच!

जिवंत व वास्तवाचा प्रत्यक्ष प्रत्यय देणारा नाट्यानुभव हा शब्दातीत असतो. तिसऱ्या घंटेपाठोपाठ उघडणाऱ्या पडद्यापलीकडं रंगमंचावर हातांच्या अंतरावर आपल्या डोळ्यांसमोर उलगडणारं काही वास्तवाचा आभासच नाही तर अनुभव देणारंही असतं. अस्सल नाटकाच्या प्रयोगामध्ये एका विशिष्ट क्षणानंतर रंगमंचावरच्या पात्रांची स्पंदनंसुद्धा बघणाऱ्यांना जाणवण्याची क्षमता असते. दुर्मीळ असला तरी अस्तित्वात असलेला हा अनुभव आहे. प्रेक्षकांशी सूर जुळलेल्या प्रयोगात पात्रांशी त्यांची एकतानता निर्माण होते, त्यांच्या गमतीनं मौज अन सुखात आनंद जाणवतो तर त्यांच्या दुःखांचा कढ गहिवरून आणतो. समोरचं आहे हे खोटं आहे हे माहीत असतानाही सर्वसामान्य प्रेक्षकासाठी त्या क्षणी ते सगळ्यात खरं असतं. ‘आत्ता आणि इथं’ हे मान्य करायला लावणं हीच नाटकाची जादू आहे आणि ताकदही! 

आपलं नाटक पुन्हा उभं राहण्यासाठी सुदैवानं सर्व बाजूंनी हात मिळतो आहे. शासनाच्या किंवा स्थानिक शासन संस्थांच्या मालकीच्या नाट्यगृहांच्या बरोबरीनं अशासकीय संस्थांच्या नाट्यगृहांनीही भाड्यामध्ये भरघोस सवलत देऊ केली आहे. वृत्तपत्रांनी जाहिरातीच्या दरात सूट देतानाच प्रमोशनल लेख, मुलाखती प्रसिद्ध करत पाठबळ दिलं आहे. कलाकार व तंत्रज्ञांनी आपली मानधनं कमी केली आहेत.

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘तू म्हणशील तसं’, ‘पुन्हा सही रे सही’, ‘मोरूची मावशी’, ‘व्हॅक्युम क्लिनर’, ‘हरवलेल्या पत्त्याचा बंगला’, ‘आमने सामने’, ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’, ‘तिसरे बादशाह हैं हम’, ‘ब्लाइंड गेम’, ‘आई रिटायर होतेय’…. ही आणि ‘एकच प्याला’ सारखी काही जुनी संगीत नाटकं सध्या पुढं सरसावत आहेत, ही तिसरी घंटा सतत वाजत राहावी म्हणून! 

दुसऱ्या महायुद्धाच्या काळातसुद्धा जे नाटक थांबलं नव्हतं ते या कोरोनाच्या महामारीनं थांबवलं होतं. आता तिसरी घंटा पुन्हा एकदा खणखणू लागली असली तरी आणखी काही काळ तरी ती नेटानं वाजवत ठेवावी लागणार. रंगकर्मींच्या प्रयत्नांना बळ आता त्याच ‘मायबाप’ रसिकांनी द्यायला हवं, ज्यांच्यासाठीच ही नाटकाची घंटा वाजण्या आतूर असते!

या तिसऱ्या घंटेची आणि एकूणच नाटकाच्या जादूची ओढ ही जितकी रसिकांना असते तेवढीच नव्हे तर त्यापेक्षा कित्येक पटीत ती अस्सल कलावंतात असते. ‘आळवावरचं पाणी’ या शब्दांत जिथल्या यशापयशाची आणि आर्थिक अनिश्चिततेची संभावना केली जाते त्या क्षेत्रात स्वतःच अवघं आयुष्य पणास लावायला कलेवरच्या अपार प्रेमाबरोबरच अफाट धैर्यही निश्चितच लागतं. पूर्वीच्या काळी याला ‘भिकेचेच डोहाळे’ म्हटले जाई. घरातून पळून येऊन नाटक कंपनीच्या बिऱ्हाडी पडेल ते काम करण्यापासूनच शागिर्दी सुरू होई, वगैरे. आता व्यवस्थित प्रशिक्षण पदवी वगैरे घेऊन नवी पिढी नाटकात येते, ते टिव्ही-सिनेमात जाण्याची एक पायरी म्हणून.

दुसरीकडे, भरपूर धनार्जनाच्या आपल्या सुस्थिर व्यवसायातून कलेच्या ध्यासानं नाटकाकडे वळल्याची उदाहरणंही आहेत. मराठी रंगभूमीवरच्या दोन प्रख्यात डॉक्टरांनी इथं आपापला व नाटकांचाही इतिहास घडवला. एकानं लोकप्रियतेचं शिखर गाठलं तर दुसऱ्यानं अभिनयकलेला शिखरावर नेलं… डॉ. काशिनाथ घाणेकर आणि डॉ. श्रीराम लागू !

नाटकांतून सुरुवात करून पुढे चित्रपटांमध्ये अमाप यशकीर्ती धनसंपदा मिळवूनही रंगमंचाच्या ओढीनं पुनरागमन करणाऱ्या अनेक दिग्गजांनी मराठी रंगभूमी आणखी समृद्ध होण्यात आपला वाटा उचलेला दिसतो. नाटक, टीव्ही, चित्रपटांची विस्मयीत करणारी प्रदीर्घ कारकीर्द असणाऱ्या सई परांजपेंनी काहीच वर्षांपूर्वी ‘जास्वंदी’ पुन्हा केलं. अमिताभ बच्चनच्या ऐन भराच्या काळात त्यांच्या बरोबरीची ‘स्टार स्टेटस’ लाभलेल्या अमोल पालेकरांना जवळपास पंचवीस वर्षांनी पुन्हा रंगभूमीच्या हाका ऐकू येत होत्याच. त्यांना प्रतिसाद देत पालेकरांनी ‘कुसूर’ हे नवं आणि नव्या रंगसंज्ञेचं नाटक नुकतंच केलं. हिंदी चित्रपटसृष्टीत आपला दबदबा कायम अबाधित ठेवणाऱ्या नाना पाटेकरांनी ‘परिंदा’च्या काळातही ‘पुरुष’ केलं होतं आणि आजही त्यांना ‘सखाराम बाईंडर’ करायची तीव्र इच्छा आहे. अशोक सराफ आणि मोहन जोशींनी रुपेरी पडदा सतत गाजवीत जमेल तेव्हा नाटक केलंच. भरत जाधव आणि मकरंद अनासपुरेंनी हेच केलं.

सोनाली कुलकर्णींनी मराठीच्या बरोबरीनं हिंदीतही आपलं स्थान प्रस्थापित करूनसुध्दा नाटकाशी असलेली आपली नाळ तुटू दिलेली नाही. त्यांच्या ‘व्हाइट लिली आणि नाईट रायडर’ आणि ‘गर्दीशमें हैं तारे’चे प्रयोग लॉकडाउन लागू होईपर्यंत होत होते. निवेदिता सराफांनी ‘वाडा चिरेबंदी’मधून अनेक वर्षांनी पुनरागमन केलं आणि अत्यंत प्रगल्भ अभिनय दर्शनानं चकितही केलं! रोहिणी हट्टंगडींनीही मध्यंतरी ‘जगदंबा’ केलं होतं आणि नव्या नाटकासाठी आजही त्या उत्सुक आहेत. मुक्ता बर्वे तर केवळ नाटकांत अभिनय करून थांबली नाही तर निर्मितीतही यशस्वी उतरलेली दिसते.

सुमीत राघवन आणि कविता लाड-मेढेकर यांचं पुनरागमन वेगवेगळ्या कारणांनी लक्षणीय ठरलं. हिंदी टीव्ही मालिका क्षेत्र गाजवून पंधरा एक वर्षांनंतर सुमीतनं चिन्मयीच्या सोबतीनं ‘लेकुरे उदंड जाहली’ निखळ नाटकाच्या ओढीनं केलं होतं पण मराठी रंगभूमीच्या वाटचालीत मैलाचा दगड स्थापित करणाऱ्या ‘हॅम्लेट’साठी चंद्रकांत कुलकर्णींनी केलेली त्यांची निवड सार्थ ठरवीत त्यांनी आपलं पुनरागमन संस्मरणीय केलं. या उलट कवितानं आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी ‘एका लग्नाची गोष्ट’ मधून रंगभूमीचा निरोप घेतला होता पण गंमत म्हणजे तब्बल सतरा वर्षांनंतर ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ मधूनच त्यांचं पुनरागमन घडलं आणि तुफान यशस्वी ठरलं! 

तिसऱ्या घंटेचा हा नाद कलावंत व रसिकांनीही असाच एकत्रित फलदायी ठरत राहो हीच रंगदेवतेशी प्रार्थना.

डॉक्टरकी सोडून पूर्णवेळ नट होण्याच्या त्यांच्या धाडसी निर्णयाचा नेमका क्षण डॉ. लागूंनी आपल्या ‘लमाण’ या आत्मचरित्रात मोठ्या मनोस्पर्शीपणानं रेखाटला आहे. डॉ. मोहन आगाशेंनी आपल्या सगळ्या वैयक्तिक जबाबदाऱ्या सांभाळत समांतर रंगभूमीपासून ‘ग्रीप्स’च्या बालनाट्यांपर्यंत दिलेलं योगदान मोठंच आहे. या सगळ्यांना आपल्या परीनं फॉलो केलेलं आणखी एक नाव म्हणजे : डॉ. गिरीश ओक.

संबंधित बातम्या