नाटकानं शोधले ‘डिजिटल’ मंच!

राज काझी
सोमवार, 18 जानेवारी 2021

रंगभूमी

भारतीय नाट्यकलेच्या उद्गात्या भरतमुनींच्या काळात ‘टिकेल तोच राहील’ हे डार्विनचं जीवनतत्त्व जन्मासच आलेलं नसल्यानं त्यांच्या नाट्यशास्त्रात नाटकांसंदर्भानं हा विचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसावी!... पण काळाच्या प्रवासात दस्तुरखुद्द नाटकावर मात्र आपल्या ‘सर्व्हायव्हल’च्या प्रश्नाला तोंड देण्याची वेळ असंख्यदा आलेली दिसते. चित्रपटांच्या आगमनानंतर नाटकाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी पराकाष्ठा करावी लागली. घराघरांत घुसून टीव्हीनं ठाण मांडल्यानंतर नाटक-चित्रपट दोन्ही धोक्यात आल्याची स्थिती निर्माण झाली… पण नाटक संपलं नाहीच. नाटक यावर मात करू शकलं यात त्याच्या आपल्या निराळ्या सामर्थ्यांसहच त्याच्या परिवर्तनशील भानाचाही वाटा होता. संगीत रंगभूमीवरील स्वैर रंगणाऱ्या गाण्यांच्या मैफलीतून स्वतःला वेळीच सोडवत नाट्यमय शब्दसंवादांची कास नाटकानं धरली. काळानुसार पाच-पाच अंकी खानदानी पसाऱ्यातून दोन अंकी आटोपशीरपणा अंगीकारला. नवनवे प्रयोग स्वीकारत आपल्यातलं चैतन्य टवटवीत ठेवलं.

या वेळची परिस्थिती मात्र वेगळीच होती. कोरोनानं आपल्या भोवतीचं अवघं जगच जसं मिटून ठेवलं. लॉकडाउननं सगळंच ठप्प होऊन बसल्यानंतर नाटकाची कथा तरी या जगावेगळी कशी घडू शकणार होती?... ओढवलेली परिस्थिती निभावून नेण्यासाठी जग व्यवहाराला आपलं स्वरूप व स्वभाव बदलणं जसं क्रमप्राप्तच झालं ते तसं नाटकालाही झालं. निखळ नाट्यउर्मी आणि रोखीचा नाट्यव्यवसाय या दोन्हींनी मग जगण्यासाठी अन्य जगासारखीच ‘डिजिटल’ वाट शोधायचं ठरवलं! अस्तित्वातच नसलेली ही वाट रंगकर्मींनी हळूहळू ‘नेट’की निर्माण करत आणली. काव्यवाचन, कथाकथन, अभिवाचन, नाट्यछटा-स्वगतांनी  वैयक्तिक स्तरावर झालेली सुरुवात पुढे सामूहिक प्रयत्नात पुढे जाऊ लागली. हौशी मंडळींची ’थिएटर प्रीमियर लीग’, नामवंतांचं ‘ओएमटी’ अर्थात ऑनलाइन माझं थिएटर’ असे वेगवेगळ्या प्रकृतीचे व प्रारूपाचे प्रयोग हे टप्पे पार करत ‘मोगरा’ या लाइव्ह ‘नेटका’चे देशविदेशात पन्नासांहूनही अधिक व्यावसायिक प्रयोग करून ही डिजिटल रंगयात्रा आता ‘नाईन रसा’ या संपूर्णपणानं नाटकाला वाहिलेल्या पहिल्या ओटीटी प्लॅटफॉर्म पर्यंत येऊन पोहोचली आहे. विशेष म्हणजे स्वांतः सुखाय, हौशी, स्पर्धात्मक, निमव्यावसायिक व मग व्यावसायिक अशा पायऱ्यांनी जशी एखाद्या रंगकर्मीची प्रगती घडत जाते त्याच पायऱ्यांनी डिजिटल नाटक पुढं चाललं आहे.
आपल्या कलाभिव्यक्तीसाठी ‘फेसबुक लाइव्ह हा सहज सुलभ मंच समाज माध्यमानं उपलब्ध करून दिला होताच. त्यात सातत्य ठेवण्याचा विश्वास आला की मग आपलं ‘यू ट्यूब चॅनल’ सुरू  

करण्यापर्यंत अगदी ग्रामीण भागातील रंगकर्मीही आले आहेत आणि ‘लाईक’ आणि ‘सबस्क्राईब’ परिचित संज्ञा झाल्या आहेत! एकेकाळी एकांकिका स्पर्धांमध्ये रमणारी व झुंजणारी ही गावोगावीची नाटकवाली मंडळी जी आपापल्या वकूबाच्या ‘शॉर्ट फिल्म्स’ कडून ‘वेब सिरीज’कडे निघाली होती त्यांनाही आता हे ‘डिजिटल थिएटर’चं वळण खुणावू लागलं आहे!

लॉकडाउनच्या काळात नामवंतांची मांदियाळीही ‘यू ट्यूब’वर आली. राहुल देशपांडेंच्या गायकीचे विविध थाट रसिकांना मंत्रमुग्ध करून गेले. स्पृहा जोशींच्या कवितांना मोठ्या प्रमाणात ‘फॉलोअर्स’ मिळाले. मधुरा वेलणकरांच्या ‘मधुरव’लाही चांगलाच प्रतिसाद मिळाला. याही प्रेरणा नवोदितांना आपल्या नाट्यगुणांच्या आविष्कारासाठी बळ देत होत्या. एरवी शहरांपुरतीच मर्यादित असणारी नाट्यचित्रपटविषयक अनेक उपयुक्त कार्यशाळा, चर्चासत्रं व वामन केंद्रेंसारख्या दिग्गजांची प्रशिक्षणं या काळात सर्वदूर ऑनलाईन ॲक्सेसिबल झाली हाही या डिजिटल रंगसंस्कृतीला पोषक भागच म्हणावा लागेल.

गुंतवणूक आणि परताव्याच्या आर्थिक गणितांचा कदाचित ताण नसल्यानं नेहमीच नवनव्या ‘ट्रायल ॲण्ड एरर’ प्रयोगांना सामोरं जाणाऱ्या हौशी किंवा समांतर रंगभूमीनंच याहीवेळा डिजिटल वाटेवर पहिलं पाऊल टाकलं. आधीच्या संपूर्ण लॉकडाउनच्या खडतर काळात ‘एफबी’वर अभिवाचनं व पुढे ‘अनलॉक’ची चाहूल लागू लागल्यावर ‘झूम’वर तालमी सुरू झाल्या. चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर या सगळ्यांना वेग आला. कल्याणच्या अभिजित झुंजारराव व सहकाऱ्यांच्या ‘अभिनय’ संस्थेनं ‘थिएटर प्रीमियर लीग’ची घोषणा केली. प्रयोग (मालाड, मुंबई), कलांश (रत्नागिरी) व परिवर्तन (जळगांव) यांच्या एकांकिकांचे एकत्रितपणे प्रयोग ‘ऑनलाईन’ आणि तेही तिकीट लावून लावले. याला इतका उत्तम प्रतिसाद मिळाला की पुढे डॉ. शरद भूताडीया, अतुल पेठे, गिरीश परदेशी, दत्ता पाटील अशा नाट्य चळवळीतील ज्येष्ठांचा सहभाग असलेले पुढचे आणखी दोन सीझन आयोजित करायला बळ मिळालं. या मॉडेलचं अनुकरण राज्यभर अनेक संस्थांनी आपापल्या भागात केलं आणि नाटक जागतं ठेवलं.

गाजलेल्या जुन्या नाटकांच्या दिमाखदार पुनरुज्जीवनाची  ‘हर्बेरियम’ ही संकल्पना यशस्वी केलेल्या अभिनेता सुनील बर्वेंनी ऑनलाइन माझं थिएटर’ ही आणखी एक अफलातून कल्पना पुढं आणली. आयोजनात नावाप्रमाणेच ‘कुशल’ असणाऱ्या खोतांची ‘वाईड विंग्ज’ बर्वेंच्या ‘सुबक’च्या जोडीला होती. शुद्ध ‘नाट्यघटक’च समाविष्ट असणाऱ्या विविध शैलींच्या सादरीकरणासाठी वीस लोकप्रिय कलाकारांना एकत्र आणताना त्यातली रंगत वाढवण्यासाठी या कलाकारांना स्पर्धेत एकमेकांसमोर उभं करण्यात आलं! (आपापल्या घरी राहूनच आपलं सादरीकरण करायचं असल्यानं स्पर्धक प्रत्यक्षात एकमेकांसमोर कधी आलेच नाहीत हे अलाहिदा!) निवडीसाठी वंदना गुप्ते, अश्विनी भावे व चंद्रकांत कुलकर्णी हे मातब्बर परिक्षक. चार शनिवार-रविवार ही स्पर्धा इथल्यासह परदेशातल्या प्रेक्षकांनीही ऑनलाइन’ पुरेपूर एन्जॉय केली.

परदेशातूनही उदंड प्रतिसादाचा सुखद अनुभव ‘मोगरा’ हे ‘नेटक’ ऑनलाईन लाइव्ह सादर करणाऱ्या हृषिकेश जोशींच्या टीमच्या वाट्यालाही असाच भरभरून आला. तो पर्यंत सादर झालेल्या ऑनलाईन नाट्यप्रयोगांपेक्षा ‘मोगरा’नं डिजिटल नाटकांना अधिक व्यावसायिक केलं आणि अनेक बाबतीत प्रगतही. एक तर दरवेळी हा प्रयोग लाइव्ह सादर होतो आणि ‘ऑनलाईन’ असूनही त्या-त्या विशिष्ट शहरापुरताच मर्यादित असतो. मुंबईच्या ‘हाऊसफुल’ प्रयोगानंच शुभारंभ होत पुढं जगभरात पन्नासपेक्षाही अधिक प्रयोग केलेलं हे ‘नेटक’. (नेटवर सादर होणारं नाटक म्हणून – ‘नेटक’!) त्यातले निम्मे म्हणजे पंचवीस प्रयोग केवळ अमेरिकेतल्या विविध शहरातूनच सादर झाले. आजवर अमेरिकेत कुठल्याच मराठी नाटकाचे इतके प्रयोग झालेले नाहीत. नॉर्वे, स्वीडन, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, दक्षिण कोरिया सारख्या देशांमध्ये तर पहिल्यांदाच मराठी नाटक दिसलं!

एक नाट्यकृती म्हणून ‘मोगरा’ परिपूर्ण करण्याबरोबरच व्यावसायिक यशाची संपूर्ण आखणी करूनच ‘मोगरा’ची (कलाकारांच्या) घरोघरी तालीम सुरु झाली होती. तेजस रानडेचं हे नाटक पाच वेगवेगळ्या वयोगट व भवतालातील स्त्रियांभोवती गुंफलेलं आहे. वंदना गुप्ते, भार्गवी चिरमुले, स्पृहा जोशी, गौरी देशपांडे व मयुरा रानडेंनी त्या जिवंत केल्या. हृषिकेश जोशींनी दिग्दर्शक म्हणून त्याचं स्वरूप निर्णयन करताना ज्या नेपथ्य, प्रकाश, संगीत, रंग-वेशभूषेची कल्पना केली होती ते वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी लाइव्ह चित्रित होताना येणाऱ्या मर्यादा अनेक होत्या पण कॉम्प्युटर इतकंच थिएटर प्रिय असणाऱ्या सुश्रुत कुलकर्णींनी त्यावरची ‘सोल्यूशन्स’ काढली व प्रयोग मनाजोगता साकार झाला. 

‘मोगरा’च्या निमित्तानं डिजिटल रंगभूमीसाठी एक वेगळंच अर्थकारण जन्माला येण्यासाठी ‘व्हीनिओ’ या एका अद्भुत सॉफ्टवेअरची मदत झाली. प्रत्येक प्रयोगाचं ऑनलाईन प्रक्षेपण चोरवाटांचा बिमोड करत  विशिष्ट भागापुरतंच मर्यादित ठेवण्याची किमया ते करतं! त्यामुळे प्रत्येक तिकिटाच्या हिशोब व रोखीची तरतूद शक्य झाली. ‘मोगरा’नं आपल्या तशा मर्यादित प्रयोग संख्येतही पंचवीसेक लाखांची यशस्वी उलाढाल केली. भविष्यातल्या नाट्यव्यवसायाची बीजंच कदाचित यातून रुजू लागतील.

भविष्यात नाट्य व्यवसायाला एक वेगळंच वळण देऊ शकेल अशा आणखी एका ज्या टप्प्यापर्यंत रंगभूमीचा डिजिटल प्रवास पोहोचताना दिसतो आहे, तो म्हणजे संपूर्णपणानं नाटकांना वाहिलेल्या एका नव्या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ची घोषणा. मराठी रंगभूमीवर सुरुवात करून आज हिंदी चित्रपटांत बऱ्यापैकी बस्तान बसविलेल्या अभिनेता श्रेयस तळपदेनं ‘नाईन रसा’ - थिएटर ऑनलाईन या नाटकांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मची उभारणी पूर्णत्वास नेत आणली आहे. अगदी नजीकच्या काळातच ते सुरू होईल. 

संपूर्णपणे नाटक व अनुषंगिक परफार्मिंग कलांना वाहिलेलं, हे या प्लॅटफॉर्मचं वैशिष्ट्य आहे. नाटक, एकांकिका, स्टँडअप्स, नृत्य, कथा-कविता सादरीकरणं यावर दिसतील. सध्या ‘नाईन रसा’वर मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी भाषेतील कंटेंट आहे पण नंतरच्या टप्प्यात तमीळ, कन्नड, बंगाली, पंजाबी व राजस्थानी भाषेतील कंटेंटचाही यात समावेश होईल.

लॉकडाउनच्या दुर्धर काळात पूर्णपणे नाटकांवर अवलंबून अशा असंख्य कलाकार, तंत्रज्ञ व कामगारांच्या मदतीसाठी काय करता येईल, कसं काम उपलब्ध करून देता येईल या निकडीतून या प्लॅटफॉर्मची कल्पना पुढं आल्याचं श्रेयस सांगतो. लॉकडाउनच्या काळात जवळपास पाचेकशे लोकांसाठी यातून काम उभं राहिलं. लॉकडाउनच्या काळातच कामांना सुरुवात झाली. योग्य ‘कंटेंट’चा शोध, त्याची आखणी, पूर्व तयारी वगैरे. त्याच काळात ‘झूम’वर तालमीही झाल्या आणि पहिल्या ‘अनलॉक’ नंतर वेगवेगळ्या नाट्यगृहांच्या रंगमंचांवर शूटिंग सुरू झालं. सद्यःस्थितीत शंभराहूनही अधिक तासांचा कंटेंट या प्लॅटफॉर्मकडं तयार आहे. 

लॉकडाउनच्या काळात गरजेतून निर्माण झालेली ही डिजिटल रंगभूमी आता पुढील काळात ओटीटीवर स्थिरावण्याची चिन्हं नक्की आहेत. 

“नाटक हा प्रत्यक्ष नजरेसमोर साकार होणारा अनुभव आहे, या आजवरच्या आपल्या धारणेला ‘ओटीटी’वरचं नाटक समाधान देईल?” या प्रश्नावर श्रेयसनं दिलेलं उत्तर पटतंय का पहा, तो म्हणतो,  “थोडा वेळ लागेल सवय बदलायला पण हे घडेल. क्रिकेटची मॅच ही सुद्धा प्रत्यक्ष मैदानावरच अनुभवण्याची मौज होती पण काळानुसार घरबसल्या टीव्हीवर अधिकच रंगू लागलो आपण. सोयीबरोबरच त्यातली निकटता, बारकावे उपलब्ध झाले. नाटकांच्या बाबतीत सुद्धा असंच काही नक्की घडू लागेल…” हृषिकेशलाही ऑनलाईन नाटक हे प्रत्येक प्रेक्षकाला पहिल्याच रांगेत बसण्याचा आनंद देतं असं वाटतं! 

आजच्या काळात हव्या त्या वेळी हव्या त्या नाटकाला पोहोचणं प्रत्येकाला शक्य होतंच असं नाही. आता डिजिटल नाटक त्यांच्यापर्यंत पोहोचेल… आपल्या नाटकांना जगभर पोहोचवण्याचा मार्गही आता डिजिटलच असणार.

संबंधित बातम्या