वाचक लिहितात...

वाचक
सोमवार, 2 मार्च 2020

वाचक लिहितात...
निवेदन :
 ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

स्व-अस्तित्वासाठी स्पेस हवीच 
 ‘सकाळ साप्ताहिक’मधील ‘सहजच...’ या सदरातील ‘माझे अवकाश मला दे...’ (ता. २५ जानेवारी) हा ऋता बावडेकर यांचा लेख आजच्या प्रत्येकाच्याच मनात असलेल्या स्पेस म्हणजेच अवकाश या विषयावर प्रकाश टाकतो. खरेच लहान, मोठा, गरीब, श्रीमंत, नेता, सामान्य व्यक्ती प्रत्येकालाच स्पेस हवी असते. ती नाही मिळाली की मनात तगमग, घालमेल आणि संघर्ष करण्याची भावना जन्म घेते. काही ही स्पेस मिळवण्यासाठी लढतात, तर काही त्यापुढे हार मानतात किंवा जे आहे त्याचा स्वीकार करतात. 
स्व-अस्तित्व निर्माण करायचे असेल, तर त्यामध्ये या स्पेसची भूमिका तितकीच महत्त्वाची. नाते कितीही घट्ट असले तरी प्रत्येक व्यक्तीला आपापली स्पेस हवी असते. मलाही नेहमी वाटायचे, काय असते ही स्पेस! नीट विचार केल्यावर मला जाणवले, की एरवी एकटेपणाला 
घाबरणारे आपण एकटेपणा हवा आहे असे वाटू लागते; तेव्हाच नेमके आपल्याला कुणी तरी भेटते, आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी असे वाटते, प्लीज यार थोडी स्पेस द्या ना. का हवी असते ही स्पेस? आपले मन शांत करण्यासाठी, मनातील घालमेल दूर करण्यासाठी, स्वतःशी संवाद साधण्यासाठी! ही स्पेस कायम हवी असते असे नाही. किंबहुना मनाची ही अवस्था अगदी थोडा वेळ असते, पण तो वेळच बहुतेक वेळा आपल्याला मिळत नाही किंवा कुणीतरी आपल्याला तो देत नाही. फक्त या स्पेसचाही अतिरेक होऊ देऊ नये. नाही तर एकटेपणा वाढेल.
- रिता शेटीया, पुणे 


मोलाची माहिती देणारे सदर
 ज्योत दिव्याची मंद तेवते देवघरातील देवापाशी... हा देवघरातील दिवा किंवा समई आणि चिराग-ए-दैर हे शब्द वेगवेगळ्या भाषेतील असले, तरी प्रसन्न, भाविक, संतुष्ट मनाची अवस्था व्यक्त होताना कोठेही अडथळा येत नाही. ग़ालिबच्या बनारसमधील वास्तव्याचे, गंगेच्या घाटावरील, देवळांच्या सान्निध्यात घालविलेल्या त्याच्या मनात घर करून राहिलेल्या क्षणांचे ‘चिराग-ए-दैर’ हे दृश्य स्वरूप आहे असे म्हणायला हरकत नसावी. चिराग-ए-दैर म्हणजेच मंदिरातील दिवा ही फारसीतली मसनवी (दीर्घ काव्य); हिंदी, उर्दू आणि इंग्रजीतही अनुवादित झाली आहे. त्याबरोबर मंदिरातील घंटानाद, शंखध्वनी आणि ‘सुमनां’चा सुगंधही सर्वदूर पसरला. वाचकांपर्यंत ही मोलाची माहिती पोचली ‘सकाळ साप्ताहिक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नंदिनी आत्मसिद्ध यांच्या ‘अन्दाज़-ए-बयाँ’ सदरामुळे! 
 मेरा मजहब तो ये हथेलीया बताती है, जुडे तो पूजा... खुले तो दुआ... (हा शेर गालिबचा नाही). इतकी स्वच्छ ज्याची समज आहे, त्या ग़ालिबला आणि त्याच्या चाहत्यांना सलाम. म्हणूनच त्या ग़ालिबला बनारसचे मंदिर पाहून काबा-ए-हिंदुस्तान म्हणताना धाकधूक होत नाही आणि त्याचे समर्थन करणाऱ्यांची गळचेपी होत नाही. कुणाच्या हक्कांवर गदा येत नाही. कुणाच्या भावना दुखावत नाहीत! उतार वयात निराशा आणि अपेक्षाभंगाचे प्रसंग पाचवीला पुजल्यासारखे हात धुऊन मागे लागलेले, गालिबची आर्थिक स्थितीही समाधानकारक नव्हती. सन्मानापेक्षा मनाला दुखावणारे क्षण वाट्याला जास्त आले हे दुर्दैव, पण हेच क्षण त्याच्या काव्यनिर्मितीला समृद्ध करणारे ठरले असे म्हणावे का? 
- अनिल ओढेकर, नाशिक 


कॉफी स्पेशल अंक छानच!
''सकाळ साप्ताहिक''च्या २२ फेब्रुवारी २०२० च्या अंकात कॉफी आणि कॉफीविषयी बरेच काही वाचायला मिळाले. प्राजक्ता काणेगावकर यांचा लेख वाचताना आपल्याबरोबरही असेच झाले होते की.. असे वाटून जाते. कॉफीबाजांच्या प्रतिक्रियाही वाचनीय आहेत. विभावरी देशपांडे यांनी सांगितलेली आठवण खरेच भन्नाट आहे. कॉफीप्रेमी असोत की आणखी कोणत्यातरी गोष्टीच्या किंवा व्यक्तीच्या प्रेमात पडलेले असोत, आपल्या प्रेमासाठी असे लोक काहीही करू शकतात... याशिवाय वैभव जोशींची कविताही आवडली. छानच झाला आहे कॉफी स्पेशल अंक!
- श्रेया फडतरे, नाशिक


आठवणी जाग्या झाल्या...
 'सकाळ साप्ताहिक'चा कॉफी स्पेशल अंक (ता. २० फेब्रुवारी) वाचला आणि खरेच आजूबाजूला वाढलेले कॉफी कल्चर अचानक खूप जाणवू लागले. अंकातील सुरुवातीच्या तीन-चार लेखांतून पुण्यातील कॉफीच्या बऱ्याच अड्ड्यांची माहिती मिळाली... माझ्या स्वत:च्याही कॉफीविषयीच्या काही खास आठवणी आहेत; कॉफीप्रेमींच्या प्रतिक्रिया वाचताना अशा अनेक आठवणी जाग्या झाल्या. कॉफी या विषयावर स्पेशल अंक काढणे ही बाबच मुळात विशेष आहे.
- राहुल पाटील, पुणे  

 

संबंधित बातम्या