वाचक लिहितात...

वाचक
सोमवार, 16 मार्च 2020

वाचक लिहितात...
निवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

‘अर्थनीतीः शेअर बाजार’ सदर वाचनीय 
डॉ. वसंतराव पटवर्धन यांच्या ‘अर्थनीती : शेअर बाजार’ या सदरातील आत्तापर्यंतचे लेख वाचनीय आहेत, नवीन माहिती बऱ्यापैकी मिळते. ७ मार्चला प्रकाशित झालेल्या लेखातून पुष्कळ माहिती अभिप्रेत होती, कारण बाजार कोरोनाने बेजार झाला आहे, पुढे काय होणार, कुठले क्षेत्र गुंतवणुकीस योग्य आहे, भविष्यात रिस्क कशी मॅनेज करायची याविषयी खूप अपेक्षा होती. यावेळी, या सदरातून कोरोना भय घालवण्याची चांगली संधी होती. भविष्यातील गुंतवणूक कशी ठेवायची ते या वेळी सांगण्यासारखे होते. अल्प, मध्य आणि दीर्घकालीन गुंतवणूक यामध्ये भेद करून त्याप्रमाणे शेअर सांगणे, भविष्यातील आर्थिक बदल, रिस्क अससेसमेंट अशी फोड केली, तर लेख अजून वाचनीय होईल.  
- प्रद्युम्न सेवेकरी


स्त्रीवादाचे सर्वसमावेशक स्वरूप समजले
 राज-रंग या सदरात प्रकाश पवार यांचा विद्या बाळ यांच्याविषयीचा लेख (ता. १५ फेब्रुवारी) वाचला. स्त्रीवाद ही आदर्श आणि सम्यक संकल्पना व तिचे सर्वसमावेशक स्वरूप विद्या बाळ यांच्या पाच वैशिष्ट्यांचा योग्यप्रकारे उलगडा झाल्यानंतर उमगत आहे. नाहीतर स्टेजवरून आम्ही स्त्रीवाद सर्वसामान्यांपर्यंत वेगळ्याच प्रकारे पोचवत असतो. प्रकाश पवार यांच्या अभ्यासपूर्ण, संशोधक मांडणीतून आमच्या विचारांना नवीन आणि विशाल दृष्टी मिळाली आहे. यापुढेही आम्हाला संशोधनासाठी अशीच अभ्यासपूर्ण आणि प्रेरक मेजवानी सतत मिळो!
- डॉ. मृणालिनी शिंदे, कराड


वृक्षवाढ व संगोपन ही नैतिक जबाबदारी
‘सकाळ साप्ताहिक’मधील (ता. ७ मार्च) ‘अंटार्क्टिकवर आश्‍चर्यकारक तापमानवाढ’ लेख वाचला. वातावरणातील अनिश्चितता ही गोष्ट जणू निसर्गाचा नियम होऊ पाहते आहे, अशी सध्याची स्थिती झाली आहे. अंटार्टिकसारख्या बर्फाळ प्रदेशात जिथे कधीही बर्फाव्यतिरिक्त काहीच पाहायला मिळत नाही, तिथेही आता पाणी पाहायला मिळत आहे, ही आता मात्र काळजी करण्याची बाब झाली आहे. जगभरातील पर्यावरणतज्ज्ञ त्यासाठी हवालदील होऊन कारणमीमांसा शोधून त्यावर मात करण्याचे मार्ग शोधत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वृक्षतोड थांबून वृक्ष लागवडीचे प्रमाण वाढवले पाहिजे. वृक्षवाढ आणि त्याचे संगोपन ही प्रत्येक सज्ञान भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे आणि ती त्याने आवर्जून पार पाडली पाहिजे. भरपूर पाऊस पडेल असे वातावरण तयार झाले पाहिजे. पाणी योग्य पद्धतीने साठवून त्याचा योग्यच वापर झाला पाहिजे. पाण्याची नासाडी म्हणजे सर्वनाश, ही बाब मनावर बिंबवली पाहिजे. धूर आणि इतर प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवला पाहिजे.
- डॉ. शिवाजी गायकवाड, राजगुरुनगर


समृद्ध करणारा पर्यटन विशेषांक 
‘सातारासह पर्यटन विशेषांक’ (ता. १ फेब्रुवारी) हा वाचकांना समृद्ध करणारा आहे. अनेक धार्मिक स्थळांची व गडकिल्ल्यांची माहिती अंकात आहे. त्यातील ‘दक्षिण काशी : वाई’ हा लेख वाचून वाईबद्दल अधिक बारकाईने माहिती मिळाली. 
वाईचे आणि आमचे ऋणानुबंध असे, की माझे पती राहुल यांची मोठी व धाकटी मावशी दोघीही वाईला असतात. तेथील मेणवली घाट, धोम येथील नृसिंह मंदिराला आम्ही भेट दिली होती. अप्रतिम वास्तू व स्थापत्यकलेची प्रचिती आम्हाला आली. वर्षा-दोन वर्षांतून गोंदवले येथे जाण्याचा योग येतो. साताऱ्याहून गोंदवले येथे जाताना वर्धनगडाचे दर्शन होते. औंध येथील वस्तुसंग्रहालयाबद्दल अभिमानाने सांगण्याची गोष्ट अशी, की हे संग्रहालय माझे आजोबा (आईचे वडील) दत्तात्रय राजाज्ञा यांच्या देखरेखीखाली (as a contractor and engineer) बांधले गेले आहे. संग्रहालयाच्या दर्शनी भागात त्यांचा नामोल्लेख आहे. 
किन्हई येथे साखरगडनिवासिनी देवीचे मंदिर डोंगरावर असून किन्हई येथे राममंदिरही आहे. येथेदेखील दरवर्षी देवीची यात्रा भरते. कार्तिक पौर्णिमेला औंधची यमाई देवी व किन्हईची साखरगडनिवासिनी यांच्या भेटीचा सोहळा संपन्न होतो. चांगल्या रस्त्यांची सोय झाल्यास व अधिक माहिती उपलब्ध झाल्यास पर्यटक या गावांना नक्कीच भेट देतील. तसेच पर्यटकांनी पाचगणी, महाबळेश्वर या पर्यटन स्थळांबरोबरच वाई, किन्हई, औंध याही गावांना आवर्जून भेट द्यावी.
- रेणुका दर्शने, पुणे
 

संबंधित बातम्या