वाचक लिहितात...

वाचक
सोमवार, 1 जून 2020

वाचक लिहितात...
निवेदन :
‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

स्वतंत्र मतकरी
‘सकाळ साप्ताहिक’चा ३० मेचा अंक नेहमीसारखाच चांगला अंक आहे. ऋता बावडेकर यांचा रत्नाकर मतकरी यांच्यावरील लेख आवडला. मतकरी सर्वतंत्र स्वतंत्र होते. त्यांना कोणत्याही संप्रदायात बसवता येत नाही. त्यांनी आपली वाट तयार केली. प्रकाश पवार यांचे महाराष्ट्रचिंतन अंतर्मुख करते.
- डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ लेखक, पुणे

सर्वसमावेशक ‘जबाबदार सुटी’
आपल्या पाचव्या ई-आवृत्तीच्या (१६ मे २०२०) निमित्ताने मुलांना समजेल अशा भाषेतून कोरोना विषाणूचा संसर्ग, खबरदारीचे उपाय इत्यादीबाबतची माहिती डॉ. अविनाश भोंडवे यांच्या लेखनातून मिळाली. सध्या त्याची नितांत आवश्यकता आहे. पृथ्वीराज तौर यांच्या लेखणीद्वारे बुकगंगा, अक्षरधारा इ. संकेतस्थळांची माहिती मिळाली. मुलांना घरातील उपलब्ध साहित्यातून विविध प्रयोग करण्याचे मार्गदर्शन मिळाले. महत्त्वाचे म्हणजे ‘जबाबदार सुटी’ या आवृत्तीमुळे मुलांना सुटीतील अनुभव व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. एकंदरीत ‘जबाबदार सुटी’ एक मुलांसाठी असलेली ‘सर्वसमावेशक’ अशी ई-आवृत्ती आहे.
- सुप्रिया खासनीस, पिंपरी-चिंचवड

चालू घडामोडींवरील लेख ही ‘सकाळ साप्ताहिक’ची खासियत
मुलांसाठी या वर्षीची सुटी कोरोनाचे संकट व लॉकडाउन यामुळे अगदी वेगळ्याच प्रकारची ठरली आहे. या सक्तीच्या सुटीवर मुलांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून (१६ मे २०२०) ही सुटी नक्कीच ‘जबाबदार सुटी’ आहे हे जाणवते. मुलांसाठी घरी बसून करता येणारे विज्ञानाचे प्रयोग, विविध उपक्रम तसेच त्यांना करता येतील अशा सोप्या पदार्थांच्या कृती फार छान आहेत. डॉ. अविनाश भोंडवे यांचे सर्वच अंकातील कोरोनाविषयीचे लेख माहितीपूर्ण आहेत. ‘कोरोना समजून घ्या’ या त्यांच्या लेखातील कोरोना विषाणूविषयीची माहिती मुलांप्रमाणेच मोठ्यांनादेखील उपयुक्त अशी आहे. चालू घडामोडींवर लेख ही तर ‘साप्ताहिक’ची खासियत असल्यामुळे त्यात इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन कलावंतांबद्दलच्या लेखांचा समावेश आहे. शीर्षकाप्रमाणेच ऋषी कपूरवरील लेख ‘खणखणीत’ झाला आहे.
शनिवारी सकाळी नाश्‍त्याबरोबर ‘सकाळ साप्ताहिक’ वाचणे हा गेल्या कित्येक वर्षांचा शिरस्ता लॉकडाउनमध्येदेखील ई-आवृत्तीच्या स्वरूपात तसाच सुरू राहिला आहे.
- मृणाल तुळपुळे, पुणे

जिव्हाळ्याचे सदर
‘सकाळ साप्ताहिक’ च्या २३ मे २०२० च्या अंकातील सर्व सदरे नेहमीप्रमाणेच वाचनीय आहेत. लॉकडाउनचा काळ लक्षात घेऊन त्यानुसार अंकाची रचना असते. लहान मोठे सर्वांसाठी उपयुक्त! स्वप्ना साने यांचे ‘बोल्ड अँड ब्यूटिफुल’ हे सदर खूपच उपयुक्त आणि जिव्हाळ्याचे वाटते. सौंदर्यासंदर्भात सगळ्याच विषयांवर सविस्तर आणि समर्पक विवेचन असते. सर्व गोष्टी घरीच जमणाऱ्या असतात.
- स्मिता तत्ववादी, पुणे

दर्जेदार माहितीचा ‘सकाळ साप्ताहिक’
‘सकाळ साप्ताहिक’ सर्व वयोगटांकरिता खूप उपयुक्त आहे. यातून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशी सर्व माहिती मिळते. या वेळच्या ‘सकाळ साप्ताहिका’तून (३० मे २०२०) आपण आत्मनिर्भर कसे व्हावे, त्याचप्रमाणे कलरफुल सरबते, आइस्क्रीमची माहिती मिळाली. ते करूनदेखील बघितले. जगभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नवीन फेस मास्कची माहिती मिळाली. अबाल वृद्ध आणि तरुण सगळ्यांकरिता जनरल नॉलेजचे क्विझ खूप मनोरंजक आहे. एकंदरीतच या ‘साप्ताहिका’तून दर्जेदार माहिती आम्हा रसिक वाचकांना मिळते.
- योगिता पाटील, बदलापूर

खऱ्या अर्थाने इतिहास जगणारे...
‘नरवीर अभिवादन यात्रा’ (२१ मार्च २०२०) या लेखात डाॅ. अमर अडके यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्ययात्रेच्या पुण्यमार्गावरच्या प्रवासाचे वर्णन केले आहे. या प्रसंगी मनात काय भावना दाटल्या होत्या, तसेच ही कल्पना त्यांच्या मनात कधी आली, सिंहगड ते उमरठला घेऊन जाणाऱ्या निरनिराळ्या वाटांचा शोध, या वाटांवर त्यांना भेटलेल्या इतिहासाच्या खाणाखुणा, मनात जपून ठेवलेले लोक व शेवटी एक मार्ग निश्चित करून त्या मार्गाने नरवीरांची पालखी घेऊन जाणे हा सर्व प्रवास लेखकाने लेखात मांडला आहे. हा मार्ग धुंडाळण्यासाठी लेखकाने बराच अभ्यास, तसेच वाटा आडवाटांनी बरीच पायपीट केलेली दिसते. हा प्रवास अनुभवण्यासाठी हा लेख वाचावाच लागेल. त्यांच्या लेखणीतून उतरलेला हा प्रवास मन रोमांचित करणारा आहे.
पारगडावर नरवीरांच्या वंशजांकडून (बाळकृष्ण ऊर्फ दादा मालुसरे) कवड्याची माळ पाहण्याचा, नव्हे अनुभवण्याचा भाग्यकारक प्रसंग लेखकाने मांडला. ही कवड्यांची माळ शिवरायांनी स्वतःच्या हातांनी नरवीरांच्या पार्थीवावर ठेवली होती. लेखक म्हणतात, ‘अंगात वीज चमकून जावी असा भास झाला.’ ज्या माळेला प्रत्यक्ष महाराजांचा पवित्र स्पर्श झाला, त्या माळेचा स्पर्श यापेक्षा वेगळी आणखी कुठली अनुभूती देणार? ज्यांना ही अनुभूती मिळते ते भाग्यवंत! पारगडाच्या मालुसऱ्यांच्या देव्हाऱ्यातले देव अजून पूर्णपणे बेळगावला गेले नव्हते, पिढ्यान् पिढ्याचे देव्हारे अजूनही पारगडला मंगल करत होते, ही वाक्ये लेखकाच्या प्रतिभेची साक्ष देतात. त्यांच्या प्रत्येक लेखातून त्यांचे शिवरायांवरचे, गडकिल्ल्यांवरचे, सह्याद्रीवरचे आणि इतिहासावरचे अतीव प्रेम दिसून येते, त्यांच्या मनात भरून राहिलेली श्रद्धा दिसून येते. हा लेख वाचताना नरवीरांचा इतिहास डोळ्यापुढे उभा राहिला. त्यांच्या पार्थिवावर महाराजांनी कवड्यांची माळ ठेवली तो प्रसंग कसा असेल, उमरठला त्यांची पालखी पोचल्यावर गावातले वातावरण कसे असेल या कल्पनेने चित्त थाऱ्यावर राहिले नाही. मन बराच वेळ इतिहासात गुंतून राहिले.
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत शिवरायांचे, त्यांच्या स्वराज्याचे, इतिहासाचे अस्तित्व आहे. प्रत्यक्ष गडावर, जेथे शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते, त्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वाड्या-वस्त्यांवर राहण्याचा, तिथल्या लोकांच्या सहवासाचा अनुभव काय विलक्षण असेल? तिथल्या वेगवेगळ्या वाटांवरून फिरताना काय काय अनुभव येत असतील? लेखक हे भाग्यशाली अनुभव वरचेवर घेत असतात. अस्वलखिंडीपासून कामथ्याला येताना जंगलात ते भरकटले होते. एवढ्यात प्रकाश आणि आवाजाने तब्बल पाऊण तास त्यांची सोबत केली. तो आवाज, तो प्रकाश, ती माउली त्यांना भेटलीच नाही. कड्यावरच्या अरण्यात लुप्त झाली. असे विलक्षण अनुभव लेखकाला पदोपदी आले.
लेखक व त्यांचे सहकारी शिवरायांचा इतिहास खऱ्या अर्थाने जगत आहेत, असे मला वाटते.
- रेणुका दर्शने, पुणे

संबंधित बातम्या