वाचक लिहितात

वाचक लिहितात...
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

ईमोजीसारखे दुसरे माध्यम नाही
जवळ जवळ तीन महिन्यांनी ‘सकाळ साप्ताहिक’ (प्रत्यक्ष) हातात पडल्यामुळे आभासी विश्‍वातून सुटका झाल्याचा आनंद मिळाला. ११ जुलैचा अंक चाळून, वाचून, रवंथ करून झाला आणि पुनश्‍च त्याच आभासी विश्‍वातील एका महत्त्वाच्या संवाद माध्यमाच्या, शब्दांना पर्याय ठरू पाहणाऱ्या ईमोजीपाशी (युनिव्हर्सल भाषा) थबकलो. तेथेच रेंगाळत राहिलो. शब्दांना पर्याय ठरणाऱ्या या ईमोजीचे यथार्थ वर्णन करण्यासाठी इरावतीताईंना जवळजवळ तीनशे साडेतीनशे शब्दांची मदत घ्यावी लागली. जगातल्या कोणत्याही देशातील, कोणत्याही संस्कृतीच्या, कुठल्याही भाषिकाला आपल्या मनातील भाव-भावना थोडक्यात निसंधिग्दपणे व्यक्त करण्याचे आजच्या घटकेला तरी अन्य माध्यम नसावे. त्याची भाषा ‘युनिव्हर्सल’ झाल्यावर का होईना त्यातील बारकावे, योग्य वापर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ईमोजीचा उगम, विकास आणि सर्व जगाच्या संवाद शक्तीवर अधिराज्य गाजविणाऱ्या क्षमतेची संपूर्ण कुंडली ‘सकाळ साप्ताहिक’ने वाचकांपुढे मांडली. ‘शब्दांना ईमोजीची साथ असेल तर परिणामकारकता वाढते,’ ही डॉ. मराठेंची प्रतिक्रिया खूपच बोलकी. या ईमोजीची दखल घेऊन ऑक्सफर्ड डिक्शनरीने केवळ त्याचा डिक्शनरीत समावेशक केला नाही, तर ‘वर्ड ऑफ द इअर’ (२०१५) असा सन्मान करून ‘फेस विथ टिअर्स ऑफ जॉय’ या ईमोजीला शब्दाचा मानही दिला गेला. मूर्ती लहान पण कीर्ती महान... दुसरे काय म्हणणार?
- अनिल ओढेकर, नाशिक

मुद्रित ‘साप्ताहिक’ वाचायची इच्छा पूर्ण...
कित्येक आठवड्यांनंतर ‘सकाळ साप्ताहिक’चा ताजा (११ जुलै २०२०) अंक दाराला अडकवलेला दिसल्यावर विलक्षण आनंद झाला. पुण्यात साधारण एप्रिल महिन्यात सर्वच वृत्तपत्रे बंद असल्याने त्यांच्या नेट-आवृत्त्या वाचत होतो म्हणा, परंतु वर्षानुवर्षे पाने उलटण्याची सवय झाल्याने त्यात फारशी मजा येत नव्हती. आता वृत्तपत्रे नेहमीप्रमाणे मिळू लागल्यानंतर ‘सकाळ साप्ताहिक’ मुद्रित स्वरूपात कधी वाचायला मिळतो अशी उत्सुकता होती, ती पूर्ण झाली.
काळाप्रमाणे अनेक बाबी बदलतात, बदल हाच सर्वात स्थायी असतो, आपणही त्यानुसार बदलले पाहिजे... वगैरे सगळे मान्य असले आणि बरेचसे (आनंदाने) स्वीकारलेही असले तरी मासिक-पुस्तक-वृत्तपत्र इ.च्या कागदाचा वास आणि स्पर्श मनात ठसलेला असतो. शिवाय पाने उलटणे, स्क्रोल किंवा पेज डाऊनपेक्षा सोपे असते आणि झूम करण्याची (विशेषतः स्मार्टफोनवर वाचताना) किरकिर नाही!
सध्याच्या दररोज बदलत्या परिस्थितीमध्येही यापुढेदेखील छापील अंक हाती येत राहील अशी आशा ठेवू.
- श्रीनिवास निमकर

सर्वच लेख विविधतेने नटलेले 
आज पुस्तकरूपी (छापील) ‘सकाळ साप्ताहिक’चा अंक मिळाला. वाचून खूप छान वाटले. इरावती बारसोडे यांचा ‘युनिव्हर्सल भाषा’ हा लेख विशेष आवडला. रोजच्या व्यवहारात आपण वापरत असलेले ईमोजी याची त्यांनी दिलेली माहिती उपयुक्त आहे. त्यानंतर डॉ. विद्याधर बापट यांचा मानसिक आरोग्यावरील लेखसुद्धा चांगला आहे. कोरोनाच्या काळातसुद्धा तुम्ही घेतलेले कष्ट आणि आजचा हा अंक यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. अंकातील सर्वच लेख खूप माहितीपूर्ण आणि विविधतेने भरलेले आहेत. असेच पुढचे सर्व अंक आम्हाला छापील स्वरूपात मिळोत हीच मनोकामना.
- संचिता लिखिते

सुव्हीनूर इटिंग... संग्राह्य लेख!
अकरा जुलैच्या ‘सकाळ साप्ताहिक’मधील संजय दाबके यांचा ‘सुव्हीनूर इटिंग’ हा लेख खूपच छान आणि संग्राह्य आहे. मांडणी आणि वर्णन ओघवते आहे. नेमकेपणा दिसतो. ‘आता हा जो स्टॉप आहे, त्याचा भुकेशी काही संबंध नसतो. थांबायचं ठरलेलं असतं.’ हे वाक्य भावलं. सर्वोत्कृष्ठ पदार्थ मिळण्यासाठी पंचतारांकित हॉटेलची गरज नाही, तर ते रस्त्याकडेच्या टपरीवरही मिळतात, हे अधोरेखित होते. 
आता प्रवास करताना लेखकाने नमूद केलेल्या ठिकाणी पाय वळणार, हे मात्र नक्की!
- सुनिलकुमार माधव रेळेकर

संबंधित बातम्या