वाचक लिहितात...

-
सोमवार, 1 मार्च 2021

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

असा ‘स्वरयात्रिक’ होणे नाही
सहा फेब्रुवारीच्या ‘सकाळ साप्ताहिका’तील ‘भावार्द्र स्वरांचा ख्यालिया’ हा  सतीश पाकणीकर यांचा लेख वाचला. त्यांनी आठवणींतून पं. भीमसेन जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा रसिकतेने घेतलेला आढावा पंडितजींचे स्वरमय भावचित्र रेखाटतो. गुलबर्ग्यात दोन-तीन वेळा त्यांच्या गायनकलेचा आस्वाद घेतला तेव्हा त्यांच्याशी बोलण्याचा सुयोगही जुळून आला. आठवणी येत राहतात तशी मनाची दारे आपोआप उघडतात आणि गानरसिकांपुढे पं. भीमसेन जोशी आपल्या स्वरांसह मूर्त होत जातात. म्हणूनच पंडितजींसारखा असा ‘स्वरयात्रिक’ पुन्हा होणे नाही!

- प्रा. व्यंकटेश वळसंगकर, गुलबर्गा, कर्नाटक

सोप्या शब्दांतले भूवारसा पर्यटन
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये सुरू झालेली ‘भूवारसा पर्यटन’ ही लेखमालिका आवडते. भूशास्त्रीय वारसा या दृष्टीने स्थळे बघणे हे फार महत्त्वाचे आहे आणि ती जाणीव या मालिकेमुळे वाचकांमध्ये रुजेल. क्लिष्ट विषय असूनसुद्धा डॉ. श्रीकांत कार्लेकर लेख अतिशय सोप्या शब्दांत व सोपा करून लिहितात. फोटोंमुळे अधिक वाचनीय होतो.

- प्रतिमा दुरुगकर

अभ्यासपूर्ण लेख
‘सकाळ साप्ताहिक’मधील सर्वच लेख चांगले ज्ञानवर्धक असतात. १३ फेब्रुवारीच्या अंकामधील ‘काय मिळतं या शोधातून?’ हा मकरंद केतकर यांचा लेख अभ्यासपूर्ण आहे. हीच ती वेळ आहे; आपल्याकडे लोकांच्या मनामध्ये प्राण्यांबद्दल असणाऱ्या अनेक अंधश्रद्धा, गैरसमज दूर करण्याची. प्राण्यांचे वर्गीकरण, त्यांची कौशल्यपूर्ण उत्क्रांतीतून चालणाऱ्या वाटचालीबद्दल समजून घेण्याची व सांगण्याची. मकरंद केतकर यांचे लिखाण विषयाशी सुसंगत असून मार्गदर्शक असते. त्यांच्या लेखांमधून उदयोन्मुख विद्यार्थ्यांना चालना मिळेल असा विश्वास वाटतो.

- देशभूषण बस्तवडे

डॉ. माशेलकरांचे मोलाचे योगदान
‘सकाळ साप्ताहिक’च्या ताज्या अंकातील (ता. २० फेब्रुवारी) हळदीचे पेटन्ट हा लेख वाचला. अमेरिकेने हळदीच्या वापराचे पेटन्ट मिळवून हळदीचा औषधी वापर करण्याच्या पारंपरिक भारतीय प्रक्रियेवर हक्क सांगितला होता. त्या विरोधात भारताने एक मोठी कायदेशीर लढाई देऊन अमेरिकेकडून ते पेटन्ट काढून घेतले असा उल्लेख आहे. हळदीच्या स्वामित्व हक्काच्या या लढाईत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथराव माशेलकर यांचे योगदान भारताच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे, ही बाब विशेषत्वाने नमूद कराविशी वाटते. हळदीच्या औषधी वापराबद्दल भारतीयांच्या अनेक पिढ्यांना असलेल्या ज्ञानावर आपला अधिकार सांगणाऱ्यांकडून आपला पारंपरिक हक्क परत मिळवण्यासाठी डॉ. माशेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक महिने अथक परिश्रम घेतले होते. लेखात उल्लेखलेल्या कायदेशीर लढाईमध्ये भारताला डॉ. माशेलकर यांच्या प्रयत्नामुळे यश मिळाले होते. आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ हळदीच्या औषधी गुणधर्मांबाबत प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये उपलब्ध असणाऱ्या संदर्भांसह अनेक पुरावे त्यांनी सादर केले होते. अमेरिकी पेटन्ट कार्यालयाला अखेर आपली चूक मान्य करावी लागली होती. डॉ. माशेलकर यांच्या या परिश्रमांमुळे आपल्या पारंपरिक ज्ञानाचे मोल जसे आपल्याला समजले तसेच संपूर्ण जगालाही ते समजले. डॉ. माशेलकरांच्या प्रयत्नांचा भारतीयांना झालेला महत्त्वाचा फायदा म्हणजे भारतीय पारंपरिक ज्ञानाचे हक्क भारताकडेच राहिले. हळदीच्या पेटन्ट प्रमाणेच अमेरिकेनेच हक्क सांगितलेले बासमती तांदळाचे पेटन्टही डॉ. माशेलकरांच्या प्रयत्नांमुळेच भारताला परत मिळाले होते.

- शुभम दवे, नाशिक
 

संबंधित बातम्या