विद्वान, चिंतक व ‘न’ समजलेला नेता! 

अनंत बागाईतकर, दिल्ली
सोमवार, 13 जुलै 2020

माजी पंतप्रधान आणि भारतातील आर्थिक उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे पामुलापर्ती वेंकट नरसिंह राव यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. २८ जून १९२१ हा त्यांचा जन्मदिवस! प्रशंसेपेक्षा टीका आणि गैर-अपसमजाचाच धनी झालेल्या या नेत्याच्या व्यक्तिमत्त्वातील काही पैलूंचा यानिमित्ताने घेतलेला आढावा...

नरसिंह राव यांना समजून घेण्यापेक्षा त्यांच्याबद्दल वाद व गैरसमजच अधिक प्रभावी ठरले. या अपसमजांची प्रमुख पार्श्‍वभूमी राजकीय होती आणि भारतासारख्या देशात राजकारण हे सर्वप्रभावी व सर्वव्यापी असल्याने नरसिंह राव त्याचे बळी ठरले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. सक्रिय राजकारणातून जवळपास निवृत्ती स्वीकारल्यानंतर अपघाताने त्यांच्याकडे या देशाचे नेतृत्व करण्याची संधी चालून आली. राव लोकप्रिय किंवा बळकट-मजबूत जनाधार असलेले नेते नव्हते आणि कदाचित तीच बाब त्यांच्याकडे नेतृत्व जाण्यासाठी निर्णायक ठरली असावी, असे अनुमान केले जाते आणि ते निराधार नाही. राजीव गांधी यांच्या आकस्मिक हत्येनंतर काँग्रेस पक्षातील नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी विविध नेत्यांनी आपापल्या परीने दावे केले होते. परंतु, राजीव गांधी यांच्या हत्येनंतर स्वकोषात गेलेल्या गांधी कुटुंबीयांना जनाधार असलेल्या तालेवार नेत्यांपेक्षा नरसिंह राव यांच्यासारखा जीवनाच्या संध्याकाळी पोचलेल्या, तसेच लोकप्रिय नसलेल्या आणि आपल्या आदेशाबरहुकूम काम करणाऱ्या नेत्याला पसंती देणे अधिक सोयीस्कर वाटले आणि काँग्रेससमोर उभ्या ठाकलेल्या त्या पेचप्रसंगात नरसिंह राव यांच्याकडे पक्ष आणि सरकारचे नेतृत्व आले. 

याठिकाणी गांधी-नेहरू परिवाराचे तत्कालीन सदस्य व त्यांच्या अंतःस्थ व विश्‍वासू वर्तुळातील मंडळी यांना नरसिंह राव यांच्या व्यक्तिमत्वाचे अचूक आकलन करण्यात यश मिळाले असे म्हणता येणार नाही. कारण त्यांनी निवडलेले नरसिंह राव आणि सत्तास्थानी विराजमान झालेले नरसिंह राव यात मोठा फरक होता. याचे कारण असे की नरसिंह राव हे फार लोकप्रिय किंवा जनाधार नसलेले नेते होते ही बाब खरी असली, तरी ते एक बुद्धिमान नेते होते आणि भारतीय राजकारण मुळापासून समजलेले ते ‘विचारी’ (थिंकिंग) नेते होते. ही बाब गांधी कुटुंब व त्यांच्या मूठभर समर्थकांना कळली नाही आणि नरसिंह राव यांना आपण आपल्या तालावर नाचवू शकू अशा समजुतीत ते राहिले. नरसिंह राव यांनी त्यांच्या कारकिर्दीत गांधी कुटुंबाशी कधीही थेट संघर्षाची भूमिका घेतली नाही, परंतु त्यांच्या आदेशानुसारही ते फारसे वागले नाहीत. त्यांनी काँग्रेसला वेगळी दिशा देण्याचाही प्रयत्न केला व तो मात्र यशस्वी झाला नाही. काँग्रेस पक्ष त्याच्या गतानुगतिक परिवारवादातच गुरफटलेला राहिला. परिवाराच्या पकडीतून काँग्रेस पक्षाला बाहेर काढण्यात राव यांचे राजकारण यशस्वी होऊ शकले नाही. 

राव यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्रिपद भूषविले आणि त्याआधी राज्यातही ते अनेक वर्षे मंत्रीही राहिले होते. मुख्यमंत्रिपदानंतर इंदिरा गांधी यांनी त्यांना राष्ट्रीय राजकारणात आणले आणि दिल्लीत त्यांनी विविध खाती सांभाळून एक खात्रीशीर मंत्री ही विश्‍वासपात्रता मिळवली. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्याकडे पक्ष आणि सरकारची सूत्रे आली. राजीव गांधी यांनी तरुणांना प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारूनही नरसिंह राव यांना त्यांनी हात लावला नव्हता. किंबहुना राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात ते मार्गदर्शक आणि त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणूनच ओळखले जात. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण असे मनुष्यबळ विकास मंत्रालय होते. याच काळात त्यांनी नवे शैक्षणिक धोरणही तयार केले व ते त्यांचे प्रमुख योगदान ठरले. वर उल्लेख केल्याप्रमाणे राजीव गांधी यांच्या मार्गदर्शकाच्या रूपात त्यांनी काम केले. राजीव गांधी यांनी तरुण नेत्यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केल्यानंतर त्याविरुद्ध काँग्रेस पक्षात असंतोष निर्माण झाला होता. सरकारी पातळीवरही राजीव गांधी यांच्या वेगवान कार्यपद्धतीबद्दल नापसंती जोर धरू लागली होती. या काळात राजीव गांधी यांच्या विरोधात आलेल्या अविश्‍वास ठरावावरील चर्चेत बोलताना नरसिंह राव यांचे अत्यंत समर्पक आणि काँग्रेसमधीलच नाराजांना समज देणारे सूचक भाषण गाजले होते. या भाषणात त्यांनी जुन्या नेत्यांना समजावताना म्हटले होते, ‘हा नेता तरुण आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्या कामाचा वेग हा निश्‍चितपणे अधिक असणार. देशासाठी जे काही करायचे ते वेगाने करण्यावर या नेत्याचा भर आहे आणि ते तारुण्यसुलभ आहे. यात गैर काही नाही. आपण जे वयाने मोठे आहोत त्यांना या वेगाशी जुळवून घेणे शक्‍य असेल, तर आपण जुळवून घेऊ अन्यथा आपण आपोआपच मागे पडणार आहोत.’ नरसिंह राव यांच्या जिव्हेला जणू भविष्यवेत्त्याचा स्पर्श झाला असावा. कारण या वेगाशी त्यांनी जुळवून घेतलेच, परंतु त्या सातत्यामुळेच त्यांना निवृत्तीनंतरही पंतप्रधानपद प्राप्त झाले. प्रथम इंदिरा गांधी आणि त्यानंतर राजीव गांधी यांच्याबरोबर नरसिंह राव यांनी ज्या निष्ठेने काम केले त्याचाच ‘राजकीय परतावा’ म्हणून पंतप्रधानपद त्यांच्याकडे आले, असे म्हटल्यास अनुचित ठरणार नाही. 

नरसिंह राव पंतप्रधानपदी आरूढ झाले आणि त्यांनी त्यांच्या चाणक्‍य-बुद्धीने त्यांच्या एकेका राजकीय प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या त्यांच्या जागी जखडून ठेवले आणि सरकार, प्रशासन व पक्षावर पूर्ण पकड मिळवली. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात त्यावेळी असलेल्या अभूतपूर्व अशा आर्थिक संकटाने झाली. त्यांनी मनमोहन सिंग यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञाला पाचारण करून अर्थखात्याची जबाबदारी दिली आणि मुक्त हस्त देऊन अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्याचे स्वातंत्र्य दिले. मनमोहन सिंग यांनी ते काम इमानेइतबारे पार पाडले. अर्थव्यवस्थेची गाडी सुरळीतपणे सुरू झाली. देशाच्या दृष्टीने हा एक नवा प्रयोग ठरला. समाजवाद व समाजकल्याणाला प्राधान्य देणारी आर्थिक धोरणे जाऊन त्यांची जागा स्पर्धेवर व मुक्त बाजारावर आधारित खुल्या व उदार आर्थिक धोरणांनी घेतली. उद्योगांना लायसेन्स परमिट दंडुकेशाहीतून मुक्त करण्यात आले. लोकांच्या हातात व खिशात पैसा खुळखुळू लागला. देशात नवा चंगळवादी - नवश्रीमंत मध्यमवर्ग तयार होऊ लागला. सुखासीनतेतून प्रतिगामी विचारांना चटकन खतपाणी मिळते. तसेच घडले आणि पाहता पाहता अयोध्येतील राम मंदिर निर्मितीच्या हिंदुत्ववादी मोहिमेने विराट रूप धारण केले. ज्या आर्थिक परिवर्तनामुळे नरसिंह राव यांनी वाहवा मिळवली, ती त्यांची प्रतिमा या प्रतिगामी व पुराणमतवादी मोहिमेने धुळीस मिळवली, इतकी की त्यातच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा दुर्दैवी अंतही झाला. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद उद्‌ध्वस्त करण्यात आली आणि ती नरसिंह राव यांच्या घसरणीची सुरुवात ठरली. यानंतर राव ही घसरण सावरू शकले नाहीत आणि ते अशा राजकीय मंडळींच्या कळपात गुंतले गेले, की तेथून त्यांची सुटका होऊ शकली नाही. परिणामी ज्या गांधी-नेहरू परिवारापासून काँग्रेसला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी राजकारण केले, त्या परिवार व परिवाराच्या निकटवर्तीयांनी नरसिंह राव यांच्या राजकीय कारकिर्दीवर शेवटचे घाव घालून ती संपुष्टात आणली. 

नरसिंह राव यांच्या कारकिर्दीचे राजकीय वैशिष्ट्य हे होते, की काँग्रेसची सत्ता असूनही भारताच्या इतिहासात प्रथमच नेहरू-गांधी परिवाराबाहेरच्या व्यक्तीकडे देशाचे पंतप्रधानपद गेले होते. त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरावादी समाजवादी व संमिश्र अर्थव्यवस्थेला फाटा देऊन देशाला नवे आर्थिक वळण व दिशा देण्यात आली. या अशा सर्वसामान्यांच्या पातळीवर दखल घेतल्या गेलेल्या परिवर्तनातून राव यांच्याबद्दल ‘लोक-सदिच्छा’ निर्माण झाली होती. नेहरू-गांधी परिवाराबाहेरची व्यक्तीदेखील काँग्रेस आणि सरकार या जबाबदाऱ्या पेलू शकते आणि समर्थपणे पेलू शकते असे चित्र निर्माण झाले होते. राव यांनी काँग्रेस आणि नेहरू-गांधी परिवाराची काही शक्तिस्थाने ओळखली होती. उत्तर भारतातील परंपरावादी राजकारणात परिवाराला पाठिंबा मिळत होता. दक्षिण भारतात तशी स्थिती नव्हती. काँग्रेस पक्षातही उत्तर भारतातील दुढ्ढाचार्य नेत्यांचा दबदबा असे. धूर्त अर्जुनसिंग, महत्त्वाकांक्षी नारायणदत्त तिवारी, माधवराव शिंदे अशी मंडळी त्यांचे नेतृत्व करीत होती. राव यांनी पद्धतशीरपणे उत्तर भारतातील पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. दक्षिणेतील पक्ष संघटना आपल्या पायावर सुस्थितीत उभी होतीच. या काळात हिंदुत्ववादी शक्तींच्या विरोधात उत्तर भारतात काँग्रेसला ज्या ताकदीने उभे करायला हवे होते ते राव यांनी केले नाही. ती पोकळी मुलायमसिंग (उत्तर प्रदेश), लालूप्रसाद (बिहार) यांच्यासारख्या सामाजिक न्यायवादी नेत्यांनी भरून काढली. भाजपकडून कल्याणसिंग यांच्यासारख्या नेत्याचा बोलबाला सुरू झाला. यात काँग्रेस पक्ष व संघटना दुर्बळ व कमजोर होत जाऊन उत्तर प्रदेशात चौथ्या स्थानावर फेकली गेली. राव यांनी काँग्रेसला पूर्वपदावर किंवा पूर्वस्थितीवर आणण्यासाठी फारसे प्रयत्न केल्याचे दृष्टीस आलेले नाही. परिणामी विश्‍वनाथ प्रतापसिंग यांनी त्यांच्या सामाजिक न्यायवादी राजकारणाने उत्तर प्रदेश व बिहारमधून काँग्रेसला हद्दपार केले होते. नरसिंह राव यांनी काँग्रेस संघटनेला बळकटी न देता ती दुर्बळ कशी राहील असेच प्रयत्न केले आणि हिंदी भाषक या दोन सर्वांत मोठ्या राज्यातून काँग्रेसच्या उच्चाटनावर त्यांनी शेवटचा हात फिरवला. 

बाबरी मशीद उद्‌ध्वस्त झाल्यानंतर काँग्रेसमधून त्यांच्या विरोधात एकच हाकाटी होणे स्वाभाविक होते. त्या इतिहासाचे तपशील सर्वांना माहिती आहेत. परंतु, अलीकडच्या काळात राहुल गांधी यांनी नरसिंह राव यांच्या जागी गांधी परिवारातील व्यक्ती पंतप्रधान असती, तर बाबरी मशीद उद्‌ध्वस्त झाली नसती असे उद्‌गार काढण्यापर्यंत मजल गाठली. १९९६ मध्ये काँग्रेसचा झालेला पराभव आणि पक्षाला लागलेली गळती या पार्श्‍वभूमीवर नरसिंह राव यांच्या गच्छंतीची मोहीम पक्षात पुन्हा सुरू झाली. यामागे ‘परिवारा’चा हात होताच. अनेक वरिष्ठ नेत्यांनी रदबदली केल्यानंतर नरसिंह राव हे काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्यास तयार झाले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या उपकाराखाली दबलेल्या व तेव्हा पक्षाचे खजिनदार असलेल्या सीताराम केसरी यांच्याकडे अध्यक्षपद देण्यास तयारी दर्शविली. केसरी आपल्या हुकमाच्या बाहेर असणार नाहीत अशी राव यांची समजूत होती. परंतु, याठिकाणी मात्र राव यांचा होरा चुकला. सीताराम केसरी यांनी अध्यक्षपद हाती येताच राव यांच्यावरच पहिला घाव घातला. त्यांचे तिकीट कापताना बाबरी मशिदीच्या कारणास्तव कापत असल्याचेही त्यांनी सांगितले. सीताराम केसरी यांनी राव यांच्याकडून संसदीय पक्षनेतेपदही अत्यंत अशोभनीय पद्धतीने काढून घेतले. राव यांची ही राजकीय अखेर होती. पुढे राव यांचा खातमा करणाऱ्या सीताराम केसरी यांनाही याहून अधिक मानहानिकारकरीत्या पक्षाध्यक्षपदावरून पदच्युत व्हावे लागले होते. या काळातले काँग्रेस अंतर्गत राजकारण हा राजकीय विश्‍लेषकांच्या दृष्टीने अध्ययनासाठी आदर्श ठरला. 

राव हे चिंतनशील, मनन करणारे व विचारी राजकारणी होते. खासगीत बोलताना त्यांनी एकदा सांगितले होते, की ते महाभारत नेहमी वाचत राहतात. कारण महाभारत या ग्रंथात जवळपास विश्‍वात सापडणाऱ्या प्रत्येक प्रवृत्तीच्या व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना राजकारणातील पेच किंवा कोडी सोडविण्यासाठी मार्गदर्शन होते. राव यांच्या व्यक्तिमत्त्वातली ही चिंतनशील, नावीन्याबरोबर जुळवून ठेवून काळसुसंगत राहण्याची प्रवृत्ती निश्‍चितपणे विधायक व सकारात्मक होती. संगणक युगाची या देशातली सुरुवात राजीव गांधी यांनी केली आणि त्यांना नरसिंह राव यांनी समर्थ साथ दिली. एवढेच नव्हे तर नंतर पंतप्रधान झाल्यावर त्यांनी त्याचे विस्तारीकरण केले. त्यांची संसदेतली काही भाषणे विलक्षण होती. त्या भाषणांची दखल मात्र उचित प्रमाणात घेतली गेली नाही. देवेगौडा यांच्या विश्‍वासदर्शक ठरावाच्या पाठिंब्यासाठी त्यांनी केलेल्या भाषणात १९९६च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला याची जी मीमांसा त्यांनी केली, त्यानंतर सभागृहात बसलेले माजी पंतप्रधान चंद्रशेखर उठून त्यांना म्हणाले, ‘अरे मौनी बाबा यही भाषण तुम इलेक्‍शन के पहले देते तो यहाँ(विरोधी पक्षात) बैठनेके लिए आते नही।’ या भाषणात राव यांनी भारतीय नीतीतत्त्वाचा अतिशय बारकाईने आढावा घेताना भाजपने सर्वसाधारण भारतीय श्रद्धेचे प्रतीक असलेल्या रामाला राजकारणात ओढले. हा भारतीय राज्यघटनेचा सर्वार्थाने भंग होता, कारण राज्यघटना धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करते असे सांगून काहीशा उपरोधाने ते पुढे म्हणाले, ‘काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत साक्षात राम उभा राहिल्यानंतर आमचा पराभव हा अटळच होता! हे अनुचित होते परंतु ते स्वीकारावे लागले!’ याच भाषणात नरसिंह राव यांनी भारतीय मनोवृत्तीवर टिप्पणी करताना एक निरीक्षण नोंदवले. भारताची विविधता लक्षात घेतल्यास हा देश एककल्ली किंवा कोणत्याही एखाद्या टोकाच्या-अतिवादी विचारसरणीकडे झुकू शकणार नाही. अति-उजव्या किंवा अति-डाव्या मार्गाने हा देश जाऊ शकणार नाही आणि या देशाला ‘मध्यम मार्गा’खेरीज पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले. आजच्या राजकारणाला कुठेतरी लागू पडेल असे हे विधान आहे. 

वर्ष होते १९९९! सत्ताचक्राबाहेर एकाकी जीवन जगणाऱ्या नरसिंह राव यांना द्वितीय जेआरडी टाटा स्मृती व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले होते. आपल्यासारख्या सत्तेत नसलेल्या व कोणतेच महत्त्व न उरलेल्या व्यक्तीला भाषण देण्यासाठी का बोलावले याबद्दल त्यांनी सुरुवातीलाच आश्‍चर्यही व्यक्त केले. पण नंतर नेहमीप्रमाणेच त्यांनी एक अत्यंत विद्वत्तापूर्ण असे भाषण केले. भारतीय खेडे म्हणजेच भारत, कारण भारत हा प्रामुख्याने खेड्यातच वसलेला आहे, असा उल्लेख करून त्यांनी प्रतीकात्मक पद्धतीने बोलताना असा आशय व्यक्त केला, की भारतात खेडी व शहरे दोन वेगवेगळ्या कालकक्षां(टाइमफ्रेम)चे प्रतिनिधित्व करतात. राज्यकर्ते या दोन्हीच्या मधे असतात आणि विविध बदल, सुधारणा व परिवर्तनाच्या माध्यमातून या दोन कालकक्षांच्या एकीकरणाचे प्रयत्न सुरू असतात. त्यात यश-अपयश मिळत राहते. परंतु, अशा मध्यभागी असलेल्या राज्यकर्त्याची मानसिक अवस्था कशी असते याचे वर्णन करणाऱ्या एका आंध्र(तेलगू) लोककवीच्या(प्रजाकवि) काही ओळींचा संदर्भ त्यांनी दिला होता आणि त्यांच्या स्वतःचे वर्णनही केले होते...

आय कॅन नॉट करेक्‍ट द राँग्ज (मी चुका दुरुस्त करू शकत नाही) 
आय कॅन नॉट शो द वे (मी मार्ग दाखवू शकत नाही) 
आय कॅन नॉट पनिश दोज हू गो ॲस्ट्रे (पथभ्रष्ट-रस्ता चुकलेल्यांना मी शिक्षाही करू शकत नाही) 
आय कॅन नॉट इव्हन लिव्ह इन हॅपी अनकन्सर्न (मी तटस्थ आनंदातदेखील राहू शकत नाही) 
ॲज काऊंटलेस अदर्स डू.. (जसे अनेक इतर असंख्य राहतात) 
सो व्हॉट इज द पॉइंट ऑफ माय वरी (मग माझ्या चिंतेला अर्थ काय ) 
ॲट व्हॉट हॅपन्स इन द वर्ल्ड (जगात काय घडते त्याबद्दल ?) 

‘फिलॉसॉफर किंग’ किंवा ‘तत्त्वज्ञ राजा’ म्हणून नरसिंह राव यांनी सुरुवातीच्या काळात वाहवा मिळवली. परंतु, कालांतराने त्यांच्यातील तत्त्वज्ञ दुर्बळ झाला. त्यांच्यातल्या ‘राजा’ने व राजकारण्याने तत्त्वज्ञावर मात केली...! 
-------------------------------------------------------------------------------------

संबंधित बातम्या