कॅमेऱ्यातून दिसलेल्या सुमित्रा भावे

धनंजय कुलकर्णी
सोमवार, 10 मे 2021

स्मरण         

ज्येष्ठ दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याबरोबर काम केलेले सिनेमॅटोग्राफर धनंजय कुलकर्णी यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...

सुनीलने दार उघडले तेव्हा सकाळचे ११ वाजले होते. आत पाऊल ठेवताच कलात्मकतेने सजलेल्या घरात प्रवेश केल्याचे मला जाणवले. एक भिंत गडद रंगाची होती, तर इतर पांढऱ्या. एका भिंतीवर दार नसलेल्या लाकडी कपाटात असंख्य पुस्तके रचली होती. इतर ठिकाणी भिंतींवर मोठ्ठाले फोटो फ्रेममध्ये लावलेले होते. मोठ्या खिडकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोपे कुंड्यांमध्ये लावलेली होती. वेगळ्याच प्रकारचा दिवा एका कोपऱ्यात उभा होता. बसायला एका बाजूला सोफा होता, तर त्याच्या समोर भारतीय बैठक होती व तिसऱ्या बाजूला आरामदायी खुर्च्या होत्या. त्यावर विविध रंगाच्या चादरी होत्या. पुस्तकांच्या भिंतीजवळ छान पॉलिश केलेला झोपाळा होता. तिथे अत्यंत महागातल्या अथवा दुर्मीळ वस्तू नव्हत्या, तरी त्यांच्या रंगसंगती व रचनेमुळे वेगळे व छान दिसत होते. 

आम्ही तिघे पलीकडचे दार ढकलून गेलो. रंगीत, जाड पडदे लावून ती खोली अंधारी केली होती. त्या अंधारातही नीटनेटकेपणा जाणवत होता. ‘आम्ही चित्रित केलेले काही सिन्स पाहूयात व काय चित्रित करायचे आहे तेही सांगतो,’ असे सुनील म्हणाला. ते पाहून झाल्यावर ‘ते कसे दिसणे अपेक्षित आहे’ हे सुमित्रा भावेंनी सांगितले. ते सगळे ऐकल्यावर चित्रीकरणाबद्दल माझ्या मनात काही वेगळ्या कल्पना आल्या आणि मी त्या दोघांसमोर मांडल्या. पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर काम करत असल्यामुळे माझ्या सूचनांचा विचार होईल याची मला खात्री नव्हती. ‘चला, आधी आपण जेवून घेऊ,’ असे सुमित्रा भावेंनी म्हणताच सुनीलने खिडकीवरचा पडदा अलगद बाजूला केला तसा खोलीत प्रकाश पसरला. त्यांनी आधी केलेल्या चित्रपटांची पोस्टर्स नजरेत भरली. त्यात काही जुन्या सिनेमांची पोस्टर्सही होती. ‘कागज के फुल’ या चित्रपटाचे पोस्टर विशेष नजरेत भरले. जेवताना बऱ्याच विषयांवर चर्चा झाली आणि जेवण संपता संपता ‘धनंजय म्हणतो तशा पद्धतीने चित्रीकरण करायला हरकत नाही, चांगलं वाटेल,’ असे सुमित्रा भावेंनी म्हणताच माझा जीव भांड्यात पडला. कारण दिग्दर्शकाने आग्रही असावे, पण दुराग्रही असू नये या स्वभावाचा प्रत्यय मला आला होता. त्या रात्री शूटिंग वेळेआधीच संपले. ‘आपल्याला आज अजून एक कॅमेरामन मिळाला’ हे सुनीलला सांगितलेले वाक्य ऐकून मन आनंदले. ‘जाहिरात क्षेत्रात होणारे छायांकन व आमच्या चित्रपटात होणारे छायांकन फार वेगळे असते, त्यामुळे आपण एकत्र काम करायला नको’ हे सुमित्रा भावेंचे मत बदलायला १९९४नंतर बारा वर्षे लागली.

आज या गोष्टीला १५-१६ वर्षे झाली. त्यानंतर आम्ही अनेक वेळा, अनेक ठिकाणी, अनेक कारणांनी भेटत गेलो; कधी मीटिंगच्या निमित्ताने, तर कधी शूटिंगच्या निमित्ताने, कधी लोकेशन पाहायला तर कधी नुसतेच हिंडायला. प्रत्येकवेळी सुमित्रा भावेंची वेगवेगळी रूपे पाहायला मिळाली. त्यामध्ये त्यांची शिस्त, त्यांची जिद्द, त्यांची पर्फेक्शन मिळवण्यासाठीची चिकाटी व या सगळ्यासाठीची वैचारिक बैठक नेहमीच जाणवत राहिली. याच सुमारास मी त्यांना ‘मावशी’ म्हणू लागलो. चांदणी चौकातून गाडी पुण्यात आली आणि भुसारी कॉलनीतील ‘वेस्ट एन्ड’कडे वळाली नाही असे बहुधा कधी घडलेच नाही. चित्रपट करणे हा मावशींच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. कोणीही चित्रपट करतो आहे म्हटले की त्या नेहमीच मदतीला तयार. 

साधारण २०१२ सालची गोष्ट आहे. मी व माझी पत्नी योगिनी पुण्याला मावशींकडे गेलो आणि त्यांना सांगितले, मी एक चित्रपट करतो आहे. कथा ऐकल्यावर ‘निर्माता कोण आहे?’ असे मावशींनी विचारले. निर्माता नसून निर्माती आहे व ती योगिनी आहे समजल्यावर त्या आत जाऊन किल्ल्यांचा जुडगा घेऊन आल्या. आमच्या हातात देत त्या म्हणाल्या, ‘सोमवारातल्या घराच्या आहेत, घेऊन जा. त्यात चित्रपटासाठी लागणारी भरपूर प्रॉपर्टी, कपडे आहेत. तुम्हाला नक्की उपयोगी येतील.’ शूटिंगच्या पहिल्या दिवशी त्या तळेगाव-दाभाडे येथे सदिच्छा देण्यासाठी आल्याचेही मला आठवते. त्यांच्या अनेक तंत्रज्ञांपैकी मी एक होतो, पण मावशींची चित्रपट व चित्रपट करणाऱ्याबद्दल आत्मीयता अगाध होती.

‘कासव’ चित्रपटाच्यावेळी प्रथम संहिता वाचन झाले. त्यानंतर त्या चित्रपटातील व्हिज्युअल्स कशी असतील यावर मावशींनी सर्वांना माहिती दिली. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे रंग कसे असतील, कपडेपट कसा असेल, चित्रपट पाहत असताना कोणते रंग प्रामुख्याने दिसतील, कोणते अजिबात दिसणार नाहीत यावर सखोल चर्चा झाली. चर्चा संपल्यावर मावशींनी माझ्या हातात एक वास्तुकलेचे पुस्तक ठेवले. त्या पुस्तकाच्या काही पानांमध्ये रंगीत कागदाच्या खुणा ठेवल्या होत्या. मी खुणेचे एकेक पान उघडून सुंदर वास्तूंचे फोटो पाहत होतो. ‘कासवसाठी यातला कोणता बंगला चांगला दिसेल? कारण हा चित्रपट जरी डिप्रेशनवर असला तरी यातील व्हिज्युअल्स सुंदरच हवेत.’ आणि आम्ही कोकणात देवगडला निघालो. समुद्रकिनारी असलेला जांभा दगडातला हा बंगला खरोखरच अतिशय सुंदर होता. आम्ही कुठून, कसे शॉट्स घेता येतील, कोणते पात्र कुठे असेल यावर चर्चा केली. बंगला नक्की झाल्यावर कामांची एकंदर घाईच उडाली. कारण चित्रपटात दिसणारी प्रत्येक वस्तू, कपडे हे शूटिंगच्या आधी घरी पाहायचेच असा मावशींचा नियमच होता. हे सर्व पाहत असताना मला असे जाणवले की वस्तू, कपडे यांचे रंग थोडे जास्तच फिकट आहेत. त्यावर मावशींबरोबर चर्चाही झाली, परंतु मावशी अशाच रंगांसाठी आग्रही होत्या. शूटिंग संपले आणि शेवटच्या कलर करेक्शनसाठी आम्ही स्टुडिओत पोहोचलो. नेहमीच्या पद्धतीने मी व कलरिस्टने कलर करेक्शन केले. मावशींनी ते पाहताच ‘अरे यातले रंग कमी करा’ म्हणून ते कमी करायला लावले आणि त्यातून जो परिणाम साधला आहे तो आपण पाहिलेलाच आहे.   

अनेक वर्षांपासून दि. बा. मोकाशींच्या ‘आता आमोद सुनासी आले’ या कथेवर मावशींना चित्रपट करायचा होता. त्याची संहिता लिहून तयार होती, त्यामुळे दरवर्षी उन्हाळा आला की त्यावर चर्चा सुरू होत असे. कारण कथेप्रमाणे हा चित्रपट पावसाच्या काळात शूट करावा लागणार होता. तशी अजून एक संधी २०१८मध्ये आली. माझा टीममध्ये प्रवेश थोडा उशिराच झाला. तोपर्यंत काही लोकेशन्स नक्की झाली होती, काही नक्की होत होती. कथेप्रमाणे संतुवाणी आणि त्याचे मित्र त्याच्याच किराणामालाच्या  दुकानावरच्या पोटमाळ्यावर पोथी वाचायला बसत. सासवडपासून इतरही ठिकाणी किराणामालाचे दुकान व पोटमाळ्यासाठी अनेक जागा पाहिल्या. परंतु त्या जागा मावशींना पसंत नाही पडल्या. मावशींचे साहाय्यक व इतरही काहीजण नवनवीन जागा शोधत होते. त्यातील एकाला मुळशी रोडवर भरेकरवाडी येथे अपेक्षित घर सापडले. आम्ही सर्वजण पाहायला गेलो. जाड भिंतीमधून जाणारा लाकडी जिना, लाकडी फळ्यांनी केलेला, मधे उंच व दोन बाजूला उतरते पत्र्याचे छत असलेला पोटमाळा पाहताच ‘मला संहिता लिहिताना असाच दिसत होता,’ असे मावशी म्हणाल्या आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. 

त्याच गावामध्ये शिवा शेतकऱ्याच्या घराचे लोकेशनही मिळाले. गरीब शेतकऱ्याच्या घरातच छोटासा गोठा हवा होता. गोठ्याची उंची इतकी कमी होती की गोठ्यात उभे राहिले तरी वाकून उभे राहायला लागायचे. पोटमाळ्याची साफसफाई व गोठ्याची डागडुजी करायला साहाय्यक कला-दिग्दर्शकाला सांगून आम्ही परत निघालो. मी मनातल्या मनात कशा पद्धतीने प्रकाशयोजना करता येईल याचा विचार करत असतानाच ‘धनंजय जागा छोटी आहे ना? आणि त्याला उंचीही फारशी नाहीए,’ असे म्हणत मावशींनी माझी तंद्री मोडली. ‘चल पाहूया घरी जाऊन काय करता येईल ते.’ लोकेशन पाहताना त्यांच्यातला कला-दिग्दर्शक विचार करत होता आणि तो विचार पूर्णत्वाला गेल्यावर आता त्यांच्यातला सिनेमॅटोग्राफर जागा झाला होता. मला त्याही परिस्थितीत मावशींचे कौतुक वाटले. त्या कुठेही असे म्हणत नव्हत्या, ‘तो तुझा प्रश्न आहे, सोडव तू.’ ‘हे आपले काम आहे’ ही सांघिक भावनाच त्या जपत होत्या. 

सुब्रतो मित्रांनी (सत्यजीत रे यांचे सिनेमॅटोग्राफर) सांगितलेला एक किस्सा आठवला. ‘चारुलता’ चित्रपटाच्यावेळी त्यांनी एक लोकेशन पाहिले व ते रे यांना पसंत पडले. सुब्रतोंचे म्हणणे होते ती खोली खूपच छोटी आहे, त्यात कॅमेरा व दिवे नेले तर कलाकाराला खोलीत जायला व हालचाल करायला जागाच उरणार नाही. सत्यजित रे आपल्या मतावर ठाम होते, ‘कथेतील पात्रासाठी याच आकाराची खोली योग्य आहे. त्यामुळे काय करता येईल हे आपण पाहू.’ त्यानंतर सुब्रतो मित्रांनी काही बल्ब एका फळीवर लावून कमी जागेत बसणारा दिवा तयार केला होता. घरी पोहोचताच मावशींबरोबर चर्चा करून माझ्या साहाय्यकाला पाठवून छोटे व बॅटरीवर चालणारे दिवे आणले व शूटिंग व्यवस्थित पार पडले. याच चित्रपटात सुरुवातीपासूनच आपल्याला पाऊस दिसत राहतो, जणूकाही पाऊस हे एक पात्रच आहे. त्यासाठी तयारी करताना आम्ही ‘राशोमान’ (अकिरा कुरोसावा) पासून अनेक चित्रपट, लघुपटांचा अभ्यास केला. ‘या सर्व चित्रपटांमध्ये साधलेला पावसाचा परिणाम साधायचा आहे पण वेगळ्या पद्धतीने,’ हा मावशींचा आग्रह पाहिला. टेक्निकल शो झाल्यावर मावशींच्या चेहऱ्यावरचा आनंद, योग्य परिणाम साधल्याची पावतीच होती.

आज ‘भावे स्कूल’चा विद्यार्थी होऊन चित्रपटसृष्टीत काम करतो आहे. मावशींनी बरोबर दिलेली शिदोरी इतकी प्रचंड व अनमोल आहे की रस्ता कितीही अंधारा व खाचखळग्याचा असला, तरी मनात अजिबात भीती नाही. मावशी माझ्यासारख्या अनेक तंत्रज्ञांना तुम्ही नुसते तंत्रज्ञ न मानता क्रिएटिव्ह प्रोसेसचा हिस्सा मानले.

गाडी परत चांदणी चौकातून खाली उतरेल, सवयीने स्टिअरिंग डावीकडे भुसारी कॉलनीकडे वळेल, पण तुम्ही नसाल. शूटिंग परत सुरू होईल, ‘लाइट्स कॅमेरा व ॲक्शन....’ म्हटले जाईल, तेथेही तुम्ही नसाल. तुमचा सतत हसरा चेहेरा आमच्या  समोर असेल, पण We will miss you मावशी!  

 

संबंधित बातम्या