आनंदयात्री विद्या बाळ 

गीताली वि. मं.
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

स्मरण
 

गांधी पुण्यतिथीला ३० जानेवारीला सकाळी विद्या बाळ यांचं दुःखद निधन झालं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि घराघरांत 'आपलं माणूस' गेल्याची भावना दाटून आली. कोण होत्या या विद्या बाळ? 

पुण्यात १२ जानेवारी १९३७ ला जन्मलेली सुधा केळकर शाळेत सतत पहिला नंबर, अव्वल वक्तृत्व, अभिनय, खेळ, नेतृत्व, लेखन यांमुळे आदर्श विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात असे. वयाच्या अठराव्या वर्षी स्वतःच्या शिक्षकांशी प्रेमविवाह करून विद्या बाळ झाली. आदर्श पत्नी, माता, सून, वहिनीच्या पारंपरिक भूमिकेत जगू लागली. या साध्यासुध्या, कर्तव्यदक्ष, आज्ञाधारक गृहिणीचा - गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती ते स्त्रीमुक्ती चळवळीची नेता - महिलांचा आधारवड ते सेलिब्रिटी हा प्रवास मिथक वाटावा असा आहे. हा प्रवास खाच-खळग्यांचा, चढउताराचा आहे. जनसंघाचं घरातलं वातावरण ओलांडून पुरोगामी विचारांच्या तीराला लागणं दमछाक करणारं होतं. पण वाढीच्या वेळा तिनं सोसल्या. विचाराच्या आणि विवेकाच्या कसावर स्वतःला सतत तपासत कृतीचं कणखर पाऊल उचललं आणि नंतर कधी मागं वळून पाहिलं नाही. कार्यकर्तृत्वाची कमान उंचावतच गेली. हे सर्व या गृहिणीला कसं काय जमलं याचं आश्‍चर्य वाटतं. पण त्याबरोबर 'येस आय कॅन...' हा मूलमंत्र गृहिणी-गृहिणीच्या मनात निनादू लागतो आणि विद्या बाळ या घराघरांत 'विद्याताई' होऊन जातात. 

ही चाकोरीबद्ध आज्ञाधारक गृहिणी जेव्हा स्वतंत्रपणे विचार करून बदलायला लागली, तेव्हा पतीबरोबर वैचारिक दरी वाढत गेली. वैवाहिक जीवनात ताण-तणाव आणि असंतोष निर्माण होत गेला. शांत-समंजस-प्रेमळ स्वभावामुळं विद्याताईंनी समजुतीनं घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते अशक्‍य आहे हे कळल्यावर सामाजिक काम, मनःशांती आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी वयाच्या पन्नाशीला कुटुंबजीवनाचा संन्यास घेतला. त्यावेळी दोन मुलगे, एक मुलगी मोठी-जाणती झाली होती. 

लग्नातून निर्माण झालेल्या कुटुंबाचा त्यांनी संन्यास घेतला; पण एका मोठ्या विस्तारित कुटुंबाची - नारी समता मंच, साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ, सखी साऱ्याजणी, अक्षरस्पर्श ग्रंथालय, मिळून साऱ्याजणी मासिक आणि पुरुष उवाच गट यात काम करणारी आणि ज्यांच्यासाठी काम केलं जातं ती सर्व मंडळी या मोठ्या कुटुंबाची धुरा त्यांनी निरलसपणे, अतिशय प्रेमानं अखेरच्या श्‍वासापर्यंत सांभाळली. बुद्धिमत्ता, संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि समंजसपणा या त्यांच्यातल्या अनोख्या मिश्रणामुळं हे शक्‍य झालं. 

विद्याताई साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकरांची नात! लोकमान्यांनंतर केसरीचं संपादकपद त्यांनी सांभाळलं आणि विपुल लेखनही केलं. त्यांच्या सुवर्णमध्याच्या सिद्धांतावर विद्याताईंचा मनोमन विश्‍वास होता. त्यांचा साहित्यिक वारसा जपत विद्याताईंनी दहा-बारा पुस्तकं लिहिली. त्यांनी चाळीस-पन्नास वर्षं मासिकाचं संपादन ज्या सर्जनशीलतेनं केलं, त्यातून त्या किती प्रतिभावान होत्या हे ठळकपणे पुढं येतं. मासिकाचा संपादक हा कप्तान असतो. स्वतःत असणारे वक्तशीरपणा, काटेकोरपणा, पूर्वनियोजन, नीटनेटकेपणा हे गुण कामाच्या ठिकाणी संपूर्ण टीममध्ये असावेत यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. निर्णय प्रक्रियेत सामूहिक जबाबदारी मानून लोकशाहीवादी बिनउतरंडीची स्त्रीवादी कार्यपद्धती, कार्यालयात असावी असा त्यांचा प्रेमाग्रह असायचा. मुख्य प्रवाहात स्त्रियांच्या आवाजाला मर्यादित अवकाश असणाऱ्या काळात ऑगस्ट १९८९ च्या मध्ये त्यांनी स्त्रियांना हक्काचं संवादाचं व्यासपीठ 'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या रूपात मिळवून दिलं. मासिकाच्या सर्वसमावेशक धोरणामुळं मासिकाला वाचकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि चोखंदळ वाचकांची पसंतीही! 

वाचकाला आवाहन करणारी नवनवी सदरं, आकर्षक आणि आशयघन मुखपृष्ठ, संगीत-साहित्य-पत्रकारिता-विज्ञान-लोककला अशा संपन्न सांस्कृतिक जगाचं दर्शन आणि वाचकांना बोलतं करण्याची हातोटी ही 'मिळून साऱ्याजणी'ची वैशिष्ट्यं! दरवर्षी सखोल वैचारिक मंथन घडवणारे, परिसंवादांनी बोलके वाटणारे दिवाळी अंक, तळागाळातल्या महिलांना बोट धरून पुढं आणणं, बोलतं, लिहितं करणं आणि दिग्गज लेखकांनाही मासिकाकडं वळवणं ही अवघड कसरत विद्याताईंनी केली. अशा टोकाच्या जीवनानुभवांना एकत्र गुंफण्याचा हा मार्ग म्हणजे एक आगळी-वेगळी संस्कारदायी चळवळ! संवेदनशीलतेला आवाहन करत, संवादाचा पूल उभारत जाणीवसंपन्न, मूल्यनिष्ठ जगण्याचा पाया बळकट करण्याचा प्रयत्न हे मासिक सातत्यानं करत आलं आहे. संवाद म्हटलं, की त्यात वादही असतोच. 'मिळून साऱ्याजणी'त अनेक विषयांवर वादही झाले आहेत. आपल्या विरोधकांची सविस्तर मतं प्रकाशित करण्याचा मनाचा उमदेपणाही त्यांनी दाखवला. मनामनांच्या अशा आंतरक्रियेतूनच विचारांची जडणघडण होत असते, यावर संपादकांनी विश्‍वास ठेवला. मासिकाचा वाढदिवस म्हणजे मनोरंजन, वैचारिक मेजवानी आणि गाठीभेटींचा हृद्य सोहळा असतो. 

 कार्यकर्ता संपादक म्हणजे काय याचा आदर्श वस्तुपाठ विद्याताईंनी घालून दिला. त्यांचं सारं आयुष्य पुणे शहरात गेलेलं, त्यामुळं ग्रामीण भागातल्या महिलांचे प्रश्‍न कळावेत म्हणून 'ग्रोइंग टुगेदर' हा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. १९८७ ते ९४ या काळात पुण्याजवळच्या काही खेड्यांत त्यांचं जाणं-येणं होतं. त्यातून त्यांना ग्रामीण स्त्रीप्रश्‍न जवळून कळला. ग्रामीण स्त्रियांबरोबरच व्यापक संवाद त्या 'मैतरणी गं मैतरणी' या 'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या संपादकीयमधून करत असत. १९५८ ते ६० या काळात विद्याताई आकाशवाणी पुणे केंद्रात 'गृहिणी' कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या. स्पष्ट उच्चार, आर्जवी-लाघवी भाषा यामुळं त्यांचे विचार घरा-घरांतल्या माणसांच्या मनात पोचले. १९६४-८६ या काळात मासिकात संपादन साहाय्यक ते मुख्य संपादक हा त्यांचा संपादकत्व बहरत जाण्याचा काळ! मुकुंदराव आणि शांताबाई किर्लोस्कर यांच्या शिस्तप्रिय आणि प्रेमळ मार्गदर्शनाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख विद्याताई नेहमी करत. विद्याताईंच्या विवेकी, संवेदनशील आणि सर्वसमावेशक संपादनामुळं स्त्री मासिकाच्या माध्यमातून त्या लाख-दीड लाख वाचकांपर्यंत पोचत होत्या. त्यांच्यामुळं स्त्री मासिकात हळूहळू स्त्री चळवळीनं पुढं आणलेले प्रश्‍न, विचार सामावले जाऊ लागले. असंख्य वाचकांबरोबर अतूट असं भावनिक आणि वैचारिक नातं निर्माण झालं. संपादकीय संवादाला प्रतिसाद देत अनेकजणी जीवनातली घुसमट किंवा अडचणी मोकळेपणानं कधी थोड्या संकोचानं व्यक्त करत. त्यांना आपलेपणानं विद्याताई तत्परतेनं स्वतः पत्र लिहीत. ते एक प्रकारे दुरून फुंकर घालणारं समुपदेशन असे. 

 मात्र पुढं याच्या मर्यादा लक्षात आल्या आणि शब्दांच्या पलीकडं जाऊन कृती करण्याचं ठरवलं, त्यातून १९८२ च्या सुमारास नीलम गोऱ्हे, सत्यरंजन साठे, समर नखाते, वसुधा सरदार, जयदेव गायकवाड आदी विद्याताईंची मित्रमंडळी स्त्री प्रश्‍नासंदर्भात काहीतरी करायला हवं, म्हणून भेटत होती. त्यातून 'नारी समता मंच'ची अनौपचारिक वाटचाल सुरू झाली. १९८७ मध्ये मंचाची अधिकृत नोंदणी झाली. फक्त महिला असणाऱ्या महिलांच्या संघटना असण्याच्या त्या काळात स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन स्त्री-पुरुष समतेचं काम करणं हे या संघटनेचं वैशिष्ट्य होतं. शिक्षित, मध्यम-उच्चमध्यम वर्गातही स्त्रियांवर अन्याय-अत्याचार होतात, हे समाजापुढं आणण्याचं अतिशय महत्त्वाचं पायाभूत काम विद्याताईंनी मंचाच्या सहकाऱ्यांबरोबर करायला सुरुवात केली. स्त्रियांसाठी बोलत्या व्हा केंद्र, अत्याचारविरोधी केंद्र, अडचणीत महिलांना लहानमुलांसहित तात्पुरता निवारा, स्त्रीवादी समुपदेशन केंद्र पुढे २००७ पासून कोंडीत सापडलेल्या पुरुषांसाठी डॉ. सत्यरंजन साठे पुरुष संवाद केंद्र सुरू केलं. पुरुषांना दिलासा देत बोलतं होण्यासाठी हे केंद्र मदत करतं. 

'सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणं खूप महत्त्वाचं,' असं त्या कळकळीनं सांगत. खरी कसोटी मतभेदांच्यावेळी होते. तिथं त्या स्वतःच्या मताशी ठाम राहत शांतपणे समतोल राखू शकत. त्यामुळं त्यांचा विचार टीव्ही चर्चा पाहणाऱ्या लाखो लोकांपर्यंत नीट पोचायचा. स्त्री चळवळीतलं १+१=२ हे नाहीतर ११ हे तत्त्व त्यांनी अक्षरशः खरं करून दाखवलं होतं. 

 स्त्रीवर्ग हा अतिशय विखुरलेला विखंडीत असा आहे. प्रागतिक विचार अशा गटांपर्यंत पोचवणं हे अतिशय जिकिरीचं काम आहे. सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि भौगोलिकदृष्ट्या भिन्न-भिन्न परिस्थितीत आपापल्या कुटुंबात रमणाऱ्या अथवा पिडलेल्या स्त्रियांना स्वातंत्र्य, समता आणि मैत्रभावाचं मूल्य सांगत, विचारांच्या माध्यमातून स्त्रियांचं आत्मभान जागवत त्यांना नैतिक बळ देत मुक्तीची वाट चालण्यासाठी विद्याताईंनी त्यांना प्रेरणा आणि बळ दिलं. स्त्री-पुरुष दोघांबद्दलची एक सहिष्णू, सुसंस्कृत जाणीव त्यांच्या विचारानं समाजाला दिली. 

 'शोध स्वतःचा' या त्यांच्या पुस्तकातून मानवी नातेसंबंधातला व्यवहार कसा असतो, दिसतो त्यातून विचार करण्याजोगं काय काय दिसू शकतं यासंबंधीचे छोटे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले. त्यातले अनुभव अगदी साधे तुम्हा-आम्हाला कुठंही भेटू शकतील असे. या सार्वत्रिक अनुभवांच्या आधारानं वैचारिक घडणीसाठी आवश्‍यक अशा बैठकीपर्यंत पोचणं अधिक सहज आणि सोपं जातं, असं आवाहन त्यांनी वाचकाला केलं.  

 'तुमच्या-माझ्यासाठी' या पुस्तकात स्वगताबरोबर संवाद म्हणजे समतेच्या पातळीवरचं बोलणं कसं गरजेचं आहे, हे अधोरेखित केलं. अनुभवाचा अर्थ लावण्यासाठी ‘का?’ हा प्रश्‍न विचारणं महत्त्वाचं. अनुभवांची देव-घेव झाली तर त्यातून मानवी जीवनाचं एक नवंच परिमाण दिसायला लागतं. पहिलं भांडण स्वतःशी ही बदलाची, परिवर्तनाची सुरुवात! अशा परिवर्तनाची सुरुवात त्यांनी हजारो-लाखोंच्या मनात करून दिली. केवढं अनमोल काम आहे ना हे. 

 विद्याताईंची आणि माझी गेल्या ३५-४० वर्षांची मैत्री. मी तिच्याहून वयानं, कार्यकर्तृत्वानं खूप लहान पण तिला 'ए विद्या' तिच्या विनंतीवरून म्हणायला लागले. तिच्या जीवनप्रवासाची मी एवढी वर्षांची साक्षीदार सखी. १९-२० वर्षांपूर्वी मला बघून उर्मिला पवार म्हणाली, 'तू विद्याची मुलगी का?' नंतर अनेकजण आम्ही दोघी बहिणी-बहिणी असं समजत-मानत होते. आता पाच वर्षांपूर्वी मी डेंचर लावलं. तेव्हापासून अनेकजण माझ्याजवळ येऊन प्रेमानं आणि अतिशय आदरानं बोलायला लागतात, तेव्हा मी त्यांना पहिलं सांगते, मी विद्या बाळ नाही गीताली! नुकत्याच मालेगाव अंमळनेरला भाषण झाल्यावर काही जण म्हणाले, 'तुम्ही त्यांची झेरॉक्‍स आहात, त्यांना भेटल्याचा आणि ऐकल्याचा आम्हाला आनंद झाला.' कुणाचं अंधानुकरण करणं माझ्या रक्तातच नाही, पण स्वत्व राखत तिच्यातल्या गुणांचा माझ्यात असलेला अंश वाढवत नेणं माझ्यासाठी आणि सामाजिक कामासाठी गरजेचं आहे, याची प्रखर जाणीव मला तिच्या जाण्यानंतर झाली आणि आता त्या दिशेनं जाण्याचा मी माझ्यापरीनं प्रयत्न करीन असं आश्‍वासन मी समाजाला देऊ इच्छिते. 

 स्वेच्छा मरणाचा विचार हा सन्मानपूर्वक, समृद्ध आणि स्वावलंबी जगण्याचा विचार आहे. अटळ अशा मृत्यूच्या विचाराशी दोस्ती केल्यानं मन निर्धास्त होतं आणि उत्साहानं निर्भयपणे जगता येतं असं सांगणाऱ्या विद्याच्या मृत्यूनंतर निराश न होता तिनं मागं ठेवलेल्या तिच्या आचार-विचाराच्या प्रकाशाला आनंदानं सक्रियपणे उजाळा देऊया... हीच तिच्या स्मृतीला आदरांजली!

संबंधित बातम्या