अभिनयाची कार्यशाळा 

चेतन कोळी
सोमवार, 18 मे 2020

स्मरण
अभिनेता इरफान खान यांचं निधन सर्वांच्याच मनाला चटका लावून गेलं. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुतापा सिकदर यांनी इरफानला पत्र लिहून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या पत्राचा हा भावानुवाद...

इरफान गेला... तो पुन्हा कधीच परत येणार नाही. पण खरं सांगू, मी काहीच गमावलं नाहीये. त्याच्या जाण्यानं मला खूप काही मिळालंय. तो गेलाय हे खरं, पण जाताना बरंच काही देऊन गेलाय आम्हाला. त्यानं आम्हाला खूप शिकवलं आयुष्यात. ती शिदोरी आता आयुष्यभर उपयोगी पडेल आम्हाला. आता वेळ आलीये त्यानं शिकवलेल्या गोष्टी प्रत्यक्षात अमलात आणण्याची! मी हे माझं वैयक्तिक आणि कौटुंबिक दुःख का बरं समजू? कारण आज लाखो लोकांची मनं दुःखानं व्याकूळ झाली आहेत. इरफान गेल्यामुळं कित्येकांना स्वतःच्या आयुष्यात पोकळी जाणवते आहे. माझ्याबरोबर लाखोंचे डोळे पाणावले आहेत. जणू आपल्याच घरातला कोणीतरी गेलाय असं त्यांना वाटतंय. इरफानचे सर्व चाहते आता आमच्यासाठी आमचे कुटुंबीय आहेत. म्हणूनच तुम्हाला माहीत नसलेल्या काही गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत.

इरफान आमच्यासाठी आजही इथंच आहे. इरफानच्या शब्दांत सांगायचं तर, इट्स मॅजिकल! जीवनाचा एकांगी विचार त्यानं कधीच केला नाही. त्याच्याविषयी तक्रार करायचीच झाली तर मी इतकीच करेन, की त्यानं मला कधीच स्वस्थ बसू दिलं नाही. त्याला नेहमीच परिपूर्णतेचा ध्यास होता. त्यामुळं मीसुद्धा माझ्या कोणत्याही कामानं कधीच संतुष्ट झाले नाही. परिपूर्णत्वाचा इरफानचा अट्टहास माझाही ध्यास झाला. त्याला प्रत्येक गोष्टीत लय जाणवायची, अगदी गोंधळात आणि कोलाहलातही! मीसुद्धा माझ्या बेसुऱ्या आवाजानं आणि बेताल पायांनी ती लय जपण्याचा प्रयत्न केला. एका अनपेक्षित वळणावर तो आगंतुक त्याच्या आयुष्यात आला आणि आयुष्य खूपच कर्कश्श झालं; तरी त्यानं ती लय हरवली नाही. मीसुद्धा त्या उद्ध्वस्ततेमध्ये लय जपण्यात आता सरावले होते. आमचं आयुष्य म्हणजे अभिनयाची कार्यशाळाच झाली होती. डॉक्टर्सनी माझ्या हाती दिलेले रिपोर्ट्स म्हणजे जणू इरफानसाठी लिहिलेलं स्क्रिप्ट असायचं. इरफाननं माझ्यात मुरवलेल्या परिपूर्णत्वाच्या ध्यासामुळं मी या स्क्रिप्टमधले बारकावे एव्हाना टिपू लागले होते.

या प्रवासात खूप मोठी माणसं भेटली मला. त्यांच्या नावाची यादी खूप लांबलचक होईल. पण हो, काहींचा उल्लेख नाही केला, तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. आमचे आँकॉलॉजिस्ट डॉ. निलेश रोहितगी (मॅक्स हॉस्पिटल, साकेत) यांनी सुरुवातीच्या त्या वादळी दिवसांत आम्हाला खूप धीर दिला. डॉ. डॅन क्रेल (यू.के.), डॉ. शिद्रवी (यू.के.) यांचे आभार मी कोणत्या शब्दांत मांडू! कोकिलाबेन हॉस्पिटलच्या डॉ. शेवंती लिमये यांच्याविषयी मी काय सांगू! त्या माझ्यासाठी गडद अंधारातला जणू लामणदिवा होत्या. त्यांच्याशी आता हृदयाचे बंध जुळले आहेत ते कायमचेच. हा प्रवास किती विलक्षण होता! एकाच वेळी तो सुंदरही होता आणि तीव्र वेदनादायीही; कधी रोमांचक होता तर बऱ्याचदा विव्हळ करणारा! ही अडीच वर्षं म्हणजे आमच्या आयुष्यातलं मध्यांतर होतं. पण गंमत म्हणजे या मध्यांतरालाही स्वतःचा आरंभ, मध्य आणि परमोच्च बिंदू आहे. अर्थात, इरफानच या ऑर्केस्ट्राचा मुख्य सूत्रधार होता. पस्तीस वर्षांचं आमचं सहजीवन. पण खरं तर तो तथाकथित संसार कधीच नव्हता; ती पस्तीस वर्षांची एकतानता होती, एकरूपता होती.

आमची आयुष्यनौका पुढं जात होती. आमची दोन मुलं - बाबिल आणि अयान - ही नौका पुढे नेत होते. वहाँ नहीं, यहाँ से मुडो... इरफानचा वेळोवेळी मिळणारा सल्ला त्या दोघांना दिशा देत होता. पण आयुष्य हे काही सिनेमासारखं नसतं. यात रिटेकही नसतात. माझी मुलं त्यांच्या वडिलांच्या शिकवणीप्रमाणं पुढचा प्रवास करतील आणि येणाऱ्या वादळांनाही समर्थपणे पेलतील, असं मला वाटतं. मी मुलांना म्हणाले, तुमच्या वडिलांनी जे काही शिकवलंय त्याचं सार तुमच्या शब्दांत मांडा.

बाबिल म्हणाला, वडिलांचं एक वाक्य माझ्या नेहमीच लक्षात राहील. ते म्हणायचे, नियती क्षणाक्षणाला अनिश्‍चिततेचं नृत्य करत असते. त्या नृत्याला शरण जा आणि स्वतःवर विश्‍वास ठेव.

अयान म्हणाला, वडिलांनी सांगितलंय - मनावर ताबा मिळवायला शिक. मनाला तुझा ताबा कधीच घेऊ देऊ नकोस.

या प्रवासात इरफान जिंकलाय आणि आता जिथं तो चिरनिद्रा घेतोय, तिथं त्याच्या आवडत्या रातराणीचं रोपटं लावताना आम्हाला अश्रू अनावर होणार आहेत. ही रातराणी फुलायला थोडा वेळ नक्कीच लागेल, पण तिच्या सुगंधानं इरफानच्या चाहत्यांची म्हणजेच माझ्या कुटुंबीयांची अंतरंगं येणाऱ्या कित्येक वर्षांपर्यंत दरवळतील, हे नक्की!

संबंधित बातम्या