भूमिकांचे सोने करणारा कलावंत

पूजा सामंत
सोमवार, 11 मे 2020

स्मरण
 

त्याच्या चाहत्यांना एक कलंदर अभिनेता दुःखाच्या खाईत लोटून गेला. २९ एप्रिल रोजी इरफान खानच्या निधनाची अतिशय काळीकुट्ट बातमी टीव्हीवर झळकली. २०१८ मध्ये इरफानने स्वतः ट्विट करून त्याला ‘इंडोक्राइन ट्युमर’ (कॅन्सर) झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोन वर्षे पूर्ण होण्याआधीच हा ‘वॉरियर’ त्याच्या मृत्यूशी दोन हात करत अखेर काळाच्या पडद्याआड गेला!

राजस्थानच्या जयपूरजवळ असलेल्या टोंक येथे ७ जानेवारी १९६७ रोजी साहेबजादे इरफान अली खान याचा जन्म झाला. इरफानला खरे म्हणजे क्रिकेटपटू व्हायचे होते. पण क्रिकेट शिकण्यासाठी लागणारा पैसा नसल्याने त्याने क्रिकेटमध्ये करिअर करणे टाळले. आपल्या बहिणीबरोबर तो जयपूर रेडिओ स्टेशन्सचे कार्यक्रम ऐकत असे, ज्यात कथा, एकांकिका, नाट्यवाचन या गोष्टींनी त्याच्यावर मोहिनी घातली. त्याच्या अम्मी-अब्बूंना त्याचे अभिनयाचे भूत पसंत नव्हते. पण तरीही पुढे वडिलांचे मन वळवून त्याने अभिनयात जाण्याचा निर्धार पक्का केला. नसीरुद्दीन शाह, मिथुन चक्रवर्ती हे त्याची प्रेरणा होते. मला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, ‘हिरो न सही, चरित्र कलाकार का रोल तो मिलेगा।’ म्हणूनच तो सिनेमात आला! ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभिनयाचा कोर्स केलेला हा कलावंत फक्त स्वबळावर, स्वप्रतिभेवर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये स्वतःची असीम छाप सोडून गेला हे एक ठळक सत्य आहे. अभिनय वंश परंपरेनेच येतो हा समज इरफानने चुकीचा असल्याचे सिद्ध केले. इरफानच्या वाटेला प्रचंड संघर्ष आला. त्याची पूर्वी क्लासमेट असलेली व नंतर पत्नी झालेली सूतापा हिची त्याला नेहमीच साथ मिळाली. सूतापा, माझी दोन्ही मुले, माझी अम्मी यांच्या सुखात माझे सुख आहे, असे तो म्हणायचा. अभिनयासाठी पारंपरिक मोजमाप असलेल्या उठावदार व्यक्तिमत्वाच्या ठराविक चौकटीत अभिनेता इरफान खान कधीही नव्हता. स्टारडम, ग्लॅमर, २०० करोड क्लब, बॉक्स ऑफिस सक्सेस या ठराविक चाकोरीत इरफान अडकला नाही. चर्चेत राहण्यासाठी त्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत. त्याच्या अभिनयाची आरंभी दखल घेतली गेली नाही. त्याचे अस्तित्व असून नसल्यासारखे होते. तब्बल १०-१२ वर्षे ‘गुमनामी’च्या छायेत काढल्यानंतर इरफानचा अभिनय आणि चेहरा लक्षात येऊ लागले. पानसिंग तोमर या सिनेमाने इरफानला राष्ट्रिय पुरस्कार मिळवून दिला. हैदर, मकबूल, हिंदी मीडियम, लाइफ इन अ मेट्रो, बिल्लू अशा अनेक हिंदी सिनेमांत इरफानने त्याच्या कसदार अभिनयाची चुणूक दाखवली. निगेटिव्ह-पॉझिटिव्ह, कॉमेडी अशा सगळ्या शेड्समध्ये तो अव्वल आहे हेही सिद्ध केले. अभिनयाची परंपरा अजिबात लाभली नसताना हॉलिवूडमध्ये नेमसेक, स्लमडॉग मिलेनियर, लाइफ ऑफ पाय, वॉरियर, अमेझिंग स्पायडरमॅन, ज्युरासिक वर्ल्डसारखे चित्रपट त्याने केले आणि तिथेही त्याचे अभिनयाचे नाणे खणखणीत आहे हे सिद्ध केले. उत्तम अभिनेता असलेल्या इरफान खानने स्वतःच्या वाट्याला आलेल्या भूमिकांचे सोने केले. ‘द वॉरियर’ या फिल्मद्वारे अनिवासी भारतीय दिग्दर्शकाने इरफान खानकडे समस्त बॉलिवूडकरांचे लक्ष वेधून घेतले! त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करता यावी अशी अनेक कलावंतांची इच्छा होती. पण त्याने मात्र सगळ्यांना गुडबाय केले! त्याचे असे जाणे अनपेक्षित नव्हते, पण इतक्या लवकर नक्कीच अपेक्षित नव्हते!

इरफानमध्ये अजिबात अभिनिवेश नसायचा, मोजके बोलायचा पण मनापासून! त्याच्या बोलण्यात अभिनय नव्हता, साधेपणा-सच्चेपणा सहज जाणवायचा. नंतरच्या काळात पद्मश्री पुरस्कार, मग हॉलिवूड स्टार ही ओळख मिळूनही तो मनाने साधा-सामान्य राहिला. त्याला स्टारडम मिळूनही त्या स्टारडमची हवा त्याच्या डोक्यात कधी भिनली नाही, हे त्याचे वैशिष्ट्य. तो ज्या व्यक्तिरेखा साकारत गेला, त्या त्या भूमिकांसाठी तो जन्माला आलाय असे वाटून गेले. ‘नेमसेक’ या सिनेमातील ‘अशोक गांगुली’ ही व्यक्तिरेखा मला जमणारी नाही असे त्याने मीरा नायरला स्पष्टपणे सांगितले होते. अशोक गांगुलीशी मी अजिबात रिलेट करू शकत नाही, त्यामुळे अन्य कलाकाराचा विचार केला जावा हे सांगणारा इरफान, माणूस आणि कलावंत म्हणून इतरांपेक्षा वेगळा होता. भूमिका कितपत आवडते, त्याचे बेअरिंग झेपेल अथवा नाही याचा विचार न करता डोळे झाकून भूमिका करणाऱ्या कलावंताच्या भाऊगर्दीत इरफान खानसारखे सडेतोड कलाकार दुर्मीळच! अलीकडे मात्र नवाझुद्दीन सिद्दकीशी होणारी स्वतःची तुलना त्याच्या पचनी पडत नव्हती. त्याचा चेहरा त्रासिक व्हायचा. 

पंचवीस एप्रिल रोजी सईदा बेगम, इरफानच्या अम्मीचे जयपूर टोंकला वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईत कर्करोगाने तब्येत ढासळल्यामुळे आणि लॉकडाऊनमुळे अम्मीला भेटणे, अंत्यसमयी तिचे दर्शन घेणेदेखील या ‘मकबूलला’ शक्य झाले नाही. कॅन्सरशी कडवी झुंज देऊन आधीच शरीराने थकलेल्या इरफानला अम्मीची एक्झिट जिव्हारी लागली. अवघ्या चारच दिवसांत इरफान अम्मीला भेटायला गेला. रमझानच्या पवित्र महिन्यात माय-लेकरांना ‘जन्नत’ मिळाली! त्याच्या सिनेमांचा-स्मृतींचा गुंजारव मसाला चहासारखा कायम गंध देत राहील!

संबंधित बातम्या