चितळे पॅटर्न राबवणारे काकासाहेब

संपत मोरे
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

स्मरण
 

आजीचा दिवस भल्या पहाटं सुरू व्हायचा. म्हशीची धार काढून आल्यावर ती मला उठवायची. उठवून चहा मिसळलेलं दूध प्यायला लावायची. तिची कामाची धावपळ सुरू असायची. गुरुवार असायचा त्यादिवशी ती खूश असायची. गुरुवारी दुधाचा पगार व्हायचा. ती म्हणायची, 'आज बेस्तरवार हाय. दुधाचा पगार मिळंल.' रोज घरातलं कुणीही दूध घालायला जात असलं, तरी गुरुवारी मात्र आजीच जायची. त्याचदिवशी गावचा बाजार असायचा. दुधाचे पैसे मिळाल्यावरच बाजार भरलेला दिसायचा.

काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना पगार मिळाला पाहिजे अशी एक रास्त मागणी आली होती. पण या मागणीच्या अगोदरच आमच्या भागात दुधाच्या पैशाला 'पगार' म्हणायची प्रथा पडली होती. नोकरी न करणाऱ्या शेतकऱ्यांना तो पगार वाटायचा आणि तो पगार वाटावा अशी त्यात नियमितता होती. 'काहीही होवो पगार गुरुवारी मिळणार म्हणजे मिळणार' ही शिस्त काकासाहेब चितळे यांनी घालून दिली होती.

रानात गुरं घेऊन गेल्यावर आपल्या गुरांना चांगला चारा मिळाला पाहिजे असा आम्हा सगळ्याच पोरांचा प्रयत्न असायचा. ज्या बांधावर जास्त गवत असंल, तिथं आपली जनावरं घेऊन जायचं. ज्या माळाला गवत असेल, तिथं सगळ्यांच्या अगोदर गुरं नेऊन चारायची अशी स्पर्धा होती. गुरांनी विशेषतः दुभत्या जनावरांनी जास्त चांगलं चुंगलं खाल्लं पाहिजे यावर आमचा भर असायचा. कारण हीच जनावरं दूध द्यायची आणि त्या दुधातूनच आम्हाला पैसे मिळायचे हीच आम्हा शाळकरी पोरांची समज होती. आपलं दूध ज्यांच्याकडं जातं तो चितळे नावाचा माणूस खूप भला वाटायचा. कारण दर गुरुवारी तो पैसे पाठवायचा. पैसे घरात आले, की वातावरण बदलायचं. गुरुवार हाच आमच्या शेतकरी कुटुंबातील चांगला वार वाटायचा. गावातला दूधवाला दूध गोळा करतो. ते दूध न्यायला चितळेंचा ट्रक येतो, पण त्या दुधाचं पुढं काय केलं जातं? हे कळण्याचं वय नव्हतं. मात्र, दर गुरुवारी पगार देणाऱ्या चितळेंबद्दल एक दिवस आजोबांना विचारलं, ''चितळे कुठं राहतो?'' ''भिलवडीत'' एवढंच उत्तर मिळालं. मग चितळे यांचा दुधाचा टँकर बघितला, की हमखास चितळे यांची आणि गुरुवारची आठवण यायची. त्या काळात त्यांना जाऊन बघण्याची इच्छा व्हायची, पण तेव्हा आम्ही गावाच्या शिवाही ओलांडल्या नव्हत्या. एवढे लहान होतो आम्ही.  नंतरच्या काळात चितळेंना समजून घेता आलं. चितळे हा एक पॅटर्न आहे. शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय? हे चितळेंच्या कुटुंबाची कथा समजून घेताना लक्षात येतं. आज चितळे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ती चितळे मिठाईची प्रशस्त दुकानं. चितळे हा आता एक ब्रँड झाला आहे, मात्र कधीकाळी चितळे बंधूंनी सायकलीवरून दूध गोळा केलं होतं. गावोगावी फिरून दूध गोळा करणाऱ्या चितळेंनी आपल्या कष्टाच्या जोरावर चितळे उद्योगसमूह उभा केला आणि वाढवलाही. कठोर परिश्रम, सचोटी, लोकाभिमुखता ही त्यांची वैशिष्ट्यं होती.

चितळे आणि वक्तशीरपणा यांचं एकच उदाहरण म्हणजे गेल्या वीस वर्षांपूर्वी चितळेंची दुधाची गाडी रस्त्यावरून गेली, की लोक म्हणायचे 'चार वाजले, साडेचार वाजले.' ज्या गावात ती गाडी रोज ज्यावेळेला पोचायची, त्यात अजिबात बदल होत नव्हता. चितळेंची गाडी हेच घड्याळ नसलेल्या रानामाळात राबणाऱ्या लोकांचं घड्याळ झालं होतं. यावरून चितळे उद्योगसमूहाच्या वक्तशीरपणाची कल्पना यावी. काकासाहेब चितळे यांच्यासारखा माणूस फक्त उद्योजक म्हणून समाजात कधी वावरला नाही. त्यांच्यात एक कार्यकर्ता दडलेला होता. हा कार्यकर्ता सतत दिसायचा. अवघ्या उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला हा माणूस आपल्या गावाला कधीही विसरला नाही. एका बाजूला उद्योगपती असलेल्या काकासाहेब चितळे यांनी गावकऱ्यांची भूमिका सक्षमपणे पार पाडली. त्यांच्या भिलवडी गावातील कोणताही माणूस त्यांना सहज भेटत होता, आपल्या अडचणी सांगू शकत होता. गावात ते गावकऱ्यासारखेच राहिले. गावातील कोणत्याही उपक्रमात ते अग्रभागी असायचे. ग्रामस्वच्छता अभियानाच्या चळवळीपासून ते अगदी वाचन चळवळीपर्यंत त्यांचा सहभाग असायचा. चांगले उपक्रम आणि चांगली पुस्तके यांच्याबद्दल ते भरभरून बोलायचे. काकासाहेब जसे त्यांच्या घरच्या लोकांना आपले वाटायचे तसे कृष्णाकाठच्याच नाही, तर ज्या ज्या गावात चितळेंची शाखा आहे, ज्या गावात त्यांचा टँकर दूध गोळा करायला जातो, त्या प्रत्येक गावातील माणसाला काका आपले वाटत होते. त्यांचा आधार वाटत होता. महापूर आला तेव्हा सगळ्यांना धीर देणारे काका मी पाहिले आहेत.

उद्योग करणारे तरुण पुढं आले पाहिजेत असं काकांना नेहमी वाटायचं. त्यामुळं एखादा त्यासाठी मदत मागायला आला, तर काका त्याला भांडवल द्यायचेच, पण त्याच्या उद्योगाच्या उद्‌घाटनालाही जायचे. त्याला प्रोत्साहन द्यायचे. अशा अनेक छोट्या व्यावसायिकांना उभं राहण्यासाठी काकांसाहेबांनी मदत केली.
चितळेंनी उद्योग क्षेत्रात भरारी मारताना त्यांच्यातील संवेदनशीलता तितकीच जागृत ठेवली. त्यामुळं एखाद्याच्या सुखात प्रत्येकवेळी जाणं त्यांना जमलं नसेल, पंण दुःखात ते नेहमी लोकांसोबत राहिले. एवढ्या मोठ्या व्यापातूनसुद्धा त्यांनी आपलं गाव, कृष्णाकाठ यांच्याशी अखेरपर्यंत आपली नाळ जोडून ठेवली.   

संबंधित बातम्या