नाट्यक्षेत्रातील ‘मनोहर’ प्रयोग

विनायक लिमये    
सोमवार, 11 मे 2020

स्मरण
नाट्यक्षेत्रासारख्या बेभरवशी क्षेत्रात सगळे काही अस्थिर असताना ‘मनोरंजन’च्या माध्यमातून मनोहर कुलकर्णी यांनी स्थिर, आश्‍वासक अशी कामगिरी करून अनेकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या साठ वर्षांच्या कामाला सलामच केला पाहिजे. कुलकर्णी यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्याविषयी... 

क्रिकेट, चित्रपट आणि नाट्यक्षेत्र या तीन क्षेत्रांत एक मोठे साम्य आहे, ते म्हणजे अस्थिरता. अशा परिस्थितीत मनोहर कुलकर्णी नावाचा माणूस हौशी, प्रायोगिक आणि पूर्णपणे व्यावसायिक अशा तिन्ही प्रकारच्या नाट्यसंस्थांसाठी एक आधारस्तंभ ठरतो हे थक्क करणारे आहे. आपल्या कामातून त्यांनी या बेभरवशी जगात प्रत्येक रंगकर्मीला आधार वाटेल, प्रोत्साहन मिळेल असे काम केले आहे. मनोहर कुलकर्णी यांनी ‘मनोरंजन’ संस्थेच्या रूपात आजच्या भाषेत विश्‍वसनीय ‘ब्रँड’ उभा केला. मनोहर कुलकर्णी यांना सगळे ‘अण्णा’ म्हणत. 

मनोहरपंत ऊर्फ अण्णांनी ‘आरएमएस’ या टपाल विभागाच्या नोकरीत असताना नाट्यक्षेत्रात प्रवेश केला. १९५० मध्ये त्यांनी नाट्यसंस्थांमध्ये नट म्हणून तर काहीवेळा बॅकस्टेजचे काम केले. सरस्वती मंदिर ही संस्था अण्णांच्या कामाची सुरुवात ठरली. पण खरे काम १९६१ मध्ये सुरू झाले. त्यावेळी नूमवि आणि भावे स्कूलमध्ये खुल्या रंगमंचावर वासंतिक महोत्सवाचे आयोजन केले जात असे. चारुदत्त सरपोतदार, चित्तरंजन कोल्हटकर आणि भालचंद्र पेंढारकर या तिघांनी या महोत्सवाची सुरुवात केली होती. या थिएटरला बहुरूपी रंगमंदिर म्हणत. अण्णांनी याचे व्यवस्थापन नेमकपणाने सांभाळले. याच काळात त्यांना नाना रायरीकर यांची साथ लाभली. १९६१ ते ७० हे दशक अण्णांचे अनुभव घेण्याचे आणि नाट्यक्षेत्रातील सर्व अंगांचा सखोल अभ्यास करणारे ठरले. १९७० मध्ये अण्णांनी नाना रायरीकर व मु. रा. तथा डॅडी लोणकर यांच्या सहकार्याने ‘मनोरंजन’ संस्थेची स्थापना केली. नाटक उभे राहण्यासाठी जे जे लागेल ते सर्व उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अण्णांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून उचलली. त्या काळात पुण्यातही बालगंधर्व, भरत, टिळक ही बंदिस्त नाट्यगृहे उभारली गेली होती. नाट्यसृष्टीचा तो बहराचा कालखंड होता. दिवंगत नाट्यसमीक्षक गो. रा. जोशी नेहमी बोलताना मराठी नाट्यक्षेत्राला ‘केशराचं शेत’ संबोधत. या केशरनिर्मितीत अण्णा पडद्यामागे सर्व गोष्टींत खंबीरपणे उभे राहत. नेपथ्य, नाट्यगृहाच्या तारखा घेणे, कलाकारांची प्रवास - निवास - भोजन व्यवस्था, मेकअप ड्रेपरीवाल्या मंडळींचा समन्वय, तिकीट छपाई, तिकीट विक्री, नाटकाची जाहिरात, त्याची प्रसिद्धी अशी पडद्यामागची पन्नास कामे अण्णा ‘मनोरंजन’च्या माध्यमातून करत होते. हौशी व प्रायोगिक नाट्यसंस्थांना अण्णांनी इतक्‍या नगण्य दरात नेपथ्याचे सामान भाड्याने दिले आहे, की काहीवेळा ते सामान आणणे आणि नेणे याचा खर्च जास्त झालेला असे. नाटकाबद्दलची सच्ची तळमळ आणि त्यासाठी पडेल ते कष्ट घेण्याची वृत्ती यामुळे प्रसंगी अण्णांनी त्या काळात नाटकाची जाहिरात करणारे कापडी बोर्ड स्वतः रंगवले आहेत. 

अण्णांमध्ये कला होती, कुठलेही काम अडू द्यायचे नाही हा बाणा होता. नाटकाचा प्रयोग वेळेवर सुरू होण्यासाठी आधी सगळ्यांचा समन्वय नेमका असावा लागतो, प्रयोगाची वेळ चुकून चालत नाही. रोजच नवी समस्या आणि नव्या अडचणी येत. नाटकाच्या प्रयोगासाठी पोलिस परवाना तसेच अन्य कामे अण्णांची टीम लीलया करत असे. त्यामागे अण्णांनी घालून दिलेली घडी व कामाची पद्धत महत्त्वाची होती. कुठल्याही मॅनेजमेंट स्कूलमध्ये शिकवली जाणार नाहीत अशी मॅनेजमेंटची टेक्‍निक्स अण्णांनी आपल्या टीमला शिकवली. यामध्ये आपला मुलगा मोहन आणि नानांचा मुलगा शिरीष (रायरीकर) या दोघांनाही आयुष्यभर शिदोरी ठरेल असे व्यवस्थापनाचे धडे दिले. काम करणारी ‘मनोरंजन’ ही त्या काळात एकमेव संस्था संपूर्ण राज्यात होती. आजही अशा सर्व सेवा देणारी व त्याही एका छत्राखाली देणारी संस्था मुंबईतही नाही. 

पुण्यातल्या अनेक संस्था मग पीडीए असो, की थिएटर ॲकॅडमी असो; या संस्थांच्या नाट्यप्रयोगाच्या तालमींवेळी अण्णा स्वतः हजर असत. दिग्दर्शकांशी चर्चा करून नेपथ्य तयार केले जाई, त्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ‘तू वेडा कुंभार’, ‘सती’, ‘जगन्नाथाचा रथ’, ‘खेळिया’, ‘महानिर्वाण’ अशा नाटकांच्या नेपथ्यांच्या कामात अण्णांनी केवळ वेळ दिला असे नाही तर आर्थिक झळही सोसली. राज्यातील अनेक छोट्या-मोठ्या नाट्यसंस्थांना, हौशी ग्रुप्सना पुण्यातील मनोरंजन संस्था व अण्णा हे हक्काचे व जिव्हाळ्याचे वाटत. अण्णांनी आपल्या व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर मुंबईतील ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ आणि ‘ललितकलादर्श’ या दोन संस्थांच्या प्रयोगांच्या व्यवस्थापनाचे काम केले. ‘ललितकलादर्श’ या संस्थेच्या नाटकाचे संपूर्ण भारतात प्रयोग झाले. त्याचे चोख नियोजन अण्णांनी संगणक आणि मोबाइल नसतानाच्या कालखंडात अत्यंत बिनचूक पद्धतीने केले. अण्णा नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी सगळ्या नाट्यनिर्मात्यांना आवाहन करून प्रत्येक प्रयोगाला ५ रुपये देणगी देण्यास सांगितले. या छोट्या उपक्रमातून त्यांनी परिषदेला ५० हजार रुपये उभे करून दिले. सातत्य, चिकाटी आणि उपक्रमशीलता त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिली. अण्णांनी ‘नट’ म्हणून ‘अश्रूंची झाली फुले’मध्ये प्रा. विद्यानंद, ‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये डॉ. सतीश, ‘उद्याचा संसार’मध्ये डॉ. गौतम, ‘लग्नाची बेडी’मध्ये पराग अशा महत्त्वाच्या भूमिका केल्या. ‘जावई माझा भला’ आणि ‘पांडू हवालदार’ या दोन चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. नाट्यनिर्माता या भूमिकेत ते शिरले तेव्हा श्रीराम लागू यांची प्रमुख भूमिका असलेले ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे प्रायोगिक नाटक त्यांनी अतुल पेठे आणि त्यांचा ग्रुप यांच्या सहकार्याने व्यावसायिक रंगभूमीवर तितक्‍याच ताकदीने सादर केले. ‘उजळल्या दिशा’सारख्या वेगळ्या विषयावरच्या नाटकाची निर्मिती केली. 

‘नाटक’ हा ‘धंदा’ नाही, हा ‘व्यवसाय’ आहे. तो एक धर्म म्हणून त्यांनी केला, पण ते करताना त्यांनी भोंगळपणाला साथ न देता गुणवत्तेची व परिपूर्णतेची कास धरली. प्रसिद्धी आणि पैशासाठी त्यांनी शॉर्टकट अवलंबला नाही. पदरमोड करून आर्थिक झळ सोसून अनेक निर्मात्यांना व रंगकर्मींना त्यांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे पुरस्कार आणि संपदा त्यांच्याकडे आली. ‘नाट्यदर्पण’चा पुरस्कार तर मिळालाच पण राज्य सरकारकडूनही त्यांचा विशेष गौरव झाला. पुणे महापालिकेच्या अत्यंत मानाच्या बालगंधर्व पुरस्कारासह एकूण १६ पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. 'रंगभूमी' हेच आपले तीर्थक्षेत्र मानून ते कार्य करत राहिले. त्यामुळे ‘घाशीराम कोतवाल’ला पुण्यात प्रचंड विरोध असताना ते या नाटकाच्या पाठिराख्यांमध्ये होते. त्यापेक्षा ते खंबीरपणे उभे राहिले होते ते सारंग दांपत्याच्या पाठीमागे. ‘सखाराम बाईंडर’च्या प्रयोगावेळी आंदोलने, निदर्शने अशा अनेक गोष्टींचा कमलाकर सारंग व लालन सारंग यांना त्रास झाला. त्यावेळी पुण्यात या नाटकांचे प्रयोग होण्यासाठी अण्णांनी संपूर्ण सहकार्य केले. विरोध करणाऱ्या संघटना, पक्ष त्यांचे पुढारी यांच्याशी बोलणे, मार्ग काढणे यात अण्णा पुढे असत. 

‘मनोरंजन’चे काम त्यांनी मोहन म्हणजे मुलाकडे सोपवले आहे. नात इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहे. एकूण आपल्या व्यवस्थापन कौशल्याची परंपरा तयार झाली हे पाहत त्यांनी निवृत्ती घेतली होती, पण काम सुरू होते. वृत्तपत्रात एखादी नाटकाबद्दलची चुकीची बातमी किंवा चुकीचा संदर्भ आला तर संबंधित वृत्तपत्रात फोन करून ते त्याबाबत सूचना करत, योग्य संदर्भ व अचूक माहिती देत असत. वयाची ८० वर्षे ओलांडली तरी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला हजेरी लावत असत. त्या मंडळींनाही अण्णांच्या मताची प्रतीक्षा असे. नाट्यक्षेत्रातील व्यवस्थापन, नेपथ्य, प्रसिद्धी आणि नाट्यचळवळ अशा विविध विभागात ते कुठलाही वाद न घालता काम करत राहिले. पुढारपणाची, मिरवण्याची पदे मिळवण्याची अपेक्षा न बाळगता संस्थात्मक कामे ते करत राहिले. आपल्यातला रंगकर्मी त्यांनी कधी मरू दिला नाही. त्यामुळे व्यावसायिक रंगभूमीतील अनेकांना जसे ते जवळचे वाटत राहिले, तसे कामगार, बाल रंगभूमीवरच्या अनेकांनाही ते आपला आधार वाटत राहिले. 

नाट्यक्षेत्रातला हा ‘मनोहर’ प्रयोग होता. या प्रयोगाने सगळ्यांना केवळ आनंदच दिला. त्याचबरोबर आपल्या कृतीतून आपल्या कामावरची निष्ठा व सातत्य काय असते ते शिकवले. पुणे हे शहर एखाद्या कार्यासाठी वाहून घेणाऱ्या संस्थांचे व त्यात एक मिशन म्हणून काम करणाऱ्या लोकांचे म्हणून ओळखले जाते. इथे अशा अनेक संस्था व मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या. पुण्याच्या नाट्यक्षेत्रात ‘मनोहर कुलकर्णी’ ऊर्फ ‘अण्णा’ असेच एक व्यक्तिमत्त्व होते. ते म्हणजे चालतीबोलती संस्थाच होते. प्रसिद्धीच्या, लोकप्रियतेच्या आणि पैशाच्या या मोहमयी क्षेत्रात नाव मिळवणे, हे अळवावरच्या पाण्यासारखे असते. पाणी कधी ओघळेल हे कुणालाच सांगता येत नाही. अण्णांचे तसे नव्हते. उलट, त्यांनी आपल्या कामातून अळवावरचा टपोरा तेजस्वी मोती वाटावे असे काम केले. पुण्याच्या नाट्यक्षेत्राचा इतिहास लिहिताना ‘मनोहर कुलकर्णी’ आणि ‘मनोरंजन’ यांचा उल्लेख केल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही, इतके अण्णांचे कर्तृत्व आणि नेतृत्व आहे.

संबंधित बातम्या